Bizkit Movie Teaser Poster Launch | बिस्किट चित्रपटाचे टीजर पोस्टर लाँच
बिस्किट चित्रपटाचे टीजर पोस्टर लाँच
आतापर्यंत गंमतीशीर नावांचे अनेक मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आले आहेत. मराठी चित्रपट हे अनेकवेळा त्यांच्या आगळ्या वेगळ्या नावांसाठी ओळखले जातात. अनेकवेळा चित्रपटाच्या नावावरून चित्रपटात प्रेक्षकांना काय पाहायला मिळणार हेच कळत नाही. आता देखील एक असा भन्नाट आणि वेगळ्या नावाचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटाचे नाव बिस्किट आहे. चित्रपटाचे नाव ऐकून या चित्रपटात प्रेक्षकांना आता काय पाहायला मिळणार हा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. मात्र हे बिस्किट आगळंवेगळं असून खूपच चवदार असणार यात काही शंकाच नाही. या चित्रपटाचं टीजर पोस्टर नुकतंच सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आलं. या पोस्टरमध्ये प्रेक्षकांना एका तलावाच्या काळी एक सायकल आणि त्यावर कपडे ठेवलेले पाहायला मिळत आहेत. या पोस्टरमधून दिग्दर्शकाला काय सांगायचे आहे याविषयी सोशल मीडियामध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे.  
एक्स्पान्शन फिल्म्स प्रा.लि.च्या पद्मश्री शेवाळे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून कथा ही त्यांचीच आहे. रवींद्र शेवाळे यांनी या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शकीय पदार्पण केले आहे. सचिन दरेकर यांची पटकथा, नामदेव मुरकुटे यांचे संवाद, किशोर राऊत यांचे छायांकन आणि चैतन्य आडकरचे सुमधुर संगीत या चित्रपटाला लाभले आहे. अभिनेते शशांक शेंडे, पूजा नायक, जयंत सावरकर, अशोक समर्थ आणि बालकलाकार दिवेश मेदगे यांच्या या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत. एका लहान मुलाने घेतलेल्या विलक्षण शोधावर हा चित्रपट बेतला असून या टीजर पोस्टरने चित्रपटाविषयी कमालीची उत्सुकता निर्माण केली आहे. 
आता हे बिस्किट आजवरच्या चित्रपटांपेक्षा किती वेगळं आणि चविष्ट आहे हे जाणून घेण्यासाठी हा चित्रपट प्रदर्शित होण्याची थोडी वाट पहावी लागणार आहे. येत्या नोव्हेंबर महिन्यात या बिस्किटाचा आस्वाद प्रेक्षकांना घेता येईल.
शशांक शेंडे हे या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. त्यांचा बंदुक्या हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटातील शशांक शेंडे यांच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक होत आहे आणि आता बिस्किट या चित्रपटात शशांक शेंडे प्रेक्षकांना एका नव्या रूपात पाहायला मिळणार आहेत. 

Also Read : ​'बंदूक्या'ला मिळत आहे प्रेक्षकांचा उत्सफूर्त प्रतिसाद
Web Title: Bizkit Movie Teaser Poster Launch
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.