कल्पनादर्शन ध्यान म्हणजे काय? ते का करावं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 03:00 AM2018-08-19T03:00:00+5:302018-08-19T03:00:00+5:30

एखाद्या प्रसंगाची किंवा दृश्याची कल्पना करून तो प्रसंग/दृश्य डोळे बंद करून पाहाणे, कल्पना करून आवाज अनुभवणे,सुगंधाची, चवीची, स्पर्शाची कल्पना करणे..

What is Visualization Meditation? | कल्पनादर्शन ध्यान म्हणजे काय? ते का करावं?

कल्पनादर्शन ध्यान म्हणजे काय? ते का करावं?

Next

-डॉ. यश वेलणकर

ध्यान या मेंदूच्या व्यायामाचे मेंदूवर दिसणा-या परिणामानुसार चार प्रकार केले जातात. एकाग्रता ध्यान, सजगता ध्यान, कल्पनादर्शन ध्यान आणि करुणा ध्यान असे हे चार प्रकार आहेत. 
 

कल्पनादर्शन ध्यान

एखाद्या प्रसंगाची किंवा दृश्याची कल्पना करून तो प्रसंग/दृश्य डोळे बंद करून पाहाणे, कल्पना करून आवाज अनुभवणे, सुगंधाची, चवीची, स्पर्शाची कल्पना करणे ! आपण रसाळ, पिकलेल्या लिंबाचे ध्यान केले तर तोंडाला पाणी सुटते. भविष्यातील संकटाचे आणि पूर्वी घडून गेलेल्या अपमानास्पद किंवा भांडणाच्या प्रसंगाचे आपण  स्मरण करतो त्यावेळी नकळत त्याचे कल्पनादर्शन ध्यान होत असते.

 त्यामुळे आपल्या शरीरात युद्धस्थितीतील रसायने पाझरतात, आपला रक्तदाब, रक्तातील साखर, हृदयाची धडधड, श्वासाची गती, स्नायूंवरील ताण वाढवतात, शरीराला थकवतात, मनाला अस्वस्थ करतात. 

ही स्थिती बदलायची असेल तर आपल्या शरीरात शांतता स्थितीतील रसायने पाझरायला हवीत. त्यासाठी आपल्या मनाला शांत करणारे एखादे दृश्य, ईश्वराची मूर्ती, देवाचे, गुरुचे किंवा आपल्या प्रिय व्यक्तीचे रूप कल्पना करून पाहायचे, हेच कल्पनादर्शन ध्यान होय.

या ध्यानाचे मेंदूवर आणि शरीरावर काय परिणाम होतात आणि ते कसे होतात हे तपासण्यासाठी अनेक प्रयोग होत आहेत. अशाच एका प्रयोगात पियानो वाजवणा-या माणसांच्या मेंदूचे एमआरआय स्कॅनिंग केले त्याचवेळी कंट्रोल ग्रुप म्हणून त्याच वयाच्या सामान्य माणसांचेही एमआरआय स्कॅनिंग केले. 

नंतर पियानो वादकांचे दोन गट केले. एका गटाला रोज एक धून दहा मिनिटे वाजवायला दिली ज्यामध्ये त्यांच्या डाव्या हाताची करंगळी अधिक वापरावी लागत होती. दीड महिना रोज दहा मिनिटे असा सराव केल्यानंतर त्यांच्या मेंदूचे पुन्हा स्कॅनिंग केले असता त्यांच्या मेंदूतील कोर्टेक्समधील डाव्या करंगळीशी संबंधित भाग विकसित झालेला आढळला.

खरी गंमत या नंतरच्या प्रयोगात आहे. दुसर्‍या पियानो वादकांच्या गटाला तीच धून प्रत्यक्ष न वाजवता ते ती धून वाजवत आहेत असे कल्पनादर्शन ध्यान रोज दहा मिनिटे करायला लावले. हे वादक त्यांची करंगळी प्रत्यक्ष वापरत नव्हते, पण फक्त तशी कल्पना करत होते. दीड महिना असे ध्यान केल्यानंतर त्यांच्याही मेंदूचे पुन्हा स्कॅनिंग केले आणि पहिल्या गटातील पियानोवादकांच्या मेंदूतील जो भाग विकसित झाला होता तोच डाव्या करंगळीशी संबंधित भाग प्रत्यक्ष पियानो न वाजवता त्याचे कल्पनादर्शन केल्याने विकसित झाला होता!

