लग्नात मान्यवरांचे सत्कार थांबवा..!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2019 07:00 AM2019-06-09T07:00:00+5:302019-06-09T07:00:05+5:30

लग्न समारंभात नाव पुकारले नाही, म्हणून नाव पुकारणाऱ्यास मारहाण झाल्याच्या दोन घटना नुकत्याच घडल्या, आता मात्र हे अतिच झालं!

Stop honoring the celebrities in the wedding! | लग्नात मान्यवरांचे सत्कार थांबवा..!

लग्नात मान्यवरांचे सत्कार थांबवा..!

Next

लग्न समारंभात नाव पुकारले नाही, म्हणून नाव पुकारणाऱ्यास मारहाण झाल्याच्या दोन घटना नुकत्याच घडल्या, आता मात्र हे अतिच झालं! हल्ली लग्नसमारंभात लग्नात आलेल्या पाहुण्यांचे माईकवरून नाव घेऊन स्वागत करण्याची अतिशय चुकीची पद्धत सुरू झाली आहे. पूर्वी हे ग्रामीण भागात होत असे,पण ते लोण आता शहरातही आले आहे.हा प्रकार थांबवलाच पाहिजे...
- अंकुश काकडे- 

खरं म्हटलं तर विवाहासारख्या समारंभांना आपण ज्यांना निमंत्रण देतो ते सर्वच जण प्रतिष्ठित असतात. असे असताना काही ठराविक लोकांचीच नावे घेऊन स्वागत केले जाते हे कितपत योग्य आहे? पण याचा कुणी विचारच करीत नाही. शिवाय ज्यांची नावे पुकारली जातात त्यातील किती जण प्रतिष्ठित असतात हादेखील प्रश्न उपस्थित होतो. ‘लग्नात आमची नावे पुकारू नका, आमचे हारतुरे, शाल-फेटे, श्रीफळ देऊन स्वागत करू नका, फक्त वेळेत लग्न लावा,’ असे आवाहन करणारे पत्रक (कै.) मोहन धारिया, विठ्ठल तुपे, बाबासाहेब पुरंदरे, खा. गिरीश बापट, विनायक निम्हण, शशिकांत सुतार, उल्हास पवार, तत्कालीन महापौर कमल व्यवहारे, डॉ. एस.बी. मुजुमदार, डॉ. विश्वनाथ कराड यांच्याशिवाय अनेक आमदार, नगरसेवकांनी आवाहन केले होते. यासाठी मीच पुढाकार घेतला होता. पुढे आठवडाभर त्याचा थोडा परिणाम दिसला, पण परत हार-तुरे देणे-स्वीकारणे सुरू झाले, पण त्याला शशिकांत सुतार, उल्हास पवार आणि मी, मात्र आजपर्यंत ठाम राहिलो आहोत. कितीही वेळा नाव पुकारले तरी आम्ही स्टेजवर जात नाही. वेळेत लग्न लागलं तर नशीब, लग्न हे मुहूर्तावर लावलं जावं, याला काही शास्त्रीय-धार्मिक आधार आहे. पण त्याकडे सर्रासपणे डोळेझाक केली जाते. शिवाय या प्रतिष्ठित पाहुण्यांना आपण वधू-वरांना आशीर्वाद देण्यासाठी बोलावतो हे विसरून त्यांच्या हस्ते जावईमान देण्याचा कार्यक्रम, काही लग्नात असे डझनभर जावई असतात, एक तर ते वेळेवर येत नाहीत, काही जावई तर वराच्या मिरवणुकीत नाचत असतात, तोपर्यंत तो प्रतिष्ठित पाहुणा स्टेजवरच. ज्यांनी हा विवाह जमवला त्याचा सत्कार, जणू काही त्याने उपकारच केलेत.
नवरदेव वेळेत येत नाही, आला तर वधूचा पत्ता नाही, एकतर ती पार्लरमध्ये गेलेली असते, तेथे तिला उशीर होतो, परत उशीर झाल्याचं उत्तर ठरलेलं, ट्रॅफीकमध्ये अडकलो होतो. या लग्नसराईत माझ्याच जवळच्या नातेवाइकाच लग्न होतं, मुहूर्त होता ५ वाजताचा. नवरदेव आला ५.४५ वाजता, पण नवरीला येण्यास २० मिनिटे उशीर झाला आणि विशेष म्हणजे ती २० मिनिटे नवरदेव तसाच घोड्यावर बसून राहिला होता, तेही उन्हात. पाहुण्यांचं नाव पुकारताना कोणती तरी संस्था, तिचा अध्यक्ष, आजी-माजी पदाधिकारी, आमदार-खासदार, अधिकारी यांची वारंवार भसाड्या आवाजात नावे घेतली जातात, काही वेळा तर त्यांचे सत्कार होत असताना बिचारे वधू-वर १०-१५ मिनिटे केवळ एकमेकांकडे पाहत असतात, काय करणार बिचारे ! काही दिवसांपूर्वी उरळी येथील लग्नसमारंभात माझं नाव कां पुकारलं नाही, म्हणून त्या नाव पुकारणाऱ्याला बाहेर बोलावून बेदम मारहाण केल्याची घटना घडली. अगदी पोलिसांपर्यंत तक्रार करण्यात आली. दुसरी घटना खा. डॉ. अमोल कोल्हे यांचे नाव पुकारून स्वागत का केले नाही म्हणून तेथील नाव पुकारणाऱ्यास मारहण करण्यात आली. बिच्चारे अमोल कोल्हे आता विचार करत असतील मी यासाठी का खासदार झालोय! आता मात्र हे अति झालं असंच म्हणावे लागेल. लग्नाची हौस सर्वांनाच असते, ते थाटामाटात व्हावे हेही आपण समजू शकतो, पण या थाटामाटात जर हे असे प्रकार घडणार असतील तर त्याला आपण काय म्हणणार! आता तरी हे थांबवा असे म्हणण्याची वेळ आलीय. 
(लेखक प्रसिद्ध राजकीय-सामाजिक कार्यकर्ते आहेत.) 

Web Title: Stop honoring the celebrities in the wedding!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.