युकेका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2018 07:01 PM2018-03-25T19:01:40+5:302018-03-25T19:01:40+5:30

अंघोळ करीत असताना आर्किमिडीजला त्याच्या समस्येवर उत्तर कसे सुचले? ‘युरेका’ क्षण नेमका केव्हा येतो? - प्रत्येक व्यक्ती सर्जनशील असते, पण सगळ्यांनाच असे का सुचत नाही? माइंडफुलनेसच्या सरावात अनेक समस्यांवर उत्तरे मिळू शकतात..

Ukake | युकेका

युकेका

Next

डॉ. यश वेलणकर

अंघोळ करीत असताना आर्किमिडीजला त्याच्या समस्येवर उत्तर कसे सुचले? ‘युरेका’ क्षण नेमका केव्हा येतो? - प्रत्येक व्यक्ती सर्जनशील असते, पण सगळ्यांनाच असे का सुचत नाही? माइंडफुलनेसच्या सरावात अनेक समस्यांवर उत्तरे मिळू शकतात..


एखादी नवीन कल्पना सुचणे, समस्येवर वेगळाच उपाय सुचणे हे सर्जनशीलतेचे एक महत्त्वाचे अंग आहे. ‘आउट आॅफ दी बॉक्स’ विचार करता येणे आजच्या काळात खूप महत्त्वाचे आहे. कारण मानवी मेंदूची स्मरणशक्ती, गणित सोडवणे, तार्किक लॉजिकल विचार करणे यांसारखी बरीचशी कामे आज संगणक करू लागला आहे. पण नवीन कल्पना मात्र संगणकाला सुचू शकत नाही. ते अजून तरी मानवी मेंदूचेच वैशिष्ट्य आहे. आर्किमिडीजचा युरेकाचा क्षण किंवा कुसुमाग्रजांना सुचलेली ‘पृथ्वीचे प्रेमगीत’ ही कल्पना हा सर्जनशीलतेचा सुंदर आविष्कार आहे!
अशा नवीन, सर्जनशील कल्पना सुचतात त्यावेळी माणसाच्या मेंदूत काय घडत असते याचे संशोधन मेंदूतज्ज्ञ करीत आहेत. मेंदूचा पुढील भाग म्हणजे फ्रंटल कोरटेक्स हा वैचारिक मेंदू म्हणून ओळखला जातो.
माणसाच्या मनात विचार असतात त्यावेळी तो अधिक सक्रिय असतो. हाच भाग माणसाच्या वर्तनावर नियंत्रण ठेवत असतो. सभ्य-असभ्यतेच्या मर्यादा तोच निश्चित करत असतो. गंमत म्हणजे, सर्जनशील कल्पना सुचतात त्यावेळी मेंदूच्या या पुढील भागातील सक्रियता काही काळ कमी झालेली असते असे मेंदूतज्ज्ञांना आढळत आहे. त्याला त्यांनी ट्रान्झिअंट हायपोफ्रंटलिटी असे म्हटले आहे.
ट्रान्झिअंट म्हणजे काही काळ. फ्रंटल ब्रेनमधील सक्रियता सतत कमी असेल तर ते गतिमंदत्वाचे, स्लो लर्निंगचे लक्षण असते. स्लो लर्नर क्रिएटिव्ह असेलच असे म्हणता येत नाही. कारण त्याच्या मेंदूच्या पुढील भागातील सक्रियता सतत कमी असते.
याउलट ज्याच्या मेंदूच्या पुढील भागात नॉर्मल सक्रियता असते, त्याच्या मेंदूत काही काळ सक्रियता कमी झाली तर त्याला नवीन सर्जनशील कल्पना सुचू शकतात. हा भाग तार्किक विचार करणारा आणि जे काही तार्किक वाटत नाही अशा विचारांना नाकारणारा असतो. एखादी नवीन कल्पना पूर्णत: अतार्किक असू शकते. त्यामुळे तार्किक विचार करणारा मेंदूचा पुढील भाग सक्रिय असेल तर अशी कल्पना मूर्खपणाची म्हणून मोडीत काढली जाते. त्यामुळेच तेथे सर्जनशीलता जन्म घेत नाही.
आपल्याला झोपेत स्वप्ने पडत असतात. त्यावेळीदेखील मेंदूतील हा तार्किक विचार करणारा भाग काम करीत नसतो. त्यामुळेच आपल्या स्वप्नात अनेक अतार्किक गोष्टी घडत असतात. कोणतीही माणसे कोठेही दिसतात. तेथे स्थळ-काळाचे काहीही बंधन असत नाही. त्यामुळेच अनेकांना नवीन कल्पना स्वप्नात सुचू शकतात.
बेंझिन रिंगमधील अणूंची रचना अशी स्वप्नातच सुचली होती. जागे असतानादेखील मेंदूच्या या तार्किक विचार करणाऱ्या भागाला काही काळ शांत करणे शक्य झाले तर माणसे अधिक सर्जनशील होऊ शकतात, असे मेंदूतज्ज्ञांना वाटते.
मेंदूच्या पुढील भागातील सक्रियता मद्य, भांग, गांजा यांच्या सेवनानं कमी होते. यामुळेच या मादक पदार्थांचे सेवन केल्यानंतर सभ्यतेच्या मर्यादा ओलांडल्या जातात. त्याच वेळी नवीन कल्पना सुचू शकतात. म्हणूनच चार आण्याची भांग प्याली की अनेक कविकल्पना सुचू शकतात असे टिळकांनी कविकल्पनांची चेष्टा करण्यासाठी लिहिले होते. कारण सर्जनशीलता केवळ नवीन कल्पना सुचणे एवढीच मर्यादित नसते, ती कल्पना कृतीत येण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. मद्य किंवा गांजा सेवनाने ही मेहनत घेण्याची क्षमता कमी होते. शिवाय या व्यसनाचे अनेक दुष्परिणाम आहेत. त्यामुळे क्रिएटिव्ह होण्यासाठी दारू, गांजा पिणे हा योग्य उपाय नाही.
