आत्मसाक्षात्कार 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2018 12:34 PM2018-06-03T12:34:40+5:302018-06-03T13:32:42+5:30

माणसाला ‘महात्मा’ करणाऱ्या एका क्लेशकारी प्रसंगाला येत्या आठवड्यात १२५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने...

Self-realization | आत्मसाक्षात्कार 

आत्मसाक्षात्कार 

googlenewsNext

- सुरेश द्वादशीवार

७ जून १८९३. याच दिवशी दक्षिण आफ्रिकेतील पीटरमार्टिझबर्ग रेल्वे स्टेशनवर ‘कृष्णवर्णीय’ गांधीजींना अक्षरश: फेकून दिले होते. तो त्यांच्यासाठी आत्मसाक्षात्कार होता! १९१५ला गांधीजी भारतात परतले तेव्हा ते ‘महात्मा’ बनलेले होते. अख्खा देश त्यांची वाट पाहत एकोप्याने उभा होता... आत्मसामर्थ्याची दांडगी शक्ती त्यांच्याकडे होती. साम्राज्यशाहीशी प्रत्यक्ष दोन हात न करता तिचे हात आपल्याच हातात कसे घ्यायचे याचा अनुभव त्यांच्याकडे होता. अवघ्या पाच वर्षात, १९२०मध्ये देशाच्या स्वातंत्र्यलढ्याची सारी सूत्रे आपसूकच त्यांच्या हाती आली आणि एक नवा इतिहास घडला!

माणसाच्या निष्क्रिय बुद्धीला सक्रिय करणारा क्षण हाच त्याच्या साक्षात्काराचा क्षण असतो. तो माणसाला त्याच्या संभाव्य जाणिवांमधून प्रगट जाणिवेत नेणारा असतो. त्यातून त्याला त्याचे आत्मबळ गवसते आणि आजवर ध्यानात न आलेल्या आत्मशक्तीचे अमर्यादपण लक्षात येते असे अ‍ॅरिस्टॉटलचे म्हणणे आहे. गांधीजींच्या आयुष्यात अशा साक्षात्काराचा क्षण
७ जून १८९३ या दिवशी दक्षिण आफ्रिकेतील पीटरमार्टिझबर्ग या छोट्याशा रेल्वे स्टेशनवर आला. तेव्हा ते हिवाळ्याच्या थंडीत कुडकुडत होते. द. आफ्रिका हा देश विषुववृत्ताच्या खाली असल्याने इथले हवामान आपल्याहून वेगळे आणि विरोधी असते.
गांधीजींचा जन्म २ आॅक्टोबर १८६९चा. यावेळी ते अवघे २४ वर्षांचे होते. वयाच्या १३व्या वर्षी विवाह केलेल्या कस्तुरबांना आपल्या दोन मुलांसह देशात सोडून ते आफ्रिकेत आले होते. त्यांनी बॅरिस्टरची पदवी प्राप्त केली होती. इंग्लंडमध्ये शिकत असताना ते तेथील अखिल इंग्लंड शाकाहार समितीचे महासचिव व त्या संघटनेच्या मुखपत्राचे संपादक राहिले होते.
पोरबंदर या त्यांच्याच गावातून येऊन आफ्रिकेत समृद्धी मिळविलेल्या दादा अब्दुल्ला या धनाढ्य व्यापाºयाला कायदेशीर सल्ला द्यायला त्यांनी त्याच्याच जहाजातून अरबी समुद्र ओलांडला होता.
तेथे पाय ठेवताच त्यांची पहिली ओळख आपल्या ‘काळ्या वर्णाशी’ झाली आणि ती त्यांना बरद्वानच्या न्यायालयानेच करून दिली. पहिल्या दिवशी कोर्टात हजर झाले ते अंगात सूट चढवून व डोक्यावर गुजराती पगडी घालून. न्यायाधीशांनी गांधींना त्यांची पगडी काढायला सांगितली. गांधींनी आपल्या स्वाभिमानी स्वभावानुसार त्याला नकार दिला व ते तसेच कोर्टाबाहेर पडले. त्यांच्या या वागणुकीने दादा अब्दुल्ला मात्र प्रसन्न झाले. गांधीजींच्या देशभक्तीविषयी व स्वाभिमानाविषयी त्यांच्या मनात आदर उभा राहिला.
