'Adarsh ​​Soon' Tejashree Pradhan Bejli RJ | 'आदर्श सून’ तेजश्री प्रधान बनली आर.जे
'आदर्श सून’ तेजश्री प्रधान बनली आर.जे
‘होणार सून मी ह्या घरची’या मालिकेतून महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरात पोहोचलेली आणि ‘आदर्श सून’ ठरलेली तेजश्री प्रधान सध्या आर.जे. बनली आहे. आता अॅक्टींग सोडून तेजश्री आर.जे कशी बनली असा प्रश्न कदाचित तुम्हाला पडेल.पण ती आर जे बनत असेही एकदा व्हावे सिनेमातून रसिकांच्या भेटीला येणार आहेय  झेलू एंटरटेनमेन्टस निर्मित आणि सुश्रुत भागवत दिग्दर्शित 'असेही एकदा व्हावे' या आगामी सिनेमात ती रेडियो जॉकीच्या भूमिकेतून तिच्या चाहत्यांसमोर येत आहे. विशेष म्हणजे या सिनेमाच्या निमित्ताने प्रथमच उमेश कामत आणि तेजश्री प्रधान हि जोडगोळी मोठ्या पडद्यावर एकत्र येत आहेत.येत्या ६ एप्रिल रोजी सर्वत्र प्रदर्शित होत असलेल्या या सिनेमातील भूमिकेसाठी तेजश्रीने खूप मेहनत घेतली असल्याचे समजते. 

'असेही एकदा व्हावे' या सिनेमाचे शुटींग सुरु होण्यापूर्वी तेजश्रीने आपल्या व्यक्तिरेखेवर कसून अभ्यास केला होता. त्यासाठी तिने आर. जे.चे खास एक महिना वर्कशॉप प्रशिक्षण घेतले होते. रेडियो जॉकींचे बोलणे, श्रोत्यांसोबतचा त्यांचा संवाद,  लकबी, शब्दांचे उच्चार, त्यांचा हजरजबाबीपणा, तसेच विषय खेळवत ठेवण्याची किमया, आणि गाण्यांद्वारे केले जाणारे श्रोत्यांचे मनोरंजन या सर्व गोष्टी तेजश्री या वर्कशॉपमध्ये शिकली. त्यासाठी तिने रेडीओ स्टेशनला भेट देखील दिली. तिथे काम करत असलेल्या आर.जे.च्या कामाचे जवळून निरीक्षण करत आणि संवाद साधत आपल्या व्यक्तिरेखेत प्राण ओतले.  

या बद्दल तेजश्रीला विचारले असता ती सांगते कि, ”माझा नेहमी भूमिका परफेक्ट करण्यावर कल असतो. माझ्यावर प्रेम करणाऱ्या प्रेक्षकांच्या अपेक्षा माझ्याकडून पूर्ण व्हाव्यात यासाठी मी कुठलीही मेहनत घ्यायला तयार असते. म्हणूनच आर. जे.ची भूमिका साकारण्यापूर्वी मी त्याचा सखोल अभ्यास केला. सुरुवातीला थोड कठीण वाटले होते, एकाच वेळी तीन-चार ठिकाणी लक्ष द्यावे लागत होते, पण हळूहळू मला ते जमू लागले, आणि आवडू देखील'.

तेजश्रीला आतापर्यंत आपण नेहमी सर्वसाधारण भूमिकेतच बघत आलो आहोत. मात्र, या सिनेमात ती वेगळ्याच भूमिकेतून लोकांसमोर येत असल्यामुळे, आर. जे.च्या रूपातील तेजश्री पाहणे, तिच्या चाहत्यांसाठी मज्जेशीर ठरेल.

Web Title: 'Adarsh ​​Soon' Tejashree Pradhan Bejli RJ
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.