नक्षलविरोधात आदिवासींची हिंमत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2017 10:36 AM2017-08-08T10:36:32+5:302017-08-08T10:36:36+5:30

नक्षलवाद्यांनी सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरून कायमच त्यांना दहशतीत ठेवलं आणि आपलं साम्राज्य उभं केलं. पण यंदा गडचिरोलीत वेगळं चित्र पाहायला मिळालं. नक्षल्यांच्या विरोधात नारे दिले गेले. शांती मार्च काढण्यात आला. नक्षल्यांचे शहीद स्मारक तोडले गेले, तेही उघडपणे. कसं घडलं हे?..

Tribulation courage against Naxal | नक्षलविरोधात आदिवासींची हिंमत

नक्षलविरोधात आदिवासींची हिंमत

Next

- मनोज ताजने

महाराष्ट्राच्या दक्षिण-पूर्व टोकावरचा गडचिरोली जिल्हा गेल्या ३८ वर्षांपासून नक्षलवादाच्या ज्वाळांनी होरपळून निघत आहे. एकीकडे नक्षलवाद्यांची दहशत, तर दुसरीकडे पोलिसांची भीती, यात पिचून गेलेला आदिवासी नि:शब्दपणे हे सर्व सहन करत आला आहे. पण अलीकडे परिस्थिती बदलत आहे. यावर्षी तर अनेक गावांमध्ये आदिवासी नागरिकांनी नक्षल्यांचे शहीद सप्ताह पाळण्याचे आवाहन करणारे बॅनर उतरवून ते जाळण्यापासून तर नक्षलवाद्यांविरुद्ध नारे लावून शांती मार्च काढण्यापर्यंत हिंमत दाखविली. एवढेच नाही तर मृत नक्षल्यांच्या नावे बनविण्यात आलेले शहीद स्मारकही तोडले. इतक्या वर्षांपासून निमूटपणे सर्व सहन करणाºया आदिवासींची हिंमत खरंच एवढी वाढली का? खरंच त्यांच्यात जागृती आली का? नक्षल्यांची दहशत कमी झाला का? - अशा अनेक प्रश्नांची उकल करण्यासाठी गडचिरोली जिल्ह्याच्या अतिसंवेदनशील भागात जाऊन प्रत्यक्ष परिस्थती जवळून पाहण्याचे ठरविले.
मनात उठलेले अनेक प्रश्नांचे काहुर आणि दडलेल्या भीतीला न जुमानता बाइकने गडचिरोलीतून प्रवासाला सुरुवात केली. पहिल्या दिवशी अनेक गावांना भेटी देत भामरागडपर्यंतचा १७६ किलोमीटरचा पल्ला सहज गाठला.
पुढे ३४ किलोमीटरवर असलेल्या चामोर्शीच्या दिशेने निघालो. चामोर्शी, आष्टी हे तालुके नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशील नसले, तरी नक्षलवादाचा फटका त्यांनाही बसला आहेच. मात्र नक्षल्यांचा शहीद सप्ताह सुरू असतानाही तो धाक आणि ती जरब यावेळी दिसत नव्हती. दोन्ही तालुक्यांतील व्यवहार सर्वसामान्यपणे सुरू होते. साधारणपणे दीड तासानंतर चामोर्शीला मागे टाकत आष्टीत पोहोचलो. नक्षलवाद्यांचा खरा इलाका इथूनच पुढे सुरू होतो.
घनदाट जंगलाला चिरत जाणाºया काळ्याशार रस्त्यावरून मी जसजसा पुढे जात होतो तसतशी मनातली उत्सुकता आणि भीतीही वाढत होती. मध्ये लागणाºया गावातील लोकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करीत होतो. त्यांच्यात धाक दिसत नसला, तरी मोकळेपणाही नव्हता. आदिवासी लोक अनोळखी माणसाशी बोलत नाहीत हे लक्षात आल्यानंतर वेगळ्या पद्धतीने त्यांना बोलते केले. खात्री पटल्यावर तेही हळूहळू मोकळं होऊ लागले. मनातलं सांगू लागले.
