- मेघना ढोके

रस्त्यातले खड्डे असोत, जमिनीवरची पिकं असोत,
की दिल्लीच्या डोक्यावर तरंगणारा ‘स्मॉग’चा
विषारी ढग, अवकाशात भ्रमण करणारे उपग्रह अनेकानेक किचकट प्रश्नांच्या उत्तरांच्या
शक्यतांवर ‘नजर’ ठेवून आहेत,
त्याबद्दल...

नोटाबंदीच्या वर्षश्राद्धापासून दिल्लीकरांचा श्वास कोंडणा-या राजधानीतल्या ‘स्मॉग’पर्यंतच्या बातम्यांनी ढवळून निघालेल्या गेल्या आठवड्यात एका बातमीकडे तुमचं लक्ष गेलं का?
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इसरो) विकसित केलेल्या एका नव्या अ‍ॅप्लिकेशनची चाचणी यशस्वीपणे पार पडली. नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्या पुढाकाराने त्यांच्या मतदारसंघातल्या ब्राह्मणगावात प्रायोगिक तत्त्वावर मोबाइल अ‍ॅपद्वारे रस्त्यांवरच्या खड्ड्यांचं सर्वेक्षण सुरू झालं. गाडी चालवताना मोबाइलवरचं नेव्हिगेशन सुरू ठेवून चालवलेल्या या अ‍ॅपने रस्त्यातले खड्डे त्यांच्या लांबी-रुंदी आणि खोलीसकट मोजले जाऊ शकतात.
जे खड्डे आहेत की नाहीत या प्रश्नावरून राजकारणं रंगतात, वाहनचालक मेटाकुटीला येतात आणि ते खड्डे का पडतात - भरले का जात नाहीत-रस्त्यावर सोन्याचे पत्रे घालता येतील एवढा पैसा खर्ची पडूनही रस्त्यावरच्या खड्ड्यात साधी खडी आणि डांबर का पडत नाही अशा अनेकानेक प्रश्नांच्या मुळाशी असतो तो पुरेशा आणि नेमक्या माहितीचा - डेटा- अभाव!
- हा अभाव खुडणारं हे साधन इसरो सध्या विकसित करते आहे. हे अ‍ॅप विशिष्ट रस्त्यावर खड्डे कुठं आहेत, किती आहेत, किती लांबी-रुंदी-खोलीचे आहेत याचा अचूक तपशील - रिअल टाइम डेटा- देऊ शकेल. सध्या हे अ‍ॅप प्रायोगिक स्वरूपात आहे; पण त्याचा प्रत्यक्ष वापर सुरू झाला की अपघात टाळण्यासाठी वाहनांना त्याचा उपयोग होऊ शकेलच, शिवाय रस्तेबांधणी आणि दुरुस्तीच्या प्रक्रियेत सर्रास चालणारे आर्थिक घोळही नियंत्रणात आणता येतील.
‘इसरो’च्या उपग्रहाच्या साहाय्याने नाशकातल्या रस्त्यावर ही ‘खड्डे मोजणी’ चालू असताना अमेरिकन अंतराळसंस्था ‘नासा’ने उपग्रहांनी धाडलेल्या काही प्रतिमा प्रसिद्ध केल्या आणि साधार दाखवून दिलं की दिल्लीच्या डोक्यावर तरंगणारा प्रदूषित ‘स्मॉग’चा ढग भारत-पाकिस्तानातल्या पंजाब प्रांतात सोंगणीनंतर शेतकºयांनी जाळलेल्या शेतातल्या धसकटांच्या जाळातून निघालेल्या धुराच्या लोटांशी संबंधित आहे. खरं तर मागच्या वर्षी ऐन थंडीच्या तोंडावर दिल्लीचा श्वास घुसमटला, तेव्हा हेच सारं भारतीय ‘इसरो’नं आपल्या सॅटेलाइट डाटाच्या आधाराने समप्रमाण सिद्ध केलं होतं. पण त्यावेळी आॅड-इव्हनच्या प्रयोगानं भारावलेल्या तज्ज्ञांनी त्या सॅटेलाइट माहितीकडे सोयीस्कर डोळेझाक केली. दिल्लीत प्रदूषणाची पातळी कमी नाही हे उघड आहे, आॅड-इव्हनचा प्रयोग अनावश्यकही नाही; पण केवळ वाहनांमुळे इतकं दाट स्मॉग निर्माण झालेलं नाही हे सॅटेलाइट डाटा सप्रमाण दाखवत होता. पण त्याकडे सोयीस्कर काणाडोळा करण्यात आला किंवा केला गेला असा संशय घ्यायला जागा आहे.
एकीकडे सर्वोच्च न्यायालयानं पंजाबातल्या मैलोगणिक पसरलेल्या शेतातलं हे गचपण जाळण्यावर बंदी घातली आहे, दुसरीकडे दिल्लीत ज्या पक्षाचं सरकार तो पक्ष या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी आग्रही आहे आणि पंजाबमधलं त्याच पक्षाचं सरकार मात्र स्थानिक शेतकºयांच्या प्रश्नाच्या कैचीत सापडलं आहे. तो प्रश्न म्हणजे पंजाबात रब्बीचा मोठा हंगाम तोंडावर असताना शेतातलं हे निरूपयोगी गचपण वर्षानुवर्षांसारखं जाळायचं नाही तर त्याचं करायचं काय? अर्थातच या नेमक्या प्रश्नाचं उत्तर धुरक्यात आणि राजकारणात हरवून गेलं आहे.
