फेरीवाले....पोलीस, नेते, हप्ते आणि खळ्ळखट्याक यांच्या पलीकडचं चित्र

By ऑनलाइन लोकमत on Sun, November 05, 2017 3:00am

मालाड, कांदिवली, दादर..सगळ्याच ठिकाणी रस्त्यांवर शुकशुकाट दिसत होता. एरवी नाना प्रकारच्या वस्तू, गजरे, भाज्या, कपडे, पिशव्या.. विकणाºया फेरीवाल्यांचा गजबजाट असतो. आज मुंबई. उद्या पुणे-नाशिक-नागपूरकडे हे फुटणारच आहेत फटाके. सगळंच अवघड आणि गुंतागुंतीचं. फेरीवाले, राजकीय नेत्यांना भेटत फिरलो. उत्तर सापडलं नाही, प्रश्नाचा गुंता तेवढा कळला. एका बाजूला सगळ्या फेरीवाल्यांना हाकला म्हणणारे लोक आणि दुसºया बाजूला हे लाखो फेरीवाले, त्यांचे संसार एकाचवेळी कोठे जाणार असा प्रश्नही!

ओंकार करंबेळकर

लहानशा तालुक्याच्या गावातला बाजारचा दिवस. फळफळावळ, कपड्यांची दुकानं, खेळणी आहेत म्हणून लहान पोरं बाजारात आली आहेत. मेंदी काढायला, बांगड्या भरायला, कानातलं, नाकातलं घ्यायला पोरी आल्यात; त्या आल्या म्हणून पोरंपण आली आहेत.. भर दुपारच्या वेळेस अचानक सन्नाटा तयार होतो. एक नुसताच काळाकभिन्न केसाळ हात हॅट उपडी ठेवतो. त्यात प्रत्येक दुकानदार भीतभीत पाच-दहा रुपयांच्या नोटा ठेवू लागतात. त्यात नेमका एक दुकानदार पैसे द्यायला नाकारतो आणि त्याच्या गाडीवरचं सामान उलटून दिलं जातं. मग त्या बिचाºया दुकानदाराला वाचवायला एखादा अनिल कपूरसारखा हीरो येतो. मग ढिश्श्यूमऽ ढिश्श्युमऽऽ होतं आणि हप्ता मागणाºया त्या दादाला हरवून हीरो त्याच्या भावी हिरोइनचं हृदय जिंकतो वगैरे.. हप्ता मागणारी अशी गुंडांची व्यवस्था केवळ सिनेमातच पाहिलेली होती. पण हे एकदा वरळीत थेटच पाहायला मिळालं. रोज रस्त्यावर फळांचे काप विकणाºया हातगाडीसमोर एक गाडी थांबली. फेरीवाल्याने सराव असल्याप्रमाणे एक प्लेट कापलेली फळं काळ्या पिशवीत घालून त्या वर्दीवाल्या हातात दिली. ती घेऊनसुद्धा पुन्हा ‘और एक’ अशी करकरीत आज्ञा त्याला मिळाली. त्याने पुन्हा तोच निमूटपणा कायम ठेवत आणखी एक डीश बांधून दिली. यामध्ये ती फळे देणाºयाला, घेणाºयाला किंवा इतर ग्राहकांना काहीच गैर वाटलं नव्हतं. हप्त्याचा हा प्रकार नंतर डिलाईल रोडवरच्या चहावाल्याशी बोलतानाही समजला होता. डिलाईल रोड हा परिसरच मुळी कोल्हापूरच्या लोकांचा. त्यांनी इथं तालीमसुद्धा सुरू केलीय. त्यामुळे तेथे दादागिरी करून हप्ते गोळा करण्याचा प्रश्न नव्हताच; पण पोलीस आणि पालिकेला हप्ते द्यायला लागतातच असं तिथल्या चहावाल्यानं सांगितलेलं. ‘जाणार कुठं आम्ही? पर्याय नाही म्हणून आम्हाला हे करावं लागतं, हप्ते द्यायचे आणि दुकान चालवायचं. चांगलं शिकलो असतो तर हे करायची वेळ आली नसती’, हे त्याचे शब्द कायम डोक्यात राहिलेले. मुंबई, पुणे, नागपूर, दिल्ली असो वा भारतातलं कोणतंही शहर. फेरीवाले हा त्या शहरांचा अविभाज्य अंग झाले आहेत. पण गेल्या काही दिवसांमध्ये या फेरीवाल्यांचा प्रश्न उफाळून आला किंवा तसा तो आणला गेला आणि शहरातले वातावरण नव्याने भडकलं. पुन्हा त्याला मराठी-अमराठीचा रंगही दिला आहेच. एलफिन्स्टनची चेंगराचेंगरी झाल्यावर अचानक मुंबईत गर्दी जास्त झालीय असं भासवायला सुरुवात झाली. मग या चेंगराचेंगरीचं उत्तर मूळ नियोजनातल्या चुका आणि वेळच्यावेळी कामं पूर्ण न करणं हे असलं तरी त्याचं वरवरचं उत्तर शोधायचा प्रयत्न सुरू झाला. त्या प्रयत्नामध्ये सापडले ते फेरीवाले. ‘हटवा या सगळ्या लोकांना!’ असं सांगत त्यांना हटवणं चालू झालं होतं. मालाडमध्ये फेरीवाल्यांना हटवणाºया मनसैनिकांवरच हल्ला झाला, त्यात मालाडचे त्यांचे विभाग अध्यक्ष सुशांत माळवदे जबर जखमी झाले होते.

