'Day of the Day' after the breakup | ब्रेकअप नंतरची धम्माल सांगणारा 'ड्राय डे'
ब्रेकअप नंतरची धम्माल सांगणारा 'ड्राय डे'

ठळक मुद्देजकाल मुलांना लवकर नैराश्य येते. त्यांना अपयश पचवता येत नाही

तरुणाईची मौजमस्ती आणि एका रात्रीची धम्मालगोष्ट सांगणारा  'ड्राय डे'  हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यानिमित्त या सिनेमाच्या कलाकारांनी लोकमतशी संवाद साधला.  या सिनेमाचे नाव जरी ड्राय डे असले तरी, आजच्या तरुण पिढीची चंगळ यात दिसणार आहे. रंगभूमी व छोट्या पडद्यावर झळकलेला अजयचं पात्र साकारणारा ऋत्विक केंद्रे  या सिनेमाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करीत असून, त्याच्या सोबतीला पल्लवीची भूमिका साकारणारी मोनालिसा बागल ही नवोदित अभिनेत्री झळकणार आहे.  एका मद्यधुंद रात्रीचा हँँगओव्हर चढवणाऱ्या या 'ड्राय डे' मध्ये कैलाश वाघमारे, पार्थ घाटगे, चिन्मय कांबळी, आयली घिए, सानिका मुतालिक हे युवा कलाकारदेखील झळकणार आहेत.

लोकमत कार्यालयाला दिलेल्या भेटीच्या वेळी चित्रपटाचे दिग्दर्शक पांडुरंग जाधव म्हणाले, 'ड्राय डे' हा मनोरंजनात्मक सिनेमा आहे. आजकाल मुलांना लवकर नैराश्य येते. त्यांना अपयश पचवता येत नाही. तसंच थोड्याश्या यशानेही ती अतिशय हुरळून जाताना दिसतात. नेमकी हीच प्रवृत्ती हेरून सिनेमाची कथा लिहिली आहे. हा चित्रपट म्हणजे एका रात्रीची गोष्ट आहे.  सिनेमामध्ये अजयचे ब्रेकअप झाल्यावर त्याचे चार मित्र काय मौजमजा करतात हे पाहायला मिळणार आहे. 'ड्राय डे' सिनेमात लव्हस्टोरी नव्हे तर ब्रेकअप नंतरची धम्माल दाखवली गेली असल्यामुळे, बॅचलर्ससाठी  हा सिनेमा मनोरंजनाची परिपूर्ण मेजवानी ठरणार आहे.  'दारू डिंग डांग', 'गोरी गोरी पान', 'अशी कशी' ही सिनेमातील गाणी यूट्युब आणि रेडिओवर हिट ठरत आहेत. फक्त तरुणाईसाठी नसून सर्वच वयोगटातील व्यक्तींसाठी हा सिनेमा 'आठवणींची डायरी' ठरणारा आहे. 

ऋत्विक म्हणाला, की अतिशय शांत डोक्याने विचार करणारे 'कूल' दिग्दर्शक म्हणजे पांडुरंग जाधव.या सिनेमाच्या निमित्ताने त्यांच्याशी मित्रत्वाचं नातं तयार झालं आहे. नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्याबरोबर माझं जवळचं नातं आहे. माझ्या पदार्पणाविषयी त्यांना कळताच त्यांनी आपणहून सिनेमाचं ट्रेलर ट्विट करत मला व चित्रपटाला शुभेच्छा दिल्या. 

मद्यधुंद अवस्थेतील तरुणाई या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये आपल्याला पाहायला मिळते. चित्रपटातील हा सीन चित्रित करण्यासाठी दिग्दर्शकाला तारेवरची कसरत करावी लागली होती. कारण, दारूच्या नशेत असणाऱ्या चार मित्रांचे संवाद आणि त्यांचे हावभाव वास्तविक वाटेल असा अभिनय कलाकारांकडून सादर होत नव्हता. अनेकवेळा प्रयत्न करूनदेखील ऋत्विक केंद्रे, चिन्मय कांबळी आणि कैलास वाघमारे या कलाकारांच्या अभिनयात जिवंतपणा येत नसल्याकारणामुळे अखेर पांडुरंग जाधव यांनी त्यांना दारू पाजण्याचा जालीम उपाय शोधला. अचंबित करणारी गोष्ट म्हणजे, दारू प्यायल्यानंतर या तिघांनी आपापला अभिनय चोख सादर करत, सीन वनटेक पूर्णदेखील केला. 

'गण्या'ची भूमिका करणारा  कैलाश सांगतो, की  नाटक आणि सिनेमा हे एकमेकांना पूरक आहेत. यातला एक घटक जरी वगळला तरी अभिनयाला पूर्णत्त्व प्राप्त होणार नाही असं मला वाटतं. नाटकात अभिनय करत असताना शेवटच्या रांगेपर्यंत आपला अभिनय पोहोचवावा लागतो सिनेमाच्या मोठ्या पडद्यावर ते सहज शक्य होते. नाटकामध्ये सुधारणेला वाव असतो. नंदसागर प्रॉडक्शन हाऊस प्रस्तुत आणि संजय पाटील यांची निर्मिती असलेला 'ड्राय डे' हा सिनेमा १३ जुलैला सर्वत्र प्रदर्शित होत आहे.   


Web Title: 'Day of the Day' after the breakup
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.