अध्यात्मिक; देशाच्या प्रतिष्ठेसाठी सुसज्ज रहायला हवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2018 08:00 AM2018-12-02T08:00:00+5:302018-12-02T08:00:06+5:30

दोन प्रवृत्तीत युद्ध होऊ नये म्हणून श्रीकृष्णाने शिष्टाईची सर्वतोपरी शिकस्त केली. परंतु यश आले नाही. शेवटी युद्ध हाच एक पर्याय ठरला. याचा अर्थ हाच की, सख्खा भाऊ जरी अन्याय करीत असेल तरी त्याचा प्रतिकार आपण केलाच पाहिजे.

Spiritual; You must be well equipped for the country's prestige | अध्यात्मिक; देशाच्या प्रतिष्ठेसाठी सुसज्ज रहायला हवे

अध्यात्मिक; देशाच्या प्रतिष्ठेसाठी सुसज्ज रहायला हवे

Next

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
संकलन: बाबा मोहोड
मित्रहो! वास्तविक तुम्ही गुरुजनांच्या अत्यंत जवळ आहात. परंतु असे असूनही बरेच वर्षानंतर आपल्या भेटीचा योग आला. आपल्या भेटीने मला आनंद झाला. सध्याचे दिवसच असे आहेत की यावेळी भारतीय माणसाचे मन स्थिर नाही. तो उत्सवात असला तरीही त्याच्या मनात फार मोठी चिंता व्यापून राहिली आहे. सध्या आपल्यावर पाकिस्तानने केलेल्या आक्रमणाला तोंड कसे द्यावे, याच विचाराने प्रत्येक भारतीय माणूस काळजीत पडला आहे.
आपला देश एक स्वतंत्र देश आहे. कोणत्याही स्वतंत्र देशाला एक वेगळी प्रतिष्ठा असते. आपल्याही देशाला ती आहे. तिचे रक्षण करणे आपले कर्तव्य आहे. प्रसंगी पडेल ती किंमत देऊनही देशाची प्रतिष्ठा टिकविण्यासाठी आपण सुसज्ज राहिले पाहिजे.
आपली परंपरा : आपला देश एक जगावेगळा देश आहे. जगात पुष्कळ देश आहेत. पण ते सारे एकेका धर्माचे आहेत. पण ज्यांत अनेक धर्म, वंश आणि पक्ष आहेत असा भारत हा एकच देश आहे. एखाद्या प्रसन्न बगिचासारखे त्याचे स्वरूप आहे. नीती, न्याय हा आमचा आधार आहे. आम्ही कोणाचाही अन्याय सहन करणार नाही आणि कोणावर आक्रमणही करणार नाही. जर कोणी आमच्याशी प्रेमाने राहत असेल तर तो आमचा मित्र आहे. आम्ही कोणाचाही द्वेष करीत नाही. कोणत्याही धर्माच्या, पक्षाच्या माणसाशी आमचे नाते जुळते. त्याच्यासाठी आम्ही आमचे सर्व काही अर्पण करू शकतो.
मित्रहो, ज्या-ज्या वेळी भारत युद्धासाठी उभा राहिला त्या-त्या वेळी भारतामागे धर्माची, पक्षाची व जातीची भावना नव्हती. शिवाजी महाराज हा येथला एक वीरपुरुष. त्याने देशभर युद्ध केले. परंतु ते कोणाही धर्माविरुद्ध, जातीविरुद्ध नव्हते. अन्यायाविरुद्ध ते युद्ध होते. शिवाजीच्या सैन्यात अनेक मुसलमान होते. शिवाजीने अनेक देशद्रोही हिंदूंना नेस्तनाबूद केले होते. आता आता महात्मा गांधींनीही असेच केले. त्यांनी भारतीय स्वातंत्र्यासाठी जन्मभर इंग्रजांशी लढा दिला परंतु अनेक इंग्रज त्यांचे मित्र राहिले. माझी लढाई इंग्रजांशी नसून इंग्रजी सत्तेशी आहे असे ते म्हणत. याचा अर्थ एवढाच की, भारत कोणालाही गुलाम करू इच्छित नाही आणि तो कोणाचाही गुलाम राहू इच्छित नाही.
भारतीय विचार :- भगवान श्रीकृष्णांनी महाभारत निर्माण केले. ते एका कुटुंबातच निर्माण झाले आहे. त्या सर्वांची जात, धर्म आणि वंश एकच आहे. पण त्यांच्यातही घनघोर युद्ध झाले. कारण एकच, एका बाजूला न्याय आणि एका बाजूला अन्याय अशी तिथे स्थिती होती. एकीकडे पांडव पाच गावावर समाधान मानण्यास तयार होते. तर दुसरीकडे कौरव सुईच्या टोकावर राहील एवढी जमीनही देण्यास तयार नव्हते. अशा दोन प्रवृत्तीत युद्ध होऊ नये म्हणून श्रीकृष्णाने शिष्टाईची सर्वतोपरी शिकस्त केली. परंतु यश आले नाही. शेवटी युद्ध हाच एक पर्याय ठरला. याचा अर्थ हाच की, सख्खा भाऊ जरी अन्याय करीत असेल तरी त्याचा प्रतिकार आपण केलाच पाहिजे.

Web Title: Spiritual; You must be well equipped for the country's prestige

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.