ताजमहाल! ऐतिहासिक वारशाचा तिरस्कार हादेखील धर्मद्वेषच..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2017 04:06 PM2017-10-21T16:06:08+5:302017-10-22T11:09:04+5:30

Taj Mahal! The hatred of historical heritage is not religion. | ताजमहाल! ऐतिहासिक वारशाचा तिरस्कार हादेखील धर्मद्वेषच..

ताजमहाल! ऐतिहासिक वारशाचा तिरस्कार हादेखील धर्मद्वेषच..

Next

- सुरेश द्वादशीवार

उत्तर प्रदेशच्या आदित्यनाथांच्या द्वेषाचे राजकारण आता थेट ताजमहाल या जगातल्या आठव्या आश्चर्यापर्यंत पोहचले आहे. देशातील सर्वाधिक प्रेक्षणीय वास्तू व जगभरच्या पर्यटकांचे आवडते स्थळ असलेल्या ताजमहाल या आगऱ्यातील मानवी चमत्काराला या मुख्यमंत्र्याने राज्याच्या पर्यटनस्थळांच्या यादीतून वगळले आहे. ताजमहालचे सौंदर्य, माहात्म्य व ऐतिहासिक वारसा या गोष्टी कुणालाही नाकारता येणाऱ्या नाहीत. पण ताजमहाल ही शाहजहान या मुसलमान बादशहाने मुमताज महल या आपल्या आवडत्या बेगमसाठी बांधलेली कबर आहे आणि तो इस्लामचा वारसा आहे असे या कर्मठ हिंदुत्ववाद्याला वाटत आहे. वास्तविक बाबरापासून जफरपर्यंतचा इतिहास हा केवळ इस्लामी सत्तेचा नाही, तो भारताचा इतिहास आहे. ताजमहाल ही त्याची वर्तमानाला लाभलेली देण आहे. केवळ संकुचित माणसेच तिच्या सौंदर्यावर व ऐतिहासिक थोरवीवर धार्मिक शिक्का उमटवू शकतात.

ताजमहाल ही देशाची सांस्कृतिक संपत्ती आणि जगभरच्या प्रेमीजनांचे विसाव्याचे स्थान आहे. भारत हा केवळ योग्यांचा, संन्याशांचा, साध्व्यांचा, बाबा आणि बुवांचा देश नाही; तो सामान्य व चांगल्या नागरिकांचाही देश आहे. हा नागरिक धर्मांध नाही आणि त्याला ताजमहाल ही इस्लामची नसून इतिहासाची देणगी वाटत आली आहे. या देशातील कवी व कलावंतांच्या प्रतिभेला व कर्तबगारीला त्या वास्तूने फुलविले आणि जागविले आहे. तिने साहित्य आणि कलेचा प्रांत समृद्ध केला आहे. जगभरातील वास्तू व शिल्पशास्त्र्यांना तिचे माहात्म्य व कौतुक वाटले आहे. झालेच तर भारतात येणारे सर्वाधिक पर्यटक ताजमहालला भेट देणारे आहेत. या पर्यटकांना मंदिरे दाखविली पाहिजेत, गंगा दाखविली पाहिजे, काशी विश्वेश्वराचे मंदिरही (ते जरा स्वच्छ करून) दाखविले पाहिजे. मात्र त्याचबरोबर लाल किल्ला, फत्तेपूर शिक्री, अजमेरच्या ख्वाजाचे स्थान आणि ताजमहालही दाखविता आलेच पाहिजे. भारत ही पाच हजार वर्षांची परंपरा आहे. आर्य, शक, हूण, मुसलमान व ख्रिश्चन या साऱ्यांना कवेत घेऊन येथील राष्ट्रीय प्रवाहांनी ती समृद्ध व सुंदर करीत आणली आहे. तिचे धर्मवार तुकडे पाडण्याचा आदित्यनाथ या पुढाऱ्याला, त्याच्या पक्षाला व परिवाराला हक्क नाही. पूर्वी एकदा पी. एन. ओक या नावाच्या एका बेगडी इतिहास संशोधकाने ताजमहाल हा तेजोमहाल असल्याचे व ते हिंदूंचे पूजास्थान असल्याचे सांगून एक विनोद घडविला होता. त्याच काळात प्रशिया (जर्मनी) आणि ऑस्ट्रिया या देशांची मूळ नावे पुरुषीय व स्त्रिया अशी होती असा जावईशोधही त्याने लावला होता. (त्याचे ते बेगडी शोध अनेक अर्धवटांना आनंदी करणारेही तेव्हा ठरले होते.) त्यावर कोटी करताना पु.ल. म्हणाले, त्याचमुळे कदाचित त्या दोन देशांच्या खाली असलेल्या छोट्या देशांना ‘बालकन्’ हे नाव पडले असावे. पुढे जाऊन त्या प्रचारी इतिहासकाराच्या नावाची चिरफाड ‘पी अन् ओक’ अशीही त्यांनी केली होती. या ओकांसारखी माणसे आणि त्यांचे उथळ लिखाण ज्यांना भावते त्यांच्या बुद्धीचा व आकलनाचा आपण राग धरता कामा नये. समज आणि आवड