सर्जनशीलता वाढवण्यासाठी ट्रान्झिअंट हायपोफ्रंटलिटी अन्य कोणत्या गोष्टीने होऊ शकते याचा शोध घेतल्यानंतर शास्त्रज्ञांना जाणवले आहे की माइंडफुलनेसमुळे हे शक्य होते.
माइंडफुलनेस हे अटेन्शन ट्रेनिंग आहे. त्याच्या सरावाने आपण आपले लक्ष कोठे असावे हे ठरवू शकतो, निवडू शकतो.
आपले अटेन्शन दोन प्रकारचे असते. फोकस्ड अटेन्शन आणि ओपन अटेन्शन. फोकस्ड अटेन्शन एकाग्रता वाढवायला उपयुक्त आहे. त्राटक, एकाच आवाजावर मन एकाग्र करणे, एका शब्दावर किंवा विचारावर मन एकाग्र करणे ही फोकस्ड अटेन्शनची उदाहरणे आहेत. क्रिएटिव्हिटीच्या अभ्यासकांच्या मते असे फोकस्ड अटेन्शन एकाग्रतेसाठी उपयोगी असले तरी क्रिएटिव्हिटीला मारक आहे. याचे कारण असे अटेन्शन असते त्यावेळी आपण ते आलंबन सोडून आलेल्या अन्य विचारांना थांबवित असतो. नवीन कल्पना सुचण्यासाठी असे विचार यायला हवेत. त्यामुळेच केवळ फोकस्ड अटेन्शनचा सराव सर्जनशीलतेला मारक ठरू शकतो.
ओपन अटेन्शन किंवा रिसेप्टिव्ह अटेन्शन मात्र सर्जनशीलतेला पोषक आहे. ओपन अटेंशनच्या सरावाने पूर्णभान शक्य होते. पूर्णभान म्हणजे त्याक्षणी आसमंतात, शरीरात आणि मनात जे काही घडते आहे ते जाणत राहणे होय. माणूस असा असतो त्यावेळी त्याच्या मेंदूतील विविध बिंदू जोडले जात असतात. त्याचा परिणाम म्हणून त्याची विचारांची लवचिकता, कोग्निटिव्ह फ्लेक्झिबिलिटी वाढते. त्यामुळेच आउट आॅफ दि बॉक्स विचार सुचू शकतो. असा विचार ओपन अटेन्शन असताना नाकारला जात नाही, नोंदवला जातो. ओपन अटेन्शनच्या सरावामध्ये मनातील विचारांना कोणतीही प्रतिक्रि या न करता पाहत राहणे अपेक्षित असते. त्यामुळेच अशा प्रकारचे अटेन्शन क्रिएटिव्हिटीला पोषक आहे.
अटेन्शन ट्रेनिंगने आपण आपले लक्ष कोठे ठेवायचे हे निवडू शकतो. हे लक्ष स्वत:च्या शरीराकडे, मनातील विचारांकडे असते त्यावेळी आपण त्याला सजग, माइंडफुलनेस म्हणू शकतो. हेच अटेन्शन आपण करीत असलेल्या कृतीवर असते त्याला मानसशास्त्रात फ्लो म्हणतात. हा फ्लो अतिशय आनंद देणारा असतो. त्यावेळी माणूस देहभान, काळाचे भान विसरून जातो. खेळाडू, कलाकार असा फ्लो अनेकवेळा अनुभवत असतात. असा फ्लोदेखील सृजनशीलता वाढवतो, त्यामुळेच कलाकारांना नवीन कल्पना सुचू शकतात.
त्यामुळे सृजनशीलता वाढवायची असेल तर ओपन अटेन्शनचा आणि सजग कृतीचा सराव अधिक करायला हवा. आपण सजगतेने, जाणीवपूर्वक एखादी कृती करीत असतो, त्यावेळी मेंदूतील पुढील भागातील सक्रियता कमी झालेली असते.
आपल्या सवयीने होणाºया बºयाच कृती आपण करीत असतो त्यावेळी मेंदूत भूत किंवा भविष्याचे विचार चालू असतात. म्हणजेच त्यावेळी मेंदूच्या पुढील भागाची सक्रियता अधिक असते.
पण आपण एखादे काम सजगतेने, जाणीवपूर्वक करतो त्यावेळी अन्य विचार कमी झालेले असतात, त्याच वेळी एखादा नावीन्यपूर्ण, सर्जक विचार सुचू शकतो.
आर्किमिडीजला अंघोळ करताना त्याच्या समस्येवर उत्तर का सुचले असेल त्याचे उत्तर या मेंदू संशोधनाने मिळत आहे.
असा युरेका क्षण अनुभवण्यासाठी, सर्जनशील कल्पना सुचण्यासाठी माइंडफुलनेसचा सराव नियमितपणे करायला हवा. शाळेत, कॉर्पोरेट कंपन्यात माइंडफुलनेसचे ट्रेनिंग द्यायला हवे. सर्व थरातील नेत्यांना असे ट्रेनिंग मिळाले आणि ते माइंडफुलनेसचा सराव करू लागले तर त्यामुळे अनेक समस्यांवर नावीन्यपूर्ण उत्तरे मिळू शकतील, असा विश्वास मेंदू शास्त्रज्ञ व्यक्त करीत आहेत.

(लेखक मनोविकासाच्या तंत्रंचे अभ्यासक आहेत.)
yashwel@gmail.com

Web Title: Ukake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.