या निमित्तानं आठवलं ते इसरोचे संस्थापक अध्यक्ष विक्रम साराभाईंचं एक मत. ते म्हणत, आपल्याकडच्या समस्या म्हटलं तर किरकोळ आहेत; पण लोकसंख्या आणि भौगोलिक व्याप्ती पाहता त्या अक्राळविक्राळ स्वरूप धारण करतात. आणि त्यावर उत्तर शोधायचं तर हायटेक्नॉलाजीच हवी.
गेल्याच महिन्यात इसरोच्या अहमदाबाद स्पेस अ‍ॅप्लिेकशन सेंटरमध्ये हा विषय तपशिलाने समजून घेण्याची संधी मिळाली होती. हवामान, ऋतूबदल, पीकअंदाज, मातीकसाचे अंदाज, दुष्काळापासून अतिवृष्टीपर्यंतचे अंदाज आणि विश्लेषण, किनारपट्ट्यांची धूप, सूर्यप्रकाश आणि वाºयाच्या दैनंदिन लहरींचा अभ्यास असं अक्षरश: डोंगराएवढं काम सध्या इसरोमध्ये चालू आहे. या प्रत्येक प्रांतातल्या घटना-घडामोडींचे अंदाज अधिकाधिक अचूक वर्तवता यावेत यासाठी सॅटेलाइट डाटा वापरून विविध अ‍ॅप्लिकेशन तयार करणं, नागरी जीवनातल्या अनेकानेक समस्यांची शास्त्रीय उकल करून नागरिकांचं आयुष्य सुकर करणं हे काम इसरो कसं करते हे पाहणं मोठं विस्मयकारक आहे.
खरं तर इसरो म्हणजे रॉकेट्स, उपग्रह आणि अंतराळ मोहिमा एवढंच आपल्याला माहिती असतं. पण नुस्ते उपग्रह सोडले म्हणजे इसरोचं काम संपत नाही. उलट एकदा उपग्रहाकडून अपेक्षित माहिती आली की तिचंं विश्लेषण आणि त्या माहितीचा समाज-घटकांच्या उन्नयनासाठी उपयोग करणं हे काम अत्यंत महत्त्वाचं असतं. आपल्याला इसरोविषयी जे अजिबात माहिती नसतं किंवा फार कमी माहिती असतं तो हा टप्पा.
इसरोच्या मोहिमांच्या बातम्या होतात, मंगळयानाची झेप राष्ट्रीय अभिमानाचा विषय ठरते, भारतीय चांंद्रयानाच्या चर्चा रंगतात; पण इसरो जे उपग्रह सोडते, त्यांच्याकडून येणाºया माहितीचं
(डेटा) विश्लेषण आणि विनियोग नेमका कसा होतो, हे आपल्याला अभावानेच माहिती असतं.
- म्हणूनच दिल्लीतल्या प्रदूषणाच्या प्रश्नात ‘नासा’ने उडी घेतल्यावर का असेना, सदैव राजकीय इंधन मिळून प्रश्न भडकता ठेवण्याची सवय झालेल्या आपल्या देशाला अशा प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी उपलब्ध होत असलेल्या उच्च-तंत्रज्ञानाची खबर ठेवण्याचं भान आलं, तरी पुष्कळ!
आंध्रातल्या कुप्पम इंजिनिअरिंग कॉलेजच्या पाच मुली आणि त्यांच्या प्राध्यापकांनी इसरोच्या मदतीने आणखी एक अ‍ॅप बनवायला घेतलं आहे. या भागात विजांचा कडकडाट आणि वीज पडण्याचं प्रमाण जास्त आहे. त्यानं होणारी मनुष्य आणि पशूहानीही मोठी आहे. त्यावर उपाय म्हणून या मुलींनी ठरवलं की असं अ‍ॅप बनवायचं जे विजा कडकडणं सुरू होण्यापूर्वी वापरकर्त्याला लिखित किंवा आवाजी संदेश पाठवेल. म्हणजे व्यक्तींसह पशूंना सुरक्षित जागी जाऊन थांबता येऊ शकेल. यासाठी जे हवामान अंदाज वापरले जातील ते इसरोचा सॅटेलाइट डाटा पुरवेल. स्थानिक माणसांसाठी किती मोलाची असेल ही मदत याचा आपण अंदाज बांधूच शकतो.
भारतीयांच्या दैनंदिन जीवनात असे अनेक बदल घडवण्याचं काम इसरोमध्ये अखंड सुरू आहे.
