According to Sachin Pilgaonkar, I changed me in time | सचिन पिळगांवकर सांगतायेत, मी काळाप्रमाणे मला बदलले

मराठी, हिंदी अशा दोन्ही इंडस्ट्रीमध्ये आपल्या अभिनयाच्या जोरावर आपले प्रस्थ निर्माण करणारे ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगांवकर कैदी बँड या हिंदी चित्रपटात एका जेलरच्या भूमिकेत दिसणार आहेत. ते अनेक वर्षांनंतर हिंदीत काम करत आहेत. त्यांच्या या चित्रपटातील भूमिकेविषयी आणि एकंदर कारकिर्दीविषयी त्यांच्याशी मारलेल्या गप्पा...

अनेक वर्षांपासून तुम्ही हिंदी चित्रपटात काम करत नाही आहात, त्यामागे काही खास कारण आहे का?
हिंदी चित्रपटांमध्ये काम करायचे नाही असे मी कधीच ठरवले नव्हते. आपल्या हिंदी चित्रपटांमध्ये हिंदुस्थानी भाषेचा वापर केला जातो. हिंदी आणि उर्दू या दोन्ही भाषांचे मिश्रण म्हणजे हिंदुस्थानी भाषा. हिंदी चित्रपटात संपूर्णपणे हिंदी भाषा वापरली तर ते प्रेक्षकांना विचित्र वाटेल तर दुसरीकडे संपूर्ण उर्दू भाषा प्रेक्षकांना समजणार नाही. त्यामुळे हिंदुस्थानी भाषा हिंदी चित्रपटात अनेक वर्षांपासून वापरण्यात येते आणि या हिंदी भाषेवर माझे प्रभुत्व आहे. वयाच्या नवव्या वर्षांपासून मी उर्दू भाषेचे धडे ज्येष्ठ अभिनेत्री मीना कुमारी यांच्याकडे गिरवले आहेत. त्यामुळे ही हिंदुस्तानी भाषा मला खूप जवळची वाटते. ही भाषा मला बोलायला खूप आवडते. त्यामुळे हिंदीत काम करायचे नाही असा मी कधीच विचार करू शकत नाही. पण हिंदी चित्रपटसृष्टीला दरम्यानच्या काळात माझा विसर पडला होता. मराठी चित्रपटसृष्टीप्रमाणेच हिंदी चित्रपटसृष्टीतील माझे योगदान महत्त्वाचे आहे हे बहुधा ते विसरले होते. त्यामुळे मी हिंदी चित्रपटात झळकलो नाही.

कैदी बँड हा चित्रपट स्वीकारण्यामागे काय कारण होते?
कैदी बँड या चित्रपटाचा दिग्दर्शक हबीब फैसलचे मी दो दूने चार आणि इश्कबाज असे दोन्ही चित्रपट पाहिले होते. त्यामुळे हा दिग्दर्शक व्हर्सटायल दिग्दर्शक असल्याचे मला चांगलेच माहीत होते. हबीबने या चित्रपटासाठी मला विचारले त्यावेळी मी त्याला माझ्या भूमिकेपेक्षाही पहिल्यांदा या चित्रपटाची कथा विचारली. माझ्यासाठी चित्रपटाची कथा ही अतिशय महत्त्वाची असते. कारण चित्रपटाच्या कथेत दम नसेल तर तुमची त्यातील भूमिका कितीही चांगली असली तरी त्याचा उपयोग होत नाही. या चित्रपटाची कथा मला आवडल्यावर मी या चित्रपटात काम करण्याचा विचार केला आणि विशेष म्हणजे या चित्रपटात सगळेच नवे चेहरे आहेत. त्यामुळे माझे कास्टिंग झाल्यावर सगळे फ्रेश चेहरे चित्रपटात असताना माझ्यासारख्या अनुभवी कलाकाराला चित्रपटासाठी का विचारले असे मी हबीबला आवर्जून विचारले होते, त्यावर तुम्ही तर संपूर्ण टीममधील सगळ्यात जास्त फ्रेश आहात असे म्हणत त्याने माझे तोंडच बंद केले होते. 

या चित्रपटात तुम्ही पोलिसांच्या भूमिकेत आहात, या भूमिकेविषयी अधिक काय सांगाल?
मी आज पन्नासहून अधिक वर्षं मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत काम करत आहे. पण माझ्या एवढ्या वर्षांच्या कारकिर्दीत मी कधीच पोलिसाची भूमिका साकारली नव्हती. आता तर कैदी बँड या चित्रपटात मी जेलरच्या भूमिकेत झळकणार आहे. त्यामुळे एक वेगळा सचिन प्रेक्षकांना पाहायला मिळणार असल्याची मला खात्री आहे.

तुम्ही एक दिग्दर्शक देखील आहात, त्यामुळे तुम्ही चित्रपटात काम करत असताना एका दुसऱ्या दिग्दर्शकाच्या हाताखाली काम करण्याचा अनुभव कसा असतो?
मी दुसऱ्या दिग्दर्शकासोबत काम करत असताना मी दिग्दर्शक नव्हे तर केवळ एक कलाकार असतो. मी त्यांच्या कामात कधीच ढवळाढवळ करत नाही की त्यांना कोणत्या प्रकारचा सल्ला द्यायला जात नाही. मी माझे काम निमुटपणे करत असतो. पण मी एक दिग्दर्शक असल्याने प्रत्येक दिग्दर्शकाला कोणकोणत्या समस्येतून जावे लागते हे मला चांगलेच माहीत आहे. त्यामुळे मी चित्रपटाच्या सेटवर नेहमीच वेळेवर जातो. कैदी बँड या चित्रपटाच्या सेटवर देखील सातची शिफ्ट असल्यास मी पावणे सातलाच उपस्थित असायचो. सेटवर मी सगळ्यांच्या आधीच पोहोचायचो. तसेच व्यक्तिरेखेविषयी अथवा एखाद्या दृश्याविषयी तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर ते चित्रीकरण सुरू व्हायच्या आधीच दिग्दर्शकाला विचारावे. चित्रीकरण सुरू असताना विचारल्यास त्याच्या कामात अडथळा येतो, हे मला चांगलेच माहीत आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी मी सेटवर कटाक्षाने पाळतो.

