ग्रामपंचायतीत सरपंच आहेत पण सदस्यच नाहीत. असं कसं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 03:00 AM2018-06-17T03:00:00+5:302018-06-17T03:00:00+5:30

सदस्य पदासाठी ना कोणी उभे राहिले, ना निवडून आले.. अशा अवस्थेत महाराष्ट्रातल्या अनेक ग्रामपंचायती सध्या लोंबकळत पडल्या आहेत. अहमदनगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यातून प्रवास करताना दिसलेले लोकशाहीचे एक ‘विपरीत’ चित्र!

Panchayat Raj. Only Sarpanch. No Member. New problem | ग्रामपंचायतीत सरपंच आहेत पण सदस्यच नाहीत. असं कसं?

ग्रामपंचायतीत सरपंच आहेत पण सदस्यच नाहीत. असं कसं?

Next

-साहेबराव नरसाळे

 

एका सरपंचपदासाठी पाच-सहा जणांचे अर्ज, तर सदस्यपदासाठी एकही उमेदवार नाही़ एका गावात तर फक्त सरपंच निवडून आलाय़ बाकी सदस्यांच्या सर्व जागा रिक्त़ काही ग्रामपंचायतींमध्ये सरपंच आणि सदस्यांच्या दोन-तीन जागा बिनविरोध निघाल्या; पण इतर जागांवर उमेदवारच नाहीत, असे चित्र सध्या महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दिसते आहे.
जुलै २०१७मध्ये सरपंच थेट जनतेतून निवडण्याचा निर्णय झाल्यानंतर निर्माण झालेल्या या विचित्र परिस्थितीचे एक उदाहरण म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुका. या आदिवासीबहुल तालुक्यातील दहा ग्रामपंचायतींच्या निवडणुका नुकत्याच झाल्या़ तब्बल २७ जागांवर एकही उमेदवार निवडणुकीला उभा नव्हता़ सध्या या सर्व जागा रिक्त आहेत आणि आता या ग्रामपंचायतींमध्ये सत्ता स्थापन कशी करायची, सरपंचाला पदभार द्यायचा का, असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत़ निवडणूक विभागाकडेही याचे अजून तरी उत्तर नाही़

आदिवासी भागातच अशी परिस्थिती का ओढवली, हे जाणून घेण्यासाठी अहमदनगरहून ११५ किलोमीटरचा प्रवास करून अकोले गाठले़ निळवंडे धरणाचे तोंड डाव्या बाजूला सोडून धरणाला वळसा घालत दिगंबर गावाच्या दिशेने रस्ता धावत होता. टळटळत्या उन्हात १३५ किलोमीटरचा प्रवास झाल्यावर टिंबाएवढे गाव अखेर सापडले, मग कळले, हेच ते दिगंबर!
ग्रामपंचायत होती झकपक. पण बंद. एका तरुणाला म्हटले, कधी उघडते ग्रामपंचायत, तर तो थोडा विचार करून म्हणाला, ‘आठवड्यातून एकदा.’ त्यानेच तातडीने पंचायतीच्या शिपायाला फोन लावून दिला. पत्रकार नावाचा कुणी आलाय म्हटल्यावर तो म्हणाला, येतोच लगेच. आणि आलाही. ग्रामपंचायत कार्यालय उघडले़ बाहेरून जसे आकर्षक तसेच आतूनही़ महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र टॉयलेट़ ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहायक, सरपंच अशा सर्वांसाठी स्वतंत्र दालने़ एक छोटेखानी मिटिंग हॉल़ मी अनेक ग्रामपंचायती पाहिल्या़ पण कोठेही कृषी सहायकासाठी स्वतंत्र कार्यालय पाहिले नाही, ते इथे होते. ग्रामपंचायत गेल्या अनेक दिवसांपासून उघडलीच नसावी, असे आतल्या धुळीवरून जाणवत होते़ खुर्च्यांवर, टेबलावर धुळीचे थर साचलेले.

