प्रासंगिक- ब्रिटिश जुलुमाचे स्मरण 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2019 06:00 AM2019-04-14T06:00:00+5:302019-04-14T06:00:12+5:30

जालियनवाला हत्याकांड हा ब्रिटिशांच्या भारतावरील जुलमी राजवटीचा कळसच होता. त्यातून पेटलेले स्वातंत्र्ययुद्धाचे कुंड  स्वातंत्र्यानंतरच शांत झाले. या घटनेला शनिवारी १०० वर्षे झाली. त्यानिमित्त केलेले स्मरण..

Relevant - Remembrance of British harrashment | प्रासंगिक- ब्रिटिश जुलुमाचे स्मरण 

प्रासंगिक- ब्रिटिश जुलुमाचे स्मरण 

Next

- श्रुती भातखंडे - 
सन १८५७ मधील बंडानंतर भारतावरची ईस्ट इंडिया कंपनीची राजवट संपून ब्रिटिश पार्लमेंटची सत्ता सुरू झाली. सत्तेच्या आणि साम्राज्याच्या रक्षणासाठी भारतीय ब्रिटिश सैन्यात शूर, लढवय्या, एकनिष्ठ सैनिकांची दले निर्माण करण्यात आली. पंजाब, गढवाल, कुमाँऊ, शीख, रजपूत, मराठा, बलुची अशा रेजिमेंट्स बनविण्यात आल्या. १८८५ मध्ये सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक व शैक्षणिक जागृतीतून राष्ट्रीय सभेची स्थापना झाली. 
 सन १९१४ च्या जागतिक पहिल्या महायुद्धात भारताकडून युद्धकार्यासाठी ब्रिटिशांना अमाप पैसा पुरविण्यात आला. युद्ध संपल्यावर मात्र ब्रिटिशांनी युद्धापूर्वी दिलेल्या सर्व आश्वासनांना हरताळ फासला. स्वातंत्र्याची गळचेपी करून स्वातंत्र्य आंदोलन दडपून टाकण्याचेच अधिक प्रयत्न सुरू झाले. दहशतवाद, बळाचा वापर करून प्रशासनावरील पकड घट्ट करण्यात आली. १९१९ मध्ये मॉटेंग्यू-चेम्सफर्ड सुधारणा कायदा करण्यात आला. 
म. गांधीजी व स्वातंत्र्य आंदोलन
या पार्श्वभूमीवर महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्यासाठी जनआंदोलन सुरू झाले. असहकार चळवळ हा आंदोलनाच्या कार्यक्रमाचा पहिला टप्पा होता. या वेळी आंदोलनाची तीव्रता कमी करण्यासाठी ब्रिटिशांनी प्रचारसभा, मोर्चे, भाषणे यावर बंदी घातली. प्रमुख नेत्यांची धरपकड झाली. डॉ. सत्यपाल आणि डॉ. सैफुद्दीन किचलू या ब्रिटिशविरोधी नेत्यांना अटक करण्यात आली. त्याच्या निषेधार्थ अमृतसरमध्ये जाळपोळ, तोडफोड झाली (१० एप्रिल १९१९), १२ एप्रिलला डॉ. किचलू यांचा सहायक हंसराज यांची बैठक होऊन जालियनवाला बागेत भाषण (१३ एप्रिल १९१९) आयोजित करण्यात आले होते. जालियनवाला बाग या घटनेची ही पार्श्वभूमी होती.  ब्रिटिशांनी ‘डिफेन्स आॅफ इंडिया अ‍ॅक्ट’ पास करून दडपशाहीचे नवे अस्त्र उगारले. 
भारतीय लोकमताची पर्वा न करता अनार्किकल अ‍ॅण्ड रेव्होल्यूशनरी क्राईम अ‍ॅक्ट (रौलेक्ट अ‍ॅक्ट) संमत केला. हेच जालियनवाला बाग घटनेचे एक कारण ठरले. या कायद्यानुसार प्रांतिक किंवा केंद्र सरकारला एखाद्या व्यक्तीच्या हालचाली संशयास्पद वाटल्यास, त्या व्यक्तीला विनाचौकशी अटक करून, खटला न भरता अमर्याद काळापर्यंत तुरुंगात ठेवण्याची शिक्षा होऊ शकणार होती. राजद्रोहाचा गुन्हा असलेल्या व्यक्तीचा खटला तीन न्यायाधीशांच्या खास न्यायपीठापुढे चालविला जावा ज्यात ज्यूरी असणार नाहीत, असे ठरविण्यात आले.
या कायद्याने भारतीय स्वातंत्र्य आंदोलन चिरडले जाणार होते. त्याचा निषेध म्हणून महात्मा गांधीजींनी अहिंसक लढा देण्याचे निश्चित केले. ६ एप्रिल रोजी देशव्यापी आंदोलन सुरू झाले. हिंदू-मुस्लिम एकजुटीने ब्रिटिशांचा प्रतिकार करू लागले.  सभा, मोर्चे याद्वारे जनता आंदोलनात सहभागी झाली. जमावाला पांगविण्यासाठी ब्रिटिशांनी गोळीबार सुरू केला. या पार्श्वभूमीवर जालियनवाला बाग हत्याकांड घडून आले. भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासातील ही अत्यंत कटू अशी घटना आहे.