तुम्ही मीना कुमारी, शम्मी कपूर यांसारख्या ज्येष्ठ कलाकारांसोबत काम केले आहे, तसेच सध्याच्या नव्या पिढीसोबतदेखील काम करत आहात, या दोन्ही पिढींमध्ये तुम्हाला काय फरक जाणवतो?
आजच्या पिढीसोबत आणि आधीच्या पिढीसोबत काम करताना खूपच फरक जाणवतो. आधीच्या पिढीचे भाषेवर प्रचंड प्रभुत्व होते. पण सध्याच्या पिढीचे तसे नाहीये. सध्याची पिढी केवळ कॅमेऱ्यासमोर हिंदी बोलते. इतर वेळी ही पिढी इंग्रजीतच संभाषण करते. एवढेच नव्हे तर दृश्याबाबत चर्चा करताना देखील ते इंग्रजीतच बोलतात. यामुळे त्यांना परफॉर्मन्स देताना खूपच त्रास होतो. तुम्ही कोणत्याही भाषेचे पंडित असले पाहिजे असे मला वाटत नाही. पण त्या भाषेची तुम्हाला जाण तरी असली पाहिजे असे माझे मत आहे. माझ्या चित्रपटातील सगळ्याच मुलांचे हिंदी खूप चांगले होते. त्यामुळे आजच्या पिढीतील काहीजण या गोष्टीस अपवाद आहेत असे मी जरूर म्हणेन.

तुम्ही गेली पन्नास वर्षं या इंडस्ट्रीत आहात, गेल्या अनेक वर्षांत इंडस्ट्री किती बदलली आहे असे तुम्हाला वाटते?  
गेल्या अनेक वर्षांपासून इंडस्ट्री खूपच बदलली आहे. इंडस्ट्रीत वेगवेगळ्या प्रकारचा बदल होताना मी पाहिले आहे. अनेक प्रकारचे कॅमेरे बदलले आहेत, तसेच तंत्रज्ञान खूप बदलले आहे. ब्लॅक अँड व्हाईटपासून आजवर झालेले सगळे बदल मी जवळून पाहिले आहेत. मी इतकी वर्षं इंडस्ट्रीचा भाग आहे, यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो. मी देखील बदलत्या काळाप्रमाणे स्वतःला खूप बदलले आहे.

तू तू मैं मैं, हद कर दी यांसारख्या तुमच्या प्रोडक्शन हाऊसच्या मालिका प्रचंड गाजल्या होत्या. पण गेल्या काही वर्षांपासून तुम्ही मालिकांचे दिग्दर्शन, निर्मिती करण्याचे बंद केले आहे, त्याचे कारण काय?
मला डेली मालिकांची निर्मिती करण्यात रस नाहीये. प्रत्येक भागात काहीतरी ट्विस्ट आला पाहिजे असे वाहिनीली वाटत असते. तसेच एखादी व्यक्तिरेखा प्रेक्षकांना आवडत नसल्यास त्याला मालिकेतून काढून टाका, एखादी मालिका प्रेक्षकांची आवडती असल्यास त्याच्याभोवतीच मालिकेचे कथानक फिरवा असे वाहिनी सतत निर्मात्यांना सांगत असते. मी माझ्या पद्धतीने काम करतो. माझ्या कोणत्याच मालिकांमध्ये कधीही वाहिनीने ढवळाढवळ केली नाही. पण आज संपूर्ण परिस्थितीच बदलली आहे. आज झोपताना किंवा किचनमध्ये असताना देखील नायिका ही जरीच्या साड्या आणि दागिने घातलेली दाखवली जाते. पण माझ्या मालिकेत नायिका ही घरी असताना गाऊन घालायची. सामान्य स्त्री ही घरात तशीच असते. मी नायिकेला उगाचच भरजरी वस्त्रात दाखवू शकत नाही. या सगळ्यामुळे मी मालिकांपासून दूर राहातो.

अशी ही आशिकी हा चित्रपट तुम्ही दिग्दर्शित करणार असून या चित्रपटात अभिनय बेर्डे प्रमुख भूमिकेत आहे, या चित्रपटात काम कऱण्यासाठी अभिनय हा तुमची पहिली चॉईस होता का?
अशी ही आशिकी या चित्रपटाची कथा लिहिल्यानंतर माझ्या डोक्यात सर्वप्रथम अभिनयच आला होता. या चित्रपटात प्रेक्षकांना कुमारवस्थेतील प्रेम कथा पाहायला मिळणार असून या चित्रपटाच्या नायिकेच्या मी सध्या शोधात आहे. अभिनय हा खूप चांगला कलाकार आहे. त्याच्यासोबत अनेक दिवसांपासून मला काम करायचेच होते. अशी ही हे शब्द माझ्या हृदयाच्या खूप जवळचे असल्यानेच मी या चित्रपटाचे नाव अशी ही आशिकी असे ठेवले आहे. 

Also Read : अशी ही आशिकी या चित्रपटाद्वारे सचिन पिळगांवकर करणार नव्या क्षेत्रात पदार्पण

 
Web Title: According to Sachin Pilgaonkar, I changed me in time
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.