Acting is to live a different life - actress Bhagyashree Limaye | अभिनय म्हणजे विविधांगी आयुष्य जगणे-अभिनेत्री भाग्यश्री लिमये
अभिनय म्हणजे विविधांगी आयुष्य जगणे-अभिनेत्री भाग्यश्री लिमये
अबोली कुलकर्णी

सोज्वळ आणि हसतमुख चेहरा असलेली प्रसिद्ध अभिनेत्री भाग्यश्री लिमये कलर्स मराठी वाहिनीवरील ‘घाडगे & सून’ मालिकेत अमृताची भूमिका साकारते आहे. कथ्थक आणि गायनामध्ये पारंगत असलेली भाग्यश्री अभिनयातही तिच्यातील टॅलेंटची उंची गाठताना दिसते आहे. याच प्रवासाविषयी तिच्यासोबत मारलेल्या या गप्पा...

 * ‘घाडगे & सून’ या मालिकेतून तुम्ही कोणता सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करत आहात?
-  घरातल्या महिला, मुली, सुना यांचा आदर करावा असा संदेश आम्ही मालिकेतून देत आहोत. आपण महिला सक्षमीकरणाबद्दल केवळ बोलतो पण कृती करतो का? हाच संदेश आम्ही घराघरांतून प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. मालिकेच्या ट्रॅकनुसार, अमृतावर आता घाडगेंच्या घराची, व्यवसायाची जबाबदारी देखील आली आहे. अमृताला घरची सर्व मंडळी ही सुनेपेक्षा मुलगी म्हणूनच जास्त मानतात. आता अक्षयला घराबाहेर काढून आता सर्व घाडगे परिवार अमृताच्या पाठीशी उभा राहिला आहे. यातून आम्ही हेच सांगण्याचा प्रयत्न करत आहोत की, सुनांवर विश्वास ठेवा, त्यांचा आदर करा. 

 * घाडगेंच्या घरात जी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. त्यानुसार अमृता घराला कशी सांभाळून घेणार आहे, काय सांगशील?
- मालिकेत सध्या अक्षय अमृताला सोडून कियाराकडे निघून गेला आहे. त्याला आता परत सन्मानाने घरी आणण्याचा प्रयत्न अमृता करणार आहे. कारण अमृताला माहितीये की, अक्षयला कियारासह घरच्यासोबत राहायचे असेल तर अमृता नक्कीच तशा दृष्टीने प्रयत्न करणार आहे. अमृता अक्षयच्या पत्नीपेक्षाही चांगली मैत्रीण आहे. त्यामुळे तिने घरातही बदल करणे सुरू केले आहेत. 

* माई आणि अमृता यांच्यातील नात्याविषयी काय सांगशील?
- माई आणि अमृता यांचं नातं खूप छान आहे. मी शूटिंग करत असताना देखील मला ते जाणवतं. त्या सेटवर सगळयांचीच एखाद्या आईसारखी काळजी घेतात. एवढंच नव्हे तर अमृता मला खूप लकी वाटते कारण तिला माई मिळाल्या आहेत. त्यांच्यातील नातं हे आजी आणि नातसून पेक्षाही आई-मुलीचं जास्त वाटतं.

*  मालिकेत अनेक दिग्गज मंडळींकडून तुला काय शिकायला मिळालं?
- खरंतर मला सेटवर खूप काही शिकायला मिळतं. सगळीच दिग्गज मंडळी आहेत. सेटवर अगदी खेळीमेळीचं वातावरण असतं. मी सगळयांचे बारीक निरीक्षण करत असते. सीन चांगला झाला की मला लगेचच सगळयांकडून दाद मिळते. सर्वजण मला अत्यंत सहजपणे एखादी गोष्ट समजावूनही सांगतात.

* चिन्मय उदगीरकर याच्यासोबतच्या आॅनस्क्रीन केमिस्ट्रीविषयी काय सांगशील?
- आम्ही खूप चांगले मित्र आहोत. तुम्ही जर सुरूवातीचे काही सीन्स पाहिले असतील तर त्यात आम्ही एकमेकांच्या अंगावर उश्या देखील फेकायचो. काहीही बोलायचो. एकमेकांसोबत बिनधास्त वागायचो. मला असं वाटतं की, तुम्ही तेव्हाच खूप चांगले मित्र होता जेव्हा तुम्ही एकमेकांसोबत भांडता पण तेवढीच काळजी देखील घेता. त्यामुळे होय, चिन्मयसोबत मी भांडते आणि त्याची तेवढीच काळजी देखील घेते.

* भाग्यश्री म्हणून या मालिकेतून दिल्या जाणाऱ्या संदेशाशी किती सहमत आहेस आणि तू तुझ्या भावी वैवाहिक आयुष्यात कशाप्रकारे आत्मसात करशील?
- मी जेव्हापासून ही मालिका करायला सुरूवात केली तेव्हापासून मला परंपरा, सण, उत्सव या सगळया गोष्टी कळू लागल्या. ज्याप्रमाणे या सर्व गोष्टींना अमृता नवखी होती तशीच मी देखील होते. पण, हो मी शिकले आहे. मला एकत्र कुटुंबाला स्क्रिनवर पाहायला खूप छान वाटतं. मी देखील हेच फॉलो करणार आहे. मला मालिकेतून दिला जाणारा संदेश मनापासून पटला आहे.

* कुठलंही अ‍ॅक्टिंगचं बॅकग्राऊंड नसताना तू या क्षेत्राकडे कशी वळलीस?
- मला अभिनयाच्या क्षेत्रात पहिल्यापासूनच यायचं होतं. त्यासाठी मी प्रयत्न देखील करत होते. मी कथ्थक, गायनाच्या परीक्षा देखील दिल्या आहेत. त्यानंतर मी मॉडेलिंग करायला सुरूवात केली. मग मी आपसूकच या क्षेत्राकडे वळले. माझ्या घरच्यांचा मला कायम सपोर्ट असतो.

* मालिकेकडून आॅफर आली तेव्हा तुझी पहिली रिअ‍ॅक्शन काय होती?
- मला प्रचंड आनंद झाला. माझ्या डोळयांतून आपसूकच आनंदाश्रू वाहू लागले. मी आई-बाबांना सांगितले. त्यांनाही माझा खूप अभिमान वाटला. आजही ते मला खूप साथ देतात. त्यांचा मला खूप आधार आहे. मला ही मालिका करायला मिळाली याबद्दल मला खूप आनंद होत आहे.

* अभिनय तुझ्यासाठी काय आहे?
- अभिनय म्हणजे इतर भूमिका जगणे. कोणत्याही कलाकाराला एका आयुष्यात अनेकांचे आयुष्य जगायला मिळते. मी घरी गेल्यावर अमृताला विसरून जाते आणि भाग्यश्री बनून माझं आयुष्य जगते. 
Web Title: Acting is to live a different life - actress Bhagyashree Limaye
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.