गुपित ठेवायचा प्रयत्न ? ते गुपित यापुढे फुटणारच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2019 07:00 AM2019-01-13T07:00:00+5:302019-01-13T07:00:03+5:30

नयनतारा सहगल यांच्या उपस्थितीवर बंदी घालता आली, पण त्यांचे (कुणालातरी नकोसे असलेले) विचार अधिक शीघ्र गतीने अधिक लोकांर्पयत पोहचले. दमनकर्त्यांसाठी हा नव्या युगाचा ‘डिजिटल धडा’ आहे !

why & how digital age has given a sharpened tool to the warriors of Freedom of expression and why government should pay the heed | गुपित ठेवायचा प्रयत्न ? ते गुपित यापुढे फुटणारच !

गुपित ठेवायचा प्रयत्न ? ते गुपित यापुढे फुटणारच !

googlenewsNext
ठळक मुद्दे नयनतारा सहगल यांना दिलेलं निमंत्रण नंतर नाकारताना जे झाकायचा आयोजकांनी प्रयत्न  केला ते अधिक उघडनागडं होऊन लोकांसमोर आलं.. कारण   गुपितं फोडण्याची ही ‘डिजिटाइज्ड’प्रक्रिया !

विश्राम ढोले

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटक म्हणून प्रख्यात लेखिका नयनतारा सहगल यांना आमंत्रित करण्यात आलं. मग  ‘अपरिहार्य’ कारण सांगून त्यांना संमेलनाला येऊ नका असं आयोजकांनी कळवलं. त्यातून मोठा वाद उभा राहिला, हा ताजा इतिहास.
त्यानंतर उसळलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या रणधुमाळीत एक मुद्दा चर्चेत आला नाही, तोपण महत्त्वाचा आहे.
सहगलबाईंना न बोलावण्यामागे त्या जे भाषण संमेलनात करणार होत्या, ते (त्यांनी आधीच लिहून पाठवलेलं ) त्यांनी करू नये, त्यांचे विचार लोकांर्पयत पोहचू नयेत, असा (अ)विचार होता. निमंत्रणच रद्द केलं, म्हणजे हे त्यातील (काहींना गैरसोयीचे) विचार लोकांसमोर येणार नाहीत अशी अटकळही होती.
- प्रत्यक्षात तसं काहीही झालं नाही. जे व्हायला नको होतो ते व्हायचं राहिलं नाही. निमंत्रण नाकारल्याची बातमी येताच अवघ्या काही तासात नयनतारा सहगल यांचं लिखित भाषण समाजमाध्यमांत व्हायरल झालं आणि एरव्ही ते जिथं जितक्या प्रमाणात पोहचलंच नसतं आणि तितक्या प्रमाणात पोहचलं. संमेलनात हे भाषण झालं असतं तर झाली असती, त्याहून कित्येक पटीने चर्चा या भाषणावर झाली.
हे असं का झालं? - याचा विचार करणं गरजेचं आहे.
एकतर आता व्यक्तीला थांबवून, नाकारून किंवा टाळून तिचे विचारही आता पसरायचे थांबविता येतील अशी स्थिती राहिलेली नाही. माध्यमे मोठय़ा प्रमाणावर यायला लागली तशी ही स्थिती काही शतकांपूर्वीच बदलली. त्यापूर्वी तसं करणं बर्‍याच प्रमाणात शक्य होतंही !
उदाहरणार्थ, अनेक शतकं इंग्रजीत कम्युनिकेशन आणि ट्रान्स्पोर्टेशन हे शब्द बर्‍यापैकी समान अर्थानं वापरले जायचे. कारण प्रत्यक्ष म्हणजे शारीर पातळीवर उपस्थित असल्याशिवाय संवाद साधलाच जायचा नाही. त्यामुळे बोलणं-भेटणं यात प्रवास अध्र्याहूतच होता. संवादाची माध्यमं आली आणि हे वास्तव बदलत गेलं. शारीर अस्तित्वावर बंधनं घातली तरी विचारांच्या प्रसारावर बंधनं घालणं अवघड होत गेलं.  माध्यमांमुळे शारीर अस्तित्व आणि विचार यांच्यात द्वैत निर्माण झालं. 
हे चित्र आजच दिसतं आहे असंही काही नाही. इतिहासातही याचे काही दाखले सापडतात. नेताजी सुभाषचंद्र बोस यांना भारतात देशवासीयांशी बोलण्याची बंदी इंग्रज सरकारनं घातली होती. पुढं ते जर्मनीला गेले आणि तिकडून बर्लीन रेडिओवरून भारतीयांशी संवाद साधू लागले. कदाचित भारतात असताना त्यांची भाषणं जितकी ऐकली गेली नसती तितकी ही भाषणं ऐकली गेली.
जे विचार दडपण्याचा प्रय} होतो, ज्यांच्या प्रसारावर बंदी घालण्याचा प्रय} होतो, त्यांना या दडपण्याची, बंदी घालण्याची नकारात्मक ऊर्जा मिळते. त्यातून ते पसरण्याचीच शक्यता वाढते. इंग्रजीत म्हणतातच, ‘द मोअर यू सप्रेस, द मोअर व्हिगरसली इट विल अलकॉइल!’