माळवदेंचे कांदिवलीच्या आॅस्कर हॉस्पिटलातील फोटो बघून त्यांना भेटायचं ठरवलं. मुंबईतल्या इतर स्थानकांच्या भोवती लोकांची, फेरीवाल्यांची गर्दी असते तशीच पश्चिम मुंबईतल्या स्टेशनांवरही असायची. पण कांदिवलीला उतरल्यावर एकदम शुकशुकाट दिसला. समोरच पोलिसांच्या गाड्या आणि पालिकेच्या गाड्या उभ्या केल्या होत्या. हॉस्पिटलकडे जाताना रिक्षावाल्याला विचारलं सगळे फेरीवाले गेले कुठे? तर त्याने समोरच्या पालिकेच्या गाडीकडे हात केला. म्हणाला, ‘ये है ना अब, इनको देखके कोई नही आयेगा’! परवा मालाडला मारामारी झाली कळलंय का विचारल्यावर तो एकदम जोरजोरात बोलायला लागला. मी आॅस्करमध्ये का जातोय हे माहिती नव्हतं त्यामुळे बोलू लागला, ‘अभी आप जिस हास्पिटलमे जा रहे हो वहीपे उसको रखा हे, भोत मारा उसको फेरिवालोंने. मजबूत मारा. १०००, ५०० लोग एकदमसे आ गये सामने और उन्होंने मारा तो बहोतही होगा ना..’ रस्त्याच्या दोन्ही बाजूला लावलेल्या गाड्या. त्यामुळे आधीच अरुंद झालेले रस्ते आणि मधोमध सुरू असलेलं मेट्रोचं काम यामुळे शहरातले सगळेच रस्ते चिंचोळे झाले आहेत. कांदिवलीत तेच होतं. त्यातून वाट काढत आॅस्करला गेलो तर माळवदेंना तेथे दाखल केलं असल्यामुळे बाहेर पोलिसांच्या गाड्या होत्याच. हॉस्पिटलच्या समोरही रस्त्याच्या दोन्ही बाजूला गाड्या लावल्या होत्या आणि खालच्या गाळ्यांमधील दुकानांनीही इंच इंच पुढे सरकत फुटपाथवर आक्रमण केलं होतं. माळवदेंना भेटायला वेगवेगळ्या पक्षांचे नेते येत असल्यामुळे थोडा बंदोबस्तही होता. मी गेलो तेव्हा माळवदे विश्रांती घेत होते. तिशी-पस्तिशीतले माळवदे. त्यांच्या वडिलांचा गारमेंटचा आणि पत्नीचा ब्यूटिपार्लरचा व्यवसाय आहे. परवाच्या मारामारीत त्यांच्या डोक्यावर वीस टाके पडले होते आणि उजव्या हाताचं हाड मधोमध तुटलं होतं. त्यामुळे त्या हातावर जाडजूड प्लास्टर घातलेलं. बरोबरचा कार्यकर्ता म्हणाला, ‘पाठीवरपण काठ्या ओढल्यामुळे तिथे मुका मार लागलाय.’ एक-दोन मिनिटं त्यांना बघून बाहेर पडलो आणि त्यांच्या खाली उभ्या राहिलेल्या कार्यकर्त्यांना भेटलो. परवाच्या मारामारीमुळे सगळे आणखीच तापलेले आणि एकदम चार्ज झालेले. उत्तर मुंबईत आजही अनेक ठिकाणी आठवडा बाजारासारखा एक दिवस ठरवलेला असतो. असं सगळ्याच उपनगरात झालं तर लोकांना सातही दिवस त्रास होण्याऐवजी एकाच दिवशी होईल आणि फेरीवाल्यांनाही