कोल्हापूरच्या खाद्यसंस्कृतीला आपुलकीचा स्वाद --ते रोमांचित चोवीस तास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 12:17 AM2019-06-16T00:17:37+5:302019-06-16T00:20:12+5:30

प्रशांत कुलकर्णी मनापासून आणि दातृत्वभावनेने केलेली कोणतीही गोष्ट उत्तमच होते.... कोल्हापूर हे त्याचे उत्तम उदाहरण... खाद्यसंस्कृती तर जगभर आहे; ...

The taste of affection for the food culture of Kolhapur - thrilled twenty-four hours | कोल्हापूरच्या खाद्यसंस्कृतीला आपुलकीचा स्वाद --ते रोमांचित चोवीस तास

कोल्हापूरच्या खाद्यसंस्कृतीला आपुलकीचा स्वाद --ते रोमांचित चोवीस तास

googlenewsNext
ठळक मुद्देमाझा हा एक दिवस मला आयुष्यभर लक्षात राहील आणि ते माझ्या आयुष्याच्या पुस्तकातलं सर्वांत सुंदर पान असेल...

प्रशांत कुलकर्णी
मनापासून आणि दातृत्वभावनेने केलेली कोणतीही गोष्ट उत्तमच होते.... कोल्हापूर हे त्याचे उत्तम
उदाहरण... खाद्यसंस्कृती तर जगभर आहे; पण कोल्हापूरकरांची आपुलकी आणि आग्रह इथल्या
पदार्थांची चव आणखी वाढवितो.... कोल्हापूर म्हणजे खाद्यमहोत्सव आणि भरभरून प्रेम देणारी माणसं... असं आवर्जून म्हणावं वाटतं... इथं येणाऱ्या प्रत्येकाला पुन:पुन्हा कोल्हापूरला यावं असं वाटणं, हे या शहराचे खास वैशिष्ट्य आहे...

रंकाळ्यावरून आम्ही महालक्ष्मी मंदिरात आलो आणि एक अफाट व्यक्तिमत्त्व भेटले... ऐश्वर्या मुनीश्वर... कोल्हापूरची लेडी डॉन... बुलेट सम्राज्ञी... सर्पमित्र... समाजसेवा व ईश्वरसेवेचे अद्भुत मिश्रण म्हणजे ऐश्वर्या... पुण्याला जाऊन यायचं म्हटलं तर लगेच बुलेट काढून तयार... सकाळी पुण्याला जाऊन संध्याकाळी पुन्हा कोल्हापुरात टच... दर्शन झाले आणि तिच्याबरोबर गप्पा मारल्या... म्हाळसाबाई हिच्या फॅन असल्याने त्यांनी तिला घरी यायचं निमंत्रण दिलं... दुसºया दिवशी अमोलची कडक मिसळ खायला भेटूू असं म्हणून निरोप घेतला...

मंदिराच्या बाहेर आलो... पद्मा शिंदेंच्या दुकानातून पिंजर कुंकू घेतलं, दगडू भोसलेकडील प्रसिद्ध पेढे घेतले... म्हाळसाबार्इंना आप्पे खायचे होते... मंदिराच्या बाहेर आप्पे खूप छान मिळतात हे माहीत होतं... अर्थात चालतं-बोलतं गुगल कोल्हापूर म्हणजे प्रथमेश बरोबर असल्याने चिंता नव्हती... प्रथमेश आम्हाला घेऊन गेला शिंदे यांच्या आप्प्याच्या स्टॉलवर... मंदिराच्या बाहेर लागूनच हे ठिकाण... गरमागरम व खुसखुशीत आप्पे... सोबत खोबरे-शेंगदाण्याची चटणी आणि पाट्या-वरवंट्यावर केलेला ठेचा... दोन-तीन प्लेट अशाच संपल्या... पुण्याचे पाहुणे म्हटल्यावर शिंदेंचा आग्रह, आपुलकी जास्तच.. तिथे प्लेटचा हिशेब नव्हता... शिंदेंचा निरोप घेऊन आमचा मोर्चा वळला खासबागच्या खाऊ गल्लीकडे...

