नगरला झालेय तरी काय?

By सुधीर लंके | Published: April 15, 2018 02:24 PM2018-04-15T14:24:33+5:302018-04-15T14:24:33+5:30

कुठल्या ना कुठल्या कारणाने  नगर जिल्हा कायम चर्चेत असतो. दोन शिवसैनिकांची नुकतीच झालेली हत्या, सोनई, खर्डा, कोपर्डीसारख्या राज्य ढवळून काढणाऱ्या घटना, छिंदम प्रकरणाने उठलेला गदारोळ..

What happened to the town? | नगरला झालेय तरी काय?

नगरला झालेय तरी काय?

Next

कुठल्या ना कुठल्या कारणाने  नगर जिल्हा कायम चर्चेत असतो. दोन शिवसैनिकांची नुकतीच झालेली हत्या, सोनई, खर्डा, कोपर्डीसारख्या राज्य ढवळून काढणाऱ्या घटना, छिंदम प्रकरणाने उठलेला गदारोळ..राजकारणातून उभे राहिलेले सवतेसुभे..संत, साहित्यिक, विचारवंतांची ही भूमी गुंडपुंड, अत्याचा-यांमुळे बदनाम का होतेय?

सोनई, खर्डा, कोपर्डी या जातीय व सामाजिक तणाव निर्माण करणाऱ्या घटना, छिंदमने केलेला शिवरायांचा अवमान यामुळे राज्यात केंद्रस्थानी असलेला अहमदनगर जिल्हा दोन शिवसैनिकांच्या हत्येने पुन्हा चर्चेत आला आहे. हे सगळे नगरलाच का घडते आहे? हा जिल्हा असा गुंडापुंडांचा, खुनी, अत्याचारी कसा बनला? या जिल्ह्याला नेमके झालेय तरी काय, असे प्रश्न त्यामुळे राज्यभरातील जाणकारांकडून पुन्हा एकदा उपस्थित होऊ लागले आहेत.
- खरेच नगरला झालेय काय? सिनेकाठच्या या गावाची व पुरोगामी जिल्ह्याची अशी संस्कृती नव्हती. आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना उभारणीचा मान या जिल्ह्याच्या नावावर आहे. शेतकºयांनी तो पै पै जमवून उभारला. ज्ञानेश्वरांनी या भूमीतून पसायदान मागितले. साईबाबांनी समतेचा संदेश दिला. नाथ संप्रदाय, हिंदू-मुस्लीम एकतेचे प्रतीक असलेले शहा-शरीफ, जग ज्यांना मानते ते अवतार मेहेरबाबा, आचार्य आनंदऋषी अशा संतसज्जनांची ही भूमी आहे. साहित्य क्षेत्रात ना. वा. टिळक, लक्ष्मीबाई टिळक, ख्रिस्तगीतकार कृ.र. सांगळे, दया पवार ते रावसाहेब कसबे, रंगनाथ पाठारे, कला क्षेत्रातही शाहू मोडक, मधुकर तोरडमल, सदाशिव अमरापूरकर हे दिग्गज या भूमीत घडले. या भूमीचे हे सगळे संस्कार दुर्लक्षिणारी व हे संस्कार मातीमोल करणारी गुंडगिरी, पेंढाºयांच्या टोळ्या निपजल्या कोठून, असा प्रश्न उपस्थित होतो.
नगरला एका वॉर्डात पोटनिवडणूक झाली. या निवडणुकीनंतर दोन शिवसैनिकांची हत्या झाली. तीन आमदारांवर या हत्येचा आरोप आहे. त्यात खरेखोटे काय ते ठरेल. पण, या घटनेनंतर राष्टÑवादीच्या कार्यकर्त्यांनी ‘गंगाजल’ सिनेमास्टाइल पोलीस अधीक्षक कार्यालयात गर्दी करून पोलीस चौकशी सुरू असताना आपल्या आमदाराला पळविले. राष्टÑवादीचे अजित पवार व सर्व नेत्यांनी आपल्या आमदारांना सेनेने चुकीच्या पद्धतीने खुनाच्या गुन्ह्यात रोवल्याचा आरोप केला. पण, पोलीस अधीक्षक कार्यालयात आपल्या कार्यकर्त्यांनी जो धुडगूस घातला त्याची जबाबदारी या पक्षाने स्वीकारलेली नाही. तसेच शिवसेनेचे आहे. राष्टÑवादीला आरोपी करून सेना मोकळी झाली. मात्र, शिवसैनिकांच्या हत्येनंतर केडगाव भागात जो धुडगूस घातला त्याबद्दल सेनेनेही पश्चाताप व्यक्त केलेला नाही.