आता अतिसंवेदनशील परिसरातील आलापल्लीपर्यंत मी पोहोचलो होतो. शक्य तितकी सहजता दाखवत काही लोकांसोबत संवाद साधण्याचा प्रयत्न केला. पण एका वाक्यात उत्तर देऊन लोक काढता पाय घेत होते. समोरची व्यक्ती सामान्य नागरिक आहे की नक्षल समर्थक अशी जी शंका माझ्या मनात येत होती, तीच शंका त्यांच्याही मनात असावी. बराच वेळ त्यांच्याशी बोलल्यावर आणि नक्षल्यांशी माझा कुठलाही संबंध नाही, हे लक्षात आल्यावर हळूहळू त्यांच्या मनातलं बाहेर पडायला लागलं.
याठिकाणी जास्त ‘रिस्क’ घेऊ नका, असा सल्ला सगळ्याच परिचितांनी दिलेला असल्याने भामरागडपर्यंतचा प्रवास चारचाकी वाहनाने केला. गाडीचालकालाही बोलते केले.
तो सांगू लागला, ‘दरवर्षी नक्षलवाद्यांचा शहीद सप्ताह (२८ जुलै ते ३ आॅगस्ट) म्हणजे सर्वांसाठी दहशत आणि तणावाची परिसीमाच असते! या काळात हिंसाचार झाला नाही असं आजवर झालेलं नाही. पोलिसांच्या गोळीने ठार झालेल्या नक्षलवाद्यांना श्रद्धांजली म्हणून या सप्ताहात सर्व व्यवहार बंद ठेवायचे, असं फर्मान नक्षलवाद्यांकडून सोडलं जातं. त्यासाठी ठिकठिकाणी कापडी बॅनर लावून लोकांना सूचना केली जाते. कोणी विरोध केला तर त्याची सरळ हत्या केली जाते. त्यामुळे भीतीपोटी नागरिक आपली रोजी बुडवून घरीच बसतात..’
अलीकडे वातावरण तेवढे तणावाचे राहिलेले नाही. आताही तीच प्रचिती येत होती. पूर्वी पोलीस जंगलातही जात नव्हते. नक्षल सप्ताहाच्या काळात तर आपल्या कॅम्प परिसरातूनही ते बाहेर पडत नव्हते. नक्षलवाद्यांकडून रस्त्यावर मोठी झाडे आडवी टाकली जात होती. त्यामुळे अनेक मुख्य मार्गांवरचीही वाहतूक या काळात पूर्णपणे बंद राहत होती. आता मात्र काही मोजके रस्ते सोडले तर वाहतुकीला अडथळा नाही. पोलीस जंगलात गस्त करताना अनेक वेळा पाहायला मिळतात.
ज्या पर्लकोटा नदीचे पाणी १५ दिवसांपूर्वी भामरागडमधील घरे आणि दुकानांमध्ये शिरून हाहाकार उडाला होता त्या पुलावरूनच भामरागडमध्ये पोहोचलो.
भामरागडच्या रेस्ट हाउसवर उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित आणि पोलीस निरीक्षक संजय सांगळे यांची बदली झाल्यामुळे त्यांचा निरोप समारंभ होणार होता. या पोलीस अधिकाºयांना नक्षल भागात काय अनुभव आले हे जाणून घेण्यासाठी त्यांची भेट घेतली. त्यांनी सांगितले, पोलीस आणि नागरिक यांच्यातील जवळीकता आता वाढली आहे. या भागात पोलीस सोडले तर इतर कोणत्याही विभागाचे कर्मचारी, अधिकारी राहत नाहीत. त्यामुळे लोकांची कोणतीही कामे, अडचणी आम्हालाच सोडवाव्या लागतात. गेल्या आठवड्यात एका महिलेला प्रसूतिकळा सुरू झाल्यानंतर तिला रुग्णालयात नेण्यासाठी वाहन नव्हते. शेवटी पोलिसांनी आपल्या वाहनाने त्या महिलेला रुग्णालयात नेले. लोकांना पोलीस आता जवळचे वाटू लागले आहेत.