अब्दुल्ला केवळ धनवंत नव्हते, ते कीर्तिवंत व सामाजिक क्षेत्रातले वजनदार इसम होते. शिवाय त्यांच्या मनात मायदेशाच्या संस्कृतीविषयीचे प्रेम होते. सोन्याच्या खाणी, जहाजे आणि प्रचंड जमिनी अशी त्यांची मोठी मालमत्ता होती. गांधीजींचे तरुण वय पाहून ‘हा मुलगा आपले काम नीट करू शकेल की नाही’ अशी शंका दादांच्या मनात आली. मात्र तीन दिवसांच्या सहवासातच गांधींनी त्यांच्या मनात आपल्याविषयीचा विश्वास उत्पन्न केला. नेमके तेव्हाच एका वकिलीच्या कामासाठी दादांनी गांधीजींना प्रिटोरियाला जायला सांगितले. त्यासाठी त्यांना रेल्वेचे पहिल्या वर्गाचे तिकीट काढून दिले. शिवाय बेडिंगचेही तिकीट त्यांच्या हाती सोपविले. पण हा जन्मजात साधा राहिलेला माणूस बेडिंगचे पाच शिलिंग त्यांना परत करत म्हणाला, ‘माझ्याजवळ माझ्या घोंगड्या आहेत’.
गांधीजी बरद्वानच्या स्टेशनवर पहिल्या वर्गाच्या डब्यात बसले. तो प्रवास साधा नव्हता. बरद्वान ते चार्ल्सटन रेल्वे, पुढे जोहान्सबर्गपर्यंत ७३ मैल घोडागाडी आणि नंतर प्रिटोरियापर्यंत पुन्हा रेल्वे असा तो तुटक आणि जिकिरीचा होता. त्यांची गाडी पीटरमार्टिझबर्ग या स्टेशनवर पोहोचली तेव्हा त्यांच्या डब्यात एक गौरवर्णीय इसम चढला. डब्यात कुणी काळा माणूस बसल्याचे पाहून त्याने रेल्वेच्या दोन अधिकाºयांना बोलावले. सारेच काळे, सावळे आणि तपकिरी हे द. आफ्रिकेत कुली म्हणून ओळखले जायचे. मग ते ‘कुली डॉक्टर्स’ असोत, ‘कुली वकील’ असोत नाही तर ‘कुली बॅरिस्टर्स’. त्या गोºया इसमासोबत आलेल्या अधिकाºयांनी गांधींकडे तुच्छ नजर टाकून त्यांना आपले सामान घेऊन तिसºया वर्गाच्या डब्यात जायला सांगितले.
‘पण माझ्याजवळ पहिल्या वर्गाचे तिकीट आहे’ गांधीजी म्हणाले.
‘असेल, पण त्याचा येथे उपयोग नाही’ असे म्हणून त्यांनी गांधीजींना अक्षरश: धरून व उचलून डब्याखाली फेकले.
गाडी पुढे निघाली तेव्हा गांधीजी प्लॅटफॉर्मवर तसेच एकटे होते. त्यांचे सामान त्या डब्यात पुढे गेले होते. त्यात असलेले ब्लँकेटही सोबत गेले होते. त्या रिकाम्या फलाटावर काही काळ थांबून थंडीने कुडकुडणारे गांधीजी प्रवाशांसाठी असलेल्या रिकाम्या हॉलमध्ये जाऊन बसले. रात्रीचे ९ वाजले होते. विषुववृत्ताच्या खाली असलेला तो प्रदेश थंडीच्या कडाक्याने गारठला होता. प्रिटोरियाकडे जायला दुसºया दिवशी रात्री येणाºया याच गाडीखेरीज दुसरी गाडी नव्हती. सामान नाही, सोबत नाही आणि पांघरायला काही नाही. गांधीजी तसेच कुडकुडत सारी रात्र त्या स्टेशनच्या आवारात बसून राहिले. दुसरा दिवस उजाडला. तेव्हा तेथे आलेल्या त्यांच्याच सारख्या ‘कुलींनी’ त्यांची समजूत काढत म्हटले, ‘येथे हे असेच चालते. खरे तर तुम्हाला पहिल्या वा दुसºया वर्गाचे तिकीट मिळायलाच नको होते’. रात्रीच्या अपमानाने गांधीजी जेवढे खचले नाहीत तेवढे या समजुतीच्या व अपमान पचविण्याची सवय झालेल्या स्वरांनी जास्तीचे घायाळ झाले.
