Acting My Passion-Actor Kishore Kadam | अभिनय माझं पॅशन-अभिनेता किशोर कदम

अबोली कुलकर्णी

किशोर कदम-चित्रपटसृष्टीतील एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व. नाटक, मालिका, चित्रपट, काव्यक्षेत्र यामध्ये रमणारा अवलिया. १९९५ मध्ये त्यांनी अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल ठेवले अन् आपल्या धीरगंभीर अभिनयाने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवले. यासोबतच त्यांनी ‘सौमित्र’ या नावाने लिहिलेल्या कवितांनीही रसिकांची मनं जिंकली. १९९९ मध्ये प्रदर्शित झालेल्या त्यांच्या ‘समर’ चित्रपटाने राष्ट्रीय पुरस्कार मिळवला. त्यांच्या भूमिकेला प्रेक्षकांसह समीक्षकांनीही कौतुकाची थाप दिली. अन् मग सुरू झाली चित्रपटसृष्टीतील घोडदौड. ‘स्पेशल २६’,‘नटरंग’,‘फँड्री’, ‘जोगवा’ यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी उत्कृष्ट भूमिका साकारल्या. आता ते ‘वाघेऱ्या’ सिनेमातून एका विनोदी व्यक्तिरेखेत दिसणार आहेत. याविषयी त्यांच्याशी मारलेल्या या गप्पा...


* ‘वाघेऱ्या’ सिनेमात तुम्ही प्रथमच विनोदी व्यक्तिरेखा साकारत आहात. काय सांगाल तुमच्या व्यक्तिरेखेविषयी?
- कुठल्याही प्रकारचे अंगविक्षेप न करता केवळ निखळ विनोद करणं हा उद्देश डोळयासमोर ठेवून मी या चित्रपटात एका गावच्या सरपंचाची व्यक्तिरेखा साकारली आहे. गावात एक घटना घडते आणि त्यावर गावातील लोक कशा प्रतिक्रिया देतात यावरून विनोदांची मालिकाच सुरू होते. एकंदरितच या सर्व घटनांवर आधारित वाघेऱ्या हा सिनेमा आधारलेला आहे.

* आत्तापर्यंत ग्रामीण भागातील प्रश्न, समस्या यांवरच चित्रपट बनवण्यात आले. मात्र, या चित्रपटात काय वेगळं प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे?
- कोणताही चित्रपट जेव्हा आकारास येतो तेव्हा त्यात एक गोष्ट असते. त्या गोष्टीभोवती संपूर्ण चित्रपट फिरतो. मग तो चित्रपट ग्रामीण भागाशी निगडीत असो वा शहरी भागाशी. कथानक हा चित्रपटाचा मुख्य गाभा असतो. या चित्रपटाचाही एक गाभा आहे ज्यात एक घटना घडते. त्या घटनेला संपूर्ण गाव कसं रिअ‍ॅक्ट होतं, यावर चित्रपट आधारित आहे. इतर गावातील लोक, तेथील राजकारण, एकमेकांमधील संबंध हे या चित्रपटातून पहावयास मिळणार आहेत.

* विनोदी भूमिका साकारण्यामागचा विचार काय होता? तुमची पहिली रिअ‍ॅक्शन काय होती?
- विचार असा काही नव्हता. पण, मला आत्तापर्यंत विनोदी भूमिका आॅफर झाली नाही त्यामुळे मी करत नव्हतो. मात्र, दिग्दर्शक समीर आशा पाटील यांनी मला विनोदी भूमिकेची आॅफर देऊ केली आणि मी ती करायला तयार झालो. खरंतर ही भूमिका अगोदर दुसºया एका कलाकाराला देण्यात आली होती. मात्र, नंतर त्यांना तारखांचा मेळ जमत नसल्याने मला आवडलेली सरपंचाची ही भूमिका माझ्याच पदरात येऊन पडली. 