या दिगंबर गावाचीही कहाणीच आहे. अकोले तालुक्यात निळवंडे धरण बांधण्याचा निर्णय झाला़ त्यावेळी पहिला हातोडा पडला दिगंबर गावावऱ वाड्या-वस्त्या तेव्हढ्या वाचल्या़ गावातील मोठी लोकसंख्या विस्थापित झाली़ जे वाड्या-वस्त्यांवर राहत होते, त्यांच्यासाठी गावठाण हद्दीत अद्ययावत ग्रामपंचायत उभी राहिली़ ग्रामपंचायतीच्या तीन-चार किलोमीटर अंतरात अवघी पंधरा-सोळा घरे़ तिही विखुरलेली़ गावात नुकतीच सार्वत्रिक निवडणूक झाली़ ग्रामपंचायत मंडळ सात जणांचे आहे आणि निवडणूक फक्त सरपंचपदाची झाली़ सरपंचपदासाठी एकूण पाच उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात उतरले, तर सदस्यपदासाठी एकही अर्ज दाखल झाला नाही़ सगळ्या सात जागा रिक्त़ गावात एकूण ८२५ मतदाऱ मतदान झाले ४२५़ त्यातील १५१ मते घेऊन लक्ष्मी सहादू खडके सरपंच झाल्या़ अठ्ठावीस वर्षीय लक्ष्मी एम.ए. शिकलेल्या आहेत़ दिगंबर गावातील सर्वांत तरुण आणि शिक्षित सरपंच असा बहुमान लक्ष्मी यांच्या नावावर आहे़ पण एकही सदस्य निवडला गेला नाही़ त्यामुळे सदस्य मंडळ स्थापन होऊ शकत नाही.
दिगंबर गावठाणसहित आता एकूण पाच वाड्या अस्तित्वात आहेत़ त्या सगळ्या दूरदूर विखुरलेल्या. गाव चिमुकले, पण ते अख्खे फिरायचे, तर निळवंडे धरणाला पूर्ण वळसा घालावा लागतो़ गावात साधे किराण्याचेही दुकान नाही़ गावच्या माळवाडीत नवनियुक्त सरपंच लक्ष्मी खडके राहतात़ काट्या-कुट्याचा, दगडधोंड्याचा रस्ता तुडवित सरपंचांच्या घरी पोहोचलो़ तर सरपंचताई शेतीत काम करीत होत्या़ त्यांचे पती मोटार बिघडली म्हणून ती दुरुस्त करण्यासाठी निळवंडे धरणावर गेले होते़ सरपंच ताई जुजबी बोलल्या तोवर त्यांचे पती सहादू आलेच. एम.ए़,बी.एड़ शिकलेले आहेत़ नोकरीसाठी प्रयत्न केले़ पण लाखो रुपये भरण्याची ऐपत नव्हती, म्हणून तेही आधुनिक शेतीत रमले़