येथून परत जायचे काय, त्यांच्या मनात विचार आला. पण तो भ्याडपणा ठरला असता असेही लगेच त्यांना वाटले. देहाने दुबळे दिसणाºया या माणसात साहसाचा वास होता, धाडसाचे सामर्थ्य होते आणि कोणत्याही प्रसंगाला सामोरे जाऊन तोंड देण्याची जिद्द होती. ते तेथेच थांबले. दुसºया दिवशी रात्री आलेल्या गाडीतील गार्डने त्यांना त्यांचे पूर्वीचे तिकीट रद्द झाल्याचे सांगितले. त्यावर ‘ते कोणत्या कायद्याने’ असे गांधींनी विचारताच तो गप्प झाला व त्याने गांधींना पहिल्या वर्गात जागा दिली. नंतरच्या स्टेशनवर त्यात आणखी गोरे लोक आले तेव्हा त्या गार्डने पुन्हा तेथे येऊन गांधींना तिसºया वर्गात जायला सांगितले. 
मात्र डब्यात भरपूर जागा होती आणि ते गोरेही सहिष्णू होते. त्यांनीच मग गार्डला गांधीजींना डब्यात बसू देण्याची विनंती केली. असा प्रवास करीत ते सकाळी जोहान्सबर्गला आले. आता पुढचा प्रवास घोड्यांच्या बंदगाड्यांमधून होता.
मोकळी हवा मिळावी म्हणून गांधी गाडीवानासोबतच्या जागेवर जाऊन बसले. पण ती जागा त्या कोचच्या मालकाची होती. त्याने येऊन गांधींना तेथून ढकलण्याचा प्रयत्न केला. पण मग सिगार ओढायचे लक्षात येऊन त्यानेच कोचातली जागा घेतली. काही अंतर चालून गेल्यानंतर तो पुन्हा बाहेर आला आणि त्याने गांधींना गाडीवानासमोरच्या खालच्या जागेवर बसायला सांगितले. त्याला गांधींनी नकार देताच त्यांच्या बखोटीला धरून त्याने गांधींना कोचाबाहेर फेकले. यावेळी अंगातले सारे बळ एकवटून गांधींनी कोचाचे रेलिंग आपल्या दोन्ही हातानी घट्ट धरले व काही काळ त्याला लोंबकळत त्यांनी तसाच फरफटत प्रवास केला. पुढे कोचातील इतर प्रवाशांनी त्यांची ती अवस्था लक्षात घेऊन कोच थांबवला व गांधीजींना आत घेतले. जोहान्सबर्गपासूनचा ७३ मैलांचा प्रवासही गांधींना वर्णद्वेषाचा असा दुसरा धडा शिकविणारा ठरला. गांधीजींनी कोचात जागा घेतली आणि गाडीवानाने तो चालू केला. पण साऱ्या प्रवासात त्या गोºयाची गांधींना शिवीगाळ आणि धमकावणी सुरू होती. रात्र पडेपर्यंत त्यांचा कोच स्टॅण्डर्टनला पोहोचला. तेथे दादा अब्दुल्लांच्या सहकाºयांनी त्यांची व्यवस्था एका खासगी जागेत केली. मात्र त्याचवेळी त्यांना प्रिटोरियापर्यंतचा प्रवास तिसºया वर्गाने करावा लागेल, असेही त्यांनी सांगितले.
