Spirituality; Today's Education Results | अध्यात्म; आजच्या शिक्षणाचे परिणाम
अध्यात्म; आजच्या शिक्षणाचे परिणाम

ठळक मुद्दे‘‘तूू राणी मी राणी मग पाणी कोण आणी’’

संकलन-बाबा मोहोड
खरे म्हणजे आजच्या शिक्षणावर आणि शिक्षण पद्धतीवरच माझा विश्वास नाही. आपल्या शिक्षणातून मुले कामचुकार निपजतात अशी स्थिती आहे. पण ही व्याख्या शक्य तितक्या लवकर बदलली पाहिजे. ज्या शिक्षणाचा कामाशी, जीवनाशी संबंध राहत नाही ते शिक्षण एका रात्रीत बदलले तरी आपल्याला आनंद झाला पाहिजे, नव्हे तसे क्रांतिकारी विचार आपण करायला लागले पाहिजे.
आजची स्थिती मोठी विचित्र आहे.
‘‘तूू राणी मी राणी
मग पाणी कोण आणी’’
अशी सगळीकडे अवस्था झाली आहे. आज शिकलेला प्रत्येक माणूस कारकून होतो, चपराशी होतो, साहेब होतो, पण चांगला शेतकरी होत नाही, चांगला कामगार होत नाही. त्याला आपले कपडे धुता येत नाहीत. बाईने शिक्षण घेतले की स्वयंपाकाची तिला लाज वाटू लागते. वास्तविक या परावलंबनात्मक वस्तुस्थितीची प्रत्येक शिक्षित माणसाला लाज वाटली पाहिजे. त्याला अत्यंत अभिमानाने सांगता आले पाहिजे की अमुक अमुक गोष्टी माझ्या श्रमातून निर्माण झाल्या. जीवनाच्या, देशाच्या उणिवा भरून काढण्याची शक्ती आणि युक्ती अंगात येणे याला मी शिक्षण समजतो.
एखाद्या सुंदर बगिच्यात नाना रंगाची, नाना आकाराची फुले असतात. त्या फुलांमुळे त्या बागेला शोभा येते. तसेच या देशाचेही आहे. या देशात नाना धर्मपंथाचे पन्नास कोटी लोक राहतात. त्या सर्वांना परस्परांशी प्रेमाने वागता, राहता आले पाहिजे. शिक्षणामुळे ही गोष्ट सहज साध्य झाली पाहिजे. शिक्षणामुळे जर जातीजातीत, धर्माधर्मात सुरू असलेल्या भांडणांची गंमत पाहण्याची अक्कल येत असेल तर त्याला मी तरी शिक्षण मानायला तयार नाही.
धर्म म्हणजे इमानदारी :-
शिक्षणामुळे जीवनाची मूल्ये बदलली पाहिजेत. म्हणजे ती अधिक चांगली, अधिक उजळ झाली पाहिजेत. आता आपण स्वतंत्र आहोत. स्वतंत्र देशाचे नागरिक आहोत. आता आपल्याला नुसते कारकून तयार करणारे शिक्षण स्वीकारून चालणार नाही. माझी धर्माची व्याख्या इमानदारी ही आहे. हिंदू की मुसलमान हा नंतरचा प्रश्न आहे. इमानदारीने शेतात काम करणारा माणूस सहजपणे देवाला प्राप्त करून घेऊ शकेल, परंतु वर्षोगणती देवापुढे बसला, त्याने रोज नाकापासून शेंडीपर्यंत गंध लावले, देवापुढे लोटांगणे घातली तरी त्याला देव मिळू शकणार नाही.
ही गोष्ट आपल्या संत-परंपरेने अधिक स्पष्ट केली आहे. गोरोबा कुंभार, सावता माळी, नामदेव शिंपी, रोहिदास चांभार, भक्त पुंडलिक हे सारे आधी इमानदार माणसे होती. त्यानंतर मग ते संत, भक्त वगैरे होते. त्यांनी जीवनभर आपापले व्यवसाय इमानदारीने केले आणि जनता जनार्दनाची सेवा करून देव जोडला. असे नसते तर तेही एखाद्या मंदिरात टाळ कुटत बसले असते !
शाळांचे कर्तव्य
ईश्वरप्राप्तीचा हा असा इतिहास आहे. काम सोडून सोंग घेण्याने देव प्राप्त होत नाही. एखाद्या शाळेत याउलट शिकविले जात असेल तर ती शाळा नाही. शिक्षकाने विद्यार्थ्याला घडविण्याचा विचार ईश्वरभक्ती समजून केला पाहिजे. असे झाले तर आपल्या एका एका शाळेतून कितीतरी गांधी, कितीतरी टिळक आणि कितीतरी जवाहरलाल निर्माण होतील आणि स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी एक जबाबदार पिढी निर्माण केल्याचे श्रेय आपणा सर्वांस मिळेल.


Web Title: Spirituality; Today's Education Results
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.