दररोज वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन धंदा करता येईल असं त्यांचं मत होतं. एवढ्यात माळवदेंचे वडील जेवणाचा डबा घेऊन वरती गेले. मी म्हटलं, हे सगळं जखमा, डोकं फुटणं.. यामुळे त्यांच्या घरच्यांना भीती नाही का वाटली. ‘अर्थात! वाटणारंच. पण हे काम करताना असे प्रसंग येणारंच याची आम्हाला जाणीव आहे; पण आम्ही घाबरत नाही. यापुढेही आम्ही घाबरणार नाही, लढत राहणारच.’ - हल्ल्यामुळे या लोकांच्या निर्धारात अजिबात बदल झाला नव्हता. त्यांचं बोलणं ऐकत असतानाच त्या भागाचे खासदार गोपाळ शेट्टी मालाडमध्ये येत असल्याचं कळलं म्हणून त्यांना भेटून राजकीय नेते फेरीवाल्यांचं नक्की काय करणार आहेत ते विचारायचं ठरवलं. गोपाळ शेट्टींच्या मते मार्केटसाठी राखीव जागांवर झोपड्या उभ्या राहणं किंवा तयार मार्केटमध्ये गरजूंना जागावाटप न झाल्यामुळे फेरीवाल्यांच्या प्रश्नानं उग्र स्वरूप धारण केलंय. राजकीय पक्षांमध्ये असणारे मतभेद, दूरदृष्टीचा अभाव, अधिकाºयांची बेजबाबदार वृत्ती आणि पालिका ही सगळी फेरीवाला प्रश्न तापण्याची कारणं आहेत असं त्यांनी बोलता बोलता मान्यच केलं. ‘हप्तेखोरी इज ए ओपन सिक्रेट’ असं म्हणत त्यांनी आपलं मत मांडलं, ‘‘कोणीही आलं आणि कोठेही बसून धंदा सुरू केला असं आता कोणत्याही शहरात चालणार नाही. फेरीवाल्यांना सकाळी १० ते दुपारी ४ या गर्दी नसलेल्या वेळेत जागा आखून देता येतील. लोकांनाही एकाचवेळी भाज्या-फळं रोज लागणार आहेत; पण ते (फेरीवाले) त्यांना डोळ्यांसमोर नको आहेत. फेरीवाल्यांनी आत येऊ नयेत, असे बोर्ड सगळ्या सोसायट्यांनी लावलेत. वस्तू हवी, पण फेरीवाले नको अशी स्थिती शहरांमध्ये तयार झाली आहे, त्यामुळे फेरीवाल्यांची योग्य व्यवस्था करायला हवी.’’ कांदिवलीप्रमाणे मालाडच्या स्टेशनबाहेरही शुकशुकाट होता. रोजचे फेरीवाले गायब झाले होते आणि पालिकेच्या व पोलिसांच्या गाड्या बंदोबस्तासाठी लावलेल्या दिसत होत्या. पण फेरीवाल्यांसारखाच किंवा त्याहून जास्त अडथळा निर्माण करणारं रस्त्यावरचं पार्किंग कोणालाच कसं दिसत नव्हतं याचं आश्चर्य वाटत होतंच. मालाड स्टेशनजवळच्या फेरीवाल्यांपैकी कोणालातरी भेटायचं होतं; पण ते सगळेच गायब झाले होते. दुसºया दिवशी त्यांचा दादरला मोर्चा होता म्हणून तिकडेच कोणी फेरीवाले भेटतील असा विचार करून दुसºया दिवशी दादरलाच सकाळी गेलो.