धानोरा तालुक्यात छत्तीसगडच्या सीमेकडील बहुतांश गावांमध्ये नक्षल्यांचे प्राबल्य आहे. त्याच गावातील १०-१२ वर्षांच्या बालकालाही नक्षलवादी काय आहे हे माहीत आहे.
लोकांशी गप्पा मारत, त्यांच्याशी बोलत आम्ही प्रवास करीत होतो. त्यांच्या मनातून नक्षल्यांची भीती कमी झाल्याचं जाणवत होतं.
सावंगा (पेंढरी) येथे सहावीत शिकणारा अजय भेटला. त्याला विचारलं, नक्षलवादी तू कधी पाहिले आहेस का? ते कसे असतात? काय करतात?..
त्यावर तो म्हणाला, नक्षलवादी मारतात. त्यांच्याजवळ बंदूक असते. मला कधीच नक्षलवादी बनायचं नाही. त्या लहान मुलाच्या तोंडातून नक्षली आणि त्यांच्याविषयीची नाराजी स्पष्टपणे डोकावत होती. नक्षल्यांना आणि त्यांच्या दडपशाहीला लोकांचा आता पाठिंबा राहिलेला नाही, त्याचा हा धडधडीत पुरावा होता.
पट्टबोरीया गावातला आठवीत शिकणारा सुखदेव म्हणाला, मी लहान असताना माझ्या घरी नक्षलवादी यायचे. १०-१२ जण बंदूक घेऊन असायचे. ते काय करायचे ते मला समजत नव्हतं. पण त्यांची खूप भीती वाटायची. आजही वाटते.
टोकावरील सावरगावचा महेश आज एमएच्या दुसºया वर्षाला शिकतोय. त्याच्या गावातील सर्वाधिक शिकलेला कदाचित तो एकमेव असावा. तो म्हणाला, ‘आधी गावात येऊन मीटिंग घेताना, जेवण करताना मी नक्षल्यांना पाहिले आहे. पण पोलीस मदत केंद्र झाल्यापासून ते येत नाही. त्यांचे धोरण योग्य नाही. ज्या कुटुंबातील सदस्य पोलीस दलात गेला त्याच्या कुटुंबीयांना धमकावून पोलीस दल सोडण्यासाठी त्याच्यावर दबाव टाकला जातो. नक्षल्यांमुळे आमची अधोगतीच झाली. आता आम्हाला विकास पाहिजे..’
नक्षल्यांविषयीचा संताप त्याच्या शब्दाशब्दांतून ठिबकत होता.
असे कितीतरी जण.. पण आज नक्षल्यांच्या विरोधात ते स्पष्टपणे बोलत होते. हा अनुभव नवीनच होता.
जेवलवाहीची बारावीत शिकणारी प्रीती, लक्ष्मी यांनी आपापल्या गावातल्या वीज, पाणी अशा समस्या मांडल्या. आजवर या समस्या दूर झाल्या नाहीत. ‘किती दिवस आम्ही असंच जगायचं? आम्हाला विकासाच्या प्रक्रियेत याचचं आहे, पण नक्षलवादामुळे आम्ही मागंच राहिलो..’ - आपली तळमळ त्यांनी स्पष्टपणे व्यक्त केली.
बदल होतो आहे, लोकांना नक्षलवादाचा फोलपणाही आता कळायला लागला आहे. कायम नक्षल्यांच्या धाकात राहणं त्यांना आता कठीण झालं आहे आणि मान्यही नाही. त्याचं प्रतिबिंब दिसू लागलं आहे. आता हीच वेळ आहे गावकºयांच्या पाठीशी उभं राहण्याची. त्यांना पाठिंबा देण्याची आणि त्यांच्या मनातील नक्षल्यांची भीती समूळ नष्ट करण्याची..

