On the day of Omkar Dixit and Monalisa Baagal's 'Parfum' will be displayed | ​ओंकार दीक्षित आणि मोनालिसा बागल यांचा 'परफ्युम' होणार या दिवशी प्रदर्शित

मराठी चित्रपटांची नावे जर आपण पाहिलीत तर ती नक्कीच एकदम इंटरेस्टींग असतात. सध्या काळानुरुप मराठी चित्रपट बदलला आणि आता तशीच हटके नावे सुद्धा सिनेमाची येऊ लागली आहेत. नावात काय आहे असे जरी म्हटले असले तरी सिनेमांच्या बाबतीत मात्र तसे नाही. कारण चित्रपटाच्या नावात बरेच काही दडलेले असते. तर एखादया चित्रपटाच्या नावावरूनच तो सिनेमा पाहायला जाण्याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये निर्माण झालेली पाहायला मिळते. आता हेच पाहा ना परफ्युम हा चित्रपट त्यापैकीच आहे. उत्तम कलाकारांचा समावेश असलेला हा परफ्युम सप्टेंबरमध्ये दरवळणार आहे. ओंकार दीक्षित आणि मोनालिसा बागल ही नवी जोडी या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर झळकणार आहे.
एचआर फिल्म डॉमच्या डॉ. हेमंत दीक्षित आणि ओंकार दीक्षित यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे तर हलाल सारख्या गाजलेल्या चित्रपटाची निर्मिती केलेल्या तसेच आगामी लेथ जोशी चित्रपटाची प्रस्तुती करणाऱ्या अमोल कागणे स्टुडिओजचे अमोल कागणे आणि लक्ष्मण कागणे यांनीच परफ्युमची प्रस्तुती केली आहे. दिग्दर्शक आणि कॅमेरामन म्हणून करण तांदळे यांनी काम पाहिले आहे. ओंकार आणि मोनालिसासह अभिनेता चिन्मय मांडलेकर, अभिजित चव्हाण, सयाजी शिंदे, अनिल नगरकर, कमलेश सावंत, भाग्यश्री न्हालवे असे उत्तम आणि अनुभवी कलाकारही या चित्रपटात आहेत. 
परफ्युम असे सुवासिक नाव असलेला हा चित्रपट प्रेक्षकांना आनंद देण्यासाठी सज्ज झाला आहे. नावामुळे या चित्रपटाच्या कथानकाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहेच. मात्र चित्रपटाविषयी अधिक माहितीसाठी अजून थोडीच वाट पाहावी लागणार असून सप्टेंबर महिन्यात हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
चिन्मय मांडलेकरने हलाल या चित्रपटात देखील काम केले होते. चिन्मयचा फर्जंद आणि मस्का हे दोन्ही चित्रपट सध्या प्रेक्षकांचे मन जिंकत असून या दोन्ही चित्रपटातील त्यांच्या भूमिका प्रेक्षकांना आवडत आहेत. आता या चित्रपटात चिन्मयची भूमिका काय असणार याची उत्सुकता त्याच्या फॅन्सना लागली आहे. 

Also Read : अभिनेता चिन्मय मांडलेकरला काय विसरण्याची सवय आहे? ऐकून तुम्हीही चक्रावल्याशिवाय राहणार नाही
Web Title: On the day of Omkar Dixit and Monalisa Baagal's 'Parfum' will be displayed
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.