प्रत्यक्ष घटना (१३ एप्रिल १९१९) 
डॉ. मुहम्मद बशीर व कन्हैयालाल भाटिया यांनी रविवारी जालियनवाला बागेत सभा घेण्याचे निश्चित केले. पंजाबमधील अमृतसर शहरातील ब्रिटिश हत्याकांडाचे हे स्थळ म्हणजे हे मैदान. चारही बाजूने उंच, इमारती व आत जाण्यासाठी असणारा एक चिंचोळा मार्ग, लाला हंसराज यांचे भाषण ऐकण्यासाठी व सत्याग्रहास प्रतिसाद देण्यासाठी २० हजार लोक व बैसाखी हा सण असल्याने बागेत जमलेले तरुण, स्त्रिया, वृद्ध, मुले एकत्र होते. त्या वेळी मायकेल ओडवायर हा पंजाब प्रांताचा लेफ्टनंट गव्हर्नर होता व कर्नल रेडिनाल्ड एडवर्ड हेन्री डायर हा ब्रिगेडिअर जनरल होता. ज. डायर २५ व्या पंजाबी तुकडीतील पंजाबी, गुरखा व बलूची फलटणीतले ९० सैनिक घेऊन या स्थळी पोहोचला. त्याने जमावावर थेट गोळीबार सुरू केला. तो १० मिनिटे चालू होता. एकूण १६५० फैरी झाडण्यात आल्या. जमावाने बाहेर पडण्यासाठी प्रवेशद्वाराकडे धाव घेतली; पण चेंगराचेंगरी झाली, अनेकांनी विहिरीत उड्या मारल्या. काहींनी भिंत ओलांडून उड्या मारून जीव वाचविण्याचा प्रयत्न केला. जीव वाचवण्याच्या प्रयत्नात अनेकांचे जीव गेले.
या घटनेची चौकशी करण्यासाठी सरकारने ज. हंटरच्या अध्यक्षतेखाली कमिटी नेमली. या चौकशी समितीत जॉर्ज रेस्कीन, डब्लू एफ राईस, सर जॉर्ज बरो, थॉमस स्मिथ, एच. सी. स्टोक्स आणि भारतीय सर चिमणलाल हरिलाल सेटलवाड, जगत् नारायण व सेठ तलवाड हे होते. काँग्रेसने पंडित नेहरूंच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली. काँग्रेसच्या मते १००० लोक ठार झाले, तर सरकारी आकडा फक्त ३७९ जणांचा होता. कर्नल ओडवायरने डायरच्या या कृत्याचे समर्थन केले. कर्नल डायरने चौकशीत उद्धटपणे उत्तरे दिली . हाउस आॅफ लॉर्डसच्या लोकांनी डायरची बाजू घेतली. ब्रिटिश इंडियाचा रक्षणकर्ता असे ठरवून त्याला पैशाची थैली अर्पण केली.
या घटनेनंतर म. गांधीजींच्या सत्याग्रह चळवळीला व स्वातंत्र्य आंदोलनाला अधिकच धार चढली. निरपराध लोकांचा बळी घेतल्याने सरकारचा सूड घेण्याची भाषा सुरू झाली. उधमसिंग नावाचा एक अनाथ मुलगा पेटून उठला. त्याने लंडन येथे जाऊन १३ मार्च १९४० रोजी लंडनच्या कॅक्स्टन हॉलमध्ये भर सभेत कर्नल ओडवायरवर गोळ्या झाडल्या व सूड घेतला. त्याला जून १९४० मधे फाशी देण्यात आले. भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासातील ही एक परिवर्तन बिंदू ठरणारी घटना होती. ज्या लोकांनी ब्रिटिशांना सैन्यात एकनिष्ठपणे लष्करात मदत केली, त्यांचा विश्वासघात करण्यात आला.  लोकशाहीचे प्रणेते म्हणून ज्यांनी गर्व केला त्या ब्रिटिशांना लोकशाही अधिकार भारतीयांना बहाल करायचे नव्हते हे सिद्ध झाले. त्यांना भारतावरची पकड अधिक घट्ट व मजबूत करायची होती. स्वातंत्र्य आंदोलन चिरडून टाकायचे होते. शासकांना शासित देशातील लोकांच्या जीवन-मृत्यूची पर्वा नव्हती. काळ्या लोकांना (वर्णद्वेष) सुसंस्कृत करण्याची जबाबदारी आपल्यावर असल्याचे जगभर भासविणाºया ब्रिटिशांचे खरे रूप दिसून आले; मात्र भारतीय जनतेने ब्रिटिशांच्या या दहशतवादाला न घाबरता आंदोलन जोमाने व उत्साहाने सुरू केले व अखेर ब्रिटिशांना देशाबाहेर घालवून स्वातंत्र्य मिळवलेच.
(लेखिका मॉडर्न कला, विज्ञान आणि विज्ञान महाविद्यालयात इतिहास विभागप्रमुख आहेत.)
 

Web Title: Relevant - Remembrance of British harrashment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे