कचऱ्याचं बक्षीस!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2019 06:03 AM2019-02-10T06:03:00+5:302019-02-10T06:05:06+5:30

शाळेच्या पर्यावरण संवर्धन स्पर्धेसाठी स्वयंपाकघरातल्या कचऱ्यापासून खत करण्याचा प्रकल्प मुलांनी निवडला. त्यासाठी सीक्रेट जागाही निवडली आणि सुरू झाला त्यांचा प्रयोग ! पण थोड्याच दिवसांत घाणेरड्या वासानं बिल्डिंगमधले लोक हैराण झाले !

Waste prize! | कचऱ्याचं बक्षीस!

कचऱ्याचं बक्षीस!

googlenewsNext
ठळक मुद्देधड ना लहान, धड ना मोठे अशा ‘मधल्या’ मुलांसाठी नवी ‘विण्डो’

- गौरी पटवर्धन

‘शी यार ! आमचं कोणीच काही ऐकत नाही.’ पाचवीतला सिद्धांत घरी आला तोच तणतणत. ‘जर का आम्ही सांगतो त्यातलं काहीच करायचं नसतं तर आम्हाला विचारतात कशाला???’
‘अरे... एवढं काय झालंय?’ आजीने हातातला पेपर बाजूला ठेवत विचारलं.
‘काही नाही ! मी अजिबात सांगणार नाहीये. कारण मी काहीही सांगितलं तरी तुम्ही सगळे जण त्या मोठ्या मुलांचीच बाजू घ्याल हे मला माहितीये.’
‘अरे हो हो... जरा शांत हो. मला कळू तरी दे काय झालंय ते.’
‘काही गरज नाहीये. आमचा प्रोजेक्ट जेव्हा पूर्ण होईल ना, तेव्हा कळेलच तुम्हाला.’ असं म्हणून सिद्धांत रागारागात त्याच्या खोलीत निघून गेला. पाठोपाठ त्याचे सोसायटीतले ४-५ मित्रमैत्रिणी आले. तेही त्याच्यापाठोपाठ खोलीत गेले. आणि मग जरा वेळाने खोलीतून जोरजोरात हसण्याचा आणि बोलण्याचा आवाज यायला लागला. इतका वेळ काय झालं असेल याचा विचार करणाºया आजीने परत पेपर उचलला आणि मनात म्हणाली, ‘मिटलेलं दिसतंय भांडण.’
पण एरवीसारखं सिद्धांतनं रात्रीच्या जेवणाच्या वेळी काय झालं होतं ते सांगितलं नाही. आणि त्याने सांगितलं नाहीये तर त्याला नसेल सांगायचं असं गृहीत धरून आजीनेपण काही विचारलं नाही. आईबाबा दुपारी कामाला बाहेर गेलेले असल्यामुळे त्यांना यातलं काहीच माहिती नव्हतं. काही दिवस शांततेत गेले. काही दिवसांनी सोसायटीची मीटिंग होती.
त्यात सोसायटीच्या अगदी मागच्या कोपºयातल्या बिल्डिंगमध्ये ग्राउण्ड फ्लोअरला राहणाºया साने काकू म्हणाल्या, ‘हल्ली सोसायटीतून कचरा वेळेवर बाहेर टाकला जात नाही का? आमच्या घरात हल्ली फार वास यायला लागलाय.’ त्यांच्या वरच्या मजल्यावर राहणारे शेखकाका म्हणाले, ‘हो, आमच्याही घरात वास येतो हल्ली. मला वाटलं कुठेतरी ड्रेनेजची लाईन फुटली असेल.’ सोसायटीच्या सेक्रेटरी काकू म्हणाल्या की, मी कचरा नेणाºया माणसाला आणि प्लंबरला विचारते. हळूहळू बिल्डिंगमधल्या सगळ्यांची तक्र ार यायला लागली की त्यांच्या बिल्डिंगमध्ये घाण वास येतो. कोणालाच काही कळेना. कारण प्लंबर येऊन सगळं चेक करून गेला. आणि कचरा नेणारा माणूस म्हणाला की आम्ही सगळा कचरा घेऊन जातो. मग घाण वास कशाचा येतोय ते कोणाला कळेना.
हळूहळू त्या बिल्डिंगच्या बाजूला गेलं की येणारा घाण वास हा सगळ्या सोसायटीच्या चर्चेचा विषय झाला. सगळे जण आपापल्या परीने तो वास का येत असेल याचा विचार करत होते. सिद्धांत आणि त्याचे मित्रमैत्रिणी हल्ली तिथेच खेळत असायचे. पण या दोन गोष्टींचा परस्परांशी काही संबंध असेल असं मात्र कोणाला वाटलेलं नव्हतं. त्यात सिद्धांत आणि त्याच्या सगळ्या मित्रमैत्रिणीनी आपापल्या घरातून कचरा बाहेर आणून टाकायचं काम आपणहून स्वत:कडे घेतलं होतं. त्याचाही संबंध कोणी घाण वासाशी लावला नाही. पण आता जवळजवळ महिना होऊन गेला होता.
