As an actor and guy, Bhikari made me rich: Swapnil Joshi | अभिनेता आणि माणूस म्हणून भिकारी या चित्रपटाने मला श्रीमंत केलेः स्वप्निल जोशी

स्वप्निल जोशी मराठी इंडस्ट्रीतील चॉकलेट बॉय म्हणून ओळखला जातो. पण आज तो त्याची इमेज ब्रेक करून भिकारी या चित्रपटात एका वेगळ्या रूपात पाहायला मिळणार आहे. त्याच्या या भिकारी चित्रपटाबद्दल त्याच्याशी मारलेल्या गप्पा...

भिकारी या चित्रपटाचे शीर्षक ऐकल्यानंतर तुझी सगळ्यात पहिली प्रतिक्रिया काय होती?
गणेश आचार्य यांना माझ्यासोबत काम करायचे असल्याने ते अनेक दिवसांपासून माझा नंबर शोधत होते. हे मला कळल्यावर खरे तर मी खूपच खूश झालो. मला तुझ्यासोबत काम करायचे आहे, मला भेटायला ये असे त्यांनी मला सांगितल्यावर मी त्यांना भेटायला गेलो. त्यांनी मला चित्रपटाची कथा ऐकवण्यासाठी बोलावले होते. मी भेटताच त्यांनी मला चित्रपटाचे नाव सांगितले. त्यावर चित्रपटाचे नाव ऐकून मी अक्षरशः दोन पावले मागे गेलो. पण या चित्रपटाची कथा ही एका आई आणि मुलाची आहे असे त्यांनी मला सांगताच मी लगेचच चित्रपटासाठी होकार दिला. या चित्रपटाचे संपूर्ण नाव हे स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी असे आहे. स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी ही म्हण आपण लहानपणापासूनच ऐकत आहोत. आपल्या आईला गमवावे लागणार असे ज्यावेळी त्या मुलाला वाटते. त्यावेळी आपल्या आईला वाचवायला मुलगा काय काय करतो हे या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. मी माझ्या खऱ्या आयुष्यात माझ्या आईच्या खूपच जवळ आहे. तिच्यासाठी मी काहीही करू शकतो. आज माझ्या भूमिकांमुळे महाराष्ट्रीतील अनेक आयांना मी त्यांचा मुलगा वाटतो. त्यामुळे हा चित्रपट मी माझ्या आईला आणि महाराष्ट्रातील तमाम आयांना अर्पण करत आहे.

गणेश आचार्य यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव कसा होता आणि ते एक कोरिओग्राफर असल्याने त्यांनी तुला किती नाचवले आहे?
गणेश आचार्य यांचा चित्रपट म्हटला की, त्या चित्रपटात गाणी, नृत्य असणारच याची मला चांगलीच कल्पना होती. या चित्रपटातील सहा गाण्यांमधील तीन गाण्यात मी नृत्य केले आहे. देवा या गाण्यात मी बॉलिवूड स्टाईलने नाचलो आहे तर ये आता या रोमँटिक गाण्यात मी कन्टेम्पररी डान्स केला आहे तर बाळा या गाण्यात मी हिप हॉप केले आहे. मी आजवरच्या माझ्या कारकिर्दीत कधीच हिप हॉप डान्स केला नव्हता. मी या चित्रपटातील नृत्यांसाठी जवळजवळ दोन महिने तालीम केली आहे.

एक सेलिब्रिटी झाल्यानंतर रस्त्यांवरून फिरणे हे खूप अवघड असते. पण या चित्रपटाच्या निमित्ताने तू पुण्यातील अनेक भागांमध्ये चित्रीकरण केले आहे. त्याचा अनुभव कसा होता? 
पुण्यातील रस्त्यांवर, स्टेशनवर आम्ही या चित्रपटाचे चित्रीकरण केले आहे. पण तुम्हाला विश्वास बसणार नाही लोकांना माझ्या गेटअपमुळे मला ओळखताच आले नाही. पहिल्या दृश्याच्या वेळी माझ्या संपूर्ण टीमला भीती होती की, मला कोणी ओळखले तर प्रचंड गर्दी होईल, लोकांना सांभाळणे कठीण जाईल. पण लोकांनी मला ओळखले नाही हे पाहाताच त्यांना प्रचंड आनंद झाला होता.  लोकांनी चित्रीकरणाच्यावेळी मला भिकारी समजून भीक दिले. काहींनी तर मला शिव्या घातल्या. काहींनी तू धडधाकट असताना भीक का मागतोस असेदेखील मला सुनावले तर काहींनी मला प्रेमाने खायला देखील दिले. या चित्रपटाचे नाव भिकारी असले तरी एक कलाकार म्हणून आणि एक माणूस म्हणून या चित्रपटाने मला खूप श्रीमंत केले. 

तू या चित्रपटाद्वारे तुझी इमेज बदलत आहेस तर तुला कधी त्याची भीती वाटली नाही का?
एक अभिनेता म्हणून प्रत्येक कलाकाराला वेगवेगळ्या भूमिका साकारायच्या असतात. या चित्रपटाच्या निमित्ताने मला एक वेगळी भूमिका साकारायला मिळत आहे. त्याचा मला खूप आनंद होत आहे. 
Web Title: As an actor and guy, Bhikari made me rich: Swapnil Joshi
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.