starling birds creates amazing 'clouds' in the sky.. | आभाळाला पंख हजार..
आभाळाला पंख हजार..

ठळक मुद्देडोळ्यांचं पारणं फेडणाऱ्या अवकाशातल्या महानाट्याचा विलोभनीय आविष्कार

- डॉ. श्रीश क्षीरसागर
सध्याचा माघ आणि येणारा फाल्गुन म्हणजे आपल्या मराठी वर्षाचे शेवटचे दोन महिने मिळून होणारा शिशिर ऋतू. हव्याहव्याशा वाटणाऱ्या, तर कधी गारठवून टाकणाºया थंडीचा हा काळ.
‘‘धूमधूम्रा रजोमन्दास्तुषाराविलमण्डला:।।
दिगादिव्या: मरुच्छैत्यादुत्तरो रोमहर्षण:।।’’
हवेत तरंगणाºया सूक्ष्म बाष्पकणांमुळे आसमंत धुरकट झालेला. पहाटे पडणाºया, अधूनमधून दाटणाºया धुक्यामुळे सूर्यही उशिरापर्यंत झोकाळून गेलेला. त्यात भर म्हणून उत्तरेकडून येणारे शीतल वारे अंगावर रोमांच उभे करताहेत. हिवाळ्याचं किती चपखल वर्णन करून ठेवलंय आपल्या ऋषिमुनींनी ! उन्हाची काहिली, गात्रांचा थकवा, घामाची चिकचिक, घशाची कोरड यांपासून कोसो दूर असणारा हा उत्साहवर्धक, प्रफुल्लित, तरतरीत, प्रसन्न चित्रवृत्तींचा काळ. साहजिकच ह्या दिवसांत ‘केल्याने देशाटन’ ह्या उक्तीला अनुसरून भटकंती, प्रवास, सहलींचे प्लॅन्स आखले जातात. वेगळ्या वाटा, अनवट ठिकाणं, बदलता निसर्ग साद घालत असतो, अन् त्याला प्रतिसाद म्हणून आपली पावलं नवनव्या ठिकाणांकडे वळत असतात. ह्या भटकंतीत जशी सहजी नव्या माणसांची गाठ पडते, तसेच निसर्गातले अनोखे सवंगडीही सामोरे येतात. नवे वृक्ष, नवी फुलं, नवी फुलपाखरं, नवे पक्षी आपल्याला एकटं सोडत नाहीत. याचं बारकाईने निरीक्षण केलं तर हिवाळ्यात वाढलेली पक्ष्यांची संख्या आणि वैविध्य ध्यानी आल्याशिवाय राहात नाही. याला कारणीभूत असतात दूरदेशीचे स्थलांतर करून आलेले पक्षी !
एक महत्त्वाची बाब आपल्या अजिबात ध्यानात येत नाही ती म्हणजे आपली भटकंती आपल्या आनंदासाठी, मौजेसाठी असते; मात्र ह्या पाखरांचं देशाटन अपरिहार्यतेतून होत असतं. दरवर्षी हिवाळ्यामध्ये उत्तर गोलार्धात युरोप-रशिया, उत्तर आशियामध्ये कडाक्याची थंडी पडू लागली की हळूहळू तळे-तलाव, नदी-झरे गोठू लागतात. सूर्यदर्शन दुर्लभ होऊ लागतं. रोजच हिमवृष्टी होऊन सारा आसमंत बर्फाच्छादित होऊन जातो. साहजिकच अशा वातावरणात पक्ष्यांना त्याचं खाद्य मिळवणं अशक्य होऊन बसतं. शेवटी निरूपायाने हे पक्षी थंडीपासून बचाव करण्यासाठी अन खाद्याच्या शोधार्थ, तुलनेने उबदार अशा दक्षिणेकडच्या प्रदेशांकडे प्रस्थान करतात. मजल-दरमजल करत हजारो किलोमीटर दूरवरच्या भारतीय उपखंडात त्यांना सुयोग्य निवारा सापडतो.
इथे नुकत्याच संपलेल्या पावसाळ्यामुळे बहुतेक तळे-तलाव, नद्या भरलेल्या असतात. पाणथळी, धरणांची बॅकवॉटर्स, दलदलींमध्ये विविध जलचरांची मांदियाळी असते. सुकत चाललेल्या माळरानांवरच्या गवतांना मोप बी धरलेलं असतं. गवतामातीत, ओसाडीत विविध किडेमकोडे, नाकतोडे, कोळ्यांची पैदास होत असते. शेतात पिकं तयार होत असतात, वाºयावर डोलणाºया ताटांमध्ये दूधभरले दाणे मोहवत असतात. झाडाझुडपांच्या पानांवर कितीक जातींच्या कीटक-फुलपाखरांच्या अळ्या वाढू लागलेल्या असतात. लगोलग अर्धा हिवाळा उलटताना पळस-काटेसावर-पांगाºयासारख्या देशी वृक्षांच्या लालकेशरी फुलांतले मधुरसाचे प्यालेही ओसंडून वाहू लागणार असतात. थंड रात्री, तर उबदार दिवसांचा हा भारतीय उपखंडाचा, सुजलाम् सुफलाम्, खाद्याची रेलचेल असलेला विस्तीर्ण मैदानी प्रदेश या पाखरांसाठी स्वप्नवत डेस्टिनेशन असतो.
याबरोबरच अजून एक महत्त्वाची बाब या पक्ष्यांना इथे आकर्षित करते, ती म्हणजे इथली सुरक्षितता ! उत्तरेकडचे काही भागवगळता भारताच्या बहुसंख्य प्रदेशांत या पक्ष्यांच्या शिकारीचं प्रमाण बºयापैकी कमी आहे. राजस्थान-गुजरातेत तर तिथल्या समाजाने बहुसंख्य पक्ष्यांना विलोभनीयरीत्या आपल्या रोजच्या जगण्यात सामावून घेतलं आहे.