दादर. सगळ्यांसाठी रोजचं एकदम घाईगर्दीचं स्टेशन. मध्य आणि पश्चिम अशा उड्या मारायचं हे लाखो लोकांचं ठिकाण. त्यात लांबवर जाणाºया गाड्या पकडण्याचीही इथंच गर्दी उसळलेली असते. पण इथंही तोच मालाड-कांदिवलीवाला शुकशुकाट होता. मोर्चा निघणार म्हणून पक्का बंदोबस्त होता. एरव्ही नाना प्रकारच्या वस्तू, गजरे, फुलं, भाज्या, कपडे, पिशव्या विकणारी माणसं स्टेशनपासून १५० मीटरच नाही तर त्याच्याही बाहेर दिसत नव्हती. (स्टेशनपासून १५० मीटर अंतरावर फेरीवाल्यांनी बसू नये, असा नियम आहे.) पण नेहमीच्या पुस्तक विक्रेत्यांच्याजवळ दिसणाºया, मोडवलेली कडधान्यं विकणाºया राधाबाई तेवढ्या एकट्याच फुटपाथवर दिसल्या. कडधान्य भिजत घातलेल्या एकदोन प्लॅस्टिकच्या बादल्या, छत्री, बुट्ट्या, ट्रे असं सामान कोपºयात ठेवून त्या पिटुकल्या स्टुलावर बसल्या होत्या. तुम्ही एकट्या बºया बसलात असं विचारताच त्यांनी एकदम पट्टाच सोडला, ‘‘अरे पोरा आम्ही इथं ७० वर्षे बसतोय, मराठीच आहे. आधी मिस्टर बसायचे आता मी. विचार वाटल्यास दुकानात (असं म्हणून त्यांनी मागच्या दुकानाकडे हात केला.) आम्हीपण मराठीच आहोत. फुटपाथ विकणारे आणि विकत घेणारे वेगळेच आहेत, त्यांना कसं काय कोणी विचारत नाही. सकाळी अंधेरीवरून साडेपाचला निघते. हॉटेलांना माल लागतो, तो द्यायचा आणि दुपारी बारापर्यंत निघायचं, हे बघ या डाळिंब्या संपल्या की मी जाणार.’’ पण तुम्हाला भीती वाटत नाही का कारवाईची आता? ‘‘मी का घाबरू? उचला पाहिजे तर मला. कोण आहे माझ्यामागे रडायला. या दिवाळीत गिºहाईकांनीच मला पाच साड्या आणून दिल्या. त्यात काढणार हे वर्ष. मला कसली काळजी आहे आता. पोलीस काय थोडे पैसे घेत असतील तेवढंच, घेऊ देत सगळ्यांनाच पोट आहे. मिस्टर गेले म्हणून मी हे काम करतेय. एकेकाळी मिस्टर कल्याणवरून रोज तीन-चार ‘डाग’ माल आणायचे. आता मला पोरगा नाही मग पोट भरायला हे काम करायलाच हवं. चार पोरी आहेत; पण त्या लग्न होऊन गेल्या. मी काहीही झालं तरी भीक मागणार नाही की हात पसरणार नाही.’’ बोलता बोलता त्यांनी दोन-चारवेळा ‘चहा घेणार?’ असं विचारलं आणि चहाचा आग्रह सुरूच ठेवला.