एक दिवस सानेकाकूंना त्यांच्या घरासमोरच्या कोपऱ्यातल्या झाडीतून चक्क एक डुक्कर बाहेर येताना दिसलं. सोसायटीच्या सगळ्यात आतल्या कोपऱ्यातल्या झाडीत ते डुक्कर का गेलं असेल असा प्रश्न पडून त्यांनी सानेकाकांना बघायला सांगितलं. सानेकाकांनी शेखकाकांना मदतीला बोलावलं. दोघं मिळून कोपऱ्यात अस्ताव्यस्त वाढलेल्या झुडपांच्या मागे बघायचा प्रयत्न करायला लागले; पण त्यांना तिथे जाता येईना. लवकरच त्यांच्या लक्षात आलं की दुसºया बाजूने झुडपांच्या मागे जाण्यासाठी छोटीशी वाट होती. त्यातून ते आत गेले आणि ती घाणेरीची झुडपं आणि सोसायटीची भिंत यांच्यामध्ये त्यांना दिसला... ओल्या कचऱ्याचा एक ढीग. त्यावर थोडीशी मातीपण होती. पण घरातलं उरलेलं अन्न, भाज्यांच्या काड्या, शेंगांची आणि कांद्यांची टरफल असलं काय वाट्टेल ते त्यात होतं. इतके दिवस घाणेरडा वास कसला येत होता ते त्यांच्या लक्षात आलं. पण सोसायटीतला कचरा बाहेर नेण्याची उत्तम व्यवस्था असताना हा ओला कचरा असा सोसायटीच्या आवारात कोणी आणि का टाकला असेल ते त्यांच्या लक्षात येईना. बरं, सोसायटीच्या मागच्या बाजूला दुसरी काही वस्ती किंवा सोसायटी नव्हती. तिथे मोकळं मैदान होतं. त्यामुळे तिकडून कोणी कचरा टाकेल याचीही काही शक्यता नव्हती. शेवटी सानेकाका आणि शेखकाकांनी ठरवलं, की आपण आता लक्ष ठेवू. त्याप्रमाणे दुसºया दिवशी दोघं पडदे बंद करून आपापल्या खिडकीत लपून बसले.
सकाळी कचरा नेणारा माणूस येण्याच्या वेळी त्यांना सिद्धांत आणि त्याचे मित्रमैत्रिणी एकानंतर एक हळूच त्या झुडपांच्या मागे जाताना दिसले. जाताना त्यांच्या हातात प्लॅस्टिकच्या पिशव्या होत्या, येताना मात्र त्यांचे हात रिकामे होते. सानेकाका आणि शेखकाकांनी ताबडतोब बाहेर येऊन मुलांना पकडलं. आणि मग जो उलगडा झाला तो भलताच भारी होता.
झालं असं, की शाळेने पर्यावरण संवर्धनासाठी एक स्पर्धा जाहीर केली होती. त्यात मोठ्या मुलांनी झाड लावायचा प्रकल्प करायचा ठरवला. लहान मुलांना मात्र आपल्या स्वयंपाकघरातला कचरा बाहेर न टाकता त्याचं खत करायचं असा प्रकल्प करायचा होता. लहान मुलांनीही कोपऱ्यातली जागा शोधली. त्यात त्यांच्या ताकदीने जमला तेवढा छोटासा खड्डा केला आणि त्यात आपापल्या घराचा ओला कचरा आणून टाकायला सुरुवात केली. पण खत काही तयार होईना. ‘वास येतो’ अशी तक्रार मात्र सगळे करायला लागल्यावर त्यांना मोठ्या माणसांशी बोलायला भीती वाटायला लागली. मग त्यांनी अन्नावर थोडी माती टाकली. पण त्याने काहीच झालं नाही.
हे ऐकल्यावर शेखकाकांनी अक्षरश: कपाळावर हात मारून घेतला. मुलांची पद्धत सॉलिड गंडलेली होती; पण त्या दोघांनी ठरवलं की मुलांना रागवण्यापेक्षा त्यांनी जो विचार केलाय त्याकडे बघू. आणि मग सानेकाका आणि शेखकाकांच्या पुढाकाराने सोसायटीने ओल्या कचऱ्याचा खात प्रकल्प सुरू केला.
बिचाऱ्या छोट्या मुलांच्या प्रकल्पाला बक्षीस काही मिळालं नाही; पण त्यांच्यामुळे त्यांच्या सोसायटीला मात्र हरित सोसायटीचं पहिलं बक्षीस मात्र मिळालं !

(गौरी ‘लिट्ल प्लॅनेट फाउण्डेशन’ची समन्वयक आहे)

Web Title: Waste prize!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.