कल्पना करून ती पाहिल्याने मेंदूतील त्या कृतीशी निगडित भाग विकसित होतो हेच मेंदू विज्ञानाने सिद्ध केले.
या तंत्राचा उपयोग क्रीडा  मानसशास्त्न आणि खेळाडूंचे कोचिंग यामध्ये मोठय़ा प्रमाणात केला जातो. खेळाडू त्यांना जो खेळ खेळायचा आहे त्याच्या उत्तम परफॉर्मन्सचे मानसिक चित्र  पुन्हा पुन्हा पाहतात. त्यामुळे त्या कृतीशी निगडित मेंदूचा तो भाग विकसित होतो आणि मसल मेमरी तयार होते म्हणजे त्या कृतीतील स्नायूंना त्या कृतीची स्मृती तयार होते. तिरंदाजी, शूटिंग, जिम्नॅशिअम, पोलजम्प अशा अनेक क्रीडा प्रकारात या तंत्राने सराव केला जातो.

एकाग्रता ध्यानाने मनात अन्य विचार येत आहेत, आपले मन भरकटते आहे याची जाणीव लवकर होते. सजगता ध्यानाने आत्मभान आणि भावनिक बुद्धी वाढते. कल्पनादर्शन ध्यानाने अनावश्यक युद्ध स्थिती बदलवता येते, एखाद्या प्रसंगाची भीती कमी करता येते, एखाद्या कौशल्याचा मानसिक सराव करता येतो आणि करु णा ध्यानाने मेंदूचा निगेटिव्ह बायस्ड बदलतो, नकारात्मकता कमी होते. त्यासाठी या चारही प्रकारच्या ध्यानांचा सराव चालू ठेवायला हवा.

ध्यान आणि कृतीही..

* विचारांना कृतीची जोड नसेल तर केवळ विचार सत्यात येत नाहीत. हे जसे सकारात्मक विचाराबद्दल खरे आहे, तसेच नकारात्मक विचाराबाबतही खरे आहे. विचार हा मेंदूच्या पेशीतील केवळ एक तरंग असतो, तो प्रत्यक्षात खरा होण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागते. म्हणूनच यशस्वी खेळाडू केवळ कल्पनादर्शन ध्यान करून थांबत नाहीत, त्या खेळात नैपुण्य मिळविण्यासाठी कठोर पर्शिम घेत असतात.

* केवळ कल्पनादर्शन ध्यानावर विसंबून राहणे जसे अपयशाला आमंत्रण देणारे आहे तसेच केवळ सकारात्मक विचारांवर अवलंबून राहणेही चुकीचे आहे.

* एखादा निर्णय घेताना, समस्या सोडवताना सतत केवळ सकारात्मक विचार करणे धोकादायक ठरू शकते. कारण त्यामुळे भविष्यातील धोक्यांचा विचार केला जात नाही, आवश्यक ती काळजी घेतली जात नाही. वळणावरून जाताना वेगाने गाडी चालवणारा माणूस वाटेत कोणताही अडथळा नसणार असा सकारात्मक विचार करणाराच असतो; पण वस्तुस्थिती वेगळी असते आणि अपघात होतात. म्हणून निर्णय घेताना सर्व शक्यतांचा विचार करून योग्य ती काळजी घेणे आवश्यक असते.

* मनातील विचारांचा आपल्या शरीरावर, मेंदूवर परिणाम होतो, हे आज स्पष्ट दिसत आहे. पण विचार केवळ विचार असतो, ते सत्य नसते. माइण्डफुलनेसच्या नियमित अभ्यासाने आपली विचारांची सजगता वाढते त्यामुळे कोणत्या विचाराला महत्त्व द्यायचे आणि कोणत्या विचाराकडे दुर्लक्ष करायचे याचा विवेक जागृत होतो. 

(लेखक मनोविकासाच्या तंत्रांचे अभ्यासक आहेत.)

yashwel@gmail.com

Web Title: What is Visualization Meditation?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.