Ashwini Ekbote may be seen in the film Shubhang Kariti Kalyanam | अश्विनी एकबोटे यांना पाहाता येणार शुभं करोति कल्याणम या चित्रपटात

मुलांचे प्रश्न आणि त्यांचे बालविश्व दाखवणारे अनेक मराठी चित्रपट अलीकडच्या काळात आलेत. याच पार्श्वभूमीवर लहान मुलांना केंद्रस्थानी ठेवून मानवी नात्यांचे प्रतिबिंब दाखवणारा शुभं करोति कल्याणम हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विश्वकर्मा चित्र यांची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाची निर्मिती दिपा भालेराव यांनी केली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन शैलेन्द्रसिंह राजपूत यांनी केले आहे.
शुभं करोति कल्याणम या चित्रपटातून एका ध्येयवेड्या मुलाच्या वेगळेपणाची आणि त्याला मिळालेली चांगली साथ याची कथा मांडली आहे. आयुष्यात काहीतरी वेगळे करायचे स्वप्न पाहिले जाते, तेव्हा लहान मुले असो वा मोठे त्यांना प्रचंड कष्टाशिवाय यश मिळत नाही, हे सांगत त्यांना लहान वयातच ‘स्वप्न पाहा आणि ती झटून पूर्ण करा’ हे सांगण्याचा प्रयत्न या चित्रपटातून केला आहे. चांगल्या-वाईटाची समज देत लढायला शिकवणाऱ्या या चित्रपटातून मनोरंजनाच्या माध्यमातून सुरेख संदेश दिला आहे.
अश्विनी एकबोटे, सिया पाटील, नरेश बिडकर, अरविंद कोळी, हरिंदर सिंग राणा यांच्यासोबत बालकलाकार तेजल भालेराव, सिद्धेश लिंगायत, विनय शिरसाट, तन्मय म्हात्रे, सानिया पाटील, श्रावणी मेढेकर, राहुल मुळीक, मर्नोवी ओक, सुजल गायकवाड, आकाश शिरसाट यांच्या या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत.
शुभं करोति कल्याणम या चित्रपटाची कथा, पटकथा गीते बी.विजय यांनी लिहिली असून संवाद शैलेन्द्रसिंह राजपूत यांनी लिहिले आहेत. संकलन चैतन्य तन्ना तर छायांकन सुरेश उतेकर आणि मनिष पटेल यांनी केले आहे. नृत्यदिग्दर्शन प्रविण बारिया यांचे असून कलादिग्दर्शन मधु कांबळे यांचे आहे. संगीत राजेश कमल यांनी दिले असून वैशाली माडे आणि मंगेश चव्हाण यांनी या चित्रपटातील गीते स्वरबद्ध केली आहेत. कार्यकारी निर्माते विनोद बरई आहेत. 
विशेष म्हणजे प्रेक्षकांना या चित्रपटात दिवंगत अभिनेत्री अश्विनी एकबोटे यांना पाहाता येणार आहे. नाट्यत्रिविधा या नाटकाचा प्रयोग सुरू असताना २२ ऑक्टोबरला पुण्यातील भरत नाट्यमंदिरात त्यांचे निधन झाले. नृत्य करत असताना गिरकी घेताना त्या रंगमंचावर कोसळल्या. त्यांना रंगमंचावरच हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित करण्यात आले होते. 

Also Read : अश्विनी एकबोटेच्या स्मरणार्थ देण्यात आला पुरस्कार
Web Title: Ashwini Ekbote may be seen in the film Shubhang Kariti Kalyanam
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.