सचिन कुंडलकर
 
आई, शाळेच्या संस्कृत मंडळाला दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर सकाळी पाच वाजता अथर्वशीर्ष म्हणायला बोलावलंय तर मी जाऊ का? सकाळी रिक्षा मिळेल का? तिथे सोवळ्यावर मला टी शर्ट घालता येईल का असं सरांना विचारशील का? सगळ्यांना उघडे करून  का बसवतात देवापुढे? परंपरा म्हणजे काय? म्हणजे बाबा वागतात तसंच मी वागायचं आहे का?
 
आई, देव खरेच असतो का? असला तर मग तो कुठे असतो? आपल्या देवघरात आहेत ते सगळे देव वरती आकाशात एकत्र राहतात का? त्यांच्या वेगवेगळ्या सोसायट्या असतात का? मग वेगवेगळ्या सणांना ते आपल्या आणि इतरांच्या घरी येऊन जातात का? लक्ष्मी तर रोजच संध्याकाळी येते आणि घरावरून नजर टाकून जाते असे तू म्हणालीस मग ती रात्रभर फिरते का? कारण कितीतरी घरे आहेत? आपले गुरुजी येऊन पूजा करून मूर्तीमध्ये प्राणप्रतिष्ठा करून जातात तेव्हा गणपती खराखुरा आपल्याकडे पाच दिवस राहायला येतो? मग आपल्याकडे येतो तसा सगळ्यांकडेच येत असेल ना? मग नक्की किती गणपती आहेत? 
 
गौरी येतात त्या नक्की कुठून येतात? ही पावले त्यांची असतात का? आपल्या अंगणात ती कधी उमटतात? मी दोन करंज्या खाऊ का? नैवेद्य कधी होणारे? एक लाडू तरी देतेस का? मी सोवळे नाही नेसले तर चालेल का? माझे पोट खूप मोठे झाले आहे, मी गुरु जींसमोर असा उघडा बसण्याऐवजी सोवळ्यावर टी शर्ट घालू का? मूर्ती विसर्जन केली की ती देवनदीतून पोहत स्वर्गात जाणारे का? म्हणजे आपली मुठा नदी पुढे स्वर्गात जाते का? नद्यांची नावे कुणी ठेवली? 
 
तुला मोदक कुणी शिकवले? आज्जीला मोदक कुणी शिकवले? आज्जीच्या आईला? 
आई रस्त्यावरच्या गणेशोत्सवाची वर्गणी मागायला ती मवाली मुले परत आली तर काय सांगू? दार उघडू का? ओटी म्हणजे काय? आजी परत कधी जाणारे? ती गेली की मग तू मला आॅम्लेट करून देशील का? पण स्वयंपाकघरात बनवले तर गणपती गौरींना कळेल का? मग विसर्जन झाले की बनवून देशील का? कट म्हणजे काय? गणपती नसतो तेव्हा वर्षभर आपले गुरु जी काय करतात? ते सिनेमा बघतात का? गणपती पाहायला कधी बाहेर पडायचे? कावरे आइस्क्र ीम घेऊन देशील का? 
आई, ‘सनम बेवफा’ गाणे आहे त्यातले बेवफा म्हणजे काय? बाबा हे तुझे सनम आहेत का? गणपतीला हिंदी येते का? संस्कृत? बिल्लनची नागीण म्हणजे काय? टिळक कोणती गाणी लावायचे? टिळकांच्या वेळी हिंदी पिक्चरची गाणी होती का? पारतंत्र्य म्हणजे काय? पण ब्रिटिश लोक हिंदू नव्हते का? चिनी लोक इंग्लिश बोलतात का? 
 
आपल्याकडे गणपती पाच आणि गोखले काकूंकडे दीड दिवस कारण काकू आळशी आहेत का? घरचा गणपती दहा दिवस का नसतो? आपल्याकडे गौरी येतात आणि शिंदे काकूंकडे महालक्ष्म्या येतात त्या सेमच असतात का?
 
शाळेच्या संस्कृत मंडळाला दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर सकाळी पाच वाजता अथर्वशीर्ष म्हणायला बोलावलंय तर मी जाऊ का? सकाळी रिक्षा मिळेल का? सगळे साबुदाणे आणि केळी का खात बसतात तिथे सकाळी सकाळी? तिथे सोवळ्यावर मला टी शर्ट घालता येईल का असे सरांना विचारशील का? सगळ्यांना उघडे करून का बसवतात देवापुढे? मुलांनीच का टी शर्ट काढायचे? मुली का नाही काढत? 
अमेरिकेतपण गणपती असतो का? का नसतो? अमेरिकेत पारतंत्र्य नव्हते का? ब्रिटिश लोकांचे अमेरिकेवर राज्य नव्हते का? तुमच्या लहानपणी तुम्ही डेकोरेशन कसे करायचात? प्रस्तुतकर्ता म्हणजे काय? देणगी म्हणजे काय? गणपती बरोब्बर त्याच दिवशी कसा येतो? स्वर्गात कालनिर्र्णय लटकवलेले असते का? 
 
