...‘शोध’ मात्र काही संपत नाही !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2019 09:25 AM2019-01-06T09:25:00+5:302019-01-06T09:25:01+5:30

ललित : आज माझे कशातच लक्ष लागत नव्हते. सकाळपासून नुसती शोधाशोध चालू होती. अख्ख्या घरभर पसारा झाला होता; पण हवे ते नेमके मिळत नव्हते आणि जे मिळत नव्हते तेच नेमके का हवे होते? याचे उत्तरही सापडत नव्हते. मला वाटते अशी अस्वस्थता प्रत्येकाला येत असावी. त्या अस्वस्थतेने मला प्रथमच जाणवून दिले होते की, त्या पुस्तकाचे व माझे जणू काही नातेच जडले आहे.  तशी कित्येक पुस्तके मी वाचतेच; पण हवा तो नेमकेपणा देणारी काही थोडकीच पुस्तके असतात.  ती आपल्या आयुष्यात येतात आणि जसे मोकळ्या आभाळात इंद्रधनू ने रंग भरावे तसे रंग भरून जातात. जेव्हा अचानकच ती गायब होतात. तेव्हा जी अस्वस्थता येते ती फार वेडेपिसे करून ठेवते.

... 'Search' never ends! | ...‘शोध’ मात्र काही संपत नाही !

...‘शोध’ मात्र काही संपत नाही !

googlenewsNext

- सुषमा सांगळे - वनवे

योग्यवेळी योग्य माणसे आणि योग्य पुस्तक भेटायलाही नशीबच लागते. नाहीतर जीवननौका कोणत्या पैलतीरावर घेऊन जाईल हे सांगताही येत नाही. हे झाले पुस्तकांच्या बाबतीत; पण अशा कित्येक गोष्टी आपल्या आयुष्यात घडतात. कधी आपल्या कपाटातील फाईल सापडत नाही, तर कधी हवी ती साडी सापडत नाही, बऱ्याच वेळा अगदी खूप जपून ठेवलेली कागदपत्रे अथवा वस्तूदेखील हव्या त्या वेळी गायब होतात. जणू काही त्यांनी अदृश्य अवस्थाच प्राप्त केली की काय, असे वाटते. या गोष्टीमुळे कित्येक वेळा घरात कलहही निर्माण होतात, बऱ्याच वेळा त्याची शिक्षा ही भोगावी लागते. अशावेळी मनात विचार येतो की या वस्तू लपून बसून आपले त्यांच्यावर किती प्रेम आहे हेच तर अजमावत नसतील ना..? की त्यांना असे माणसाला सतावण्यात मज्जा वाटत असेल? कधी कधी तर एक वस्तू शोधत असताना अचानक तिथे पूर्वी कधी हरवलेली वस्तू सापडते. त्यावेळेस ती सापडली म्हणून आनंद होतो ही पण, पाहिजे त्यावेळेला ती का सापडली नाही? याचे दु:ख जास्त होते.

मला तर वाटते आपले निम्मे आयुष्य तरी या शोधाशोधीतच जात असावे आणि असे प्रत्येकाच्या बाबतीत घडतही असावे. हे झाले वस्तूंच्या बाबतीत; पण आपल्या आयुष्यात येणारी माणसेच अचानक नाहीशी झाली, सोडून गेली तर..? त्यामुळे येणारी अस्वस्थता जीवघेणी वाटते. काही माणसे आपल्या मनावर ठसे उमटवून निघून जातात, काही काळाबरोबर विसरली जातात. कधी कधी ती अचानक गायबदेखील होतात. तर काही हवेच्या झुळकीबरोबर येतात आणि जातात. काही मुद्दामहून अदृश्य अवस्था प्राप्त करून आपले त्यांच्यावर किती प्रेम आहे, हे अजमावतात. मला कायम माणूस म्हणजे न उलगडलेले कोडेच वाटते. इथे प्रत्येकाची पद्धत वेगळीच असते. प्रत्येकाचा शोधही वेगळाच असतो. माणसाचे आयुष्य हे मला गणित मुळीच वाटत नाही. कारण यात प्रत्येकाची उत्तरे वेगवेगळी असतात.

कधी ही माणसे इतकी रुसतात की, ती कधीही मागे वळून पाहत नाहीत. बहुतेक त्यांना जीवन म्हणजे काय हेच समजले नसावे. कधी कधी ही माणसे एवढी दूर जातात की त्यांना परतीचा रस्ताच सापडत नाही. येण्याची इच्छा असूनसुद्धा... का खरेच तिथून यायलाच देत नसतील? अशावेळी मात्र मन अस्वस्थतेने तडफडते. निरर्थक अस्वस्थता ज्याचे नाव मृत्यू असते. त्याच्या अस्तित्वाची पोकळी सतावत राहते आणि मन त्याच्या आठवणीत झुरत राहते.
खरेच किती क्लिष्ट आहे ना माणूस हा प्राणी. केवळ त्याच्याकडे इतर प्राण्यांपेक्षा वेगळी अशी गोष्ट म्हणजे ‘मन’ ही असल्यामुळेच तो अधिक क्लिष्ट झाला असावा. तो प्रत्येक गोष्टीत आपले मन अडकवतो आणि त्याच्या इच्छेप्राप्तीसाठी धडपडतो आणि पुन्हा शोध सुरू होतो अविरत न संपणारा... माणसाचे सारे आयुष्य संपत जाते. तरी त्याचा शोध मात्र काही संपत नाही. बऱ्याच वेळा तो काय शोधतो, हे त्याचे त्यालाही समजत नसावे. अशावेळी मला वाटते. तो त्याचे ‘मन’ तर शोधत नसावा भरकटलेले... बऱ्याच वेळा या शोधात असंख्य चांगल्या गोष्टी तर कधी त्यापेक्षाही अनमोल गोष्टी त्याला मिळतात; पण त्याचे या गोष्टीकडे लक्ष नसल्यामुळे त्या येतात आणि तशाच निघूनही जातात. हरवलेले शोधणे आणि पुन्हा शोधात स्वत:स हरवणे, हा खेळ म्हणजेच जीवन नाही का? 

Web Title: ... 'Search' never ends!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.