*  किती अवघड असतं प्रेक्षकांना हसवणं? की त्यापेक्षा गंभीर भूमिका साकारून प्रेक्षकांना अंतर्मुख करणं जास्त कठीण?
- दोन्हीही खूप जास्त कठीण आहे, असं मला वाटतं. विनोद हा गांभीर्याने करायला हवा आणि गंभीर भूमिका तर अतिशय गंभीर प्रकारे करायला हव्यात तरच आपला विचार प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकतो.

* तुम्ही हिंदी, मराठी, तमीळ चित्रपट, टीव्ही मालिकांमध्येही काम केले आहे. यातील कोणत्या प्रकारांत तुम्ही स्वत:ला कम्फर्टेबल मानता?
- ज्या प्रकारांत मला काम मिळेल त्या प्रकारांत मी स्वत:ला कम्फर्टेबल मानतो. कारण एका कलाकारासाठी त्याने साकारलेला अभिनय जास्त महत्त्वाचा असतो, मग माध्यम कोणतंही असो.

 *  काय वाटते मागे वळून पाहताना, अभिनय क्षेत्रामुळे तुमचं आयुष्य किती समृद्ध झालं आहे ?
- अजून चांगल्या भूमिका वाट्याला यायला हव्या होत्या. माझ्यातील क्षमता मला प्रेक्षकांसमोर सिद्ध करायची असते. पण, हरकत नाही. आत्तापर्यंत ज्या भूमिका माझ्या वाट्याला आल्या त्यामुळे मी समाधानी आहे.

* अभिनय तुमच्यासाठी काय आहे?
- अभिनय माझ्यासाठी पॅशन आहे. पोटा-पाण्याचा धंदा आहे त्याशिवाय माझं आयुष्य पुढे नेणारा मार्ग आहे, असे मी मानतो.

*  उत्कृष्ट अभिनेता असण्यासोबतच तुम्ही उत्कृष्ट कवी देखील आहात. ‘सौमित्र’ या नावाने तुमच्या कविता वाचकांच्या भेटीला येत असतात. एका मुलाखतीदरम्यान तुम्ही कवी गुलजार यांच्यासोबतच्या मैत्रीचा उल्लेख केला होता. काय सांगाल याविषयी?
-  एका नाण्याच्या दोन बाजू असतात त्याप्रमाणे माझ्या आयुष्याचेही दोन पैलू आहेत. ते म्हणजे एक अभिनय आणि दुसरे म्हणजे माझे काव्य. मला वाटतं की, हे दोन्ही पैलू एकमेकांना वृद्धिंगत होण्याची शक्ती देतात. गुलजार साहेबांबद्दल सांगायचं झालं तर ते माझ्यापेक्षा वयाने एवढे मोठे आहेत. पण, हे त्यांचे मोठेपण आहे की, ते मला किशोर म्हणून ओळखतात. त्यांच्यासोबतच्या मैत्रीचा मी आदर करतो. 

* सध्या कास्टिंग काऊचचा मुद्दा गाजतो आहे. याविषयी तुमचं मत काय?
- माझ्याबाबतीत तसं काही झालेलं नाही.

* अनेक रिअ‍ॅलिटी शोज सध्या टीव्ही जगतात सुरू आहेत. काय वाटतं की, रिअ‍ॅलिटी शोज हे मनोरंजनाचे माध्यम असू शकते का?
- असू शकतं. शोचा दिग्दर्शक ज्याप्रकारे तो शो साकारत असतो त्यावरच सर्व काही अवलंबून असतं, असं मला वाटतं.

* इंडस्ट्रीत कलाकार होऊ इच्छिणाऱ्या  स्ट्रगलर्संना काय संदेश द्याल?
- संदेश देण्याइतपत मी काही मोठा नाही. मी गेली २५ ते ३० वर्षं या इंडस्ट्रीत काम करतो आहे. माझ्या काळातील कलाकाराचं पॅशन वेगळं होतं, आता इंडस्ट्रीत असलेल्या कलाकारांचं पॅशन वेगळं आहे. त्यामुळे स्वत:चा प्रवास प्रत्येकाने आपापला केला पाहिजे, असं मला वाटतं.

Web Title: Acting My Passion-Actor Kishore Kadam
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.