या गावात व असे गुन्हे करणाºया लोकांत लोकशाहीच रुजलेली नाही याची ही लक्षणे आहेत. नगर हा एकेकाळचा कम्युनिस्ट व समाजवादी चळवळीचा बालेकिल्ला असलेला जिल्हा आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळात नगर जिल्ह्यात विधानसभेच्या ज्या निवडणुका झाल्या त्यात काँग्रेसची केवळ एक जागा निवडून आली होती. इतर सर्व जागा कम्युनिस्ट व समाजवाद्यांनी जिंकल्या होत्या. तो काळच भारावलेला होता. पायी फिरून, सायकलवर प्रचार व्हायचा. बिनपैशांच्या निवडणुका होत्या. जिल्हा लोकल बोर्डाच्या अध्यक्ष हिराबाई भापकर यांनी सायकलवर जिल्ह्याचा दौरा केला होता. पुढे जिल्ह्यात काँग्रेस वाढली. नंतरच्या काळात तिच्यातून राष्टÑवादी निर्माण झाली. नव्वदनंतर सेना-भाजपा यांचा उदय झाला. कम्युनिस्ट लयाला गेले.
या सर्व पक्षांनी राजकारणाचा पोत व कार्यपद्धतीच बदलवली आहे. दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांनी मतदारसंघावर पकड निर्माण करण्यासाठी सहकारी साखर कारखाने काढले. हे कारखाने म्हणायला सहकारी आहेत; पण तेथे सगळी सरंजामदारी. बापानंतर मुलगा चेअरमन होतो. जिवंतपणीच हे लोक कारखान्यांना स्वत:ची नावे द्यायला लागले आहेत. कारखान्यांमुळे या घराण्यांकडे प्रचंड पैसा आला. त्या जोरावर आमदारकी, खासदारकी टिकून राहते. यात सर्वसामान्य कार्यकर्त्यांना या नेत्यांची हुजरेगिरी करण्याशिवाय पर्यायच राहत नाही. ‘साहेब’ ठरवतील तेच अंतिम मानले जाते. लोकशाही अशी ‘लिमिटेड’ झाली आहे.
- या मंडळींना आपले साम्राज्य जपायचे असल्याने त्यांनी स्वत:चे ‘सुभे’ निर्माण केले आहेत. इतरांच्या सुभ्यांमध्ये हस्तक्षेप करायचा नाही, असा अलिखित नियम त्यांनी ठरविला आहे. त्यामुळे आपल्या शेजारील तालुका जळाला तरी हे लोक तिकडे फिरकत नाहीत. बोलत नाहीत. लोकशाहीच्या अशा ‘हद्दी’ या जिल्ह्यात आहेत. त्यातून राजकारणातील अधिष्ठान व मूल्यव्यवस्थाच लयाला गेली आहे. सगळा दिखावा सुरू आहे. घोळ आहे तो येथे. संस्थात्मक राजकारणामुळे या जिल्ह्यात ही कार्यपद्धती मोठ्या प्रमाणावर आहे. साखर कारखाने अधिक असल्याने सरंजामदारही अधिक आहेत. त्या तुलनेत त्यांना प्रश्न विचारणाºयांची संख्या व आवाज कमी आहे.
१९६९ साली शरद पवार यांनी राज्यातील काँग्रेसच्या दुरवस्थेबद्दल यशवंतराव चव्हाण यांना पत्र लिहिले होते. या पत्रात ते म्हणतात, ‘आमच्यातील सत्तास्पर्धा इतक्या थराला गेली आहे की, आम्ही कोणाचे प्रतिनिधित्व करत आहोत याचे भान आम्हाला राहिलेले नाही. वैयक्तिक स्वार्थासाठी आम्ही आदर्श सोडून दिले असून, राजकीय शिक्षण देण्याची प्रोसेस बंद झाली आहे. सत्तेतील माणसे सत्तेचा, पैशाचा वापर स्वार्थासाठी करत आहेत. आपणाबरोबर न येणाºया वर्गाची ते पिळवणूक करत आहेत’. शरद पवार यांनी यशवंतरावांना उद्देशून जे लिहिले होते तेच आज राष्टÑवादी व काँग्रेसच्या सामान्य कार्यकर्त्यांनी आपल्या हायकमांडला लिहिण्याची वेळ आली आहे. हीच संस्कृती सेना-भाजपातही आली आहे.