अहमदाबादमधल्या इसरोच्या आवारात रॉकेटपलीकडची अशी इसरो भेटते आणि भेटतात तपन मिश्रा. त्यांना भारताचा ‘रडार मॅन’ म्हणतात. रिमोट सेन्सिंगचा त्यांचा अभ्यास अफाट आहे. इसरोविषयी बोलताना ते सांगतात, ‘मी सगळ्यांना सांगतो, येस वी अल्सो मेक रॉकेट्स. आम्ही असं तंत्रज्ञान बनवतो, जे अंतराळासाठी असलं तरी ते क्लिष्ट नाही. ते तंत्रज्ञान सामान्य माणसाला सहज हाताळता यायला हवं. सामान्य माणसाचं आयुष्य सुकर करेल आणि स्वस्तही असेल, परवडेल असं तंत्रज्ञान इसरोमध्ये विकसित होतं आहे.इसरो इज नॉट फॉर रॉकेट अ‍ॅण्ड सॅटेलाइट्स. स्पेस टेक्नॉलॉजी वर्क्स फॉर ग्राउड रिअ‍ॅलिटी.
फक्त शेती एवढाच विषय घेतला तरी उपग्रहीय माहितीचं विविध प्रकारे विश्लेषण करून शेतकºयांना त्याचा थेट लाभ पोहचवणं आणि सरकारी कृषी विभागालाही धोरणात्मक निर्णयांसाठी मदत करणं अशा विविध पातळ्यांवर इसरो सध्या कार्यरत आहे. मान्सूनचा अंदाज, दुष्काळाचा अंदाज, नगदी पिकांचा अंदाज, फळं आणि भाजीपाला यांचं उत्पादन, माती परीक्षण, मातीतला ओलावा, पिकांवर येणारे साथीच्या रोगांचं निदान, भूजल पातळीचे अंदाज अशी विविध प्रकारची माहिती इसरोचे उपग्रह सरकारला पुरवतात.
आकडेवारी आणि माहितीची अशी लांबच लांब जंत्री अजून बरीच देता येईल. इसरोच्या वेबसाइटवर ही सारी इत्थंभूत माहिती सर्वांना उपलब्ध आहे. कुणी अधिकची माहिती मागितली तरी देण्यात येते. कारण माहिती आणि तंत्रज्ञान जास्तीत जास्त लोकांना उपलब्ध करणंं हेच इसरोचं तत्त्व आहे. या माहितीचा उपयोग करू इच्छिणाºया कुणाही सर्वसामान्य नागरिकाला, संस्था अगर नागरी गटांना ही माहिती इसरो विविध संकेतस्थळांवर उपलब्ध करून देते. आपलं शहर, विशिष्ट भागातली आपली शेती अशा व्यक्ती-विशिष्ट माहितीसाठीही या वेबसाइट्स उपयुक्त ठरू शकतात.
अहमदाबाद सॅकचे राजकुमार सांगतात, ‘पीक अंदाज, शेतकºयांचं संभाव्य नुकसान, पीकविमा, पुराचे अंदाज, किनारपट्टींची धूप, क कोळसा खाणींतलं उत्पादन, तिथल्या कामाची नियमितता, विमानांना धुकं, स्मॉग यांची माहिती, एरोसेल क्लिनिंग, शहर विकास आराखडे यासाठीची सारी माहिती आम्ही देतो. विविध राज्य सरकार, संस्था अगर व्यक्तींनी सॅटेलाइट डाटा वापरण्यासाठीची अ‍ॅप्लिकेशन बनवून देण्याची मागणी केली तर व्यावसायिक तत्त्वावर ते बनवून देण्याचं कामही इसरो आणि संलग्न सरकारी संस्था किंवा विभागवार खाती करतात. डाटा देण्याची जबाबदारी आमची, तो समाजापर्यंत पोहचवणा-या यंत्रणा वेगळ्या आहेत; पण जी माहिती उपग्रहाकडून येते ती सगळ्यांसाठी खुली करणं हे इसरोचं तत्त्व आहे. बहुतांश माहिती आमच्या वेबसाइट्सवरही उपलब्ध असतेच. माहिती मिळणं, सहज मिळणं ही आजच्या काळाची ताकद आहे, ती वापरली पाहिजे.’
बंगळुरू आणि अहमदाबाद इसरोत फिरताना इसरोचा असा वेगळाच चेहरा भेटतो. तो चंद्रावर, मंगळावर जाण्याइतकाच रसरशीत, थरारक आणि आयुष्यबदलास पूरक आहे. महत्त्वाच्या निरोपा-निरोपीबरोबरच फुटकळ चर्चा लढवणारी, घटकाभराचं मनोरंजन करणारी आणि फॉरवडर्सची ढकलगाडी चालवणारी साधनं म्हणजे आपल्या मोबाइल स्क्रीनवर डाउनलोड केलेली अ‍ॅप्स असा आपला समज आहे, आणि अनुभवही!
- पण त्यापलीकडली कितीतरी अ‍ॅप्स आपल्या देशातल्या किचकट समस्यांना हात घालण्याची जबाबदारी घेऊन कार्यरत झाली आहेत. आकाशात झेपावणारे इसरोचे उपग्रह आपल्या रस्त्यावरचे खड्डे मोजण्यापासून जमिनीच्या पोटातली भूजल पातळी मोजण्यापर्यंत आपल्या आयुष्याशी निगडित अनेकानेक शक्यतांवर ‘नजर’ ठेवून आहेत, ही माहिती आपल्याला असलेली भरी!

