'Acting My Love and Life' - Pallavi Joshi | ‘अभिनय माझं प्रेम आणि आयुष्य’ - पल्लवी जोशी

अबोली कुलकर्णी 

अभिनेत्री, निर्माती, गायिका, होस्ट या सर्व प्रकारांत आपलं आगळंवेगळं टॅलेंट सिद्ध करणारी प्रथितयश अभिनेत्री म्हणजे पल्लवी जोशी. चाईल्ड अ‍ॅक्टर म्हणून त्यांनी त्यांच्या अभिनय करिअरला सुरूवात केली. मराठी, हिंदीच नव्हे तर यासोबतच मल्याळम, कन्नड यासारख्या प्रादेशिक भाषांतही त्यांनी निवडक भूमिका साकारून त्यांचे वेगळेपण दाखवून दिले. आता कित्येक वर्षांनंतर  झी मराठीवरील ‘ग्रहण’ या मालिकेतून त्यांनी कमबॅक केले आहे. मालिकेतील रमा या व्यक्तिरेखेची चर्चा टीव्ही इंडस्ट्रीत सुरू आहे. मालिकेविषयीच्या आणि आत्तापर्यंतच्या अनेक गमतीजमती, गप्पा-गोष्टी त्यांच्यासोबत घेतलेल्या मुलाखतीतून उलगडत गेल्या.

* तुम्ही ‘ग्रहण’ या रहस्यमय मालिकेतून मराठीत कमबॅक केले आहे. याच मालिकेची निवड करावी असे का वाटले?
- कथानक हेच माझ्या मालिकानिवडीचं एकमेव कारण आहे. जेव्हा तुमच्याकडे एखाद्या मालिकेची स्क्रिप्ट येते तेव्हा मनात कुठेतरी ही भीती कायम असते की, मालिका कशी होईल? प्रोडक्शन कसे असेल? या सर्व बाबींचा विचार करूनच मग योग्य तो निर्णय घ्यावा लागतो. या मालिकेच्या वेळेसही तेच झाले. 

* रमाच्या व्यक्तिरेखेसाठी तुम्हाला काय मेहनत घ्यावी लागली काय सांगाल? 
- एखादी चांगली कलाकृती तयार करायची असेल तर एका कोणाच्या मेहनतीने ते होत नाही, त्यामागे संपूर्ण टीमची मेहनत असते. मात्र, तरीही रमाच्या व्यक्तिरेखेसाठी मला वेगळी अशी काही मेहनत घ्यावी लागली नाही. कारण आता एवढ्या वर्षांनंतर इंडस्ट्रीत काम करताना एखादा सीन आपल्याला कसा करायचा आहे, हे आपसुकच कळून येतं त्यासाठी काही वेगळे परिश्रम घ्यावे लागत नाहीत. 

* व्यक्तिगत आयुष्यात तुमचा पुनर्जन्म, आत्मा यासारख्या गोष्टींवर विश्वास आहे का?
- नाही. माझा विश्वास नाही आणि मला तसा काही अनुभव देखील आलेला नाही. पण, या विषयावर मला चर्चा करायला जाम आवडतं. कारण इथे काहीच दृश्य नसतं ज्याचा आधार घेत आपण काही वक्तव्य करावं. त्यामुळे साहित्यातील एक प्रकार म्हणून याचं थ्रिल अनुभवायला मला आवडतं. 

* तुम्ही हिंदी-मराठी दोन्ही प्रकारच्या माध्यमांमध्ये काम केलं आहे. काय फरक जाणवतो?
- दोन्ही माध्यमांमध्ये बराच फरक आहे. हिंदी माध्यमांत लाईफस्टाईल, डायलॉग, सेट्स, कॉस्च्युम्स या सगळयांतच फरक जाणवतो. तसं आपल्या मराठीत संस्कृती, सर्वसामान्य राहणीमान पाहायला मिळतं. भारतातील सगळया लोकांना समजतील अशा प्रकारच्या मालिकांची निर्मिती निर्मात्यांना करावी लागते. मात्र, मराठी मालिकांचा प्रेक्षकवर्ग हा मर्यादित आहे. त्या सगळयांनाच रूचतात, भावतात. 

* तुम्ही मल्याळम, कन्नड चित्रपटांतही काम केलं आहे. एक कलाकार म्हणून तुम्ही मराठीत स्वत:ला किती कम्फर्टेबल मानता ?
- जी आपली मायबोली असते त्यात आपण केव्हाही कम्फर्टेबल असतोच. इतर भाषांमध्ये काम करताना आपण स्वत:ला अपंगच समजतो. मल्याळम भाषा मला जरा कठीण वाटली. त्यातील अक्षरं, लिपी ही जराशी कठीण वाटते. पण याउलट कन्नड भाषा संस्कृतच्या अधिक जवळ जाणारी आहे. कन्नड चित्रपटांत काम करत असताना मला कन्नड थोडी थोडी समजू लागली होती. पण, या दोन्ही भाषांमध्ये काम करण्याचा अनुभव फार उत्तम होता. 

* तुम्ही अनेक टीव्ही सीरिज, चित्रपटांमध्ये काम केलं आहे. स्क्रिप्ट निवडताना कोणत्या गोष्टींची काळजी घेता?
- काळजी वगैरे मी काही घेत नाही. आॅफर्स येतच असतात. पण, जी भूमिका किंवा स्क्रिप्ट मला मनापासून आवडते, तिलाच मी होकार देते. कथानक चांगलं असावं, माझ्या भूमिकेला त्यात किती वाव आहे, हे देखील पाहणं माझ्यासाठी महत्त्वाचं असतं.