सकाळी गांधीजींनी रेल्वे स्टेशनच्या प्रमुखांना पत्र लिहून आपल्याला पहिल्या वर्गात जागा देण्याची विनंती केली. प्रत्यक्ष भेटीत स्टेशनमास्तरांनी त्यांना ते तिकीट दिले. मात्र ‘वाटेत गार्ड तुम्हाला तिसºया वर्गात जायला सांगू शकेल. त्यावेळी मला काहीएक करता येणार नाही’, असेही वर बजावले. प्रत्यक्षात गाडीत भेटलेल्या गार्डने त्यांना तिसºया वर्गात जायला सांगितले व त्यासाठी हुज्जतही घातली. मात्र त्याच डब्यात असलेल्या एकमेव गोºया प्रवाशाने गांधींची बाजू घेऊन त्या गार्डची समजूत घातली. त्यावर ‘तुम्हाला कुलीसोबतच बसायचे असेल तर बसा’ असे म्हणून तो संतापाने डबा सोडून गेला. पुढला जोहान्सबर्गपर्यंतचा त्यांचा प्रवास मात्र शांततेत; पण मनातल्या अस्वस्थतेसह पार पडला. जोहान्सबर्गच्या स्टेशनवर त्यांना घ्यायला कुणी आले नव्हते. वेळ रात्रीची होती. स्टेशनवरील टॅक्सीवाल्याला गांधींनी नॅशनल हॉटेलवर पोहचवायला सांगितले. टॅक्सीवाल्याने त्यांना हॉटेलात पोहचविले. मात्र हॉटेलच्या चालकाने ‘जागा नसल्याचे सांगून’ त्यांना ठेवून घ्यायला नकार दिला. पुढे त्याच टॅक्सीने ते कमकशिन यांच्या हॉटेलात गेले. तेथे दादा अब्दुल्लांचा माणूस त्यांची वाट पाहात होता.
‘तुम्हाला ग्रॅण्ड नॅशनल हॉटेलमध्ये जागा मिळेल असे वाटलेच कसे?’ असे त्याने गांधींना विचारले.
‘का नाही?’ या गांधींच्या प्रश्नाला ‘ते तुम्हाला लवकरच कळेल’ असे काहीसे तुटक उत्तर त्याने दिले. ‘इथला पहिला आणि दुसरा वर्ग गोºयांसाठी राखीव आहे’, तो गांधींना म्हणाला. त्या वर्गाने रेल्वेकडे याविषयी आणखीही अनेक मागण्या केल्या असल्याचेही त्याने सांगितले. तरीही गांधींनी प्रिटोरियासाठी पहिल्या वर्गाचे तिकीट मागितले. शिवाय स्टेशनमास्तरांना या अन्यायाबाबतचे एक पत्रही त्यांनी लिहिले.
स्टेशनमास्तरांनी त्यांना पहिला वर्ग दिला खरा; पण ‘पुढील स्टेशनवरचा गार्ड तुम्हाला त्यात बसू देईल की नाही ते जरा पाहा’ असेही त्यांना बजावले. झालेही तसेच. तेथील गार्डने त्यांना पुन्हा तिसºया वर्गात जायला सांगितले. यावेळी झालेल्या तणातणीत डब्यातील इतर गोºयांनीही गांधीजींची बाजू घेतली व प्रकरण मिटले. प्रिटोरियापर्यंतचा गांधींचा प्रवास सुखरूप; पण भयग्रस्त अवस्थेतच झाला. प्रिटोरियाच्या कृष्णवर्णीय हॉटेलमालकानेही त्यांना त्यांचे जेवण गोºयांच्या मेसमध्ये न घेता आपल्या खोलीतच घ्यावे लागेल असे बजावले. पण पुढे तेथील गोºयांनीच या ‘कुली बॅरिस्टरला’ आपल्यासोबत जेवणाची परवानगी दिली. हा सारा अपमान मुकाट्याने गिळत गांधीजी खटल्याचे काम संपेपर्यंत प्रिटोरियात राहिले व काम आटोपून ते बरद्वानला परतले.
