Adinath Kothare will work with Madhuri Dixit | आदिनाथ कोठारे करणार माधुरी दीक्षितसोबत काम

आदिनाथ कोठारेच्या फॅन्ससाठी एक खूप चांगली बातमी आहे. प्रेक्षकांचा लाडका आदिनाथ आता बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित सोबत काम करणार आहे. आदिनाथनेच ही गोष्ट सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या फॅन्सना सांगितली आहे. त्याने माधुरी दीक्षित सोबतचा एक फोटो पोस्ट करून समथिंग न्यू (काहीतरी नवे) आणि वर्किंग विथ लिजंड (मी लिजंड सोबत काम करत आहे) असे हॅशटॅग दिले आहेत. त्यावरून आदिनाथ माधुरीसोबत काम करत असल्याचे आपल्याला कळत आहे. पण आदिनाथ माधुरीसोबत कोणत्या चित्रपटात काम करत आहे याबाबत त्याने मौन राखणेच पसंत केले आहे.
माधुरी दीक्षित बकेट लिस्ट या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण नुकतेच संपले असून त्यानंतर ती आता एका मराठी चित्रपटाची निर्मिती करणार आहे. माधुरी आता प्रेक्षकांना निर्मातीच्या भूमिकेत दिसणार आहे. ती १५ ऑगस्ट या मराठी चित्रपटाची निर्मिती करणार असून हा एक कॉमेडी चित्रपट आहे. स्वातंत्र्य हे एक असे गिफ्ट आहे जे केवळ तुम्ही स्वतःला देऊ शकता या विषयावर हा चित्रपट असणार असून मराठीतील अनेक दिग्गज कलाकार या चित्रपटात प्रेक्षकांना मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटात राहुल पेठे आणि मृण्मयी देशपांडे मुख्य भूमिकेत आहेत. माधुरीने चित्रपटाची घोषणा केल्यानंतर काहीच दिवसांत आदिनाथने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्यामुळे तो माधुरीच्या १५ ऑगस्ट चित्रपटात झळकेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. आता यात तथ्य काय हे केवळ आपल्याला आदिनाथच सांगू शकतो.
आदिनाथ कोठारेने छकुला या चित्रपटाद्वारे बालकलाकार म्हणून त्याच्या कारकिर्दिला सुरुवात केली. झपाटलेला २, सतरंगी रे, दुभंग यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने काम केले. तो 100 डेज या मालिकेतही काही महिन्यांपूर्वी झळकला होता. एक अभिनेता म्हणून त्याने मराठी चित्रपटसृष्टीत त्याचे चांगलेच प्रस्थ निर्माण केले आहे. आदिनाथ केवळ एक चांगला अभिनेताच नाहीये तर एक निर्माता म्हणून देखील त्याने आपले नाव कमावले आहे तसेच एक दिग्दर्शक म्हणून देखील लवकरच तो त्याच्या कारकिर्दीला सुरुवात करणार आहे.

Also Read : आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कोठारेच्या घरात आला नवा सदस्य
Web Title: Adinath Kothare will work with Madhuri Dixit
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.