Ashok Saraf had briefly escaped these accidents | ​या अपघातांमध्ये थोडक्यात बचावले होते अशोक सराफ

अशोक सराफ यांचा आज वाढदिवस असून त्यांनी वयाची ७१ वर्षं पूर्ण केली आहेत. ते मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकार आहेत. आयत्या घरात घरोबा, एक डाव भुताचा, अशी ही बनवाबनवी अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. हम पाच या मालिकेत त्यांनी साकारलेला आनंद माथुर तर आजही प्रेक्षकांच्या चांगलाच लक्षात आहे. अशोक सराफ यांनी मराठी सोबतच हिंदी चित्रपटांमध्येदेखील खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. त्यांनी करण अर्जुन, यस बॉस यांसारख्या अनेक हिंदी चित्रपटांमध्ये  दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. तुम्हाला माहीत आहे का, अशोक सराफ यांच्या गाडीला आतपर्यंत दोनदा अपघात झाला आहे. हे दोन्ही अपघात अतिशय भीषण होते. या दोन्ही अपघातात अशोक सराफ थोडक्यात वाचले. एका अपघाताच्या वेळी तर त्यांना तब्बल सहा महिने विश्रांती घ्यावी लागली होती. 
अशोक सराफ यांच्या गाडीला २५ वर्षांपूर्वी एक मोठा अपघात झाला होता. या अपघाताच्या वेळी त्यांच्या मानेला जबर दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे अपघातानंतर तब्बल सहा महिने तरी अशोक सराफ यांना विश्रांती घ्यावी लागली होती. त्या दरम्यान त्यांना त्याच्या कोणत्याच चित्रपटाचे चित्रीकरण करणे शक्य नव्हते. त्यांनी तब्बल सहा महिन्यांनंतर गणेश चतुर्थीच्या दिवशी पुन्हा चित्रीकरण करायला सुरुवात केली. अशोक सराफ यांची गणपती बाप्पावर प्रचंड श्रद्धा आहे. त्यामुळे त्यांनी गणेश चतुर्थीच्या मुहुर्तावर पुन्हा काम करायला सुरुवात केली. मामला पोरीचा या चित्रपटाच्या चित्रीकरणाद्वारे त्यांनी कमबॅक केले होते. 
अशोक सराफ यांचा दुसरा अपघात काहीच वर्षांपूर्वी झाला होता. ते आणि संतोष जुवेकर गोल गोल डब्यातला या मराठी सिनेमाच्या पत्रकार परिषदेसाठी पुण्याला जात असताना तळेगावचा बोगदा क्रॉस करताना हा अपघात झाला होता. २०१२ साली मुंबई-पुणे एक्सप्रेसवर झालेल्या अपघातात ते थोडक्यात बचावले होते. अशोक सराफ यांची गाडी वेगात असताना मागचा टायर फुटला होता. या गाडीत अशोक सराफ, संतोष जुवेकर यांच्यासह गोल गोल डब्यातला या चित्रपटाचे दिग्दर्शक असित रेडीज आणि संगीतकार सतीश चंद्र देखील होते.

Also Read : तुम्हाला माहीत आहे का चित्रपटसृष्टीत येण्याआधी बँकेत काम करायचे अशोक सराफ?
Web Title: Ashok Saraf had briefly escaped these accidents
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.