हेच ज्ञान असे समजणाऱ्यांकडून जास्तीच्या अध्ययनाची व आकलनाची अपेक्षाही करायची नसते.

आदित्यनाथांचे ताजमहालला पर्यटनस्थळातून काढण्याचे कृत्य केंद्र सरकारला जसे आवडले नाही तसे त्यांच्या मंत्रिमंडळातील इतरांनाही ते आवडले नाही. रिटा बहुगुणा या त्यांच्या पर्यटनमंत्र्याने ताजमहाल भोवतीच्या पर्यटकांच्या सोयी वाढवण्यासाठी १०० कोटींचा निधी उपलब्ध करून दिल्याचे याच वेळी जाहीर झाले आहे. आदित्यनाथांचे भांडण ताजमहालशी नाही; ते अल्पसंख्य मुसलमानांशी आहे. ते कर्मठ आहेत, एका धार्मिक आश्रमाचे प्रमुख आहेत आणि टोकाचे परधर्मद्वेष्टे आहेत. ज्या वास्तूवर जग प्रेम करते त्या वास्तूवरचा त्यांचा द्वेष त्यातून आला आहे. प्रेम आणि राग किंवा आत्मीयता आणि तिरस्कार हे मनाचे गुण आणि व्यक्तीचे अधिकार आहेत. प्रत्येकाला आपल्या प्रेमाचा व द्वेषाचा विषय निवडून घेण्याचा अधिकारही आहे. मात्र या अधिकाराला इतर साºया अधिकारांप्रमाणे व्यक्तिगत आवडीनिवडीची मर्यादा आहे. आदित्यनाथांना ताजमहाल आवडत नसेल तर तो त्यांच्या अधिकाराचा भाग आहे; मात्र आपली आवड वा नावड साऱ्या समाजावर, राज्यावर वा देशावर लादणे हा एका हुकूमशाही मानसिकतेचा प्रकार आहे. स्वधर्मावर प्रेम करणे ही बाब स्वाभाविक म्हणावी अशी आहे आणि ते करण्याचा हक्क घटनेनेही साऱ्यांना दिला आहे. मात्र द्वेष आणि तिरस्कार या गोष्टी जेवढ्या अस्वाभाविक तेवढ्याच त्या नागरी स्वातंत्र्याच्या विरोधात जाणाऱ्या आहेत. त्यातून एखाद्या धर्मविशेषाचा आणि त्यातील ऐतिहासिक थोरामोठ्यांनी उभ्या केलेल्या राष्ट्रीय महत्त्वाच्या वास्तूंचा द्वेष हा साऱ्या इतिहासाएवढाच देशाचाही अपमान करणारा प्रकार आहे आणि असा अपमान मुख्यमंत्री म्हणविणाऱ्या इसमालाही क्षम्य ठरणारा नाही. मात्र द्वेष हेच ज्यांच्या राजकारणाचे अधिष्ठान आहे त्यांना हे सांगण्यात फारसे हशील नाही.

(लेखक लोकमतच्या नागपूर आवृत्तीचे संपादक आहेत)

Web Title: Taj Mahal! The hatred of historical heritage is not religion.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.