अनु मलिक यांचे मराठीत पदार्पण, 'आसूड' चित्रपटाला दिले संगीत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2018 08:00 AM2018-12-19T08:00:00+5:302018-12-19T08:00:00+5:30

अनु मलिक ‘आसूड’ या आगामी मराठी चित्रपटात आपल्या संगीताची जादू दाखवणार आहेत.

Anu Malik debut in Marathi, 'Aasud' music given to the film | अनु मलिक यांचे मराठीत पदार्पण, 'आसूड' चित्रपटाला दिले संगीत

अनु मलिक यांचे मराठीत पदार्पण, 'आसूड' चित्रपटाला दिले संगीत

googlenewsNext
ठळक मुद्देअनु मलिक यांचे मराठी सिनेसृष्टीत पदार्पण ‘आसूड’ सिनेमाला अनु मलिक यांनी दिले संगीत

मराठी सिनेसंगीताच्या आकर्षणाने हिंदी चित्रपटसृष्टीतल्या गुणी गायक व संगीतकारांनी मराठी चित्रपटांमध्ये आपल्या प्रतिभेची मोहोर उमटवली आहे. बॉलिवूड इंडस्ट्रीतील एक मोठे नाव म्हणजे सुप्रसिद्ध गायक संगीतकार अनु मलिक. आजवर असंख्य हिंदी चित्रपटांतील गाण्यांना आवाज व संगीत देणारे राष्ट्रीय पारितोषिक आणि फिल्मफेअर अॅवॉर्ड विजेते अनु मलिक ‘आसूड’ या आगामी मराठी चित्रपटात आपल्या संगीताची जादू दाखवणार आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने त्यांनी प्रथमच मराठीत पाऊल ठेवले आहे. हा चित्रपट येत्या ८ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

२ नोव्हेंबर १९६० रोजी जन्मलेल्या अनु मलिक यांना संगीताचा वारसा त्यांचे वडील ख्यातनाम संगीतकार सरदार मलिक यांच्याकडून मिळाला. १९८० साली वयाच्या २० व्या वर्षी त्यांनी संगीत दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले. गाण्यांमध्ये तबल्याचा वैशिष्ट्यपूर्ण वापर ही अनु मलिक यांच्या संगीताची खासियत आहे. आजही त्यांच्या गाण्यांवर तरूणाई फिदा असते. ‘बॉर्डर’, ‘बाजीगर’ ’विरासत’, रेफ्युजी, ‘बादशहा’, जुडवाँ, ‘मै हूँ ना’, ‘शूट आउट अॅट वडाला’, ‘दम लगाके हैशा’, ‘यमला पगला दिवाना’ या चित्रपटांमध्ये त्यांनी संगीत दिलेली गाणी प्रचंड लोकप्रिय झाली. ‘उँची है बिल्डींग’, ‘गरम चाय की प्याली हो’, ‘जानम समझा करो,’ ‘ज्युली ज्युली’, ‘मै खिलाडी तू अनाडी’ ही त्यांनी गायलेली गाणी सुद्धा सुपरहिट झाली.
अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नावर ‘आसूड’ हा चित्रपट भाष्य करत असल्याने विषयाची खोली लक्षात घेता तशाप्रकारचे संगीत देणे अपेक्षित होते. यातील गाणी व संगीत प्रेक्षकांच्या मनाला नक्कीच भिडणार असून आपल्या मराठी पदार्पणाबद्दल अनु मलिक सांगतात की,  ‘मराठीत काम करण्यास मी उत्सुक होतो, ‘आसूड’ च्या निमित्ताने मला ही संधी मिळाली हा मी माझा सन्मान समजतो. ‘आसूड’ साठी संगीत देणं माझ्यासाठी खूपच वेगळा अनुभव होता’. यापुढेही मला मराठी चित्रपटांना संगीत देण्याची संधी मिळेल असा विश्वास अनु मलिक यांनी व्यक्त केला.
गोविंद प्रोडक्शन प्रस्तुत ‘आसूड’ या चित्रपटात एका युवकाचा व्यवस्थेविरोधातील लढा दाखवताना शेतकऱ्यांच्या सद्य स्थितीचा, त्यांच्या समस्यांचा विषय हाताळण्यात आला आहे. चित्रपटाची निर्मिती दिपक मोरे यांची असून सहनिर्मिती विजय जाधव यांची आहे. लेखन व दिग्दर्शन निलेश जळमकर तर सहदिग्दर्शन अमोल ताळे यांचे आहे. कथा–पटकथा आणि संवाद निलेश जळमकर व अमोल ताळे यांचे आहेत. छायांकन अरुण प्रसाद यांनी केले असून संकलन सचिन कानाडे यांचे आहे. 

 

Web Title: Anu Malik debut in Marathi, 'Aasud' music given to the film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.