मनातल्या गाठी उकलायच्या असतील तर शरीराला विसरून कसं चालेल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2018 06:35 AM2018-10-07T06:35:21+5:302018-10-07T06:35:21+5:30

मनात साठवलेल्या गाठी उलगडायच्या असतील तर शरीराला विसरून चालणार नाही हे बुद्धाने सांगितलेले सत्य आजचे विज्ञान अधोरेखित करते आहे.

notice your body while solving mind problems | मनातल्या गाठी उकलायच्या असतील तर शरीराला विसरून कसं चालेल?

मनातल्या गाठी उकलायच्या असतील तर शरीराला विसरून कसं चालेल?

Next


-डॉ. यश  वेलणकर

अनेक माणसांच्या मनात कसली तरी भीती असते. कुणाला गर्दीची, कुणाला उभे राहून बोलण्याची, कुणाला अंधाराची, लिफ्टमधून एकटे जाण्याची. कुणाच्या मनात अपघाताचे, मृत्यूचे विचार येतात आणि भीती वाटते. कुणाला अचानक भीतीचा अटॅक येतो, शरीराला घाम फुटतो, हातपाय कापू लागतात.

शरीरातील संवेदना आणि मनातील विचार यांचा संबंध काय, असा प्रश्न अनेकांच्या मनात येतो. या प्रश्नाचे उत्तर मेंदूविज्ञानाला गेल्या दहा वर्षात समजू लागले आहे. माणसाचा मेंदू कसे काम करतो याचा उलगडा होऊ लागल्याने शरीर आणि मन यातील द्वैत दूर होऊ लागले आहे.

मेंदूचे सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे स्वचे संरक्षण आणि  वंशविस्तार. त्यासाठी तो पंच ज्ञानेंद्रियांचा उपयोग करून परिसराची माहिती घेत असतो. त्याच बरोबर तो शरीरातील प्रत्येक पेशीशी संपर्क ठेवून शरीरात काय घडते आहे हेही जाणत असतो.

आपला मेंदू प्रत्येक क्षणी जगाची आणि शरीराची माहिती घेत असतो. त्या माहितीचा अर्थ लावून त्यावर प्रक्रिया करण्याचे कामही मेंदूत चालू असते, त्यातूनच विचार निर्माण होत असतात. आपण जागे असताना मेंदूत एकाचवेळी अनेक कामे चालू असतात. त्यातील फार थोड्या गोष्टी आपल्या जागृत मनाला समजत असतात. आपण कसला तरी विचार करीत असतो, त्याचवेळी कुठेतरी खाज उठू लागते. ही संवेदना मेंदू जाणतो, ती चांगली नाही असा अर्थ लावतो आणि हाताला हुकूम देऊन तो खाजवायला लावतो.

 पण हे सारे आपल्याला समजतेच असे नाही. आपण आपल्या नकळत शरीराच्या अनेक हालचाली करत असतो, नखे खातो, हात-पाय हालवतो, तोंड वेडेवाकडे करतो. शरीरातील संवेदना आपल्या जागृत मनाला फार कमी वेळ समजतात; पण मेंदू त्या सतत जाणत असतो, त्यांचा अर्थ लावत असतो आणि त्यांना प्रतिक्रि या करीत असतो.
प्रत्येक क्षणी बाह्य जगाची माहिती, शरीरातील संवेदना आणि मनातील विचार यांचे संयुग, एक गाठ तयार होत असते, मेंदू त्याचा अर्थ लावतो आणि त्यानुसार शरीरात बदल करतो. प्रत्येक ज्ञानेंद्रिय, शरीरातील तीन यंत्रणा आणि विचार यामुळे एकाचवेळी अशी अनेक संयुगे तयार होत असतात.

हे सर्व चालू असताना काहीतरी महत्त्वाचे घडते. तिकडे लक्ष वेधून घेण्यासाठी एखादे संयुग अधिक प्रबळ होते. त्या प्रबळ संयुगालाच आपण भावना म्हणतो. मनात येणारी प्रत्येक भावना ही ते संयुग आता सर्वात महत्त्वाचे आहे असे सांगण्यासाठीच असते. उदाहरणार्थ मी उद्या काय करायचे याचा विचार करीत रस्त्याने चाललो असताना अचानक कानावर भयानक कर्कश आवाज पडतो, मी दचकतो, छातीत धडधडू लागते, मनात भीती निर्माण होते. आणि मी पटकन रस्त्याच्या बाजूला उडी मारतो. त्यामुळे कर्कश आवाज करीत वेगाने जाणा-या बाइकपासून मी वाचतो. त्या क्षणी ही उडी मारण्याची कृती अत्यावश्यक होती. भयानक आवाज, तो ऐकल्याबरोबर शरीरात होणारे बदल, त्यामुळे छातीत वाढलेली हृदयाची गती आणि मनातील भीती यांचे संयुग तयार होते. हे संयुग प्रबळ असते त्यामुळेच मी पटकन कृती करू शकतो, उडी मारू शकतो. हे संयुग, ही गाठ माझ्या मेंदूत साठवली जाते. कोणत्याही भावनेमध्ये विचार, भावना आणि शरीरातील संवेदना यांची अशी एकत्न गाठ बांधली जाते.
 

