ट्रम्प इन द व्हाईट हाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2018 07:30 AM2018-09-23T07:30:33+5:302018-09-23T07:30:33+5:30

हे बॉब वुडवर्डस मोठे भले गृहस्थ. इतकी वर्षे पत्रकारितेत असूनही अमेरिकेत त्यांच्याविषयी आदर आहे. नव्या पुस्तकात त्यांनी वर्णिलेलं ‘ट्रम्प-महात्म्य’ सध्या अमेरिकेत चवीच्या चर्चेचा विषय आहे. त्या पुस्तकात वर्णिलेल्या अविश्वसनीय वाटू शकतील अशा प्रसंगांचा हा विश्वसनीय वानोळा.

Trump in the White House | ट्रम्प इन द व्हाईट हाऊस

ट्रम्प इन द व्हाईट हाऊस

Next

-निळू दामले

वॉटरगेट  प्रकरण शोधून काढणार्‍या बॉब वुडवर्ड यांचं ट्रम्पांचे व्हाइटहाउसमधले दिवस या विषयावरचं पुस्तक नुकतंच प्रसिद्ध झालं. ट्रम्प कसे निर्णय घेतात, त्यांचं व्यक्तिमत्त्व कसं आहे यावर हे पुस्तक प्रकाशझोत टाकतं. 
या पुस्तकातले वुडवर्ड यांनी वर्णिलेले हे दोन शेलके  प्रसंग.

नेटो या आंतरराष्ट्रीय संघटनेत राहायचं की नाही हा धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी व्हाइटहाउसमध्ये संध्याकाळी बैठक होती. अध्यक्ष ट्रम्प, परदेश मंत्नी, संरक्षण मंत्नी या बैठकीत होते. चीफ ऑफ स्टाफनी विषय कार्यक्रम पत्रिकेद्वारे सर्वांना कळवला होता. ट्रम्पनी कार्यक्र म पत्रिका पाहिलीच नव्हती. पूर्वतयारी करून, विचार करून बैठकीत भाग घेण्याची सवय ट्रम्पना नव्हती. बैठक सुरू झाल्यावर  फालतू विषयावर ट्रम्प बोलत राहिले. टीव्हीवर पाहण्यात आलेल्या घटनेवरच बडबड करणं अशी ट्रम्प यांची सवय होती. येमेनमध्ये अमेरिकेची फसलेली, फेल गेलेली कारवाई हा त्या दिवशी टीव्हीतल्या चर्चेचा एक गरम विषय होता. सेनेटर मॅकेननी सरकारवर टीका केली होती. ट्रम्प याच विषयावर बोलू लागले आणि मॅकेनवर घसरले. 

ट्रम्प म्हणाले ‘.हे मॅकेन. येमेनमधल्या लष्करी कामगिरीबद्दल बोलताहेत. यांना काय अधिकार. स्वत: काय केलं. त्यांचे वडील नौदल प्रमुख होते, त्यांनी आपल्या अधिकाराचा वापर करून मॅकेनना व्हिएतनामी कैदेतून सोडवून अमेरिकेत परत आणलं, इतर युद्धकैदी तुरुंगात खितपत पडले असताना.’

संरक्षण मंत्री जनरल मॅटिसनी ट्रम्पना सांगितलं ‘सर, तसं घडलेलं नाहीये. मॅकेननी तुरुंगाबाहेर पडायला नकार दिला, तीन वर्ष तुरुंगात राहून त्यांनी शारीरिक छळ सोसला आणि नंतर ते यथावकाश इतरांबरोबरच तुरुंगातून सुटले.’
ट्रम्प यांची माहिती किती तोकडी असते आणि माहिती न घेता कसे ते धडाकून खोटं बोलतात याचा हा एक नमुना. 
शेवटी या बैठकीत नेटो या विषयावर चर्चा झालीच नाही, ट्रम्प यांनी अद्वातद्वा नेटो बंद केली पाहिजे, असं काही वाक्यांत सांगितलं आणि बैठक संपली. 

जनरल मायकेल फ्लिन यांच्याबद्दल सरकारच्या अनेक विभागांचे आक्षेप असतानाही ट्रम्प यांनी त्यांना सुरक्षा सल्लागार या महत्त्वाच्या पदावर नेमलं. यथावकाश फ्लिन यांचं बेकायदेशीर आणि राष्ट्रीय सुरक्षेला घातक वर्तन सिद्ध झालं. ट्रम्पनी फ्लिनना एका ट्वीटच्या वाटेनं धाडकन हाकलून दिलं.