सर्व गावच अनुसूचित जमाती प्रवर्गातील़ ठाकर आणि कोळी या दोनच जमाती गावात आहेत़ ग्रामपंचायतीच्या सर्व जागा अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत़ लक्ष्मी यांना सरपंचपदासाठी उभे करण्याचा निर्णय झाला. लक्ष्मी यांची जात पडताळणी झालेली़ त्यामुळे जात पडताळणीचा अडसर नव्हता़ निवडणुकीसाठी खर्चही फारसा नाही़ अवघा बारा हजार रुपये खर्च आला़ प्रचारादरम्यान लोकांना चहा, वडापाव, त्यांच्या गाड्यांना पेट्रोल असा मर्यादित खर्च झाला आणि आम्ही सरपंच झालो, असे सहादू सांगत होते़
ग्रामपंचायतीबाबत खोलात शिरायला लागलो तर म्हणाले, ‘आम्हाला जास्त काही माहिती नाही, आम्ही आत्ताच सरपंच झालोय़ शिकून घेऊ हळूहळू़ गाव तंटामुक्त आहे़ हागणदारीमुक्त आहे, असे सांगताना गावाला एकही पुरस्कार नसल्याची खंत त्यांच्या चेहऱ्यावर उमटून गेली़ ही अकोले तालुक्यातल्या दिगंबरवाडीची कथा. आजूबाजूच्या गावातही हे असेच चित्र दिसते.
एकटे सरपंच निवडून आलेले. सदस्यांचा पत्ता नाही आणि ग्रामपंचायतीत शुकशुकाट.
डोंगररांगांच्या कुशीतले जायनावाडी-बिताका गाव. गावातल्या लोकांना नव्या सरपंचाचे नाव सांगता येईना अशी अवस्था. जायनावाडी-बिताका ही ग्रुप ग्रामपंचायत़ येथील सातही जागा अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत़ त्यातील चार जागा महिलांसाठी, तर उर्वरित तीन पुरुषांसाठी असे आरक्षण पडले आहे़ बाळू मारुती डगळे हे बिनविरोध सरपंच झाले़ तर दोन पुरुष सदस्य बिनविरोध निवडून आले़ एक पुरुष आणि चार महिलांच्या अशा पाच जागा रिक्त राहिल्या़ इथेही ग्रामपंचायत सदस्य मंडळ स्थापन होत नाही़ वरिष्ठांकडे मार्गदर्शन मागविले आहे, असे ग्रामसेवक चव्हाण सांगत होते़
शेजारच्या चंदगिरवाडीत वेगळी अवस्था नाही. सात सदस्यांसाठी मतदान होते. सरपंचपदासाठी ६ जण निवडणुकीच्या आखाड्यात उतरले़ त्यातून यशवंता बेंडकुळी हे निवडून आले़ तीन सदस्यही बिनविरोध निवडले गेले़ पण चार जागा रिक्त राहिल्या़ या चारही जागा महिलांच्या आहेत़ या गावात सलग पंधरा वर्षे महिलाराज होते़ गंगूबाई चौरे, सकूबाई इदे, हिराबाई भांगरे यांनी पंधरा वर्षांच्या काळात सरपंचपद भूषविले़ तरीही नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत एकाही महिलेने सदस्यपदासाठी अर्ज भरला नाही, हे विशेष़आता पुरेशा संख्याबळाअभावी येथेही ग्रामपंचायत सदस्य मंडळ स्थापन होणार नाही आणि लोकनियुक्त सरपंचांचे करायचे काय, हा प्रश्न अनुत्तरितच आहे़
परतीच्या वाटेत कोंभाळणे लागले. हे बियाणांची आई राहीबाई पोपेरे यांचे गाव़ रस्त्याकडेलाच राहीबार्इंचे घर लागते़ सहज त्यांच्या घराकडे वळालो़ दारातच जुन्या लांबट वांग्याचे बियाणे वाळत पडलेले होते़ राहीबार्इंचा मुलगा भेटला़ त्याने पाणी दिले़ राहीबार्इंविषयी विचारले तर म्हणाला, ‘त्या गुजरातला गेल्या आहेत़ गुजरात सरकारने त्यांना बोलावले आहे़ सात दिवस त्या तिकडेच राहणार आहेत़’ राहीबाई पोपेरे याही आदिवासी महिलाच़ पण त्यांचे नाव आज जगभर आदराने घेतले जात आहे़ चंदगिरवाडी आणि कोंभाळणे या दोन गावांमधील अंतर पाच किलोमीटरचे़ पण महिलांमध्ये पडलेले कितीतरी पिढ्यांचे अंतर अस्वस्थ करत राहिले़

(लेखक ‘लोकमत’च्या अहमदनगर आवृत्तीत उपसंपादक आहेत़)

Web Title: Panchayat Raj. Only Sarpanch. No Member. New problem

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.