विक्रांतच्या पावभाजीच्या ठिकाणी आलो... पावभाजी हा माझ्या पोरीचा आवडता पदार्थ... गरमागरम व चटकदार पावभाजीवर तिनं ताव मारला... विक्रांत भेटायला बाहेर आला... तोही माझा वाचक आहे हे ऐकून आनंदलो... तिथेच अजून एक माझे कोल्हापूरचे वाचक भेटले... त्यांच्याशी बोललो आणि मग आलो राजाभाऊंच्या प्रसिद्ध भेळकडे... ही भेळ म्हणजे खाऊ गल्लीची जननीच... भेळ चापून मग त्यावर तिथेच एका ठिकाणी पाणीपुरीचा थर लावला... पोट आता गयावया करायला लागले होते... ‘मालक आता आवरा, बास झालं... नाहीतर मी फुटेन’ हे ते ओरडून ओरडून सांगत होते...

तिथून बाहेर पडलो तर प्रथमेश म्हणाला, ‘कोल्हापूरची अजून एक खास गोष्ट दाखवितो...’ तो आम्हाला एका चौकात घेऊन गेला... तेथे बºयाच म्हशी उभ्या होत्या... जागेवरच म्हशीचे दूध काढून प्यायला दिले जाते... ‘धारोष्ण दूध’ या शब्दाचा खरा अर्थ व प्रत्यक्षातली चव येथे समजली... ग्लासभर दूध रिचवले व आजच्या खाद्यचक्कीला बंद केले...

आजच्या दिवसाची सांगता झाली होती... दुसºया दिवशी सकाळीच आम्ही अमोल गुरवच्या लक्ष्मी मिसळ अड्ड्यावर भेटलो... येथेही मी येणार म्हटल्यावर बरीच मित्रमंडळी जमा झाली... जर्मनीत माझ्याशी थोडक्यात भेटीची हुक्काचूक झालेला आयटी तज्ज्ञ संतोष कुईगडे भेटायला आला... सतत हसतमुख प्रसाद गवस, सदाबहार व्यक्तिमत्त्व महेश निगडे व कोल्हापूरचे शीघ्र कवी रमेश तोंडकर... एक उत्तम खवय्या, उत्तम लेखक व चवींचा बादशहा असलेला प्रसिद्ध शेफ शिवप्रसाद, श्री. व सौ. प्रथमेश आणि डॅशिंग ऐश्वर्या होतीच... एवढी मंडळी जमली म्हटल्यावर गप्पांचा फंड रंगला... सोबत अमोलची मिसळ...

अमोलने त्याच्या परिश्रमाने आणि वडिलांच्या आशीर्वादाने त्याची ही लक्ष्मी मिसळ कोल्हापूरमध्ये सर्वोच्च स्थानी नेऊन ठेवली आहे... कोल्हापूर व मिसळ हे काय नाते आहे, हे ज्याला माहीत करून घ्यायचे असेल त्याने तर तडक लक्ष्मी मिसळ गाठावी... अशी मिसळ मी आयुष्यात कधी खाल्ली नाही... त्यात असे आजूबाजूला मित्रमंडळी असेल तर गप्पा टप्पा मारत मिसळ खायला अजून रंगत येते... अफलातून अशा मिसळची चव चाखण्यासाठी लोक अर्धा अर्धा तास वाट पाहत उभे असतात... आणि त्यात रविवार म्हटल्यावर तर अजून गर्दी... पण, त्याही धामधुमीत अमोल आणि त्याच्या वडिलांनी वैयक्तिक लक्ष देतं आग्रहाने भरपेट मिसळ खाऊ घातली... कोल्हापुरात आलात आणि ही मिसळ न खाता गेलात तर काहीतरी राहून गेल्याची हुरहुर नक्कीच लागेल... मेकॅनिकल झालेला अमोल म्हणजे सळसळत्या उत्साहाचा झरा आहे आणि त्याला साथ देणारी, हसतमुख त्याची पत्नी अनुलेखा... दोघेही आम्हाला भेटायला आदल्या दिवशी खासबागमध्ये आले होते... व त्यांनी माझ्या मुलीसाठी सातूच्या पिठाचे लाडू बनवून आणले होते...
अमोलच्या मिसळ सेंटरवर बरीच गर्दी होती... त्यामुळे आम्ही आटोपते घेत अमोलला शुभेच्छा देत निरोप घेतला... आणि मग प्रथमेश मला घेऊन गेला खास अशा माणसाच्या घरी... त्याचं नाव प्रतीक बावडेकर... कोल्हापूर म्हणजे एकाचढ एक अशा हिºया-माणकांची खाणच... प्रतीक त्यातलाच एक अस्सल कोल्हापुरी हिरा... २५-३० वयाचा एक असामान्य काम करणारा सर्वसामान्य युवक... या माणसाला कोल्हापूरमध्ये ‘झाडांचा माणूस’ किंवा ‘कोल्हापूरचा ट्री मॅन’ म्हणून ओळखतात... लहान मुलं त्याला ‘ट्री मॅन’ म्हणून हाक मारतात... एखाद्या माणसाने मनावर घेतलं तर काय करू शकतो त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे हा प्रतीक...