पाकिस्तान-अफगाणिस्तान आणि मध्यपूर्वेकडील काही देशांतील अपरिमित शिकारीच्या हिंस्र म्हणाव्या अशा संस्कृती(?)च्या तुलनेत भारतातील सोशिक, उदार, सुरक्षित व समावेशक वातावरणाकडे पक्षी मोठ्या प्रमाणात आकर्षित होतात. लाखोंच्या संख्येने येणाºया या पक्षिगणांमधले, एका प्रकारचे खूप मोठ्या संख्येत धडकणारे पक्षी सध्या ‘सेलिब्रिटी’ बनले आहेत. सूर्यास्तसमयी आकाशात उडत, अखंड चिवचिवाट करत कसरती करणाºया या हजारो पक्ष्यांच्या थव्यांच्या थक्क करणाºया क्लिप्स सोशल मीडियात प्रसिद्ध झाल्या आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने एकत्र येणारे, मावळतीच्या आभाळाला हजारो पंख फुटल्याची अनुभूती करून देणारे कोणते बरे हे पक्षी?
पोट व पाठ गुलाबी रंगाची, काळे पंख, काळं डोकं, त्यावर छोटीशी मानेवर रुळणारी काळी शेंडी, गळा-पंख-शेपटीही काळीच अन पिवळी चोच अशा छानशा रंगसंगतीच्या, मैनेच्या कुळातील या पक्ष्याला ‘गुलाबी मैना’ आणि ‘भोरडी’ अशी नावे आहेत. हिवाळ्यात यांचा गुलाबी रंग तितकासा तजेलदार दिसत नाही, काहीसा बदामी झाक असलेला वाटतो, म्हणून ‘बदामी मैना’ हेही एक नाव आणि अर्धा हिवाळा उलटल्यावर जानेवारी-फेब्रुवारीत रानावनात पळस-काटेसावर-पांगारे फुलू लागले की त्यांच्या मोठ्या शोभिवंत केशरीलाल फुलांतला मधुरस प्राशन करण्यासाठी या मैनांची हमखास पळस-सावरींवर हजेरी ! म्हणून यांना ‘पळसमैना’ हेही अजून एक नाव ! या गुलाबी रंगावरूनच ‘रोझी स्टार्लिंग’ आणि ‘रोझी पास्टर’ ही इंग्रजी नावे.
या पळसमैनांचे आपल्या प्राचीन संस्कृत वाङ्मयातही उल्लेख आहेत. आपल्याकडे दिसणाºया आठ-दहा जातींच्या साळुंक्या-मैनांना संस्कृतमध्ये ‘सारिका’ असं नाव आहे, अन् पळसमैनेला खास ‘मधुसारिका’ ! पळस-सावरीच्या फुलांतल्या मधुरसावरच्या विशेष प्रेमामुळे ‘मधुसारिका’ हे नाव यांना मिळालं यात शंका नाही. ‘किंचित जातका’मध्ये यांचा उल्लेख ‘सुवण्ण सालिक’ म्हणजे ‘सुवर्णसारिका’ असा केलेला दिसतो. इथे ‘सुवर्ण’ हे विशेषण यांच्या सौंदर्यामुळे दिलं गेलंय.
हंसदेवाच्या ‘मृगपक्षिशास्र’ या भारतीय पशुपक्ष्यांचं वर्णन करणाºया प्राचीन ग्रंथातही या मैनांचा उल्लेख आढळतो. मैनांना त्यात ‘शारिका’ या नावाने संबोधलेले दिसते. त्यातले वर्णन असे-
‘‘नानाप्लुतिविदश्र्चैते गगने दूर गामिन:।
मनोज्ञगुणसंमान्या: कोपमोहादिवर्जिता:।।
स्वल्पालस्य समेताश्र्च मध्यान्हे क्लांतपत्रका:।।’’
‘‘हरतºहेच्या उड्या मारणारे-हालचाली करणारे, अवकाशात दूरवर जाणारे, गुणी, (माणसांचे) मन मोहून घेणारे, कोप-मोह नसलेले असे हे पक्षी. थोडेसे आळशी, मध्यान्हसमयी म्हणजे दुपारी यांचे पंख मलूल होऊन हे विश्रांती घेतात.’’
अगदी तंतोतंत नाही, तरी बºयापैकी प्रत्यक्षाशी जुळणारं आहे हे वर्णन ! वरच्या ओळींमधले ‘गगने दूरगामिन:’ आणि ‘मध्यान्हे क्लांतपत्रक:’ हे उल्लेख पळसमैनांचं अगदी चपखल वर्णन करणारे. सकाळभर पिकू लागलेल्या शेतांमधल्या पिकांचे दाणे, मातीतले, झाडापानांवरचे कोळी-कीटक मटकावून, सध्या (पांगाºयाच्या) फुलांवर आलेल्या पळस-काटेसावर-पांगाºयाच्या फुलांमधल्या मधुरसाचा आस्वाद घेऊन या पळसमैना दुपारच्या उन्हाच्या वेळी आंब्यासारख्या झाडांच्या पानावळीत विश्रांती घेणं पसंत करतात. ‘मध्यान्हे क्लांतपत्रक:’ यातून दुपारी पंख शिणण्याचा स्पष्ट अर्थबोध होतो आणि ‘गगने दूर गामिन:’ ही तर गुलाबी मैनांची खासियतच ! एक तर युरोप-उत्तर आशियापासून हजारो किलोमीटर्सचा पल्ला आकाशमार्गे गाठून त्या दाखल होतात. दुपारच्या विश्रांतीनंतर सायंकाळी सूर्यास्ताच्या मागे-पुढे, रातथाºयाला जाण्यापूर्वी यांच्या आकाशातल्या महानाट्याची सुरुवात होते..
सूर्य मावळतीला झुकलेला असतो, कधी क्षितिजापल्याडही गेलेला असतो. आभाळ शिशिरातल्या संध्यासमयीच्या केशरी-किरमिजी रंगांनी रंगलेले असते. अशात कुठल्या कुठल्या लांबवरच्या शेतांत-रानांत चरायला, दाणे टिपायला गेलेल्या शे-दीडशे पळसमैनांचा एक एक थवा वेगवेगळ्या दिशांतून आभाळात दाखल होऊ लागतो. पाहता पाहता वीस-पंचवीस मिनिटांत त्यांची संख्या शेकड्यातून हजारांवर पोहोचते. अक्षरश: हजारो मैना एकाच वेळी आकाशात मोठ्या ढगासारखा अवाढव्य थवा तयार करून भीरभिरु लागतात. अजूनही त्यांची संख्या फुगतच असते. अशात एखादा फाल्कन-ससाणा, शिक्रा किंवा हॅरियर-भोवत्या यासारखा शिकारी पक्षी त्यांच्या मागे लागतो, आणि आकाशाच्या विस्तीर्ण रंगमंचावरचं ते अद्भुत महानाट्य सुरूहोतं...

