Bhau Kadam and Kadam Chatterjee | भाऊ कदम आणि कुशल बद्रीकेची फटकेबाजी

छोट्या पडद्यावर आपल्या धमाकेदार अदाकारीने, वेगवेगळ्या रूपात ज्या जोडीने महाराष्ट्राला वेड लावले ती जोडी मोठ्या पडद्यावर धमाका करण्यास सज्ज झालीये.  रसिकांच्या घराघरांत पोहचलेली ही जोडी म्हणजे भाऊ कदम आणि कुशल बद्रीके. हे दोघेही अवघ्या महाराष्ट्राला पोट धरून हसायला भाग पाडत आहेत. कुशल आणि भाऊ ही जोडी रसिकांचे तुफान मनोरंजन करत असल्यामुळे दोघांना रसिकांकडून भरभरून प्रेम मिळते. या दोघांनी सादर केलेल्या  स्किटवर रसिक भरभरून दाद देत असतात. छोट्या पडद्यावर ही जोडी सुपरहिट असली तरी आता या दोघांची जुगलबंदी रूपेरी पडद्यावरही पाहायला मिळणार आहे. 

‘लूज कंट्रोल’ या चित्रपटात कुशल इंजिनिअरींगच्या उडाणटप्पू विद्यार्थ्याच्या तर भाऊ कदम पोलिसाच्या भूमिकेत आहे. आता ही जोडी एकत्र आल्यावर काय धमाल उडेल हे वेगळं सांगायला नको. या सिनेमातून दोघेही हसवून हसवून प्रेक्षकांच्या डोळ्यातून नक्कीच पाणी काढतील. दोघांच्याही वेगळ्या भूमिका प्रेक्षकांना सिनेमातून बघायला मिळणार आहे ज्या आधी तुम्ही पाहिल्या नसतील. सिनेमात दोघांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका असून वेगळ्या अंदाजातही विनोदवीरांची ही जोडी रसिकांच्या भेटीला येणार असल्यामुळे रसिकांना मनोरंजनाची पर्वणी मिळणार हे मात्र नक्की. हा सिनेमा २३ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.


या धमाल सिनेमात छोट्या पडद्यावर प्रेक्षकांची पसंती मिळवलेले व प्रेक्षकांचे लाडके कलाकार ​​ ​भालचंद्र कदम,  कुशल बद्रिके यांसोबत मधुरा नाईक, अक्षय म्हात्रे, मनमीत पेम, शशांक केरकर,​​ कुशल बद्रिके,​ ज्येष्ठ अभिनेते​ शशांक शेंडे, ​​आरती सोळंकी, टिया अथर्व, बिनोद राय बनतावा, बंटी चोप्रा, नम्रता आवटे, प्राजक्ता हनमगर, नम्रता कदम, अजय पुरकर, रामा नादगौडा, दीपिका सोनवणे, अंजली अत्रे, पूजा केसकर, अंजली धारू, विकास वाघमारे, उमेश जगताप, प्रवीण खांडवे यांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत.

​प्रेम झानगीयानी प्रस्तुत ​अजय सिंग यांनी दिग्दर्शित केलेल्या या सिनेमाची कथा आणि पटकथा त्यांनीच लिहिली आहे तर संवाद प्रियदर्शन जाधव यानी लिहिले आहेत. संगीत रोहित नागभीडे आणि मिहीर भट, पार्श्वसंगीत आशिष, गीत वैभव देशमुख यांचे लाभले आहे. तर सिनेमाचं कास्टिंग रोहन मापुसकर, संकलन उज्वल चंद्रा सिनेमटोग्राफी मर्जी पगडीवाला यांनी केली आहे. तर सिनेमाचे कार्यकारी निर्माता म्हणून त्रिलोक सिंग राजपूत यांनी जबाबदारी पार पाडली आहे.
 
Web Title: Bhau Kadam and Kadam Chatterjee
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.