वाढदिवासाचं गिफ्ट म्हणून गायत्रीला पाळाच्याय मधमाश्या.. त्या का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 06:30 AM2019-01-20T06:30:32+5:302019-01-20T06:35:02+5:30

गायत्रीला हवंय वाढदिवसाचं ‘गिफ्ट’! आपल्या बागेत झाडं आहेत, फुलं आहेत, मग समजा तिथे आणून ठेवली एक पेटी आणि पाळल्या मधमाशा, तर काय बिघडलं? - असा मुद्दा घेऊन ती आईबाबांशी वाद घालतेय!

story of honey bees and little Gayatri | वाढदिवासाचं गिफ्ट म्हणून गायत्रीला पाळाच्याय मधमाश्या.. त्या का?

वाढदिवासाचं गिफ्ट म्हणून गायत्रीला पाळाच्याय मधमाश्या.. त्या का?

Next

-गौरी पटवर्धन 

‘आई या वाढदिवसाला मला पाहिजे ते गिफ्ट देशील?’ 
- गायत्रीनं आईला लाडीगोडी लावत विचारलं. पुढच्या आठवड्यात गायत्रीचा अकरावा वाढदिवस होता. आणि तो चान्स साधून एरवी आईबाबा ज्याला नाही म्हणतात ते काहीतरी मिळवायचं असा तिचा प्लॅन होता. कारण एरवी एखाद्या गोष्टीला नाही म्हटले तरी ते आपल्या वाढदिवसाला कशाला नाही म्हणणार नाहीत याची तिला आशा होती. पण तिच्या अपेक्षेप्रमाणे आई काही लगेच ‘हो’ म्हटली नाही. कारण गायत्रीचं असं प्लॅनिंग असणार हे आईलापण माहिती होतं. पण वाढदिवसाच्या गिफ्टबद्दल काहीच ऐकून न घेता नाही म्हणणं आईसाठीपण रिस्की होतं. त्यामुळे तिनं जरा विचार केला आणि म्हणाली, ‘तुला काय पाहिजे त्यावर ते अवलंबून आहे ना बेटा.’

- ‘अशी काय गं आई तू? सगळी गंमत घालवून टाकतेस ! कधीतरी डायरेक्ट हो म्हणालीस तर काही बिघडेल का?’

गायत्रीला आईचा रागच आला होता. काहीही मागितलं की ही आधी हजार चौकश्या करते, मग आपल्या मित्रमैत्रिणींकडून जास्तीची माहिती काढून घ्यायचा प्रयत्न करते, मग बाबांशी बोलून ठरवू असं म्हणते आणि अध्र्याच्यावर वेळेला ‘नाही’च म्हणते, हे गायत्रीला अनुभवानं माहिती होतं.

यावेळी तिला जी गोष्ट हवी होती, ती आधी समजली तर घरात कोणीच हो म्हणणार नाही हेही गायत्रीला माहिती होतं. त्यामुळे तिनं पक्कं ठरवलं की काहीही झालं तरी चालेल; पण आईनं हो म्हणेपर्यंत आपण काय पाहिजे ते सांगायचंच नाही. हे करणं सोपं नव्हतं; पण त्याशिवाय काही इलाजही नव्हता. पण आईही काही कच्च्या गुरु ची चेली नव्हती. 
ती म्हणाली, ‘अगं तसं नाही. पण मी आधी हो म्हणायचं आणि मग ऐनवेळी ते करता आलं नाही तर तुझाच मूड जाईल. म्हणून म्हटलं, तुला काय हवंय ते आधी सांग. शक्य असेल तर आपण नक्की आणू.’

आईच्या या गोड बोलण्याला फसायचं नाही हे गायत्नीचं आधीच ठरलेलं होतं. त्यामुळे तीही काही सांगेना आणि ती सांगत नाही तोवर आई हो म्हणेना. असं बराच वेळ चालल्यावर आणि गायत्नी ऑलमोस्ट रडायला लागल्यावर आईनं थोडीशी माघार घेतली आणि स्वत:च्या मनातली भीती बोलून दाखवली.

‘हे बघ गायत्री, तू जर कुत्र्याचं पिल्लू आणायचं म्हणत असलीस तर त्याला काही आम्ही दोघं हो म्हणणार नाही. कुत्र्याचं खूप करायला लागतं, तू अजून लहान आहेस.’
‘माहितीये !’ गायत्री जोरात ओरडली, ‘यापुढचं सगळं लेक्चर मला पाठ आहे. ते परत परत सांगू नकोस. मी काही कुत्र्याचं पिल्लू मागत नाहीये !’

गायत्रीनं या आधीच्या प्रत्येक वाढदिवसाला कुत्र्याचं पिल्लू मागितलं होतं. त्यामुळे आईच्या मनात तीच शंका येणं स्वाभाविक होतं. पण गायत्री कुत्र्याचं पिल्लू मागत नाहीये म्हटल्यावर आई एकदम रिलॅक्स झाली आणि बेसावधपणे म्हणाली, ‘मग ठीक आहे. दुसरं काही तुला पाहिजे असेल तर आणूया आपण.’

