खडूस, खत्रूड, खवचट आणि खतरा : पुणेरी पाट्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 03:00 AM2018-06-24T03:00:00+5:302018-06-24T03:00:00+5:30

‘हे प्रदर्शन दुपारी 1 ते 4 या वेळातसुद्धा खुले असेल’ असा अस्सल पुणेरी खवचटपणा निमंत्रणातच करणारे ‘पुणेरी पाटय़ां’चे प्रदर्शन ‘लोकमत’तर्फे पुण्यात आयोजित केले आहे. त्यानिमित्ताने

Puneri Patya only Punekar's know how to make and deal with them | खडूस, खत्रूड, खवचट आणि खतरा : पुणेरी पाट्या

खडूस, खत्रूड, खवचट आणि खतरा : पुणेरी पाट्या

googlenewsNext
ठळक मुद्दे खरे तर पुणेकरांची खिल्ली उडविणार्‍या 99.99 टक्के पाटय़ा पुणेकरांनीच तयार केलेल्या असतात. मार्मिक शब्दांत आशय व्यक्त करण्याची कला पुणेकरांच्या अंगी मुरलेली आहे. चपखल शब्दांमधून मार्मिक टिप्पणी झळकते.

अविनाश थोरात

‘तुम्हाला प्रत्येक विषयात स्वत:चे मत नसेल तर येथे प्रवेश नाही’ अशा इशार्‍यापासून ते ‘पगडीखालची खरी बुद्धिमत्ता काय असते हे पाहायचंय?’ असे आव्हान फक्त एकाच शहरात दिले जाऊ शकते, ते म्हणजे पुणे. ‘पुणेरी पाटी’ हे पुण्याचे एक व्यवच्छेदक लक्षण. सुरुवातीला पेठांमध्येच असलेली पुणेरी पाटी शहर पसरले तशी संपूर्ण पुण्यात पसरली. त्यामुळे डेक्कन जिमखान्यावरच्या एखाद्या बंगल्यासमोर गप्पांचा फड करणार्‍यांना रोखण्यासाठी लिहिले जाते की, ‘नारळाच्या झाडाखाली उभे राहू नये व कोणतीही गाडी उभी करू नये. नारळ पडून नुकसान झाल्यास मालक जबाबदार राहणार नाही.’
घरासमोर, दुकानांसमोर गाडय़ा उभ्या केल्याने वारंवार होणार्‍या कटकटींना कंटाळून एकाने सूचना लिहिली, ‘कृपया पार्किग समोरच्या बाजूला करावे.’ पण त्यामध्ये एक खास पुणेरी टोलाही दिला, की ‘सदर सूचना गाढवांसाठी नाही.’
हॉर्न बजाने की बिमारी अनेकांना असते. त्यासाठी एका पुणेकराने गाडीवर पाटीच रंगवून घेतली की, ‘आम्ही रस्त्यात मुक्काम करत नाही. कृपया हॉर्न वाजवू नये.’


नदीचे मूळ आणि ऋषीचे कूळ शोधू नये म्हणतात. तसेच पहिली पुणेरी पाटी लागली कधी हे शोधता येत नाही. पण शंभर वर्षाहून मोठी परंपरा आहे आणि पुणेकरांनी ती जाज्वल्य अभिमानाने जपलेली आहे. कमीत कमी शब्दांत समोरच्याचा जास्तीत जास्त अपमान करण्याची कला पुणेकरांनाच साधली आहे, असे म्हणतात. त्याचप्रमाणे कमीत कमी शब्दांत जास्तीत जास्त खवचट आशय व्यक्त करणारी पुणेरी पाटीही कोणी येरा गबाळा बनवू शकत नाही. त्यासाठी मुळा- मुठेचं पाणीच अंगी मुरलेलं असावं लागतं. 
पुणेरी पाटय़ा म्हणजे पुणेकरांसाठी अभिमानाचा वारसा. केवळ बुद्धिमत्ता नाही तर खास पुणेरी तैलबुद्धीतून पाटय़ांच्या माध्यमातून पुणेकरांचा स्पष्टवक्तेपणा आणि थेट भिडण्याची वृत्ती झळकते. पुणेकरांबाबत अनेक विनोद सांगितले जातात. अनेकदा पुणेकरांवर कोतेपणाचा आरोप होतो. ‘चहाची वेळ झाली’ असे म्हणत पाहुण्यांना बाहेरच्या खोलीत बसवून स्वयंपाकघरात जाऊन चहा पिणार्‍या पुणेकरांचे उदाहरण दिले जाते. यामध्ये अतिशयोक्तीही असते; पण तरीही हिशोबीपणा, व्यवहारीपणा आणि त्यासोबत थोडय़ातच समाधान मानताना उधळपट्टी करायची नाही, ही पुणेकरांची वृत्ती होती आणि आजही आहे. यामागची सामाजिक कारणेही महत्त्वाची आहेत. 
पुणे हे पूर्वीपासून सेवानिवृत्तांचे आणि विद्याथ्र्याचे शहर म्हणून ओळखले जाते. राज्यभरातून आलेल्या विद्याथ्र्याना पुण्याने आसरा दिला. माधुकरी मागून शिक्षण पूर्ण करून आयुष्यात स्थिरस्थावर झालेल्यांची संख्या मोठी आहे. त्याचबरोबर सेवानिवृत्तांचे शहर असल्याने भविष्याचा विचार करून कंजूषपणाचा आरोप झाला तरी चालेल; पण उगाच बडेजावासाठी पैसे खर्च करायचे नाहीत, ही वृत्तीही अंगी बाणलेली. वास्तविक हा गुण; परंतु इतरांनी आपला दिलदारपणा दाखविताना हा दुगरुण करून टाकला. या सगळ्या परिप्रेक्ष्यातून पुणेरी पाटय़ांकडे पहायला हवे. त्यामुळेच उत्स्फूर्तपणे सूचना देणे हा इथल्या जीवनशैलीचा भाग बनला आहे.
पुणेकर पाटय़ांमधून स्वतर्‍च्या व्यंगावर बोट ठेवण्याचे धाडस दाखवतो. खरे तर पुणेकरांची खिल्ली उडविणार्‍या 99.99 टक्के पाटय़ा पुणेकरांनीच तयार केलेल्या असतात. मार्मिक शब्दांत आशय व्यक्त करण्याची कला पुणेकरांच्या अंगी मुरलेली आहे. चपखल शब्दांमधून मार्मिक टिप्पणी झळकते. चेष्टा करावी तर त्यातही काही टॅलेंट असावे, ही दृष्टी पुणेरी पाटय़ांनीच दिली. खडूस, खत्रूड, खवचट व तरीही हवेहवेसे वाटणारे या पाटय़ांमधील शब्द अस्सल पुणेकरांची तैलबुद्धी दाखवतात व त्यांचा खास पुणेरी बाणाही!