आत्तापर्यंत..
१४८ पोलीस शहीद १७० नक्षलवादी मारले गेले
४३२ नागरिकांची हत्या ५८० नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण यावर्षी ४३ नक्षलवाद्यांना अटक
यावर्षी..
१४० गावांत नक्षल्यांना गावबंदी १२२१ विद्यार्थ्यांना सहलीतून दाखविले बाहेरचे जग.

नक्षलवाद रोखण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरलेल्या योजना
१) नक्षल गावबंदी
या योजनेत नक्षलवाद्यांना गावात येऊ देणार नाही, त्यांना अन्नधान्य पुरवठा किंवा कोणत्याही प्रकारे सहकार्य करणार नाही असा ठराव ग्रामपंचायतला दरवर्षी घ्यावा लागतो. हा ठराव घेणाºया गावाला ३ लाख रुपये प्रोत्साहन निधी दिला जातो. यावर्षी १४० ग्रामपंचायतींनी गावबंदीचा ठराव दिला आहे.

२) नक्षल्यांसाठी नवजीवन योजना
आत्मसमर्पण करणाºया नक्षल सदस्याला किमान २ लाखापासून तर पुढे त्याच्या हुद्द्यानुसार त्याच्यावर ठेवलेल्या बक्षिसाची रक्कम मदत म्हणून दिली जाते. याशिवाय त्याच्या पाल्यांना मोफत शिक्षण, रोजगार-स्वयंरोजगारासाठी मदत, भूखंडाचे वाटप करून त्याच्यावर असलेले गुन्हेही माफ केले जातात. २००५ पासून ही योजना सुरू असून, आत्तापर्यंत ५८० जणांनी आत्मसमर्पण केले आहे. त्यात ४१६ पुरुष आणि १६४ महिला आहेत.

३) महाराष्ट्र दर्शन सहल
ग्रामीण भागातील सरकारी शाळांमध्ये शिकणाºया वर्ग १४ ते १८ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांना गृह विभागाकडून १० दिवसांच्या महाराष्टÑ दर्शन सहलीवर नेले जाते. ज्यांनी जिल्ह्याबाहेर कधी पाऊल ठेवले नाही त्यांना बाहेरचे जग कसे आहे हे दाखविले जाते. मुंबईपर्यंत प्रमुख ठिकाणं दाखविली जातात. राज्याच्या पोलीस महासंचालकांशी त्यांची भेट होऊन ते त्यांच्याशी संवाद साधतात. २०१३ पासून सुरू केलेल्या या योजनेत आत्तापर्यंत १५ सहलीतून १२२१ विद्यार्थ्यांना राज्याची सैर घडविण्यात आली आहे.
४) जनमैत्री मेळावा
दरवर्षी २८ जुलै ते ३ आॅगस्ट या काळात नक्षलवाद्यांकडून शहीद सप्ताह पाळला जातो. या काळात दहशत पसरविण्यासाठी हिंसक कारवायाही घडवितात. यादरम्यान कोणीही नक्षल्यांच्या आवाहनानुसार व्यवहार बंद न ठेवता वातावरण जास्तीत जास्त शांत राहावे यासाठी पोलिसांकडून गावागावांत जनमैत्री मेळावे घेतले जातात. काय चांगले, काय वाईट हे समजावून सांगून आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, असा विश्वास पोलिसांकडून दिला जातो. यादरम्यान गावात शांती मार्चही काढला जातो.

५) जनजागरण मेळावा
दुर्गम भागातील एखाद्या मोठ्या गावात हा मेळावा घेतला जातो. यात पोलिसांसोबत सर्व विभागांचे अधिकारी सहभागी होतात. गावातील ज्या-ज्या विभागांच्या समस्या आहेत त्या ऐकून घेऊन संबंधित विभागाच्या अधिकाºयांकडून त्या तिथेच सोडविण्याचा प्रयत्न केला जातो. गावकरी तालुका किंवा जिल्हास्तरावर येऊ शकत नाहीत, त्यांची कामे गावातच व्हावी हा त्यामागचा उद्देश आहे.

६) ग्रामभेट
छोट्या-छोट्या गावांतील समस्या अनेक वेळा संबंधित विभागापर्यंत पोहोचतच नाहीत. त्यामुळे पोलीस विभागाकडून गावकºयांची भेट घेऊन त्यांच्या समस्या संबंधित विभागांपर्यंत पोहोचवायच्या असे ग्रामभेट कार्यक्रमाचे स्वरूप असते. यामुळे सर्व समस्या सुटत नसल्या तरी बºयाच समस्या मार्गी लागतात. याशिवाय काही सामाजिक उपक्रमही ग्रामभेटीच्या निमित्ताने राबविले जातात.

७) आपली कन्या आपल्या भेटी
भामरागडचे डीवायएसपी संदीप गावित यांनी आपल्या कार्यक्षेत्रात ही योजना सुरू केली आहे. यात पोलीस दलात कार्यरत झालेल्या मुलींना आदिवासी कुटुंबीयांकडे पाठवून त्यांना तिच्यातील प्रगतीची माहिती दिली जाते. इतर कुटुंबीय आणि तिचे कुटुंबीय यांच्यातील फरक सांगितला जातो. यातून आदिवासी कुटुंबांचे मनपरिवर्तन होण्यास मदत होत आहे.

पोलीस-नागरिक समन्वय
पोलीस नागरिकांचा विश्वास जिंकत आहेत म्हणून आम्हाला आमच्या कामात यश येत आहे. आज नक्षलवाद्यांच्या भीतीने ग्रामीण भागात कोणत्याही विभागाचे कर्मचारी राहत नाहीत. त्यामुळे त्या-त्या विभागाच्या समस्या घेऊन लोक आमच्याकडेच येतात. आम्हीही त्यांना त्याच आत्मीयतेने मदतीसाठी तत्पर असतो. एकीकडे नागरिकांची मदत, तर दुसरीकडे नक्षल्यांशी दोन हात करून आम्ही त्यांना रोखले आहे. त्यामुळे नक्षलवादी निश्चितपणे बॅकफूटवर गेले आहेत. हे केवळ आम्ही म्हणत नाही, तर पोलीस कारवाईत हाती लागलेल्या नक्षल्यांच्या डायरींमध्येही याची नोंद आढळली आहे.
- डॉ. हरी बालाजी
अतिरिक्त पोलीस अधीक्षक (नक्षल क्राइम)


रात्री नऊपर्यंत व्यवहार!
- नागरिकांमध्ये आत्तापर्यंत जी भीती होती ती आता कमी होत आहे. आत्तापर्यंतच्या वातावरणामुळे लोक दु:खी आहेत. त्यांनाही विकास पाहिजे आहे, पण ते उघडपणे समोर येत नाहीत. ज्या एटापल्लीत पूर्वी अंधार पडायला लागला की दुकाने आणि सर्व व्यवहार बंद व्हायचे तिथे आता रात्री ९ पर्यंत दुकाने सुरू राहतात. दुकानांची संख्याही वाढली आहे. लोकांना शेतीपयोगी साहित्य, स्वयंरोजगारासाठी लागणाºया वस्तूंची पूर्तता करण्यासाठीही आमच्याकडे तरतूद आहे. मागणीनुसार आम्ही तीही मदत करीत आहोत.
- प्रभाकर त्रिपाठी
कमांडंट, १९१ बटालियन, सीआरपीएफ

मुद्दाम भामरागडला आले!
- मी मूळची औरंगाबादची. आतापर्यंत नाशिक ग्रामीणला सेवारत होते. गडचिरोलीला बदली झाल्यानंतर मी मुद्दाम भामरागड पोलीस ठाणे मागितले. अशा अतिसंवेदनशील नक्षलग्रस्त भागातील ठाणेप्रभारी म्हणून काम करणारी मी या जिल्ह्यातील पहिलीच महिला अधिकारी आहे. या भागातील महिलांच्या माध्यमातून बरेच काही चांगले करण्यासाठी वाव आहे आणि ते मी करणार आहे.
- अंजली राजपूत
ठाणेदार, भामरागड पोलीस ठाणे
 

 

(लेखक लोकमतच्या नागपूर आवृत्तीत उपसंपादक आहेत.manoj.tajne@lokmat.com)

Web Title: Tribulation courage against Naxal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.