The battlefield is big! - Director Rakesh Sarang | ‘रणांगण’चा कॅनव्हास मोठा! - दिग्दर्शक राकेश सारंग

अबोली कुलकर्णी

‘रणांगण’ या मराठी चित्रपटातून अभिनेता सचिन पिळगावकर आणि अभिनेता स्वप्नील जोशी हे कित्येक वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर एकत्र पाहायला मिळणार आहेत. मराठी चित्रपटसृष्टीचा चॉकलेट बॉय स्वप्नील जोशी या चित्रपटात खलनायकाच्या रूपात दिसणार आहे. ५२ विक्स एंटरटेनमेंट आणि हार्वे फिल्म्स प्रस्तुत आणि ग्लोबल एंटरटेनमेंट मिडिया सॉल्यूशन्स (जीसिम्स) निर्मित ‘रणांगण’ चित्रपटाची निर्मिती करिष्मा जैन आणि जो राजन यांनी केली असून सहनिर्मिती अर्जुन सिंह बर्रन, स्वप्नील जोशी आणि कार्तिक निशानदार यांनी केली आहे. तर या चित्रपटाचे लेखन-दिग्दर्शन राकेश सारंग यांनी केले आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शक राकेश सारंग यांच्याशी मारलेल्या या गप्पा..

* काय सांगाल ‘रणांगण’ चित्रपटाविषयी? दिग्दर्शनाची धुरा कशी सांभाळली?
- प्रथम मी असं सांगेन की, ‘रणांगण’चा कॅनव्हॉस खुप मोठा आहे. चित्रपटात प्रत्येक कलाकाराला त्याच्या स्वभावाविरूद्ध भूमिका करायला मिळाल्या आहेत. ज्या भूमिका त्यांनी आत्तापर्यंत कधीही केल्या नव्हत्या, त्या त्यांना या चित्रपटाच्या निमित्ताने करायला मिळाल्या आहेत. स्वप्नील जोशीला आपण कायम रोमँटिक हिरो म्हणूनच पाहत आलो आहे. पण, तो खलनायक झाल्यास कसा दिसेल? याचा आपण कधी विचारच केला नाही. या चित्रपटाच्या निमित्ताने सचिन पिळगावकर, आनंद इंगळे, सुचित्रा बांधेकर, सिद्धार्थ या सर्वांनाच चौकटीबाहेरच्या भूमिका करायला मिळाल्या. त्यामुळे मला एक दिग्दर्शक म्हणून कायम या गोष्टीचेच आव्हान वाटले आहे. 

* सचिन पिळगावकर आणि स्वप्नील जोशी ही मराठी चित्रपटसृष्टीतली दोन मोठी नावं, यांची निवड करावी असे का वाटले?
- स्वप्नील आणि मी बऱ्याच दिवसांपासून एकत्र सिनेमा करायचा विचार करत होतो. मला सिनेमा करायचा होता पण, त्यात मला खलनायक स्ट्राँग हवा होता. मग मी स्वप्नीलला विचारलं की, तू खलनायक करशील का? तर तो म्हणाला,‘खलनायकच का’? मी म्हटलं, खलनायक दिसणाऱ्या  माणसाने एखाद्याला दगा दिला तर त्याला एकवेळ काही वाटणार नाही, पण, सुंदर दिसणाऱ्या, वाटणाऱ्या  माणसाने जर एखाद्याला धक्का पोहोचवला तर तो धक्का जास्त जबरदस्त असतो. त्याच धक्क्याचा वापर मला या चित्रपटात तुझ्या खलनायकी भूमिकेमागून घडवून आणायचा आहे.’ त्यानंतर त्यालाही पटलं आणि आम्ही एकत्र काम करायचं ठरवलं.

* सख्या रे हे गाणं कथानकाची गरज होती का?
- चित्रपटातील गाणी अत्यंत मनमोहक अशी आहेत. गाण्यांमध्येही वैविध्य ठेवण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. अवधुत गुप्ते याने यात एक गाणं केलं आहे ज्यात त्याने दोन नटांसाठी आवाज दिला आहे. गणपतीच्या गाण्याला साधारणपणे पुरूषी आवाज असतो, पण आम्ही स्त्रीच्या आवाजातील गाणं रेकॉर्ड केलं आहे. ते पे्रक्षकांना आवडणार, यात काही शंका नाही. याशिवाय ‘सख्या रे’ हे राहुल रानडे यांनी केलेलं गाणं यातही आम्ही बदल केला आहे. जुन्या गाण्याची पहिली ओळ तशीच ठेवून संपूर्ण नवं गाणं आम्ही सादर के लं आहे. हे गाणं म्हणजे कथानकाची गरज होती असे नाही, तर आमच्या चित्रपटातील नायिकेला ती ओळ जमून येत होती. 

* सचिनजींसारख्या दिग्गज कलाकाराला एखादा सीन समजावून सांगताना दडपण आले का?
- नाही. याअगोदरही मी सचिनजींसोबत काम केलं आहे. मी सिनेमा जरी पहिल्यांदा करत असलो तरीही मी याअगोदर एका संपूर्ण मालिकेत मी त्यांच्यासोबत काम केलंय. त्यामुळे माझ्यासाठी सचिनजींसोबत काम करणं काही नवीन नव्हतं. 

* तुम्ही २००९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ओके हॉर्न प्लीज’ या चित्रपटातून दिग्दर्शनाच्या क्षेत्रात डेब्यू केला होता. नाना पाटेकर यांच्यासोबत यात तुम्ही काम केलं आहे. मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये दिग्दर्शन करताना कोणत्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी लागते?
- काळजी अशी काही घ्यावी लागत नाही. फक्त फरक एवढाच आहे की, मराठी चित्रपट बनवताना मराठी मनांची काळजी घ्यावी लागते तर हिंदी सिनेमा बनवताना संपूर्ण भारतीय मनाचा विचार करावा लागतो. त्याशिवाय आर्थिक बाबींचाही विचार करावा लागतो. हिंदी चित्रपटांएवढं मराठी चित्रपटांचं बजेट नसतं. पण, स्क्रिप्ट, सेट, गाणी, संगीत इ.गोष्टींवर जी मेहनत घ्यावी लागते ती दोघांनाही सारखीच असते. 

* दिग्दर्शकाला प्रत्येक भूमिका तटस्थपणे पहावी लागते. असं कधी होतं का की, एखाद्या कॅरेक्टरबद्दल जवळीक निर्माण झाली आहे?
- अगदी. दिग्दर्शकाला चित्रपटातील सगळी पात्र जवळची असली पाहिजेत. त्याशिवाय चित्रपटात रंगत येत नाही. बºयाच वेळेला असं होतं की, दिग्दर्शक एकाच पात्रावर जास्त लक्ष केंद्रित करतो. पण, तसे न होता ज्युनियर आर्टिस्ट जरी असेल तरीही त्याला आपलंसं करून त्याचा रोल त्याला समजावायला हवा. 
Web Title: The battlefield is big! - Director Rakesh Sarang
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.