Complete shooting of 'Kritant' | 'कृतांत'चे शूटिंग पूर्ण

विषयांमधील वेगळेपण हे मराठी चित्रपटसृष्टीचं वैशिष्ट्य मानला जातं. इथे दैनंदिन जगण्यातील विषयांवर चिद्धपट बनववले आणि थेट देश-विदेशांतील चित्रपट महोत्सवांमध्ये कौतुकास पात्र ठरतात. याच धाटणीचा आणखी एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच येणार आहे. ‘कृतांत’ असं शीर्षक असलेल्या या चित्रपटाचं चित्रीकरण नुकतंच पूर्ण झालं आहे. ‘रेनरोज फिल्म्स’च्या बॅनरखाली मिहीर शाह यांनी ‘कृतांत’ची निर्मिती केली आहे. मुहूर्त झाल्यानंतर ‘कृतांत’च्या संपूर्ण टिमने प्रचंड मेहनतीने ठरलेल्या वेळेत चित्रीकरणाचं काम पूर्ण केलं आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन दत्ता मोहन भंडारे यांनी केलं आहे. भंडारे यांनी या चित्रपटात वर्तमान काळातील दैनंदिन जीवनाची सांगड जगण्याच्या तत्त्वज्ञानाशी घालत एक अनोखी कथा सादर केली आहे.  या  चित्रपटाच्या निमित्ताने आजच्या धावपळीच्या व्यावहारीक जीवनातील तात्विकतेचा संबंध अधोरेखित करण्यात आला आहे.  या चित्रपटाविषयी बोलताना भंडारे म्हणाले की, ‘कृतांत’चा विषय प्रत्येकाच्या  जीवनाशी निगडीत असल्याने सर्वजण या चित्रपटाशी एकरूप होतील. आज प्रत्येकजण धावपळीचे जीवन जगतोय. या धावपळीत तो इतका गुंग झालाय की, त्याला स्वत:च्या अंतर्मनातही डोकावायला वेळ नाही. अशा परिस्थितीत तो इतरांशी संवाद कसा साधणार हा महत्त्वाचा मुद्दा या चित्रपटात मांडण्यात आला आहे. स्वतःकडे आणि त्या अनुषंगाने आपल्या अवतीभोवती वावरणाऱ्या आपल्याच जीवलग व्यक्तींकडे पाहण्याची नवी दृष्टी देणारा हा चित्रपट आहे. या चित्रपटाची कथा प्रत्येकाला अंतर्मुख होऊन विचार करायला लावणारी आहे. कोणत्याही प्रकारचे उपदेशाचे डोस पाजण्याऐवजी निखळ मनोरंजनाच्या आधारे एक सुरेख संदेश देण्याचा प्रयत्न कृतांत च्या माध्यमातून करण्यात आला आहे. त्याला वास्तव लोकेशन, कलाकारांचा सहजसुंदर अभिनय, श्रवणीय गीत-संगीत, नेत्रसुखद सादरीकरणाची जोड देण्यात आली आहे. थोडक्यात काय तर हा चित्रपट प्रेक्षकांना एक परीपूर्ण  कलाकृती पाहिल्याचा आनंद देणारा आहे. या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद  दिग्दर्शक दत्ता  भंडारे यांनीच लिहिली असल्याने कागदावरील कथा पडद्यावर चितारताना त्यांना कुठेही अडथळा आला नाही. एखाद्या चित्रकाराने कॅनव्हासवर  अगदी सहजपणे एखाद चित्र रेखाटावं  तशी भंडारे यांनी ‌‘कृतांत’ द्वारे आपल्या मनातील कथानक मोठ्या कॅनव्हासवर  चतारले आहे. या कामी भंडारे यांना संदीप कुलकर्णी, सुयोग गोऱ्हे, विद्या करंजीकर, सायली पाटील, वैष्णवी पटवर्धन आदी कलाकारांची सुरेख साथ लाभली आहे. संगीतकार विजय गवंडे यांनी या चित्रपटातील गीतांना संगीत दिले आहे. विजय मिश्रा  या चित्रपटाचे कॅमेररेमन असून दत्ताराम लोंढे कार्यकारी निर्मात्याची जबाबदारी पार पाडीत आहेत. कोकणातील मालवण येथील निसर्गरम्य लोकेशन्स तसेच मुंबईतील मढ आणि नॅशनल पार्क परिसरात या चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आलं आहे. सध्या या चित्रपटाच्या पोस्ट प्रोडक्शनचं काम वेगात सुरू आहे.

Web Title: Complete shooting of 'Kritant'
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.