- नंदकुमार टेणी
मराठी भावगीतविश्वात अढळपद प्राप्त करणारे गायक म्हणून अरुण दाते आणि त्यांचा शुक्रतारा हा कार्यक्रम विख्यात आहे. त्याला ५५ वर्षे झाली. अजूनही या गायिकीचे आणि अरुण दाते यांनी गायलेल्या भावगीतांचे गारुड रसिकांच्या मनावर कायम आहे. जगभरात २७०० कार्यक्रम, शंभराहून अधिक गायिकांचा सहभाग. मराठी भावगीतातील पहिले युगुलगीत होण्याचा बहुमान शुक्रताराला मिळालेला, अनिल मोहिलेंचं संगीत संयोजक म्हणून ते पहिलेच गीत, तर अरुण दातेंचे ते पहिलेच मराठी गीत. असे अनेक ‘प्रथम’ त्याच्या नावावर नोंदविले गेले आहेत. विशेष म्हणजे अमराठी असलेल्या दाते यांची ही किमया म्हणूनच अलौकिक अशी आहे.
रामूभय्या दाते हे हिंदुस्थानी संगीतातील रसिकाग्रज. अरविंद दाते हे त्यांचे चिरंजीव. अरविंद दाते म्हणजेच अरुण दाते. त्यांच्या या संगीत आणि गायन कारकिर्दीची साठी नुकतीच झाली. तर शुक्रताराची ५५ वर्षे पूर्ण झालीत. त्यानिमित्ताने शुक्रताराचा नवा आविष्कारही अरुण दाते यांचे सुपुत्र अतुल दाते यांनी घडविला आहे. त्यालाही रसिकांचा भरभरून प्रतिसाद मिळतो आहे. या सगळ्या प्रवासाची कहाणी मोठी विलक्षण आहे.
रामूभय्या दाते हे इंदूरचे ट्रान्सपोर्ट कमिशनर होते. हिंदुस्थानी संगीतातील सगळ्या बड्या गायकांशी त्यांचा असिम स्नेह होता. तसेच त्यांच्याशी जिव्हाळ्याचे संबंधही होते. कुमार गंधर्व हे पण मध्य प्रदेशातले आणि रामूभय्या पण मध्य प्रदेशातले. त्यामुळे त्यांच्यातले सख्य खूपच वेगळे होते. तेव्हा अरविंद दाते म्हणजेच अरुण दाते हे १६ वर्षाचे होते आणि ड्रायव्हिंग चांगले करायचे. त्यामुळे कुमारजींना घरी आणण्याची व इच्छितस्थळी पुन्हा सोडून देण्याची जबाबदारी अरविंदवर असे. ड्रायव्हर सीटवर अरविंद आणि मागील सीटवर कुमारजी आणि त्यांच्या सौभाग्यवती असा प्रवास चालायचा. ड्रायव्हिंग करताना अरविंद कुठलेतरी गाणे गुणगुणत असायचा. त्याचा आवाज ऐकून कुमार म्हणाले, तुझा आवाज छान आहे रे, तू गाणं शिक. मी तुला गाणं शिकवतो. अरविंदने होकार दिला आणि त्यादिवशी कुमारजींनी अरविंदला समोर बसविले आणि एक अत्यंत दुर्मीळ अशी चीज (गजल) त्याला शिकविली. ती त्याने सहीसही आत्मसात केली.
यानंतर दुसरा एक प्रसंग घडला. पु. ल. देशपांडे तेव्हा महाराष्ट्रात गाजत होते. ठिकठिकाणच्या कॉलेजात त्यांना पाहुणे म्हणून बोलावले जायचे. पुलंना तरुणाईशी संवाद साधायला खूप आवडायचे म्हणून तेही अशा कार्यक्रमांना आवर्जून जायचे. ज्या कॉलेजात अरविंद शिकत होता त्या कॉलेजच्या कार्यक्रमासाठी पु. ल. गेले होते. कार्यक्रमाच्या आधी ते कॅम्पसमध्ये तरुणांशी संवाद साधत होते. ते म्हणाले, तुमच्यापैकी चांगला गातो कोण? मग त्या घोळक्यातल्या दोघातिघांची नावे इतरांनी सुचविली. त्यांचे गाणे पुलंनी ऐकले आणि म्हणाले आणखीन चांगला कोण गातो. त्यावर ती मुले म्हणाली त्या झाडाखाली तो जो लंबू मुलगा उभा आहे ना तो फार छान गातो. पुलंनी त्याला जवळ बोलवले आणि एखादे गाणे गाऊन दाखवायला सांगितले. तेव्हा तो आढेवेढे घेऊ लागला. मग त्यांनी त्याचे नाव विचारले. दाते आडनाव ऐकल्याबरोबर त्यांनी विचारले तू रामूभय्यांचा कोण? चिरंजीव, असे उत्तर दिल्याबरोबर अरे, तू तर घरातलाच आहेस? लाजतोस कशाला? म्हण म्हण, असे पु.ल. म्हणाले. तेव्हा कुमार गंधर्वांनी शिकविलेली ती गजल अरविंदने गाऊन दाखविली. ती इतकी अप्रतिम होती की पु.लं.ची तबियत खूश झाली. दुसºया दिवशी पु.ल. घरी आलेत. गप्पाटप्पा झाल्यावर त्यांनी रामूभय्यांना सवाल केला तुम्ही अख्ख्या दुनियेचे गाणी ऐकताय आणि घरातल्या गाण्याकडे दुर्लक्ष करता? हे बरे नाही. तेव्हा ते चकित होऊन म्हणाले, आमच्या घरात गातो कोण? हा काय अरविंद! अप्रतिम गातो हो. असे पु.लं.नी सांगितल्यावर पहिल्यांदा वडिलांनी पुलंच्या साक्षीने अरविंदचे गाणे ऐकले. तेव्हाही त्याने कुमारांनी शिकविलेली गजलच गायिली होती. आपला मुलगा गातो हे त्यांना पुलंमुळे कळाले. म्हणजे कुमारांची पहिली शिकवणी आणि पुलंचा हा असा सक्रिय आशीर्वादात्मक पुढाकार यामुळे अरविंद दातेंमधला गायक खºया अर्थाने घडला.

