Brother Hammeridge, the artist from Fu Bai Fu, appealed for financial help | ​फू बाई फू मधील या कलाकाराला झाले ब्रेन हॅमरेज, कुटुंबाने केले आर्थिक मदतीचे आवाहन

विकास समुद्रेने झकास, अगडबम, नवरा माझा नवसाचा, पिपाणी यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. या चित्रपटांमधील त्याच्या भूमिकांचे चांगलेच कौतुक झाले आहे. तसेच त्याने अनेक मालिकांमध्ये देखील काम केले आहे. तसेच त्याच्या अनेक नाटकामधील भूमिका देखील चांगल्याच गाजल्या आहेत. फू बाई फू या कार्यक्रमातील त्याची कॉमिक टायमिंग प्रेक्षकांना चांगलीच आवडली होती. त्याने या कार्यक्रमात त्याच्या विनोदी शैलीमुळे प्रेक्षकांना खळखळून हसवले. फू बाई फू मधील त्याचे अनेक स्कीट प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आहेत. आजही त्याचे हे स्कीट त्याचे फॅन्स फेसबुकला आवर्जून पाहातात. पण विकासच्या फॅन्ससाठी एक वाईट बातमी आहे. त्याला नुकतेच ब्रेन हॅमरेज झाले असून मीरा रोड मधील भक्ती वेदांत रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. 
विकासला गेल्या कित्येक दिवसांपासून डोकेदुखीचा त्रास होत होता. गेल्या काही दिवसांपासून यावर उपचार सुरू होते. पण त्यावर काहीच फरक पडत नव्हता. त्याची डोकेदुखी गेल्या तीन-चार दिवसांपासून प्रमाणाच्या बाहेर वाढल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याला रुगाणालयात दाखल केल्यानंतर त्याला ब्रेन हॅमरेज झाले असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे त्याच्यावर तात्काळ शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्याच्या प्रकृतीत आता सुधारणा होत आहे. 
विकास गेली अनेक वर्षं मराठी इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे. त्याने आजवर अनेक छोट्या-मोठ्या भूमिका साकारल्या आहेत. विकासने एक विनोदी अभिनेता म्हणून मराठी इंडस्ट्रीमध्ये स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. विकास आज इतकी वर्षं मराठी इंडस्ट्रीत काम करत असला तरी त्याची आर्थिक परिस्थिती काही चांगली नाहीये. त्यामुळे त्याच्यावरील पुढील उपचार कसे करायचे असा प्रश्न त्याच्या कुटुंबियांना आणि मित्रांना पडला आहे. विकासच्या उपचारासाठी विविध संस्था आणि नाट्य-सिनेसृष्टीतील लोकांनी मदतीसाठी पुढे यावे, असे आवाहनदेखील त्याचा कुटुंबीयांकडून करण्यात आले आहे.
विकासच्या प्रकृतीबद्दल त्याच्या फॅन्सना कळल्यानंतर त्याची तब्येत लवकरात लवकर सुधारावी यासाठी त्याचे फॅन्स प्रार्थना करत आहेत. 

 
Web Title: Brother Hammeridge, the artist from Fu Bai Fu, appealed for financial help
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.