नाविक
आपल्यासाठी पत्ते-रस्ते शोधण्याचं काम करणारं मोबाइलमधलं जीपीएस आताशा आपण रोज वापरतो. पण ते अमेरिकन जीपीएस. बहुसंख्य देश तेच वापरतात. फक्त रशिया आणि युरोपने आपापलं स्वतंत्र जीपीएस विकसित केलं आहे. कारगिल युद्धाच्या वेळी शत्रूच्या हालचालींचा माग काढण्यासाठी अमेरिकन जीपीएसची अपेक्षित मदत न मिळाल्याने संपूर्णत: देशी बनावटीच्या जीपीएसची सामरिक गरज प्रकर्षाने जाणवली. शिवाय भारतातल्या गर्दीच्या (आणि अस्ताव्यस्त नियोजनाच्या) शहरातली गुंतागुंत समजणारा ‘डोळा’ अमेरिकन जीपीएसकडे कुठून असणार? इसरोने ती जबाबदारी घेतली. या जीपीएसचं नाव नाविक, ते आता अंतिम टप्प्यात आलं आहे. त्यासाठीचे सॅटेलाइट भारतावर फोकस करत अंतराळात गतिशील आहेत. त्यांच्या मदतीनं आपली जुनी गर्दीची शहरं, अरुंद गल्ल्या, अस्ताव्यस्त पसाºयासह नांदणा-या आपल्या शहरात आपल्याला अधिकाधिक अचूक दिशादर्शन हे ‘नाविक’ देईल आणि लवकरच ते आपल्या मोबाइलमध्येही असेल. येत्या काळात नेव्हिगेशन ही ताकद असेल आणि त्यासाठी दुसºया देशाच्या तंत्रज्ञान - कृपेवर अवलंबून राहणं भारताला परवडणारं नाही.

