- अपर्णा वाईकर


चिनी आणि भारतीय सणांत बरंचसं
साम्य असलं, तरी मानसिकतेत
मात्र काहीसा फरक आहे.
सरकार जे काही करतंय
ते आपल्या भल्यासाठीच,
यावर त्यांचा ठाम विश्वास.
त्यामुळे विकासासाठी सरकारनं
घरादारावर नांगर फिरवला तरी
त्यालाही त्यांचा पाठिंबाच असतो.
भावनांचा गुंता न करता ते सहज
दुसऱ्या ठिकाणी राहायला जातात.
काही लोकं तर मला असे भेटले,
ज्यांचं घर सरकारनं पाडलं नाही,
म्हणून त्यांना खूप दु:ख झालं !

चायनीज नवीन वर्षाच्या सुट्या नुकत्याच संपल्या आहेत. हे नवीन वर्ष म्हणजे इअर आॅफ रूस्टर आहे. यांच्याकडे बारा वर्षांना बारा प्राण्यांची चिन्हं असतात. त्या-त्या वर्षी जन्माला आलेल्या व्यक्तीचं ते चिन्ह असतं. आपल्याकडे जशा राशी आहेत काहीसं तसंच. त्यातही ‘ड्रॅगन’च्या वर्षात जन्माला आलेले लोक फार भाग्यवान असतात असं मानलं जातं. या ‘ड्रॅगन’च्या वर्षात लग्न केलं, घर घेतलं, नवं काम सुरू केलं तर ते सगळंच खूप चांगलं मानलं जातं. त्यामुळे २०१२ मध्ये जेव्हा ‘ड्रॅगन’चं वर्ष होतं त्यावर्षी सर्वांत जास्त लग्नं लागली आणि चीनच्या लोकसंख्येतही वाढ झाली. तसंच ‘टायगर’च्या वर्षात लोक लग्नं करत नाहीत. त्यावर्षी झालेली लग्नं टिकत नाहीत अशी समजूत आहे. 
बऱ्याच पद्धतींमध्ये मला त्यांच्यात आणि आपल्यात साम्य दिसलं. आता काही दिवसांनी एप्रिल महिन्यात त्यांचा ‘चिंग मिंग फेस्टिव्हल’ असतो. याला ‘टूंब स्वीपिंग डे’ असंही म्हणतात. आपल्या पितरांना पुरलेल्या ठिकाणी जाऊन तिथे साफसफाई करतात. त्यांना आवडणारे पदार्थ आणि काही वस्तूसुद्धा तिथे नेऊन ठेवले जातात. नंतर या पितरांसाठी प्रार्थना केली जाते. आपल्या सर्वपित्री अमावास्येसारखीच ही पद्धत आहे. आपल्या पितरांना, त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी हीच भावना यामागे असते.
बहुतेक वेळा जून महिन्यातला ‘ड्रॅगन बोट फेस्टिव्हल’ किंवा ‘द्वान वू जीए’ हा सण जवळपास २००० वर्षं जुना आहे असं लोक सांगतात. ‘चू यु आन’ नावाच्या एका महान कविवर्यांच्या आठवणीत हा दिवस साजरा होतो. त्यांनी जलसमाधी घेतली होती. यादिवशी काही ठरावीक तलावांमध्ये, नद्यांमध्ये बोटींची शर्यत होते. या बोटी ‘ड्रॅगन’च्या आकाराच्या आणि निमुळत्या असतात. आपल्याकडे केरळमध्ये अशा बोटींची शर्यत दरवर्षी होते. या दिवसासाठी इथे ‘झोंग झं’ नावाचे भाताने बनवलेले आणि बांबूच्या पानांत गुंडाळून उकडलेले डंपलिंग्ज हे लोक खातात. आपल्याकडे जसा प्रत्येक सणाचा पदार्थ ठरलेला आहे तसाच काहीसा प्रकार इथेही दिसतो. यांचा ‘मिड आॅटम फेस्टिव्हल’ किंवा ‘चाँग चू जीए’ हा मला आपल्या ‘कोजागरी पौर्णिमे’ची