अरविंदचे अरुण दाते कसे झाले त्याचाही किस्सा आहे. यशवंत देव आणि श्रीनिवास खळे यांनी अत्यंत आग्रहाने दाते यांना शुक्रतारा हे गीत गाण्याची संधी दिली होती. आधी हे गीत सुधा मल्होत्रांच्या साथीने मुंबई आकाशवाणीच्या कार्यक्रमासाठी रेकॉर्ड केले गेले. त्यापूर्वी अरविंद यांनी कधीही मराठी गीत गायिले नव्हते. ते हिंदी गीत, गजल आणि भजने गात असत. तीसुद्धा आकाशवाणी इंदूर केंद्रासाठी. त्यांचे मराठी मध्य प्रदेशातील धाटणीचे! त्याची खिल्ली पुण्यामुंबईची मंडळी उडवायची. त्यामुळे अरविंद हे मराठी गायनापासून लांबच असायचे. परंतु खळे यांनी पाडगावकरांचे ‘शुक्रतारा मंद वारा’ हे गीत मी तुमच्याचकडून गाऊन घेईन. तुम्ही गायला नाहीत तर दुसºया कोणाकडूनही गाऊन घेणार नाही असा हट्ट धरल्यामुळे ते तयार झाले होते. १९६२ मध्ये हे गाणे रेकॉर्ड झाले. आणि कमालिनी विजयकर या कार्यक्रमाची उद्घोषणा तयार करीत असताना तपशीलात ए.आर. दाते असे नाव पाहिल्यावर त्यांनी खळे आणि देव यांच्याशी संपर्क साधला आणि ए.आर. दाते यांचे नाव विचारले. कारण नाव आणि आडनाव अशी उद्घोषणा करण्याची आकाशवाणीची परंपरा होती. परंतु या दोघांनाही त्यांचे नाव माहीत नव्हते. अरु अरु असे त्यांच्या घरची मंडळी त्यांना म्हणतात. त्यामुळे बहुधा अरुण असावे. तेच नाव देऊन टाका, काही चूक असेल तर पुढच्या वेळी सुधारणा करून घेऊ, असे या दिग्गजांनी सांगितल्यावर शुक्रतारा मंदवाराचे गायक अरुण दाते व सुधा मल्होत्रा अशी उद्घोषणा झाली. दातेंनी ते गाणे ऐकल्यावर देव आणि खळे यांना दूरध्वनीवरून सांगितले की, अहो, माझे नाव अरुण नसून अरविंद आहे. त्यावर पुढच्या वेळी सुधारणा करू असे या दोघांनी सांगितले. परंतु शुक्रतारा या गीताने एवढी लोकप्रियता मिळवली की, दातेंना आपले अरविंद हे नाव सोडून अरुण हेच नाव धारण करावे लागले आणि अरविंद दातेंचे अरुण दाते झाले.