पुढली तीन वर्षे तेथे राहून त्यांनी त्या साºया क्षेत्रात वकील म्हणून आपले नाव कायम केले. शिवाय तेथील जनतेचा व विशेषत: गौरेतर जनतेच्या मनातील स्वत:विषयीचा आदरही त्यांनी वाढविला. मात्र त्यांचे खरे आणि याहून मोठे काम पुढेच होते.
१९९६च्या मध्याला गांधीजी भारतात परतले. त्यांची बोट कलकत्त्याला लागली आणि त्याच दिवशी ते अलाहाबादमार्गे मुंबईला रवाना झाले. अलाहाबादेत गाडी चांगली पाऊण तास थांबत असल्याने त्यांनी तेथील त्रिवेणी संगमाचे दर्शन घ्यायचे ठरविले. मात्र दर्शनाहून परततानाच त्यांना त्यांची गाडी स्टेशन सोडताना दिसली. तिथल्या सावध स्टेशनमास्तरांनी त्यांचे सामान मात्र अगोदरच उतरवून घेतले होते. आपला वेळ वाया न घालविण्याच्या वृत्तीने गांधींनी तडक एक हॉटेल गाठले व तेथून ते तेव्हाच्या पायोनियर या प्रसिद्ध नियतकालिकाच्या कार्यालयात गेले. तेथे संपादक डॉ. चेस्नी ज्यु. यांना भेटून त्यांच्या कानावर त्यांनी आफ्रिकेतील भारतीयांची सगळी दुरवस्था घातली. संपादकांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेऊन त्यांना आपल्या नियतकालिकात लिहिण्याचे आमंत्रण दिले. गांधीजींनी ती कैफियत राजकोटला येऊन लिहायला घेतली तेव्हा तिचे ९० पानी पुस्तक झाले. ते ब्ल्यू बुक (निळी पुस्तिका) म्हणून लगेच लोकप्रियही झाले. पुस्तिकेच्या दहा हजार प्रति हातोहात गेल्या. तिच्या जास्तीच्या प्रति गांधीजींनी लहान मुलांकरवी राजकोट व अन्यत्र वाटण्याचीही व्यवस्था केली. (सत्याग्रहात मुलांना सहभागी करून घेण्याचा धडा मला येथेच मिळाला असे गांधींनी आपल्या आत्मचरित्रात लिहिलेही आहे.)
या पुस्तिकेचे सार देश व विदेशातून अनेक वृत्तपत्रांनी प्रकाशित केले. त्याचा वृत्तांत दक्षिण आफ्रिकेत पोहोचताच तेथील गोºयांनी त्याची होळी केली व गांधींना देशात पुन्हा पाय न ठेवू देण्याच्या प्रतिज्ञा केल्या. मात्र कोणत्याही विरोधाला न जुमानणारे गांधी पुन्हा आफ्रिकेकडे निघाले. यावेळी कस्तुरबा व त्यांची दोन मुलेही त्यांच्यासोबत होती. गोºया दंगेखोरांनी त्यांची बोट किनाºयावर रोखली व गांधींना देशात पाऊल ठेवू न देण्याचा निर्धार घोषित केला. परिणामी ती बोट किनाºयापासून दूर २१ दिवसपर्यंत समुद्रातच नांगरून उभी राहिली. पुढे गांधी त्यांच्या कुटुंबीयांसोबत किनाºयावर आले तेव्हाही ते सारे रक्तबंबाळ होईपर्यंत गोºयांनी त्यांच्यावर दगडफेक केली. यावेळी पोलिसांनी दिलेले संरक्षण गांधींनी नाकारले. पोलीस ठाण्यात काही दिवस राहण्याचा सल्लाही त्यांनी झुगारला. प्रत्यक्ष इंग्लंडचे परराष्ट्र सचिव चेम्बरलेन यांनी दिलेला न्यायालयात दाद मागण्याचा सल्लाही त्यांनी फेटाळला... ज्या लोकांसोबत राहायचे त्यांचे वैर नको असे त्या साºयांवर त्यांचे म्हणणे होते... हळूहळू विरोध मावळला आणि गांधींची वकिली पुन्हा मार्गाला लागली.
