प्रत्येक क्षणाच्या अनुभवाचा साक्षीदार होण्यासाठी काय करावं ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2018 06:55 AM2018-09-23T06:55:22+5:302018-09-23T06:55:22+5:30

हर क्षणाचा अनुभव जगण्यासाठी मदत करणारा साक्षीभाव

  What to do to become a witness of every moment's experience? | प्रत्येक क्षणाच्या अनुभवाचा साक्षीदार होण्यासाठी काय करावं ?

प्रत्येक क्षणाच्या अनुभवाचा साक्षीदार होण्यासाठी काय करावं ?

Next


-डॉ. यश  वेलणकर

माणसाच्या कर्ता, भोक्ता आणि साक्षी अशा तीन भूमिका असतात. यातील कर्ता आणि भोक्ता अगदी जन्माला आल्यापासून माणूस असतोच. बाळ आईचे दूध चोखत असते त्यावेळी कर्ता असते, ते दूध प्यायल्याने त्याचे समाधान होते. त्यावेळी ते भोक्ता असते. साक्षीभाव मात्र जन्मत: नसतो. तो शिकून घ्यावा लागतो. 

माइंडफुलनेसचा सराव हा साक्षीभाव विकसित करण्यासाठीच आहे. हा साक्षीभाव विकसित झाला की माणूस अधिक चांगला कर्ता, अधिक चांगला रसिक भोक्ता होऊ लागतो. आता कोणत्या रोलमध्ये, कोणत्या भूमिकेत आपण राहायचे आहे हे तो ठरवू शकतो, त्यानुसार लवचीकतेने स्वत:च्या भूमिका बदलू शकतो. साक्षी व्हायचे म्हणजे मन वर्तमानात आणून त्या क्षणी परिसरात, मनात आणि शरीरात जे काही होत आहे ते जाणायचे, त्याचा स्वीकार करायचा. ..आणि पुढील क्षणी साक्षी राहायचे की कर्ता, भोक्ता व्हायचे हे ठरवायचे. हे कौशल्य नियमित सरावाने वाढते. 

कोणत्याही क्षणी आपला अनुभव सुखद- दु:खद किंवा न्यूट्रल म्हणजे असुखद-अदु:खद असतो. साक्षी व्हायचे म्हणजे हा अनुभव जाणायचा. तो सुखद असेल तर त्याचा आनंद घ्यायचा, भोक्ता व्हायचे, रसिक व्हायचे. तो सुखद नसेल तर ती परिस्थिती बदलण्यासाठी कोणते प्रयत्न करायला हवेत, ते ठरवायचे आणि ते प्रयत्न करायचे म्हणजे कर्ता व्हायचे. ते करताना सजगतेने त्या कृतीमध्ये पूर्ण तन्मय व्हायचे, त्या कृतीचाच आनंद घ्यायचा. 

हेही लक्षात घ्यायचे की माणसाचे सर्व प्रयत्न नेहमी यशस्वी होतातच असे नाही. काही गोष्टी आपण बदलवू शकतो, त्या बदलण्यासाठी आटोकाट प्रयत्न करायचे. पण आयुष्यात काही गोष्टी आपल्या नियंत्रणाबाहेर असतात. त्यांचा स्वीकार करायचा. म्हणजेच साक्षी व्हायचे. असे साक्षी झाल्याने अस्वीकाराचे दु:ख कमी होते, अस्वस्थता, तणाव कमी होतो. हे शरीराच्या आजारांसाठी करायचे, मानसिक भावनांसाठी करायचे, बाह्य परिस्थितीसाठीही करायचे.  शरीरात जे काही घडते आहे त्याविषयी साक्षीभाव विकसित करण्याचे पहिले पाऊल म्हणजे नैसर्गिक श्वासामुळे होणारी छातीपोटाची हालचाल जाणत राहायची. मतिमंद मुले आणि काही मानसिक आजार असलेल्या व्यक्ती सोडल्या तर अन्य सर्व माणसे ही श्वासाची हालचाल जाणू शकतात, म्हणजेच साक्षीभाव अनुभवू शकतात. आपण श्वासाची गती प्रयत्नपूर्वक बदलवतो म्हणजे प्राणायाम करतो, त्यावेळी कर्ता असतो. 

साक्षी व्हायचे म्हणजे श्वासामध्ये कोणताही बदल करण्याचा प्रयत्न न करता तो जसा आहे तसा जाणायचा. याच साक्षीभावाने मनातील विचार आणि भावनादेखील जाणता येतात. मनात येणारे भीतीदायक विचार आपण नाकारतो, ते विचार बदलण्याचा प्रयत्न करतो. काहीवेळा हे प्रयत्न यशस्वी होतात पण प्रत्येक वेळी होतातच असे नाही. भीतीचे विचार मनात पुन्हा पुन्हा येत राहतात, माणसाला अस्वस्थ करतात. आपण विचार बदलण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी कर्ता असतो. पण प्रयत्न करूनही पुन्हा पुन्हा भीतीचे विचार मनात येत असतील तर हे विचार आपल्या नियंत्रणाबाहेर आहेत हे मान्य करायचे आणि  साक्षी व्हायचे. त्या विचारांना नाकारण्याचा, त्यांना बदलवण्याचा प्रयत्न न करता, त्यांचा स्वीकार करायचा आणि आपले लक्ष शरीरावर आणायचे. त्या विचारांचा परिणाम म्हणून शरीरात काय होते आहे, छातीत धडधड, पोटात गोळा, कपाळावर घाम, हातापायात कंप जे काही जाणवते आहे त्या संवेदनांचा स्वीकार करायचा. आजचे मेंदूविज्ञान सांगते की असा स्वीकार माणूस करतो त्यावेळी त्याच्या भावनिक मेंदूची सक्रियता कमी होते. 

माइंडफुलनेस म्हणजे साक्षीभाव कोणताही शारीरिक किंवा मानसिक त्रास असेल तरच उपयुक्त असतो, असे नाही. हा साक्षीभाव रोजच्या आयुष्यातील आनंद वाढवणारा आहे. साक्षीभावाने मनातील विचारांपासून अलग झालो तरच आपण वर्तमानातील छोटे छोटे आनंद अनुभवू शकतो. 

छोट्या छोट्या आनंदक्षणांसाठी.
* आपले मन भूत आणि भविष्यात भटकत असते. मनात सतत येणारे विचार आपल्याला वर्तमानात ठेवत नाहीत. 

* आपले मन अनावश्यक विचारात आहे हे लक्षात येईल त्यावेळी आपले लक्ष त्याक्षणी येणारे आवाज, जाणवणारे स्पर्श,रूप,गंध यावर आणायचे. 

* साक्षीभावाने मनातील विचारांपासून अलग झालो तरच आपण वर्तमानातील छोटे छोटे आनंद अनुभवू शकतो. तो क्षण आनंददायी असेल तर भोक्ता होऊ शकतो. 

* अस्वस्थता साक्षीभावाने कमी करू शकतो,  भोक्ता भावाने आनंद अनुभवू शकतो.


(लेखक मनोविकासाच्या तंत्रांचे अभ्यासक आहेत.)

yashwel@gmail.com

Web Title:   What to do to become a witness of every moment's experience?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.