आठवण करून देतो. आपल्या कोजागरीच्या बरोबर एक महिना आधीच्या पौर्णिमेला हा सण असतो. याला मून फेस्टिव्हल असंही म्हणतात. या दिवशी सगळ्यांना सुटी असते. या रात्री सगळे परिवारातले लोक एकत्र जमतात. पूर्ण चंद्रकलेप्रमाणेच पूर्ण परिवाराचं एकत्र सेलिब्रेशन असतं. या दिवशी ‘मून केक’ हा पदार्थ चंद्रप्रकाशात आपल्या जवळच्या लोकांबरोबर बसून खातात. गाणी म्हणतात. शक्य असेल ते लोक नदी किंवा तलावाकाठी जमून स्वच्छ चंद्रप्रकाशाचा आनंद घेतात. या दिवशी पाण्यावरचे आॅपेरा शोजसुद्धा काही ठिकाणी केले जातात. या नृत्यप्रकारात वेगवेगळ्या बोटींवर बसून किंवा पाण्यातील स्टेजवर एखादी खूप जुनी प्रेमकथा रंगवली जाते. खूप सुंदर असा हा नृत्यप्रकार आहे. मून केक म्हणजे एक अत्यंत चविष्ट पदार्थ आहे. ‘युए’ म्हणजे चंद्र आणि ‘बिंग’ म्हणजे बिस्किट किंवा केकचा प्रकार. हा अगदी छोटा गोल चंद्राच्या आकाराचा केक असतो. याच्या आत कमळाच्या बियांचं किंवा सुक्या मेव्याचं सारण असतं.
१ ते ४ आॅक्टोबर या कालावधीत तिथे नॅशनल डे साजरा केला जातो. आपल्या प्रजासत्ताक दिनाला जशी दिल्लीमध्ये धामधूम असते तशीच इथे त्यावेळी बिजिंगमध्ये असते. इथले लोक डिसेंबरमध्ये बऱ्याच प्रमाणावर ख्रिसमस साजरा करताना दिसतात. मला आधी आश्चर्य वाटलं होतं हे बघून. पण मग लक्षात आलं की बरेच लोक ख्रिश्चन धर्म पाळतात. मी इथे आले तेव्हा माझी अशी कल्पना होती की या देशात सगळेच लोक केवळ बौद्ध धर्म पाळतात. पण हळूहळू माहिती होत गेली. केवळ पाचच धर्म पाळण्याची परवानगी चीनमध्ये आहे. ज्यावेळी इथे कम्युनिस्ट पार्टीची स्थापना झाली त्यावेळी जे पाच धर्म अस्तित्वात होते ते पाचच धर्म आपल्या देशासाठी पुरेसे आहेत असा निर्णय चीनने त्यावेळी घेतला आणि तो आजही पाळला जातोय. यात प्रामुख्याने बुद्धिझम, ख्रिश्चनिझम, इस्लाम हे आहेत. थोड्याफार प्रमाणात ताओइझम आणि प्रोटेस्टॅण्टीझमही दिसतात. बौद्ध धर्म हिंदू धर्मासारखाच असल्यामुळे इथे हिदू धर्माला वेगळी मान्यता नाही. सगळीकडे मोठमोठी बुद्धाची मंदिरं दिसतात. यांतून गौतम बुद्धाच्या आणि त्यांच्या प्रमुख अनुयायांच्या मूर्ती ठेवलेल्या असतात. शांघायमध्ये ‘जिंग आन बुद्धा टेंपल’ नावाच्या देवळात प्रवेशद्वारासमोर भलामोठा सोनेरी ‘अशोक स्तंभ’ आहे. तसंच ‘वूशी’ नावाच्या गावात भली मोठी उभ्या बुद्धाची मूर्ती उभारली आहे. या मूर्तीच्या आजूबाजूला अनेक देवळं, म्युझियम्स आणि बगिचे आहेत. यापैकी एका म्युझियमच्या थिएटरमध्ये सिद्धार्थ गौतमाच्या गोष्टीचं नाट्य रूपांतर दाखवलं जातं. २० मिनिटांचं हे नाटुकलं हा आम्हाला खूप सुखद अनुभव होता. असं