‘नक्की ना? प्रॉमिस?’ असं विचारण्यातल्या गायत्रीच्या टोनवरून आईच्या मनात शंकेची पाल चुकचुकली होती. पण आता ती जे काही मागेल ते कुत्र्याच्या पिल्लापेक्षा सोपंच असेल असं गृहीत धरून आई म्हणाली, ‘हो नक्की. आता तरी सांगशील का तुला काय हवंय ते?’ एव्हाना बाबापण ही चर्चा ऐकायला येऊन बसला होता. तोही म्हणाला, ‘‘सांगायला तर लागेलच ना गायत्नी. तू सांगितलं नाहीस तर आम्हाला कसं कळेल?’
‘बघा हां. ऐकल्यावर नाही म्हणाल तुम्ही.’ आईबाबानं एकमेकांकडे बघितलं. ही मागून मागून काय मागेल? फोन किंवा लॅपटॉप. काही अटी घालून दिवसाकाठी एखादा तास या वस्तू तिला द्यायची त्यांची मनाची तयारी होती. बाबा म्हणाला, ‘आता आम्ही नाही म्हणणार नाही. सांग तू बिनधास्त !’

‘मला ना. मधमाश्या पाळायच्या आहेत !’, गायत्रीनं एका श्वासात सांगून टाकलं. 
‘काय???’ आई-बाबा एका आवाजात ओरडले. मग दोघंही एकदम हे कसं अशक्य आहे, असं काहीतरीच गिफ्ट कोणी मागतं का, असं काय काय म्हणायला लागले. 
पाच मिनिटं सगळा आरडाओरडा करून झाल्यावर शेवटी आई म्हणाली, ‘बरं ते जाऊदे. मला सांग की तुला मधमाश्या का पाळायच्या आहेत?’

‘कारण मधमाश्या आपल्या पर्यावरणाचा खूप महत्त्वाचा भाग आहेत. सगळीकडे बिल्डिंग्ज झाल्यामुळे त्यांना राहायला जागा उरलेली नाहीये. आपल्या बागेत भरपूर फुलं आहेत तर त्या इथे छान राहू शकतात.’

‘हे कोणी शिकवलं तुला?’, बाबानं हतबुद्ध होऊन विचारलं.
‘आम्हाला शाळेत शिकवतात पर्यावरणाच्या तासाला.’
‘काय? घरी मधमाश्या पाळा म्हणून??? उद्या शाळेत येते मी तुझ्या टीचरना भेटायला. त्यांच्या घरी पाळू देत त्यांना मधमाश्या!’ आई चांगलीच चिडली होती.
‘अगं तसं नाही शिकवत गं. पण मधमाश्यांची संख्या कमी होतीये. आणि मधमाश्या नष्ट झाल्या तर माणसंपण नष्ट होतील.’
‘अगं पण म्हणून आपण का पाळायच्या मधमाश्या?’
‘आपण का नाही पाळायच्या आई? आपल्याकडे जागा आहे, फुलझाडं आहेत, शिवाय त्यांचं काही करायला लागत नाही, त्याची पेटी मिळते ती आणून ठेवून द्यायची.’
‘अगं पण त्या चावतील ना.’
‘आई मधमाश्या अशा उगीच चावत नाहीत. आणि उद्या खरंच माणसं नष्ट झाली तर त्यात आपण पण मरू. त्यापेक्षा आत्ता मधमाश्या पाळायला काय हरकत आहे?’
गायत्नीनं तिच्या बाजूनं बिनतोड युक्तिवाद केला होता. आपलं पर्यावरण, आपली पृथ्वी आपणच वाचवली पाहिजे हे तिच्या आईबाबांना मान्य होतं. पण त्यासाठी आपण अशी सुरुवात का करायची हे त्यांना समजत नव्हतं. आणि पृथ्वी आपली आहे तर सुरु वात आपणच केली पाहिजे हे गायत्नीला स्पष्ट दिसत होतं. त्यांच्या विचारांमधली दरी भरून निघणं कठीण आहे. कारण कितीही झालं तरी अश्या बाबतीत मोठी माणसं लहान मुलांची बरोबरी करून शकत नाहीत, हेही तिला कळत होतं.

(गौरी ‘लिट्ल प्लॅनेट फाउण्डेशन’ची समन्वयक आहे.)

lpf.internal@gmail.com

-----------------------------------------------------------------------------------


ही आहे थोड्या ‘सटक’ वयातल्या
मुला-मुलींसाठी एक मोकळीढाकळी 
‘स्पेस’

- या जागेत आम्ही तर लिहूच; पण मुलांनीही लिहावं असा प्लॅन आहे. मुलांनी काय लिहायचं? - याचं उत्तरही मुलांना आणि त्यांच्या आईबाबांना या ‘स्पेस’मध्येच मिळेल.
थोडी धडपडी, डोकं जरा ‘तिरकं’ चालणारी, सतत काहीतरी कीडे करायला उत्सुक असलेली मुलंमुली.. कुचकट न बोलता अशा मुलांना ‘सपोर्ट’ करणारे प्रयोगशील शिक्षक आणि अशा वेड्या मुलांच्या पाठीत धपाटे न घालता त्यांच्या गळ्यात मैत्रीचा हात टाकणार्‍या आई-बाबांची मिळून एक ‘कम्युनिटी’ बनवता येईल का, असा एक बेत आम्ही शिजत घातलाय. त्याविषयी सांगूच !
तर भेटूया, येत्या रविवारी !
अधल्या-मधल्या मुलामुलींसाठी काय काय शिजतंय हे पाहायचं असेल, तर एका गरमागरम, ताज्या ताज्या भांड्यात जरा पटकन डोकावून पाहायला सुरुवात करा  

www.littleplanetfoundation.org

 

Web Title: story of honey bees and little Gayatri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.