मात्र यापुढचा त्यांचा काळ कोर्टात खटले लढवण्याहून सामाजिक व राजकीय न्यायासाठी लढण्यातच अधिक गेला. सगळ्या अश्वेतांना वास्तव्याचे परमिट घ्यावे लागे. त्यासाठी दर पाच वर्षांनी त्यांना पाच पौंडाचा कर भरावा लागे. त्यांना कायमस्वरूपी नोकºया नसत. कुली, वेटर्स, फळविक्रेते किंवा घरगडी अशी हलकी कामे त्यांना करावी लागत. त्यांना मालमत्ता घेता येत नसे. फुटपाथ वापरता येत नसत. पहिल्या वा दुसºया वर्गाची तिकिटे मिळत नसत. सार्वजनिक वाहनात त्यांना अखेरच्या जागा असत... ‘आपण सारे एकाच ब्रिटिश साम्राज्याचे नागरिक असताना हा भेदभाव का’, असा प्रश्न यावर गांधी विचारत. प्रथम लेखी, मग पत्रातून, पुढे व्याख्यानातून आणि अखेर लोकांना सोबत घेऊन केलेल्या सत्याग्रहातून.
मग त्यासाठी तुरुंगवास, सक्तमजुरीची कैद आणि अमानुष मारहाण. पुढे सरकारने सगळ्या अश्वेतांची लग्ने एका कायद्यान्वये बेकायदेशीर ठरविली व ती कायदेशीर करून देण्यासाठी करासह सरकारी कागदपत्रे सादर करण्याचा आदेश काढला. त्याविरुद्ध केलेल्या सत्याग्रहात गांधींसोबत कस्तुरबाही तुरुंगात गेल्या. त्यांनीही सक्तमजुरी भोगली. सोबतचे अश्वेत सहकारीही मारहाण सहन करीत व तुरुंगात जात. १९०६ नंतरचा फार मोठा काळ गांधींनी असा घालविला.
मात्र हा तुरुंगवास भोगत असतानाच गांधींचे नाव साऱ्या जगात गेले. हा माणूस स्वत:साठी वा आपल्या जातीधर्मासाठी लढत नसून मूल्यांसाठी प्राण पणाला लावतो. या सत्याने ही किमया केली. टॉलस्टॉय, रोमा रोलाँ आणि तेवढेच जागतिक कीर्तीचे लेखक, कवी, कलावंत व राजकीय नेते याच काळात त्यांचे पत्रमित्र झाले. त्यामुळे त्यांच्याकडे फार दुर्लक्ष करणे तेथील सरकारलाही नंतर जमले नाही. द. आफ्रिकेचे गव्हर्नर जनरल स्मट्स हे आरंभी गांधींचा राग करीत; पण गांधीजींचे अहिंसात्मक व सविनय आंदोलन, त्यांची तुरुंगातली सहनशीलता आणि त्यांच्या स्वभावातील मार्दव व शत्रूपक्षाशीही स्नेह जुळविण्याची वृत्ती यांनी तेही भारावले. काही काळानंतर ते गांधीजींचे प्रशंसकही बनले. तथापि गांधी आपले शत्रू आहेत हे विसरणे मात्र त्यांना कधी जमले नाही.
याच दरम्यान त्यांनी टॉलस्टॉय आश्रमाची स्थापना केली. या आश्रमात श्वेत, अश्वेत, सर्वधर्माचे व जातिपंथाचे लोक एकत्र राहात, एकत्र जेवत व एकाच तºहेचे जीवन जगत. गांधींची सहजीवनाची व मानवी समतेची चळवळ या त्यांच्या आश्रमीय आयुष्यातूनच सुरू झाली.