काही चीनमध्ये बघायला मिळेल त्याची कल्पनासुद्धा मी कधी केली नव्हती. लहानपणी ऐकलेली सिद्धार्थ गौतमाची गोष्ट आम्हाला चीनमध्ये नाट्यस्वरूपात बघायला मिळाली. या देशात इस्लामला मान्यता असल्यामुळे क्वचित काही चिनी डोक्यावर जाळीच्या टोप्या घातलेले दिसतात. प्रामुख्याने हे लोक लहान लहान उपाहारगृहे चालवताना किंवा सुका मेवा विकताना दिसतात. चीनमध्ये कम्युनिझम आहे, लोकशाही नाही. हे फायद्याचं की तोट्याचं, यावर भरपूर वाद आहेत. परंतु मला याचे जे फायदे दिसतात ते असे की, सरकारच्या कुठल्याही धोरणाला, नव्या योजनेला लोक विनाकारण विरोध करत नाहीत. सरकार जे करेल ते आपल्या भल्यासाठीच असेल असा लोकांचा ठाम विश्वास आहे. याचं एक उदाहरण म्हणजे शांघायमध्ये नवे रस्ते, फ्लायओव्हर्स बांधताना खुप जुनी घरं, दुकानं पाडून टाकावी लागणार होती. पण यासाठी त्या घरात राहणाऱ्या लोकांनी विरोध केला नाही. कारण खूप विचार करायला लावणारं आहे. या लोकांना सरकारने दुसऱ्या ठिकाणी नवी घरं, दुकानं बांधून दिली आणि ती जुनी जागा सोडण्यासाठी भरपूर पैसेही दिले. हे बघून माझ्या मनात आलं, नवं घर मिळालं, पैसा मिळाला हे सगळं ठीक आहे; पण त्या जुन्या जागेशी असलेल्या भावनिक नात्याचं काय? जिथे आपण लहानाचे मोठे झालो किंवा ज्या वास्तूत आपण लग्न होऊन राहायला आलो त्या वास्तूशी आपलं एक नातं असतं. आपल्या खूप आठवणी त्या जागेशी जोडलेल्या असतात. पण इथल्या लोकांना त्याचा तसा त्रास होताना दिसला नाही. याचं कारण कदाचित हे असेल की त्यांना लहानपणापासूनच ‘जमीन’ ही सरकारच्या मालकीची आहे आणि त्यावर आपला स्वत:चा काहीही हक्क नाही याची कल्पना आणि सवयही आहे. म्हणूनच अगदी सहज, काहीही विरोध न करता हे लोक नव्या जागेत राहायला जातात. गंमत म्हणजे आमच्या वाहनचालकाच्या घराच्या थोड्या दुरून हा फ्लायओव्हर गेल्यामुळे त्याचं घर पाडलं गेलं नाही या गोष्टीचं त्याला वाईट वाटलं. त्याचं म्हणणं आहे की माझं घर खूप जुनं झालंय, ते पाडून नवं बांधायला माझ्याजवळ एवढे पैसे नाहीत. सरकारनेच जर ते पाडलं असतं तर बरं झालं असतं. पैसाही मिळाला असता आणि नवं घरही मिळालं असतं.
काय गंमत आहे बघा! विरोध करणारे मोर्चे काढणं तर सोडाच, पण ही माणसं उलट आपलं जुनं घर पाडायला कुणी येतंय का याची वाट बघतात. सरकार ज्या सुधारणा करतंय त्यांना विरोध न करता पूर्णपणे सपोर्ट करण्याची या लोकांची वृत्ती खरोखर वाखाणण्यासारखी आहे. कदाचित म्हणूनच या देशाची इतकी प्रगती आणि विकास झालेला आहे. समृद्धीच्या मार्गावर हा देश याच कारणांमुळे अग्रेसर आहे.

 

 

(लेखिका शांघायमध्ये वास्तव्याला आहेत.)