सुरक्षा सल्लागार हे फार महत्त्वाचं पद रिकामं ठेवता येत नसतं. ट्रम्पनी आपल्या सहका-याना आदेश दिला, शोधा.
ले. जन. मॅकमास्टर यांचं नाव सुचवलं गेलं. मॅकमास्टर वॉर हीरो होते, बुद्धिमान होते, त्यांनी पुस्तकंही लिहिली होती. मॅकमास्टर हे लढवय्या आणि बुद्धिमान माणूस असं मिर्शण होतं. मॅकमास्टर सैन्यात कार्यरत होते.

 ट्रम्प यांचे सल्लागार स्टीव बॅनन यांनी मॅकमास्टर यांना सल्ला दिला ‘ट्रम्पना लेक्चर देऊ नका. त्यांना प्रोफेसर आवडत नाहीत. त्यांना बुद्धिमान माणसं आवडत नाहीत. हा गडी कधी वर्गात लेक्चरला बसला नाही, त्यानं कधी नोट्स काढलेल्या नाहीत. परीक्षेच्या आदल्या मध्यरात्री हा गडी कोणा तरी मित्नाच्या नोट्स घेई, कॉफी पीत पीत त्यातलं जेवढं पाठांतर करता येईल तेवढं करी, दुस-या दिवशी सकाळी 8 वाजता परीक्षेला जाई आणि त्याला सी ग्रेड मिळत असे, असा हा माणूस आहे आणि आज तो अब्जाधीश आहे एवढंच लक्षात ठेव आणि जाताना युनिफॉर्ममध्ये जा. ट्रम्पला युनिफॉर्म घातलेली माणसं आवडतात.’

 

मॅकमास्टर एक साधा म्हणजे अगदीच स्वस्तातला सूट घालून ट्रम्पसमोर हजर झाले.
मॅकमास्टरनी ट्रम्पना 20 मिनिटांचं लेक्चर मारलं. जगातले अनेक सिद्धांत त्यांनी ट्रम्पना सांगितले. मुलाखत संपल्यावर ट्रम्पनी बॅननना विचारलं ‘कोण होता हा माणूस.’ बॅनन म्हणाले ‘हे होते जनरल मॅकमास्टर.’
ट्रम्प म्हणाले ‘तुम्ही तर म्हणाला होतात की ते लष्करात आहेत.’
बॅनन म्हणाले ‘हो ते लष्करातच जनरल आहेत.’

ट्रम्प म्हणाले, ‘मला तर वाटलं की ते बियर विक्रे ते (बियर सेल्समन) आहेत.’
मॅकमास्टर नापास झाले. मागोमाग जॉन बोल्टन या एका विद्वान प्रोफेसरची त्या पदासाठी मुलाखत झाली. मुलाखत पाच-दहा मिनिटांतच संपली. ट्रम्पनी बोल्टनना नापास केलं कारण त्यांच्या मिशा झुडूपासारख्या जाड होत्या.तरीही पुन्हा एकदा बोल्टन आणि मॅकमास्टर अशा दोघांनाही बोलवायचं ठरलं. बोल्टन ट्रम्प समोर उभे राहिले. त्यांनी मिशा काढलेल्या नव्हत्या. ट्रम्पनी त्यांना चार-दोन मिनिटातच नापास केलं. नंतर मॅकमास्टर चकचकीत युनिफॉर्ममध्ये ट्रम्प समोर उभे राहिले. ट्रम्पनी विचारलं, ‘तुम्हाला हा जॉब हवाय का?’

मॅकमास्टर म्हणाले, ‘होय.’
ट्रम्प म्हणाले, ‘दिला.’
लगोलग ट्रम्प म्हणाले, ‘मीडियाच्या माणसांना बोलवा, मला जाहीर करायचंय.’

मीडिया आला. ट्रम्प म्हणाले, ‘मॅकमास्टर हा ग्रेट माणूस आहे. तो ग्रेट काम करणार आहे याची मला खात्री आहे. मी त्याला नेमलं आहे.’

मॅकमास्टर ग्रेट होते हे केव्हा ट्रम्पना कळलं? त्यांनी बॅनन किंवा कोणाकडूनही मॅकमास्टर यांची फाइल मागितली नव्हती, पाहिली नव्हती.   
मॅकमास्टर चुटकीसरखी सुरक्षा सल्लागार झाले.

(ख्यातनाम पत्रकार असलेले लेखक सध्या अमेरिकेत आहेत)

damlenilkanth@gmail.com

Web Title: Trump in the White House

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.