याच काळात इंग्लंडचे द. आफ्रिकेच्या क्षेत्रात बोअरांशी युद्ध सुरू होते. (१८९२ ते १९०२) बोअर हे डच वंशाचे लोक फार पूर्वी या क्षेत्रात आले आणि त्यांनी त्यातला बराच मोठा प्रदेश आपल्या ताब्यात आणला. पुढच्या काळात इंग्रजांच्या साम्राज्यशाही आक्रमणानंतर त्यांच्यात प्रथम ताणतणाव व मग युद्धे झाली. त्यांचे पहिले युद्ध १८८०मध्ये तर दुसरे १८९२ मध्ये झाले. या युद्धात गांधीजींनी ‘साम्राज्याचे नागरिक’ या नात्याने भाग घेऊन त्यासाठी सुमारे ११०० लोकांचे सेवापथक उभे केले. युद्धभूमीवर जखमी झालेल्या ब्रिटिश सैनिकांना इस्पितळापर्यंत किंवा रेल्वे स्टेशनपर्यंत स्ट्रेचरवरून पोहचविण्याची जबाबदारी या पथकाने घेतली. अनेक सैनिकांना त्यांनी २० ते २५ मैलांपर्यंत असे वाहून नेले. एका प्रसंगात एकट्या गांधींनी एका घायाळ ब्रिटिश सैनिकाला ४० मैलपर्यंत खांद्यावर उचलून नेल्याची नोंद या पथकाच्या इतिहासात आहे. त्यासाठी ब्रिटिश राजसत्तेने त्यांना एक लष्करी सन्मानही प्रदान केला. पुढे जालियनवाला बागेच्या हत्याकांडानंतर गांधींनी तो व त्यांना मिळालेले इतर सारेच शासकीय पुरस्कार सरकारला परत केले.
याही काळात गांधींचा स्वातंत्र्य व समतेचा लढा आणि त्यांचे सहकुटुंब तुरुंगात जाणे सुरूच होते. मात्र पुढल्या काळात त्यांना व त्यांच्या सहकाºयांना तुरुंगात जरा चांगली वागणूक मिळू लागली. तुरुंगात असतानाच गांधीजींनी कातडे कमावण्याचे व चपला शिवण्याचे तंत्र शिकून घेतले. त्यांच्या अखेरच्या तुरुंगवासात त्यांनी गव्हर्नर जनरल स्मट्स यांच्यासाठी चपलांचा असा जोड बनविला. त्यांच्या सुटकेनंतर त्यांना भेटायला स्मट्सने सरळ तुरुंगातूनच त्यांना आपल्या कार्यालयात बोलविले. त्यावेळी गांधींनी त्यांना तो चपलांचा जोड भेट म्हणून दिला. त्या भेटीने ओशाळलेल्या गव्हर्नर जनरलने गांधीजींचे आभार मानले. पुढे ‘येथून घरी कसे जाणार?’ असे त्याने विचारले तेव्हा ‘पायीच’ असे उत्तर गांधींनी दिले.
‘का, एखादे वाहन का करीत नाही?’ स्मट्सने विचारले. तेव्हा ‘मजजवळ तेवढे पैसे नाहीत’ असे उत्तर गांधींनी दिले. तेव्हा जास्तीचेच ओशाळलेल्या स्मट्सने स्वत:च्या खिशातून काही रक्कम काढून ती गांधीजींच्या हाती सोपविली.
...यानंतर गांधीजींनी लगेचच आफ्रिका सोडली व मायदेश गाठला. मात्र १८९३ मध्ये तेथे गेलेले मोहनदास आता महात्मा झाले होते. जाताना त्यांची दखलही न घेतलेला देश आता त्यांची वाट पाहात एकोप्याने उभा होता... येणारे गांधी आत्मसामर्थ्याचा अनुभव सोबत आणणारे तर होतेच, शिवाय साम्राज्यशाहीशी प्रत्यक्ष दोन हात न करता तिचे हात आपल्याच हातात कसे घ्यायचे याचेही ज्ञान सोबत आणणारे होते. त्याचमुळे १९१५च्या जानेवारीमध्ये भारतात आलेल्या गांधींनी अवघ्या पाच वर्षात, १९२०मध्ये देशाच्या स्वातंत्र्यलढ्याची सारी सूत्रेच आपल्या हाती घेतली.
(लेखक लोकमतच्या नागपूर आवृत्तीचे संपादक आहेत.)

 

 

 

Web Title: Self-realization

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.