नगर शहरात तर संस्थात्मक राजकारणही नाही. येथे कुणी टांगेवाला, कुणी दूधवाला, कुणी हमाल, कुणी पावभाजीवाला नेता झाला. खरे तर ही चांगली बाब होती. पण, हे लोक आपले मूळ विसरले व ‘दादा’ बनले. राष्टÑवादीने जगताप या एकाच कुटुंबात दोन आमदारक्या दिल्या. पिता-पुत्र दोघेही आमदार. याचा अर्थ या पक्षाचीही काहीतरी मजबुरी दिसते. जेथे पक्षच मजबूर असेल तेथे कार्यकर्ते बोलण्याचे धाडस काय दाखविणार?
वाचन, लेखन करून व चांगली भाषणे करून आपण आमदार-खासदार, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य होऊ शकतो यावरचा लोकांचा विश्वासच उडाला आहे. यशवंतराव चव्हाण राजकारणात असताना पत्नीला पत्रव्यवहार करायचे. कुटुंबाच्या खर्चाबद्दल विचारायचे. सुशीलकुमार शिंदे सांगतात की, बॅरिस्टर नाथ पै हे इतके अभ्यासू भाषण करायचे की त्यांचे फोटो आम्ही खिशात बाळगायचो. राजकारणातील ही वाचन-लेखन संस्कृती संपली आहे.
बी.जे. खताळ हे नगर जिल्ह्यातील माजी मंत्री आहेत. आयुष्यभर या माणसाने साधनसूचिता, तत्त्व, विचार जपले. त्यांनी शताब्दीत पदार्पण केले आहे. त्यांचा समारंभ नगर जिल्ह्याबाहेरील मंडळींनी पुण्यात केला. पण, नगरकरांना तसे करावेसे वाटले नाही. कारण खताळांचा सत्कार करून फायदा काय, हा हिशेब!
जिल्ह्यातील साहित्यिकांनाही राजकारण्यांचे वारे लागले आहे. तेही गप्प आहेत. साहित्यक्षेत्रातही ‘कंपू’ निर्माण झाले आहेत. डॉक्टर, शिक्षक, वकील यांच्या संघटनांचेही राजकारण्यांशी हितसंबंध येतात. बार असोसिएशनवर निवडून येण्यासाठी, सरकारी वकील होण्यासाठी पक्षांचा आशीर्वाद लागतो. शिक्षक आमदार व्हायचे असेल तर राजकारण्याचे पाठबळ लागते. त्यामुळे या सर्व उच्चशिक्षित वर्गाने आणि सज्जनांनी कुठल्याही घटनेवर भूमिकाच घ्यायची नाही, असे ठरविलेले असते. नगरची डॉक्टर मंडळी वैद्यकीय तज्ज्ञांपेक्षा राजकारण्यांच्या हस्तेच हॉस्पिटल्सची उद्घाटने करायला प्राधान्य देतात यातूनही अगतिकता दिसते.
अगदी अण्णा हजारे, पोपटराव पवार यांसारखी माणसेही नगरमधील घटनांबाबत बोलत नाहीत. कारण त्यांच्या विचारांकडे तटस्थपणे पाहण्याचे शहाणपण समाजाकडे व राजकीय नेत्यांकडेही नाही. जिल्ह्यातील सज्जनांनी बळजबरीने मौन पाळल्याने हितसंबंधी लोक घटनांना बºयाचदा अतिरंजित बनवतात. जिल्ह्याबाहेरील लोकांचा अशावेळी हस्तक्षेप होतो. त्यातून सत्यही समोर येत नाही आणि नुसताच गदारोळ होतो. मूठभरांची सरंजामदारी आणि सज्जनांचे मौन या जिल्ह्याला बदनाम करते आहे. धाकच राहिलेला नाही.
नगरच्या घटनेनंतर दूरचित्रवाणी वाहिनीवरील चर्चेत गृहराज्यमंत्री दीपक केसरकर व राष्टÑवादीचे नवाब मलिक म्हणाले की, आम्ही आता नगरच्या राजकारणाचे शुद्धिकरण करणार आहोत. हे बाहेरचे नेते बोलले; पण नगरचे धुरीण म्हणविणारे मौनात आहेत. म्हणून पेंढाºयांच्या टोळ्या दहशत गाजवत आहेत.

Web Title: What happened to the town?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.