म्हणूनच मनातील नकारात्मक भावना, भीती, चिंता, संताप यांच्यात बदल घडवायचा असेल तर केवळ विचार बदलून उपयोग होत नाही, ती भीती पुन्हा पुन्हा डोके वर काढत राहते.

मी माझ्या घरात बसलेला असताना मला रस्त्यावर घडलेला प्रसंग आठवतो. पुन्हा कल्पनेनेच मी तो कर्कश आवाज ऐकतो, माझ्या छातीत धडधडू लागते आणि भीती वाटते. घरात गाडी येणार आहे का असे मी माझ्या मनाला समजावतो, घाबरण्यासारखे काहीही नाही असा विचार करतो तरीही भीती पूर्णत: जात नाही. आता मला झोपेत भीतिदायक स्वप्ने पडतात आणि मी दचकून जागा होतो. केवळ विचार बदलून, बी पॉझिटिव्ह असे आठवून भीती कमी होत नाही कारण या भीतीच्या गाठीतील संवेदनांचा अर्थ मेंदू लावतो आहे तो बदलला जात नाही. तो बदलण्यासाठी पुन्हा भीती वाटेल त्यावेळी माझे लक्ष शरीरावर नेऊन छातीत, पोटात काय होते आहे ते मी जाणायला हवे आणि जे काही जाणवते आहे त्याचा स्वीकार करायला हवा.

छातीत धडधडते आहे, पोटात खड्डा पडल्यासारखे वाटत आहे, ओके, हे कुठे कुठे होते आहे आणि कोठे होत नाही हे एखाद्या शास्त्नज्ञासारखे साक्षीभावाने पाहायला हवे. मी शरीरातील संवेदना जाणतो आणि तिला प्रतिक्रिया न करता, तिचा स्वीकार करतो त्यावेळी त्या संवेदनेचा मेंदूत जो अर्थ साठवला गेला आहे तो बदलतो. फोबिया, पॅनिक अटॅक, आघातोत्तर तणाव यांचा त्रास कमी होतो. 

मनात साठवलेल्या गाठी उलगडायच्या असतील तर शरीराला विसरून चालणार नाही हे बुद्धाने सांगितलेले सत्य आजचे विज्ञान अधोरेखित करते आहे.
याच तंत्राचा उपयोग करायला माइण्डफुलनेस थेरपीमध्ये शिकवले जाते..

संवेदनांचा अर्थ  लावला जाताना..
 

* आपला मेंदू स्वत:च्या शरीराची माहिती तीन प्रकारांनी मिळवत असतो. 

1 शरीराचा तोल सांभाळण्याचा मेंदू कानातील यंत्रणेच्या सहाय्याने सतत प्रयत्न करीत असतो, ही पहिली यंत्रणा वार्धक्यामध्ये कमजोर होऊ लागते त्यामुळे तोल जाऊ लागतो. 

2 दुसरी यंत्रणा शरीरातील सांध्यांशी जोडलेली असते, त्यामुळे आत्ता या क्षणी शरीर कोणत्या स्थितीत आहे, हात कोठे आहेत, मान कशी आहे हेही मेंदुला समजत असते.  

3 तिसरी यंत्रणा ही त्वचा आणि  शरीरातील इंद्रिये यांच्याशी जोडलेली असते. भूक लागली आहे, शी किंवा शू होते आहे हे या यंत्नणेमुळे आपल्याला कळते. 
 

या तीन ही यंत्रणा शरीरात काही संवेदना निर्माण करतात.या संवेदना मेंदू जाणतो , त्यांचा अर्थ लावतो अणि त्यानुसार काय करायचे हे ठरवतो, तशी कृती करतो. 

माणसाचा मेंदू या संवेदनांचा अर्थ लावायला हळुहळू शिकत असतो

(लेखक मनोविकासाच्या तंत्रांचे अभ्यासक आहेत.)

yashwel@gmail.com

Web Title: notice your body while solving mind problems

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.