या माणसाने कोल्हापूर व परिसरात आजपर्यंत १३८२ झाडे लावलीत. नुसती लावली नाही तर ती सगळीच्या सगळी जगविली... प्रत्येक झाडाची त्यांच्याकडे नोंद असून, त्याच्याकडे या सर्व झाडांची फाईल आहे... कोल्हापूरमध्ये असा एक रस्ता, गल्ली, बोळ नसेल तेथे प्रतीकने लावलेले झाड नसेल... वाढदिवस, सणवार, कौटुंबिक सोहळा अशा वेळेला आठवण म्हणून लोक झाड लावण्यासाठी प्रतीकला बोलावतात... प्रतीक स्वखर्चाने ती झाडे लावतो... त्यासाठीचे खत, माती, रोप स्वत: घेऊन जातो... आता कोणी झाडाचे पैसे देत, तर कोणी देत नाही आणि प्रतीक ते कधी मागतही नाही... तो तरुण पिढीसाठी आदर्श आहे... प्रतीकच्या घरी गप्पा झाल्या... त्याचा निरोप घेऊन बाहेर पडलो...मी आता माझ्या हॉटेलवर व तेथून गोव्याकडे प्रस्थान करणार होतो...

कोल्हापूरमधील मागचे २४ तास माझ्यासाठी भारावलेले, मंतरलेले होते... मी लिखाणातून जे
काही कमाविले असेल त्याला कोल्हापूरकरांनी भरभरून प्रतिसाद देत आपलं प्रेम माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर दिलखुलासपणे उधळत आपल्या निरागस दिलदार दर्दीपणाचा प्रत्यय दिला होता आणि तेही अगदी साधेपणाने.... मनापासून...

हा एक दिवस एवढं कोल्हापूर हिंडलो, फिरलो, खाल्लं-पिलं पण मला चुकूनही खिशात हात घालायची वेळच कोणी येऊ दिली नाही... कोल्हापूरकरांनी आमच्यावर प्रेमाचा एवढा वर्षाव केला की विचारू नका... कोणी मुलींसाठी खाऊ दिला तर कोणी देवीची उत्तम फोटोफ्रेम दिली... तर रसायनमुक्त शुद्ध कोल्हापूरची गुळाची ढेप दिली... मी आभार कोणाचेच मानणार नाही. कारण, ते खूप औपचारिक होईल... माझा हा एक दिवस मला आयुष्यभर लक्षात राहील आणि ते माझ्या आयुष्याच्या पुस्तकातलं सर्वांत सुंदर पान असेल...
(उत्तरार्ध)

Web Title: The taste of affection for the food culture of Kolhapur - thrilled twenty-four hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.