विधानसभा निवडणूकीत शिवसेनेची उमेदवारी...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 12:07 AM2018-11-13T00:07:20+5:302018-11-13T00:07:47+5:30

पैलवानकी हीच आपली ओळख असावी, असा माझा प्रयत्न राहिला आहे. आमच्या काळात पैलवानाला मोठा मान होता. त्यामुळे पैलवानकीतील यशाचा आधार घेऊन काहींनी पुढे राजकारणाचे फड गाजविले.

 Shiv Sena's candidacy for assembly elections ...! | विधानसभा निवडणूकीत शिवसेनेची उमेदवारी...!

विधानसभा निवडणूकीत शिवसेनेची उमेदवारी...!

Next

हिंदकेसरी दीनानाथसिंह यांची जीवन कहाणी--लाल माती

पैलवानकी हीच आपली ओळख असावी, असा माझा प्रयत्न राहिला आहे. आमच्या काळात पैलवानाला मोठा मान होता. त्यामुळे पैलवानकीतील यशाचा आधार घेऊन काहींनी पुढे राजकारणाचे फड गाजविले. हिंदकेसरी मारुती माने हे सांगली साखर कारखान्याचे अनेक वर्षे उपाध्यक्ष होते. शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांनी त्यांना राज्यसभेवरही घेतले होते. मारुती माने यांनी सांगली मतदारसंघातून १९९६ ला काँग्रेसचे मदन पाटील यांच्याविरोधात लोकसभेची निवडणूकही लढविली होती. ‘भारतभीम’ जोतिरामदादा सावर्डेकर हेदेखील सांगलीचे नगराध्यक्ष होते. आताचे भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांचे ते आजोबा. खेळ असो अथवा चित्रपट; त्यातील लोकप्रियतेचा वापर निवडणूक जिंकण्यासाठी करण्याची पद्धत आपल्याकडे आहे. माझ्याही जीवनात असे एक छोटेसे वळण आले.
महाराष्ट्राच्या राजकारणात १९९० नंतर शिवसेनेची चांगलीच हवा निर्माण झाली होती. बाळासाहेब ठाकरे यांची रोखठोक भाषा व सडेतोड भूमिका लोकांना आवडत होती. एकदा शिवसेनेला सत्ता दिल्यास काहीतरी चांगले घडेल असे लोकांना वाटत होते. साधारणत: १९९२ ची गोष्ट. मूळचे उत्तर प्रदेशमधील भदोई जिल्ह्यातील असलेले व बोरिवलीस राहणारे विधानपरिषदेचे आमदार धनश्याम दुबे यांनी माझे नाव कुर्ला मतदारसंघातून शिवसेनाप्रमुखांना सुचविले. या मतदारसंघात भय्या लोकांचे मतदार जास्त होते. मराठा समाजही जास्त होता. ‘हिंदकेसरी’ म्हणून माझी त्या मतदारसंघातही ओळख होती. त्यामुळे मलाच मैदानात उतरविण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला होता. त्यानुसार मला ठाकरे यांच्या भेटीचा निरोप आला. या संदर्भात माझ्या मनोहर जोशी व अन्य तत्सम नेत्यांसमवेत चार वेळा बैठका झाल्या. शेवटची बैठक ‘मातोश्री’वर थेट बाळासाहेब यांच्यासमवेतच ठरली. रात्री उशिरा ही बैठक झाली. त्यावेळी वेगवेगळ्या मतदारसंघांतील संभाव्य उमेदवारांच्या भेटीगाठी व चाचपणी सुरू होती. मी ‘मातोश्री’वर गेलो. बाळासाहेब यांची भेट झाली. ज्या व्यक्तीबद्दल आजपर्यंत नुसते ऐकलेच होते, ते बाळासाहेब साक्षात समोर होते. अत्यंत करारी बाण्याचा माणूस. ‘एक घाव, दोन तुकडे’ अशा स्वभावाचा. मी त्यांना भेटून नमस्कार केला व पैशाची अडचण सांगितली. त्यावर त्यांनी ‘अडचणी सांगू नका, पैशासह सर्व मदत शिवसेना तुम्हाला करील; परंतु तुम्ही तातडीने कुर्ला मतदारसंघात येऊन राहा,’ असे सांगितले. कोल्हापूर सोडून मुंबईत येऊन राहायचे म्हटल्यावर माझी अडचण झाली. मी त्यांना भीत-भीतच म्हणालो, ‘साहेब, मुंबईत येऊन राहण्यात मला अडचण आहे. त्यापेक्षा मी येऊन-जाऊन करतो. कायमस्वरूपी मला राहता येणार नाही.’ बाळासाहेब ते बाळासाहेबच..,. ते एका सेकंदात कडाडले, ‘पैलवान, निघा तुम्ही! ’ तिथे पुन्हा कसलीही चर्चा नाही. एकदा निर्णय म्हणजे निर्णय. त्यांनी माझ्या उमेदवारीचा कंडकाच पाडला. कुर्ला-नेहरूनगर असा हा मतदारसंघ. त्यामध्ये चेंबूरचाही काही भाग येत असे. या मतदारसंघातून त्यावेळी रमाकांत मयेकर शिवसेनेकडून विजयी झाले; परंतु हिंदुत्ववादी प्रचार केल्याच्या तक्रारीवरून त्यांची आमदारकी पुढे वर्ष-दीड वर्षात गेली. त्यानंतरच्या पोटनिवडणुकीत या मतदारसंघातून शिवसेनेने सूर्यकांत महाडिक यांना उमेदवारी दिली; परंतु तिथे समाजवादी पक्षाचा उमेदवार विजयी झाला. हा सगळा राजकीय खेळ पाहून माझे वस्ताद म्हणाले, ‘दीनानाथसिंह, तू वाचलास. नाही तर ना घर का, ना घाट का... अशी तुझी अवस्था झाली असती.’ मी त्यांना म्हणालो, ‘वस्ताद, यापुढे कोल्हापूर सोडण्याचा विचार पुन्हा कधीही मनात येऊ देणार नाही.’
‘मातोश्री’वरून बाहेर आल्यावर टॅक्सी पकडून बोरिवलीला गेलो. मला रात्रभर झोप लागली नाही. आपण ही संधी सोडून चुकले की काय, असेही वाटू लागले; परंतु कपाळी जे लिहिलेले नाही ते तुम्हांला मिळणार नाही, अशी मनाची समजूत घालून घेतली. शिवसेनाप्रमुखांना भेटल्यावर माझ्या तोंडातून ‘कोल्हापूर सोडत नाही,’ असे वाक्य कसे निघाले, हे मलाही समजले नाही. कदाचित कोल्हापूरच्या मातीबद्दलचे प्रेम असेल किंवा शिवसेनेची आमदारकी माझ्या नशिबी नसेल; परंतु हे एक वळण व वादळ आयुष्यात येऊन गेले, एवढे मात्र नक्की...!
 

शब्दांकन : विश्वास पाटील ---लाल माती




 

Web Title:  Shiv Sena's candidacy for assembly elections ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.