शुक्रतारा या गीताच्या लोकप्रियतेमुळे दाते यांना सतत कार्यक्रमाच्या आॅफर्स येऊ लागल्या परंतु त्यांच्याकडे एकच मराठी गीत होते. तरीही रसिक म्हणायचे तुमचा कार्यक्रम हवाच. मग हिंदी गाणी, गजल आणि एकच मराठी गीत याचा समावेश करून हा कार्यक्रम होऊ लागला. प्रारंभी त्याचे नाव शुक्रतारा नव्हते. त्याला जेव्हा २५ वर्षे पूर्ण झालीत तेव्हा अनुराधा पौडवाल यांनी शुक्रतारा हे नाव द्यावे असे सुचविले. तेव्हापासून तेच नाव कायम राहिले. शुक्रताराचे २७०० प्रयोग जगभरात अरुण दातेंनी केले. भावगीताच्या कार्यक्रमाचे एवढे प्रयोग होण्याचा हादेखील एक विक्रमच म्हटला पाहिजे. काहीही झाले तरी मी इतरांची गीते गाणार नाही हा अरुण दाते यांचा निर्धार अखेरपर्यंत कायम राहिला. हेच या कार्यक्रमाच्या यशस्वीतेचे एक गमक म्हटले पाहिजे. प्रारंभीच्या काळात दाते यांना सखी शेजारिणी, भातुकलीच्या खेळामधली, या जन्मावर अशी अनेक एकापेक्षा एक सरस गीते मिळत गेली. ती ही तुफान लोकप्रिय झालीत आणि त्यातून शुक्रताराचे सौष्ठव वाढत गेले.

पाडगावकर, देव आणि खळे हे माझे ब्रह्मा, विष्णू, महेश आहेत. त्यांच्यामुळेच मी इथपर्यंतची संगीतमय वाटचाल करू शकलो असे अरुण दाते विनम्रपणे सांगतात. जेव्हा दाते सेवानिवृत्त झाले त्यावेळी त्यांना मिळालेल्या रकमेतून त्यांनी या तिघांना प्रत्येकी पन्नास पन्नास हजारांचा चेक गुरुदक्षिणा म्हणून कृतज्ञतेपोटी घरी नेऊन दिला होता. हा माझ्या कष्टाचा पैसा आहे. त्यातून ही गुरुदक्षिणा मी तुम्हाला देतो आहे असे ते म्हणाले होते.

शुक्रताराचा एक अनुभव मोठा विलक्षण आहे. नाशिकला कार्यक्रम होता. अरुण दातेंचे जीवलग स्नेही होते वसंत पोतदार. कार्यक्रमाच्या मध्यंतरात ते स्टेजवर गेले आणि दातेंना म्हणाले, या कार्यक्रमाबद्दल एका तरुणाला त्याच्या भावना व्यक्त करायच्या आहेत. आणि त्या तो स्टेजवरून व्यक्त करू इच्छितो. त्याला संधी द्या. त्यावर दाते म्हणाले, त्यासाठी मला संयोजकांची अनुमती घ्यावी लागेल. ती त्यांनी दिली आणि पंधरा, सोळा वर्षाचा तो मुलगा स्टेजवर आला आणि म्हणाला, या कार्यक्रमातील या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे या गाण्यामुळे माझे आयुष्य बदलले. मी मादक द्रव्यांच्या आहारी पूर्णपणे गेलेलो होतो, परंतु सीबीएसवरील रसवतींच्या बाजूला उभा असताना मी हे गाणे ऐकले. माझे मन द्रवले, मी ते गाणे पुन्हा ऐकण्याची इच्छा रसवतींच्या मालकांकडे व्यक्तकेली. ते म्हणाले, हा रेडिओ आहे इथे असे गाणे पुन्हा ऐकता येत नाही. त्यापेक्षा तू त्याची कॅसेट विकत घे. मग मी कॅसेटचे दुकान उघडण्यापूर्वीच त्याच्या दाराशी जाऊन थांबलो आणि कॅसेट घेतली आणि ते गाणे पुन्हा पुन्हा ऐकले. त्यातून माझा पुनर्जन्म झाला. त्यावर टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला.

मच्छिंद्र कांबळी टीव्हीवर एक कार्यक्रम करायचे. त्यात एका पाहुण्याची मुलाखत घेतली जायची. तेव्हा त्यात एक रॅपिड क्वेश्चन अ‍ॅन्सर असा राउंड असायचा. त्यात त्यांनी प्रश्न केला, सर्वात आवडता संगीतकार कोण? देव की खळे तेव्हा दाते अवघडून गेले होते. पण कांबळी हटूनच बसले तेव्हा त्यांनी खळेंचे नाव घेतले. कारण खळेंना ते खूप मानत असत. खळे आणि देव त्यांच्यासाठी समानच होते. त्यांच्यात इतके ममत्व होते की दातेंच्या या उत्तरामुळे देवांना कुठलीही खंत वाटली नाही की त्यांच्या प्रेमात कुठे कमतरता आली नाही.
शुक्रताराच्या कार्यक्रमाचे निवेदन मंगेश पाडगावकर, वसंत बापट, व. पु. काळे, प्रवीण दवणे अशा अनेक मान्यवरांनी केले. अमेरिका, ब्रिटन आणि कॅनडा येथे तर त्याचे अनेक प्रयोग झालेत.

(लेखक लोकमतच्या ठाणे आणि पालघर आवृत्तीचे निवासी संपादक आहेत.)


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.