‘आणि...डॉ.काशिनाथ घाणेकर’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित !

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2018 12:27 PM2018-10-20T12:27:40+5:302018-10-20T12:27:44+5:30

“आणि ... डॉ. काशिनाथ घाणेकर” हा  सिनेमा रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. दिवाळीच्या शुभमुहूर्तावर ८ नोव्हेंबर रोजी रिलीज होणार आहे.

'And' Dr. Kshinath Ghanekar ' movie trailer out! | ‘आणि...डॉ.काशिनाथ घाणेकर’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित !

‘आणि...डॉ.काशिनाथ घाणेकर’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित !

googlenewsNext
ठळक मुद्दे मराठी थेटरमध्ये पहिली शिट्टी वाजली ती डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्यासाठी

पुन्हा बहरणार रंगभूमी...अवतरणार सुवर्णकाळ ... वायाकॉम18 स्टुडीओज प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहेत मराठी रंगभूमीचा पहिला सुपरस्टार डॉ. काशिनाथ घाणेकर यांचा विलक्षण प्रवास. मराठीमध्ये पहिल्यांदाच डॉ.काशिनाथ घाणेकर यांच्यावर सिनेमा येत असल्याने या चित्रपटाच्या घोषणेपासूनच प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचलेली आहे. चित्रपटाचा विषय, त्यामधील तगडे कलाकार यामुळे चित्रपट बराच चर्चेत राहिला असून हा चित्रपट प्रेक्षकांमध्ये आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरला आहे. सुबोध भावे या चित्रपटात मुख्य भूमिका साकारत असून चित्रपटाच्या दोन्ही टीझरला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे. चित्रपटाच्या टीजरला ४.५ लाखापेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. वायाकॉम18 स्टुडीओज प्रस्तुत या चित्रपटाचा ट्रेलर सुबोध भावे, सोनाली कुलकर्णी, सुमित राघवन यांच्या उपस्थित नुकताच प्रदर्शित झाला. दिवाळीच्या शुभमुहूर्तावर ८ नोव्हेंबर रोजी “आणि ... डॉ. काशिनाथ घाणेकर” हा  सिनेमा रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 

 
मराठी रंगभूमी आणि चित्रपट सृष्टीमध्ये डॉ. काशिनाथ घाणेकर यांचे अतुलनीय योगदान आहे, यांनी मराठी व्यावसायिक रंगभूमीला वैभवाचे दिवस आणले. प्रभावशाली संवादफेक, जरब बसणारे डोळे आणि विशिष्ट पद्धतीने बोलण्याची त्यांची शैली अद्वितीय होती. मराठी थेटरमध्ये पहिली शिट्टी वाजली ती डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्यासाठी... कधी लाल्या म्हणून तर कधी संभाजी म्हणून प्रेक्षकांच्या मनात यांनी अढळ स्थान मिळवले. ज्यांच्या नावावर तिकीटबारीवर हाउसफुल्लचे बोर्ड लागत होते असे डॉ.काशिनाथ घाणेकर ... स्वत:च नाव शेवटी लिहण्याची प्रथा ज्यांनी सुरु केली ते सुध्दा काशिनाथ घाणेकरच ... अशा या मराठीतील सुपरस्टार आणि महान रंगकर्मी डॉ. काशिनाथ घाणेकर यांचा जीवनप्रवास रुपेरी पडद्यावर सादर करण्यासाठी वायाकॉम18 स्टुडीओज सज्ज आहेत. हे जबरदस्त व्यक्तिमत्व पडद्यावर साकारत आहे सगळ्यांचा लाडका आणि अष्टपैलू अभिनेता सुबोध भावे तसेच त्यांच्यासोबत असणार आहेत सोनाली कुलकर्णी (सुलोचनादीदी), सुमित राघवन (डॉ.श्रीराम लागू), मोहन जोशी (भालजी पेंढारकर), आनंद इंगळे (प्रा.वसंत कानेटकर), प्रसाद ओक (प्रभाकर पणशीकर), वैदेही परशुरामी (कांचन घाणेकर), नंदिता धुरी (ईरावती घाणेकर), हा सिनेमा ८ नोव्हेंबर रोजी सर्वत्र रिलीज होत आहे.