केबललेस कनेक्टिव्हिटी
इसरोच्या कृपेनं लवकरच मनोरंजन अधिक इंटरनेट क्रांतीच आगामी काळात देशात अनुभवता येणार आहे. चार हजार किलो वजनाचा कम्युनिकेशन सॅटेलाइट अहमदाबाद सॅकमध्ये सध्या तयार होतो आहे. हा उपग्रह अवकाशात स्थिरावला की, आपल्या अवतीभोवतीचं केबलचं जाळंच संपून जाईल. १० जीबीचा डेटा पर सेकंद ट्रान्सफर करू शकेल अशी एक वायरलेस सर्व्हिस १५० ट्रान्सपॉण्डर्सद्वारे तयार केली जात आहे. स्मार्ट सिटीच्या नव्या नियोजनात केबलरहीत शहरं आणि हायस्पीड, स्वस्त इंटरनेट-मनोरंजनाचा इंटिग्रेटेड अनुभव आपण एका विशिष्ट डोंगलद्वारे घेऊ शकू. या जीसॅट -११ नावाच्या उपग्रहानं हायस्पीड वायफायद्वारे देशभरातली सारी शहरं आणि गावं परस्परांशी जोडली जातील.

आपत्ती व्यवस्थापन
अलीकडेच ईशान्य स्पेस अ‍ॅप्लिकेशन सेंटरने शिलॉँग इथं एक सॅटेलाइट बेस्ड व्हेदर किआॅस्क बसवलं आहे, त्यातून पावसाचा, हवामानाचा अंदाज तर मिळेलच; पण आपत्ती व्यवस्थापन ते भूजल, त्याची स्थिती याचाही अंदाज ते एका क्षणात देऊ शकेल.
गेल्या वर्षीच मणिपूर आणि आसामच्या पुरात अडकलेल्यांना मदत पाठवण्यासाठी इसरोच्या उपग्रह माहितीने मोठी मदत झाली. उत्तराखंडात जंगलांना लागलेले वणवे विझवणं हे कामही याच माहितीनं सोपं झालं. दिल्लीतले धुक्याचे दाट पदर असोत, की ओरिसातील वादळं, इसरो उपग्रहाच्या मदतीने वेळेत अंदाज वर्तवत सरकारी यंत्रणांना अलर्ट करते आहे. प्रधानमंत्री आवास योजना, नमामि गंगे हा गंगा स्वच्छता प्रकल्प, प्रधानमंत्री कृषी संचय योजना, डिजिटल इंडिया यासाºया प्रकल्पांसाठी अर्थ आॅब्जर्वेशन उपग्रहाकडून आलेली माहिती वापरण्यात येऊ लागली आहे.या वेबसाइटवर हवामान बदल, मान्सूनचे अंदाज, समुद्री तापमान यासह अनेक गोष्टींची तपशीलवार माहिती मिळू शकेल.