* झी सारे गमप आणि झी अंताक्षरी, लिटील चॅम्प्स यासारख्या सांगितीक कार्यक्रमांचे होस्टिंग तुम्ही केलं आणि एक वेगळी ओळख निर्माण केली. काय सांगाल याविषयीच्या अनुभवाविषयी?
- नक्कीच चांगला अनुभव मिळाला. आपल्या मराठी संस्कृतीत प्रत्येक घरात संगीत सामावलेलं आहे. मग ते संगीत कुठल्याही प्रकारचं असो, पण त्याला योग्य ते पोषक वातावरण निर्माण क रून दिलं जातं. आपल्याकडे मुलांना साधारणपणे तबला तर मुलींना गायन किंवा कथ्थक शिकवलं जातं. तर हे आपण मराठी माणसांत आहेच. या कार्यक्रमांच्या माध्यमातून मुलांना स्टेज मिळतं. कधीकधी एखाद्या दरी-खोऱ्यात एखादा चांगला गायक असेल आणि त्याला स्टेजच मिळत नसेल तर त्याचे गायन आपल्यापर्यंत पोहोचणार तरी कसे? त्यामुळे यासारखे कार्यक्रम व्हायला हवेत. त्यांच्यामुळे होतकरू मुलांना व्यासपीठ मिळतं.

* ‘हम बच्चे हिंदुस्थान के’,‘ खुन की टक्कर’, ‘ दादा’ आणि बºयाच चित्रपटांमध्ये तुम्ही चाईल्ड अ‍ॅक्टर म्हणून काम के लं आहे. काय वाटते  किती समृद्ध करणारा होता आत्तापर्यंतचा प्रवास?
- आत्तापर्यंतचा प्रवास अभिनेत्री म्हणून खुप समृद्ध करणारा होता. मी अभिनयाच्या क्षेत्रात काम करायला सुरूवात केली तेव्हा माझं वय केवळ १५-१६ वर्ष होतं. अगदीच कोवळं वय होतं ते. त्यावेळी मला श्याम बेनेगल, बबन हेलानी, दिग्दर्शक मोहन, रमेश सिप्पी, अमोल पालेकर यांच्यासोबत काम करायला मिळालं. सेटवर ते जेव्हा एखाद्या विषयावर चर्चा करायचे तेव्हा मी केवळ ऐकत बसायचे. ‘वर्ल्ड सिनेमा’,‘युरोपियन सिनेमा’ यांवर सुरू असलेली त्यांची चर्चा माझ्यात उत्सुकता निर्माण करायची. मी हैदराबादेत असताना ‘उस्मान’ चित्रपट करत होते. त्यावेळी सेटवर मी सर्वसामान्य मुलींप्रमाणे रोमँटिक कादंबऱ्या  वाचत बसले होते. हे श्याम बेनेगल यांनी पाहिले असता त्यांनी मला ‘ओ. हेन्री’ यांची शॉर्टस्टोरीज वाचायला दिली. यावरून मी असं म्हणेन की, आयुष्यात तुम्हाला जसे गुरू मिळतात तशी तुमची जडणघडण होत जाते. तेव्हापासून माझ्यात उत्तम वाचनाची आवड निर्माण झाली.

* निर्माती, अभिनेत्री, गायिका, उत्तम होस्ट या सर्व पातळ्यांत तुम्ही काम केलं आहे. पण, तुम्ही कोणत्या झोनमध्ये स्वत:ला कम्फर्टेबल मानता?
- खरं सांगू तर, मला अभिनयाशिवाय दुसरं काही चांगलं जमत नाही. पण, मला आवडतं म्हणून मी काही गोष्टी करत असते. माझ्या आयुष्यातून अभिनय कुठेच जायला नको. कारण तेच माझं खरं प्रेम आणि आयुष्य आहे. अभिनयाच्या झोनमध्येच मी स्वत:ला कम्फर्टेबल मानते.

* बिझी शेड्यूलमधून स्वत:साठी वेळ कसा काढता?
- कसा ते नाही सांगता येणार पण, होय मी स्वत:साठी आणि कुटुंबासाठी वेळ काढते. प्रत्येकानीच तो काढला पाहिजे. कारण तो जर तुम्ही काढला नाही तर तुम्ही वेडे व्हाल. त्यामुळे स्वत:साठी वेळ प्रत्येकानीच काढावा. 

*  अभिनयाची तुमची व्याख्या काय? 
 - अभिनय माझ्यासाठी श्वास. तो जर नसेल तर आयुष्याला काहीच अर्थ उरत नाही, एवढंच मी सांगेन.

* इंडस्ट्रीतील स्ट्रगलर्संना तुम्ही काय संदेश द्याल?
- खरंतर मला ‘स्ट्रगलर्स’ ही संकल्पनाच आवडत नाही. कारण, काही लोक स्वत:ला अ‍ॅक्टर्स म्हणवतात आणि काही स्ट्रगलर्स. खरं पाहिलं तर आम्ही देखील अजून आमच्या आयुष्यात स्ट्रगल करत आहोत. त्यामुळे प्रत्येक जण आपापल्या आयुष्यात काहीतरी नवीन शिकत असतो. अनुभवातून माणूस शिकत जातो.
Web Title: 'Acting My Love and Life' - Pallavi Joshi
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.