आपल्या भूमिकेबद्दल बोलताना सुबोध भावे म्हणाला, “मराठी रंगभूमीवर उभं रहाण्याची थोडीशी धडपड करणाऱ्या माझ्यासारख्या कलावंताच्या आयुष्यात मराठी रंगभूमीच्या पहिल्या सुपरस्टारची व्यक्तिरेखा येण ही अतिशय भाग्याची गोष्ट आहे. “आणि...डॉ.काशिनाथ घाणेकर” या चित्रपटाच्या माध्यमातून डॉ.काशिनाथ घाणेकर यांचं चरित्र आभ्यासाल मिळालं, त्यांच्या विषयी ऐकायला मिळालं, त्यांच रूप पहायला मिळाल, त्यांनी केलेल्या नाटकातली स्वगत सादर करायला मिळाली, त्यांना जवळून स्पर्श करू शकलो,त्याचबरोबर त्या काळातल्या, त्यांच्याबरोबरच्या अनेक समकालीन ज्येष्ठ श्रेष्ठ  दिग्गजांना देखील स्पर्श करू शकलो. मला अस वाटतं या चित्रपटाच्या निमित्ताने आम्ही सगळ्यांनी रंगभूमीवरच्या या सर्व मानाच्या शिलेदारांना दिलेली ही आदरांजली आहे, आणि त्यांना केलेला सलाम आहे.''

ज्येष्ठ श्रेष्ठ सुलोचनाबाईंची व्यक्तिरेखा सोनाली कुलकर्णी या चित्रपटा साकारणार असून आपल्या भुमिकेबद्दल बोलताना ती म्हणाली, “येत्या ८ नोव्हेंबरला ''आणि...डॉ.काशिनाथ घाणेकर” हा आमचा चित्रपट येतो आहे या नावात जी जादू आहे ती प्रेक्षकांना रुपेरी पडद्यावर बघायला मिळणार आहे. नुकताच चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे... आम्ही सगळे चित्रपटामध्ये कसे दिसत आहोत ते प्रेक्षकांनी बघितले आहे... प्रेक्षकांच्या मनात चित्रपट बघण्याची उत्सुकता निर्माण झाली असेल... या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपट आणि रंगभूमीवरचा हा सुवर्णकाळ प्रेक्षकांसमोर सादर करताना आम्हांला खूप आनंद होत आहे.''

ज्येष्ठ अभिनेते श्रीराम लागू यांची भूमिका चित्रपटामध्ये सुमित राघवन साकारणार असून या अनुभवाबद्दल बोलताना म्हणला, “अशा मोठ्या चित्रपटाचा भाग होणे माझ्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. मराठी नाटक प्रेमींना मराठी रंगभूमीचा पहिला सुपरस्टार डॉ. काशिनाथ घाणेकर यांचा जीवनप्रवास, तो सुवर्णकाळ तसेच त्या सुवर्ण क्षणांना पुन्हाएकदा बघण्याची संधी या चित्रपटाद्वारे  मिळणार आहे. याचबरोबर नवीन पिढीला त्याकाळातील दमदार अभिनेते आणि वैभवशाली रंगभूमीची परंपरा जाणून घेण्याची संधी मिळणार आहे. मी स्वत: नाटक आणि रंगभूमीचा चाहता असल्याने मी स्वत:ला खूप भाग्यवान समजतो कि, मला ज्येष्ठ अभिनेते डॉ.श्रीराम लागू यांची भूमिका साकारण्याची संधी मला मिळाली. यापेक्षा जास्त मी काय मागू शकतो ...”

Web Title: 'And' Dr. Kshinath Ghanekar ' movie trailer out!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.