The actress's son will now make a film release! | या अभिनेत्रीचा मुलगा आता चित्रपटसृष्टीत टाकणार पाऊल !

आपल्या आईवडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांच्या मुलांनी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवणं ही काही नवी गोष्ट नाही.अभिनय हा त्यांच्या रक्तातच असतो. त्यामुळे स्टार कलाकारांची मुलं आपल्या आईवडिलांप्रमाणेच रसिकांचं मनोरंजन करण्याच्या इराद्याने चित्रपटसृष्टीत दाखल होतात. काही महिन्यांपूर्वी विनोदाचे बादशाह लक्ष्मीकांत बेर्डे यांचा लेक अभिनय यानं चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं. आता लक्ष्मीकांत बेर्डे यांची एकेकाळची सहकारी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री किशोरी शहाणे यांचा मुलगा चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवण्यासाठी सज्ज झाला आहे. अभिनेत्री किशोरी शहाणे आणि फिल्ममेकर दीपक बलराज वीज यांचा लेक बॉबी वीज चित्रपटसृष्टी गाजवण्यासाठी सज्ज आहे. नुकतंच झालेल्या मिस्टर ग्लॅडरॅग्ज मॅनहंट-2017 या स्पर्धेचे बॉबीने जेतेपद पटकावलं आहे. महाराष्ट्रासह गोवा, गुजरात, राजस्थान यासारख्या राज्यातून आलेल्या स्पर्धांवर मात करत बॉबीने हे विजेतेपद पटकावलं आहे.विशेष म्हणजे स्पर्धे दरम्यान आजारी असूनही बॉबीने हे जेतेपद पटकावल्याने त्याचं विशेष कौतुक होत आहे.बालपणापासूनच अभिनयाचं आणि कलेचे बाळकडू त्याला घरातूनच मिळालं आहे. त्यामुळे आई-वडिलांसोबत तो कायमच सिनेमाच्या सेटवर जात असे.त्याच्या अंगी असलेली अभिनयक्षमता त्याची शाळा उत्पल संघवी स्कूलनंही ओळखली. शाळेमध्ये आयोजित नाट्य स्पर्धेत त्याला विविध भूमिका साकारण्याची संधी मिळाली. रामनाथ थरवाल यांच्या थिएटर ग्रुपचे मार्गदर्शन आणि पृथ्वी थिएटरमध्ये केलेले सादरीकरण यामुळे त्याच्यातील अभिनय क्षमतेला नवे पैलू पडण्यास मदत झाली. बालकलाकार म्हणून त्यानं विविध सिनेमांमध्ये आपल्यातील अभिनयाची चुणूक बॉबीने दाखवून दिली आहे.'शिर्डी साईबाबा', 'मुंबई गॉडफादर', 'मोहित्यांची रेणुका', 'मालिक एक' अशा सिनेमांमध्ये त्यानं बालकलाकार म्हणून काम केलं आहे. मोठमोठ्या ब्रँड्सच्या जाहिरातीसुद्धा त्यानं केल्या आहेत. एमबीएची पदवी मिळवूनही अभिनेता बनण्याचं त्याचं स्वप्न आहे. गेल्या वर्षभरापासून बॉबी यासाठी मेहनत घेत आहे. नृत्य, मार्शल आर्ट्सचे ट्रेनिंग बॉबी सध्या घेत आहे. प्रसिद्ध कोरिओग्राफर गणेश आचार्य यांचा असिस्टंट म्हणूनही त्याने काम केलं आहे. त्यामुळे आता चित्रपटसृष्टीत नवी इनिंग सुरु करण्याच्या दिशेने बॉबीने पाऊल टाकलं आहे असं म्हटल्यास वावगं ठरु नये. 
Web Title: The actress's son will now make a film release!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.