Ankush Choudhary's 'God' hit the poster of the motion picture poster | अंकुश चौधरीच्या 'देवा' या चित्रपटाच्या मोशन पोस्टरचे हटके लाँच

महाराष्ट्राचा स्टाईल आयकॉन असणाऱ्या अंकुश चौधरीची प्रमुख भूमिका असलेला 'देवा' हा सिनेमा येत्या १ डिसेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. नुकताच या सिनेमाचा दसऱ्याच्या मुहूर्तावर विविध रंगाने नटलेला मोशन पोस्टर लाँच करण्यात आला. इनोव्हेटिव्ह फिल्म्स निर्मित या सिनेमात अंकुशने साकारलेल्या 'देवा' या पात्राचे व्यक्तिमत्व देखील असेच रंगबेरंगी असून प्रत्येकाच्या आयुष्यात रंग भरण्याचे काम तो या सिनेमातून करणार आहे. दसऱ्याच्या धामधुमीनंतर रात्री १२ वाजता या सिनेमाचा हा पहिला मोशन पोस्टर सोशल नेट्वर्किंग साईटवर प्रकाशित करण्यात आला. अशाप्रकारे मध्यरात्री सिनेमाचा टीझर मोशन पोस्टर लाँच करण्याची ही पहिलीच वेळ असून 'देवा' सिनेमाच्या पूर्वप्रसिद्धीकरिता यासारख्या अनेक अतरंगी कल्पना सिनेमाच्या टीमकडून लढवल्या जाणार आहेत. 'देवा' च्या हटके प्रसिद्धीमुळे कुतुहलाचे वातावरण निर्माण झाले आहे.
हा अतरंगी 'देवा' नेमका कसा असेल? याची उत्सुकता लोकांना लागली आहे. मुरली नलप्पा दिग्दर्शित हा सिनेमा रसिकांच्या जीवनात रंग भरण्यास या वर्षाखेरीस येत आहे.देवा या चित्रपटातील अंकुशचा लूक काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. तेव्हापासूनच अंकुशच्या या लुकची चांगलीच चर्चा आहे. या चित्रपटात प्रेक्षकांना एक वेगळा अंकुश पाहायला मिळत आहे. रंगीत सदरा, फॅन्सी लॉकेट, हातात माळ, इयर रिंग्स आणि केसांची मॉडर्न स्टाईल असा या चित्रपटातील अंकुशचा लूक दिसत आहे. या लूकप्रमाणेच या चित्रपटातील त्याची भूमिकादेखील काहीशी हटके असणार आहे. या चित्रपटात तो प्रत्येकाला मदत करण्यास तत्पर असणाऱ्या एका व्यक्तिची भूमिका साकारणार आहे. त्याच्या व्यक्तिरेखेचे नाव देवा असून तो सगळ्यांचा लाडका दाखवला जाणार आहे.
दुनियादारी, डबल सीट असे एकाहून एक हिट चित्रपट अंकुशने मराठी चित्रपटासृष्टीला गेल्या काही काळात दिले आहेत. ती सध्या काय करते या त्याच्या या वर्षी प्रदर्शित झालेल्या चित्रपटाने तर बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवला. या चित्रपटात त्याने साकारलेल्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. केवळ प्रेक्षकांनीच नव्हे तर समीक्षकांनी देखील त्याची प्रशंसा केली होती.

Also Read : ​ग्लॅमरस अंदाजात साकारण्यात आला अमृता खानविलकर आणि अंकुश चौधरी यांचा मेणाचा पुतळा

 
Web Title: Ankush Choudhary's 'God' hit the poster of the motion picture poster
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.