हे चालू असताना अचानक जवळच्या मॉलपासून जोरजोरात आवाज येऊ लागला. दोन राजकीय पक्ष एकमेकांच्या समोर येऊन घोषणा देत होते. एक पक्ष फेरीवाल्यांच्या बाजूने, तर दुसरा त्यांच्याविरोधात. अचानक घोषणा सुरू झाल्या, बटाटे भिरकावले गेले आणि थोडी धक्काबुक्कीच सुरू झाली. पोलिसांनी दोन्ही गटांना आवरलं आणि त्यांना ताब्यात घेऊन गाड्या भरून घेऊन गेले. हे सगळं पाहायला दोन्ही बाजूंना लोकही जमले होते. बघ्यांना पांगवणंही एक कामचं झालं होतं. काही वेळातच रस्ता पुन्हा मोकळा झाला आणि वाहता झाला. संध्याकाळी मुंबईतल्या वेगवेगळ्या हॉकर्स संघटनांचा आझाद मैदानावर मोठा मोर्चा निघाला. तेथेही घोषणा आणि मागण्या, विरोध, निषेध वगैरे तेच झालं. दोन दिवस फेरीवाले, राजकीय नेत्यांना भेटून झालं होतं. कोण चूक कोण बरोबर हे ठरवण्यापेक्षा आता यावर कोणताच उपाय नाही का? एका बाजूस सगळ्या फेरीवाल्यांना हाकला म्हणणारे लोक होते तर दुसºया बाजूस लाखो लोक एकाचवेळी कोठे जाणार, असा प्रश्नही होताच. म्हणून नगरनियोजनाच्या अभ्यासक सुलक्षणा महाजन यांना फोन लावला. गेली तीस ते पस्तीस वर्षे शहर नियोजनासाठी त्या अभ्यास व वेगवेगळ्या समित्यांवर काम करत आहेत. पण नियोजनात राजकारण्यांना फारसा रस नसतो हे मत त्यांच्या अनुभवातून तयार झालेलं आहे. त्यामुळे अलीकडे सुलक्षणाबाई साधारणत: स्पष्टपणे सगळ्यांना आडव्या-तिडव्या सुनावतात. त्यामागे ढिम्म व्यवस्थेचा आलेला राग असतो. फेरीवाल्यांचा प्रश्न सोडवायचा कसा असं त्यांना फोनवर विचारल्यावर त्या बोलायला लागल्या, ‘‘आपल्याकडे कोणत्याही राजकारण्याला अभ्यास करायला नकोय, किती फेरीवाले आहेत, त्यांचं वर्गीकरण केलंय का कोणी? हकालपट्टी, दमदाटी किंवा राजकारणाने प्रश्न सुटत असते तर सगळेच प्रश्न सुटले असते की. फेरीवाला धोरण, फेरीवाला समिती, कोर्टात व्यवस्थित बाजू मांडणे या पातळीवर कोठेही कधीच गांभीर्याने विचार केला गेला नाही. काहीतरी घटना घडल्याशिवाय ‘प्लॅनिंग’ या शब्दाची कोणालाही आठवण होत नाही. रेल्वेस्थानकाच्या दोन्ही बाजूस ट्रान्झिट ओरिएंटेड डेव्हलपमेंट व्हावी यासाठी कितीतरी आधीच तज्ज्ञांनी मतं मांडली आहेत, नियोजनाचे आराखडे दिले आहेत; पण त्याचा विचार करायला कोणाला वेळ नाही. आपल्याकडे ९१ टक्के लोक ‘इन्फॉर्मल सेक्टर’मध्ये काम करत आहेत. चणे-फुटाणे विकणारा असा कितीसा नफा मिळवत असेल? एलफिन्स्टनच्या चेंगराचेंगरीचा आणि फेरीवाल्यांचा किती संबंध होता हे शोधलंय का कोणी? फेरीवाले ‘इझी टारगेट’ म्हणून यात सापडले आहेत. रस्त्यात पार्किंग करणाºयांबद्दल कधी कोणी बोलतंय का?’’ महाजनांचं म्हणणं पटत होतं; पण त्यांच्या प्रश्नांची उत्तरं नव्हती माझ्याकडे. आज मुंबईत अडीच लाख फेरीवाले आहेत आणि त्यांच्या कुटुंबात प्रत्येकी चार माणसं धरली तरी साधारण १० लाख लोक रस्त्यावर वस्तू विकून जगत आहेत. त्या वस्तू सर्वांना रोज लागतात हा विचार डोक्यात घोळवतच स्टेशनवर उतरलो, नेहमीच्या बार्इंकडून भाजी घेतली आणि घरी गेलो.

(लेखक ऑनलाइन लोकमतमध्ये उपसंपादक आहेत.)

संबंधित

संतप्त फेरीवाल्यांची डोंबिवलीत महापालिकेवर धडक 
पालिकेत तक्रार दिली म्हणून फेरीवाले करताहेत दादागिरी
आठवडाभर फेरीवाले हद्दपार; केडीएमसीची कारवाई
दोन तासांतच फेरीवाल्यांनी मांडले पुन्हा बस्तान!
मुंबईकर फेरीवाला

मंथन कडून आणखी

गोदावरी नांदेडमध्ये धोक्याच्या काठावर !
अध्यात्मिक; देशाच्या प्रतिष्ठेसाठी सुसज्ज रहायला हवे
अकोल्यात शॉर्ट फिल्मच्या हरिश्चंद्राची फॅक्टरी
पुन्हा राम..
मेट्रो ३ : मुंबईच्या पोटातली कालवाकालव

आणखी वाचा