20 '20 'movie is in the void of controversy! | ‘२० म्हंजे २०’ चित्रपट वादाच्या भोवऱ्यात!


एकांकिकेशी कथा मिळतीजुळती असल्याचा आक्षेप; दिग्दर्शकाला नोटीस

           चित्रपटाच्या संकल्पनेवरून होणारे वाद मराठी चित्रपटसृष्टीला नवीन नसून आता १० जून रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘२० म्हंजे २०’ हा चित्रपटही वादात सापडण्याची शक्यता आहे. या चित्रपटाची कथा दहा वर्षांपूर्वी अनेक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धामध्ये अव्वल नंबरात आलेल्या ‘काही खडूचे तुकडे’ या एकांकिकेशी मिळतीजुळती असून एकांकिकेच्या दिग्दर्शकाने चित्रपटाच्या दिग्दर्शकाला रीतसर नोटीसही पाठवली आहे. सरकारी धोरणांतील काही अटींमुळे बंद पडणारी एका गावातील शाळा, वडिलांचे अधुरे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्या शाळेत शिकवणारी मुलगी, आपल्या मुलांना शाळेत पाठवण्यास तयार नसलेले गावकरी, या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करून शिक्षिकेची शाळा टिकवण्यासाठी चाललेली धडपड.. ‘२० म्हंजे २०’ या चित्रपटाच्या क्षणचित्रांवरून चित्रपटाची कथा साधारण अशी असल्याचे लक्षात येते. हीच कथा २००६ मध्ये रुईया महाविद्यालयाने विद्यापीठाच्या युवा महोत्सवासाठी केलेल्या एकांकिकेत मांडली होती. या एकांकिकेला त्या वर्षी अनेक स्पर्धामध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिकही मिळाले होते. बंगालमधील एक शाळा बंद पडल्याची आणि तेथील शिक्षिकेने ती चालू ठेवण्यासाठी केलेल्या कष्टांची एक बातमी २००६ मध्ये एका वर्तमानपत्रात आली होती. ती वाचून या एकांकिकेची कथा सुचल्याचे ‘काही खडूचे तुकडे’चे दिग्दर्शक अभिजित खाडे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. ‘२० म्हंजे २०’ची क्षणचित्रे पाहिल्यानंतर कथेतील साधम्र्यामुळे आपण हबकलो. कथा आणि एकांकिका यामधील संघर्षबिंदू सारखाच आहे. चित्रपट तयार करणे हे मेहनतीचे आणि पैशांचे काम असते. त्यामुळे चित्रपटाचे प्रदर्शन थांबवणे हा आमचा हेतू नाही. पण एकांकिकेच्या कथा आणि संवाद लेखकांना त्यांचे श्रेय द्यायला हवे, ही आमची मागणी आहे, असेही खाडे यांनी स्पष्ट केले. या एकांकिकेची संहिता आपण वाचलेली नाही. या एकांकिकेबाबत माहितीही नव्हती. मात्र एकांकिकेच्या दिग्दर्शकाने आपल्याला सांगितलेल्या कथासारावरून माझ्या चित्रपटाची कथा नक्कीच वेगळी आहे, हे सांगू शकतो, असे चित्रपटाचे दिग्दर्शक उदय भांडारकर यांनी स्पष्ट केले.
             चित्रपटाचे दिग्दर्शक उदय भांडारकर यांनी एकांकिकेची संहिता पाठवून देण्याबाबत सांगितले. पोस्टाद्वारे ही संहिता पाठवून देण्यासाठी त्यांचा पत्ता मागितला असता, ‘माझा माणूस येऊन तुमच्याकडून संहिता घेऊन जाईल,’ असे सांगण्यात आले. त्या गोष्टीला आपण नकार दिला. भांडारकर यांना रीतसर वकिलाकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. उत्तरादाखल त्यांनी  चित्रपटाची कथा वेगळी आहे, एवढेच कळवले आहे.  – अभिजित खाडे, दिग्दर्शक व कथा लेखक
             केवळ ९० सेकंदांच्या क्षणचित्राच्या आधारावर खाडे यांनी नोटीस पाठवली आहे. ‘काही खडूचे तुकडे’ची संहिता पाठवावी, असेही त्यांना सुचवले होते. त्यांनी अद्यापही ती पाठवलेली नाही. -उदय भांडारकर, दिग्दर्शक

Web Title: 20 '20 'movie is in the void of controversy!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.