http://mosdac.gov.in/


सोलर कॅल्क्युलेटर अ‍ॅप
इसरोने बनवलेले सोलर कॅल्क्युलेटर आणि विण्ड कॅल्क्युलेटर अ‍ॅप आपल्याला डाउनलोड करून घेता येऊ शकतात. ‘कुठं सोलर पॅनल लावता येतील, ते किती सौरऊर्जा देतील, कुठं पवनचक्क्या लावल्या तर वीज उत्पादन वाढेल, दिवसाला किती सौरऊर्जा तयार होईल इथपासूनचे तपशील देणारं हे सोलर कॅल्क्युलेटर अ‍ॅप आहे. तेच वाºयाची माहितीही देतं. या साइटवर अधिक माहिती तर मिळेलच शिवाय हे अ‍ॅप डाउनलोड करता येऊ शकेल.

https://vedas.sac.gov.in/vedas/


फसल आणि चमन
भारतात मान्सूनवर आधारित शेतीत नगदी पिकं, खरीप आणि रब्बीची पिकं याचा उत्पादन अंदाज सरकारला दिला जातो. गहू, मोहरी, ज्युट, ऊस, कापूस, बटाटे, ज्वारी या पिकांच्या उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला जातो. त्यासाठी रिसॅट- दोन या उपग्रहाची माहिती वापरली जाते. आणि ही सारी माहिती इसरोच्या साइटवर उपग्रह छायाचित्रांसह साºयांसाठी उपलब्धही असते. आपल्या शहराचा, आपल्या राज्याचा पीक अंदाज शेतकरी आॅनलाइन बघू शकतात.
फसल हा कृषी उत्पादनाशी संबंधित तर चमन हा हॉर्टिकल्चर अर्थात फळफळावळ, फुलं यासंदर्भातला प्रकल्प, यासाठी माहितीचा स्रोत पूर्णत: उपग्रहांनी पाठवलेला डेटा आहे. याशिवाय देशभरात १३ राज्यं त्यातून जोडलेली आहेत. त्यामुळे पीक अंदाज भरकटण्याची शक्यता आता कमी झाली आहे. अर्थात ही माहिती वापरून सरकारी यंत्रणांनी वेळेत तसं नियोजन केलं, त्या त्या समाजघटकाला वेळेत ही माहिती दिली तरच! कारण ती माहिती जनतेला देण्याची यंत्रणा इसरोकडे नाही. त्यांचं काम फक्त तंत्रज्ञान निर्मिती, माहिती प्रक्रिया आणि विश्लेषणाचं. अंमलबजावणीचं नाही. फसल आणि चमन प्रोजेक्टच्या माहितीसाठी ही वेबसाइट पाहता येईल..

http://www.ncfc.gov.in/fasal
http://www.ncfc.gov.in/chaman


(देशातल्या अनेकानेक प्रश्नांच्या मुळाशी जाणारा ‘डेटा’ अंतराळ तंत्रज्ञानाच्या मदतीने खुला करणाºया इसरोच्या कामाची विस्तृत कक्षा, अंतराळ मोहिमा आणि इसरोची कार्यसंस्कृती यासंदर्भातला विस्तृत लेख ‘लोकमत दीपोत्सव २०१७’ या दिवाळी अंकात वाचता येईल.)


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.