जुने वाडे म्हणजे पाटय़ांचे उगमस्थान. त्याचबरोबर दुकाने, सोसायटय़ा, चौक, कट्टे, हॉटेलच्या अगदी तोंड धुण्याच्या जागा, रिक्षा, ट्रक एवढेच काय सार्वजनिक स्वच्छतागृहांवरही पाटय़ा दिसतात. गुदगुल्या करणार्‍या विनोदापेक्षा थोडे जास्त; पण बोचकारण्यापेक्षा थोडे कमी असे पाटय़ांचे संदेश असतात. वाचणार्‍याला आपल्या तिरकस व खोचक वाक्यामधून विचार करायला भाग पाडतात. केवळ नागरिकांनाच नव्हे तर शासन-प्रशासनालाही पाटय़ांतून सुनावले जाते. त्यामुळे अस्वच्छतेविरोधातील संतापावर येथे गांधीगिरी केली जात नाही, तर ‘हा आपल्या तीर्थरूपांचा जीना नव्हे, थुंकू नये’ असे म्हणून त्याच्या सवयीचे वाभाडेच काढले जातात. 
पाटय़ांचे कोठे म्हणून लक्ष नसते? त्यात महिलांना सुरक्षिततेची काळजी घेण्याबाबत कळवळा असतो. प्राणिप्रेमाच्या नावाखाली आपल्या श्वानांना उद्यानात फिरायला आणून नागरिकांना त्रास देणार्‍यांना थेट ‘शहाण्या कुत्र्याला वेडय़ा माणसाने कृपया मंदिर आणि गार्डन परिसरात आणू नये’ असे म्हणून कानशिलातच लगावलेली असते. मतांपुरते तोंड दाखवून नंतर गायब झालेल्यांनाच पुण्यात नुकताच ‘नगरसेवक हरवला आहे’ अशी पाटी लावून पुणेकरांनी चपराक दिली होती. ‘चि. नगरसेवक यांस, तू गेल्यापासून प्रभाग आजारी आहे, तरी लवकर प्रभागात ये - तुझी दुर्दैवी मतदार आई’ ही पाटी वाचून आता पुन्हा तोंड न दाखविण्याची त्या नगरसेवकाची हिंमत होणार नाही.  पुणेरी इरसाल पाटय़ा म्हणजे पुणेकरांचा अभिमान आहे. पुण्याची संस्कृती पुणेरी शैलीत खुमासदार पद्धतीने सांगणारे ते प्रतीक आहे. पुणेरी पाटय़ांच्या रूपाने होणारी मजेशीर रचना म्हणजे मधूनच बरसणारी आनंदाची सरच असते.
पुणेरी पाटी ही स्पष्टवक्तेपणाची आणि कोणाची भीडभाड न ठेवणारी आहे. समोरच्याला यात मान वाटतो आहे की अवमान, याची फिकीर ती करत नाही. कारण शेवटी हे पुणे 
आहे ! 
(लेखक ‘लोकमत’च्या पुणे आवृत्तीचे मुख्य उपसंपादक आहेत)

Web Title: Puneri Patya only Punekar's know how to make and deal with them

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.