 1980च्या दशकातली एक घटना. एमआयफाइव्ह अर्थात मिलिटरी इंटिलिजन्स सेक्टर 5 ही इंग्लंडची गुप्तचर सेवा. त्या सेवेत कार्यरत अधिकार्‍यानं निवृत्त झाल्यावर एक पुस्तक लिहिलं. त्या पुस्तकात गुप्तचर सेवा आणि शासन यासंदर्भात काही स्फोटक तपशील आहेत याची कुणकुण सरकारला लागली. इंग्रज सरकारने त्या पुस्तकावर बंदी घातली. लगोलग ते पुस्तक अमेरिकेत उपलब्ध झालं, इतकंच काय इंग्लंडच्या शेजारी स्कॉटलंडमध्येही धडाधड खपू लागलं. एरव्ही जे पुस्तक इंग्लंडमध्ये फार खपलं नसतं, गाजलं नसतं त्याच पुस्तकावर देशभर बंदी असल्यानं ते पुस्तक लोकांनी शेजारी देशांतून मिळवलं, वाचलं. म्हणजेच एखादं पुस्तक, त्यातली माहिती दडपून टाकण्याचं सामथ्र्य 1980च्या काळातही सरकार म्हणवणार्‍या यंत्रणेकडे नव्हतं. त्याचं कारण एकच, जे जेवढं दाबलं जाईल, दडपलं जाईल त्याविषयीचं माणसांचं आकर्षण जास्त उफाळून येतं. याचा अर्थ असा नव्हे की काहीच दडपू किंवा दाबून टाकता येणार नाही, तसे करता येऊ शकते. मात्र त्यासाठी अफाट ताकद लागते.
आजच्या घडीला संपर्काची ताकदवान माध्यमं उपलब्ध असताना अशी दडपशाही आणि दमन वाटतं तितकं सहजसाध्य नक्कीच उरलेलं नाही.
विकीलिक्स आणि ज्युलिअन असांज हे याच शृंखलेतलं पुढचं उदाहरण. गोपनियता किंवा काही गोष्टी लपवून ठेवणं हे सत्तेच्या हातातलं महत्त्वाचं शस्र मात्र असांजने त्यालाच सुरुंग लावला. तो ते करू शकला कारण डिजिटायझेशन आणि इंटरनेटमुळे होणारे नेटवर्किग या दोन शक्ती त्याच्यासोबत होत्या. मुळात माहिती गोपनीय राहू शकते याचे महत्त्वाचे कारण म्हणजे माहिती साठवण्याचा काहीएक भौतिक माध्यमाचा म्हणजे कागद, पुस्तक, डायरी, शिलालेख, ताम्रपट वगैरे असलेला आधार. एकदा या भौतिक वा साकार वस्तूंवर नियंत्रण मिळवलं की माहितीच्या प्रसारावर आणि गोपनीयतेवरही नियंत्रण मिळवता येतं. 
आता इंटरनेट आणि डिजिटायझेशनमुळे माहितीला फिजिकल फॉर्मच उरलेला नाही. माहितीला शारीर अस्तित्वच नसणं हा एक खूप आरपारचा आणि खोलवर बदल आहे. माहिती ही एक तरंगती किंवा निराकार बाब झाली आहे. डिजिटाझेशनमुळे माहिती निराकार तर झालीच शिवाय तिच्या अनेक प्रती काढणंही सोपं झालं. आणि इंटरनेटच्या नेटवर्किग क्षमतेमुळे ती अनेकांर्पयत चुटकीसरशी पोहचवणंही खूप सोपं झालं. माहिती एका व्यक्तीकडून पुढं पाठवणं, त्या माहितीला आपला पा¨ठंबा किंवा निषेध जाहीर करणं हे सारं एका क्लिकवर सहज शक्य होऊ लागलं. त्यामुळे माहितीच्या प्रसाराचं जाळं विस्तारत गेलं. माहितीच्या प्रसाराचा वेग इतका जास्त आहे की, काहीही गुपित राहणं आता यापुढे अशक्य होत जाणार आहे. डिजिटायझेशन-कॉपी आणि नेटवर्किग या तीनही गोष्टी मुळातच गुप्ततेला मारक आहेत. त्यामुळे आता असं म्हणतात की, इंटरनेटच्या जगात गुप्तता हे एक मिथक बनत चाललं आहे. उलट अमुक गोष्ट गुपित आहे म्हटल्यावर तिचा प्रचार-प्रसार इंटरनेटच्या माध्यमातून जास्त होतो. नयनतारा सहगल यांना दिलेलं निमंत्रण नंतर नाकारताना जे झाकायचा आयोजकांनी प्रयत्न  केला ते अधिक उघडनागडं होऊन लोकांसमोर आलं.. कारण   गुपितं फोडण्याची ही ‘डिजिटाइज्ड’प्रक्रिया !
अमिताभ बच्चनचा जुना ‘डॉन’ सिनेमा आठवा. त्यात डॉनची डायरी कुणाच्या हाती लागते यावर सारं कथासूत्र फिरतं. ती डायरी ही शारीर अस्तित्वात होती, तिची प्रत नव्हती किंवा ती तयार करणं शक्य नव्हतं म्हणून सिनेमाची कथा एका विशिष्ट वळणानं जाते. समजा ती डायरी जर डिजिटल फॉर्ममध्ये असती तर डॉन सिनेमाची कथाच बदलून गेली असती. सलीम जावेद यांच्या कथेतला हा डॉन आणि विजय वेगळ्याच वाटेचे प्रवासी झाले असते.
जसे आता आपण झालो आहोत.

******
एक उत्तम शस्र!


1  गुप्ततेचं शस्र वापरून त्या बळावर अमर्याद सत्ता गाजवणं आता अवघड होईल. सत्तेच्या गैरवापराला पायबंद बसेल.अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ईमेल वापरत नाहीत, ते म्हणूनच ! ईमेल न वापरण्याचा नेमका मतितार्थ त्यांना कळलेला आहे.
2  निगरुण-निराकार-तरंगत्या (फ्लोटिंग) माहितीला भाषेचं, देशांचं बंधन उरलेलं नाही. कोणत्याही भाषेतली माहिती अन्य कुठल्याही भाषेत भाषांतरित होऊन देशांच्या भिंती ओलांडून  वेगानं पसरू शकते.
3  कुठलीही व्यक्ती, माहिती यांना नकारात्मक मूल्य देणं हे अधिक तोटय़ाचं होऊ शकेल. नकारात्मकता हे मूल्य आहे आणि ते मिळालं की माहितीचे घोडे अधिक उधळतात. ज्याला नकार मिळाला ते स्वीकारण्याची आस समाजात निर्माण होते, हा या नव्या युगाचा धडा आहे.
4  जे नाकारायचं त्याला नकारात्मक मूल्य ही न देता अनुल्लेखानं मारणं हे कदाचित यापुढे अधिक सोयीचं ठरेल.

..पण दुधारी !


1  समाजाची सुरक्षितता, शांतता आणि कायदा सुव्यवस्था यासाठी काही गोष्टींची गुप्तता राखली जाणं आवश्यक असतं, गुप्तता हे तत्त्वच मोडीत निघालं तर समाजात अराजक माजवणारी माहितीही वेगानं पसरते. झुंडशाहीतून माणसांना मारण्याच्या अनेक घटना याच वृत्तीच्या निदर्शक आहेत.
2  माहितीचा प्रचार-प्रसार आणि डिजिटायझेशनचं तत्त्व तेच राहतं त्यामुळे माहिती विघातक की विधायक याचा विचार त्या प्रक्रियेत होत नाही. माहिती विधायक किंवा फायद्याची, स्वातंत्र्य आणि अभिव्यक्तीला पूरक-पोषक असेल तर या यंत्रणेचा फायदा होतो. मात्र तीच यंत्रणा विघातक माहितीही त्याच वेगाने लोकांर्पयत पोहचवू शकते हे विसरून चालणार नाही.
3  समाजात तेढ निर्माण करणारी माहिती अशी वेगानं पसरली तर त्याचे परिणाम किती भयावह असतात, याचा अनुभवही आपणाला येऊ लागला आहेच !

 

(लेखक समाजमाध्यमांसह संस्कृतीचे अभ्यासक आहेत.)
vishramdhole@gmail.com
शब्दांकन : मेघना ढोके

Web Title: why & how digital age has given a sharpened tool to the warriors of Freedom of expression and why government should pay the heed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.