स्वर्गात हिंदी सिनेमाची गाणी लागतात का? आजोबा स्वर्गात गेले आहेत ते वर गणपतीला भेटत असतील का? महाभारत सिरीअलमध्ये असतो तसा तिथे धूर निघत असतो का सतत? म्हणून तुम्ही उदबत्त्या लावता का? देवांना दोन तीन बायका असतात मग आपल्याला एकच का असते? चिकन शाकाहारी नसते का? 
गणेशोत्सव मंडळाची मुले मवाली का असतात? ते शिव्या देतात आणि मांडवाखाली दारू पितात ते चालते का? बुद्धीची देवता असते तर मग इंग्लंड-अमेरिकेत ज्यांना बुद्धी आहे ते पण गणेशोत्सव साजरा करतात का? न्यूटनकडे पण गणपती बसायचा का? 
 
देवा हो देवा, गणपती देवा, तुमसे बढकर कौन, स्वामी तुमसे बढकर कौन हे गाणे सारखे का लावतात? मिथुन चक्र वर्ती त्या मूर्तीवरचे दागिने चोरणार असतो का? आपल्याकडे तीनच आरत्या का म्हणतात? फार गोड गोड जेवण झालेय थोडी तिखट भजी तळतेस का? गणपती आणि सॅण्टाक्लॉज एकमेकांना स्वर्गात भेटत असतील का? कॅम्पमध्ये गणपती का बसत नाही?
 
बिन अंड्याचा केक घेऊन दे ना, चालेल का? आपण आपले मंडळ काढूया का? म्हणजे आपली आवडती गाणी मोठ्यांदा वाजवता येतील? जया बच्चनने गणपतीला सोन्याचे कान दिल्यावर मग अमिताभ बरा झाला का? आपण माझ्या स्कॉलरशिपच्या परीक्षेआधी गणपतीला सोन्याचे नाक देऊया का? कॅडबरीमध्ये अंडे असते का? गणपतीला नुडल्स आवडतील का? पॉपकॉर्न? 
पु. ल. देशपांडे गणपती बसवतात का? आणि कुसुमाग्रज बसवतात का? 
 
अंधश्रद्धा म्हणजे काय? त्या दोन गौरी एवढा चिवडा आणि शेव घेऊन जाणारेत का? मग मला तू पुन्हा करून देशील ना? आजी गणपतीला नमस्कार करताना का रडते? मला दगड टोचतात तर विसर्जनाला चपला घातल्या तर चालतील का? मी विसर्जनानंतर व्हिडीओ कॅसेट आणून सिनेमा पाहू का? ते पेशवे अजून त्या शनिवार वाड्यात राहतात का? 
 
बँकेतून गणपतीत सोन्याचे दागिने सगळ्यांना देतात का? सोन्याचे दागिने दुकानातून का नाही आणत? बँकेतून का आणतात? तोळा म्हणजे काय? धर्मेंद्रला दोन बायका आहेत तर मग त्याच्याकडे दोन गणपती बसतात का? प्रत्येक बायकोला वेगळा गणपती बसवावा लागतो का? नगरसेवक म्हणजे काय? महापौर बायकाच का होतात? तू महापौर होणारेस का? पुण्याच्या महापौर आणि मुंबईच्या महापौर भांडत असतील का? हिंदी सिनेमात गणपती असतो तर गौरी का नसते? नवस म्हणजे काय? मावशीने गणपतीला स्वेटर शिवलाय तिचे डोके फिरले आहे का? पिको म्हणजे काय? आणि फॉल? हरितालिका इतक्या छोट्या का असतात? त्या बसून का असतात? आपल्या गौरींना हात का नसतात?
 
परंपरा म्हणजे काय? म्हणजे बाबा वागतात तसेच मी वागायचे आहे का? सोन्याचे पाणी म्हणजे काय? इंग्लिश मीडियमच्या मुलांना आरत्या कोण शिकवणार? अनाथ नाथे अंबे म्हणजे काय? नयना मला म्हणाली की ती तिच्या बॉयफ्रेंडसोबत विसर्जनाच्या गर्दीत पळून जाणारे तर पळून कुठे जातात? पळून लग्न करणे म्हणजे कसे करायचे? मी कुणाचा बॉयफ्रेंड आहे? मनालीला आरत्या येत नाहीत तर तिला पाप लागणारे का? मला आरत्यांचे किती पुण्य मिळणारे? पुण्य साठले की काय करायचे? कुणाला सांगायचे? कुळाचार म्हणजे काय? अमिताभ आजारी होता तेव्हा रेखाला त्याला भेटू दिले का? गांधीजी गणपती बसवायचे का? टिळक गेले आणि गांधी आले मग त्यांनी गणपती का बसवला नाही? गांधीजी गुजराथी होते ना? त्यांना आरत्या येत नव्हत्या का? गुजराथ्यांकडे आपल्यासारख्याच आरत्या असतात का? डालडा म्हणजे काय? त्यापेक्षा दिवाळी आधी का येत नाही? गणपतीत फटाके का घेत नाहीत? नानाआजोबा आले की सारखे श्लोक का म्हणून दाखवायला सांगतात? त्यांना मी सिनेमाचे गाणे म्हणून दाखवू का? हार्ट अ‍ॅटॅक म्हणजे काय? त्यांना परत कधी येणारे? 
 
(ख्यातनाम लेखक, दिग्दर्शक)

Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.