सोनकेशरी आकाशात पळसमैनांचे नृत्य
1- हळूहळू मंद होत जाणाºया प्रकाशात विस्तीर्ण आभाळाच्या अथांग पटावर अक्षरश: हजारो पळसमैना मोठ्याने चिवचिवत एकमेकींना खेटून एकाच दिशेने वेगात उडतात.
2- सोनकेशरी अवकाशाच्या पार्श्वभूमीवर ह्या पक्ष्यांचा भलामोठा थवा एखाद्या घनगर्द काळ्यासावळ्या मेघासारखा प्रतित होतो.
3- काही अंतर एका दिशेत उडत गेल्यावर अचानक एखादी कळ दाबून आदेश दिल्यासारखा तो संपूर्ण थवा निमिषार्धात उडण्याची दिशा बदलून एकदम वेगळ्याच दिशेला वळतो.
4- सगळेच्या सगळे पक्षी एकाच वेळी दिशा बदलतात आणि तो काळासावळा ढग अचानक वेगळ्याच दिशेला वेगाने सरकू लागतो.
5- अत्यंत शिस्तबद्धरीत्या, सफाईदारपणे
हा भलामोठा थवा आकाशात कसरती करतो. मध्येच एकाचे दोन थवे होतात, दोन वेगवेगळ्या दिशांना वेगात जाऊन पुन्हा क्षणार्धात ते एक होतात.
6- अशी ही डोळ्यांचं पारणं फेडणारी सायंकालीन कवायत अर्धा तासपर्यंतही सहजी चालते.
7- शेवटी अंधार पडू लागला की दोन-चार शेवटच्या वरून खाली, खालून वर सुरकांड्या मारत हा थवा अखेरीस मोकळ्या मैदानी प्रदेशातल्या उसाच्या शेतांत किंवा मोठाल्या झाडांच्या फाद्यांच्या पसाऱ्यात रातथाऱ्यासाठी शिरून गुडूप होतो.
8-  इतका वेळ अनिमिष नेत्रांनी पिऊन घेत असलेला हा आगळा खेळ संपल्याची जाणीव होऊन निरुपायाने आपण भानावर येतो..
(पूर्वार्ध)
(लेखक निसर्गप्रेमी आणि पक्षीअभ्यासक आहेत.)

kshirsagarshreesh@gmail.com


Web Title: starling birds creates amazing 'clouds' in the sky..
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.