...माय चाइल्ड इज सेफ! कोयनेच्या इतिहासातली काळी पहाट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2017 04:44 PM2017-12-09T16:44:49+5:302017-12-10T07:06:21+5:30

महाराष्ट्राची वरदायिनी कोयना ! कृष्णा नदीची उपनदी ! या नदीवर १९६४ मध्ये शंभर टीएमसी पाणीसाठ्याचे भले मोठे धरण बांधून पूर्ण करण्यात आले. ११ डिसेंबर १९६७ ही कोयनेच्या इतिहासातली काळी पहाट! भल्या सकाळी बसलेल्या भूकंपाच्या धक्क्याने अख्खी कोयनानगरची वसाहत होत्याची नव्हती झाली!

... my child is safe! Black dawn in the history of Koyane | ...माय चाइल्ड इज सेफ! कोयनेच्या इतिहासातली काळी पहाट

...माय चाइल्ड इज सेफ! कोयनेच्या इतिहासातली काळी पहाट

Next
ठळक मुद्दे११ डिसेंबर १९६७ ही कोयनेच्या इतिहासातली काळी पहाट! भल्या सकाळी बसलेल्या भूकंपाच्या धक्क्याने अख्खी कोयनानगरची वसाहत होत्याची नव्हती झाली!

- वि.रा. जोगळेकर

महाराष्ट्राची वरदायिनी कोयना ! कृष्णा नदीची उपनदी !
या नदीवर १९६४ मध्ये शंभर टीएमसी पाणीसाठ्याचे भले मोठे धरण बांधून पूर्ण करण्यात आले.
११ डिसेंबर १९६७ ही कोयनेच्या इतिहासातली काळी पहाट! भल्या सकाळी बसलेल्या भूकंपाच्या धक्क्याने
अख्खी कोयनानगरची वसाहत होत्याची नव्हती झाली! या धरणाच्या उभारणीपासून कोयना प्रकल्पात अभियंता म्हणून काम केलेले सांगली जिल्ह्यातील तासगावचे वि. रा. जोगळेकर यांनी भूकंपाची ती पहाट अनुभवली आहे.
कोयनेच्या भूकंपाला आज पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने जोगळेकरांच्या स्मरणातली ‘ती’ पहाट...

10 डिसेंबर १९६७. भूकंपाच्या आदल्या रात्री
अलोरे येथील बंगल्याच्या पाय-यांवर बसून मी आणि आमचे सवदत्ती रावसाहेब रात्री ११ वाजेपर्यंत गप्पा मारत होतो. त्याही वेळी भूकंपाचे लहान मोठे धक्के केव्हातरी पायाला जाणवल्यासारखे वाटत होते. मला तरी त्यात नवीन काही वाटले नाही. सर्व प्रकल्पावर कुठेतरी मोठमोठी कामे, त्यासाठी सुरुंग लावणे हे चालू असे. त्याचे आवाज आणि धक्के अधूनमधून ऐकायला मिळत. त्याशिवाय अलीकडच्या काळात सौम्य भूकंपही चालू झाले होते; पण ते कुणी फारशा गांभीर्याने घेत नसत. रात्री सवदत्ती रावसाहेब घरी गेल्यानंतर मी निवांतपणे अंथरूणाला पाठ टेकली.

पहाटे पहाटे भूकंपाचा असला महाभयंकर धक्का बसल्यावर मात्र मी पूर्ण जागा झालो. पाठोपाठ असेच धक्के जाणवू लागले. माझ्या बंगल्याच्या आढ्याजवळचे काही दगड सुटून खाली पडले. इतक्यात सवदत्ती रावसाहेबांचा फोन आला, ‘कोयनानगरला काहीतरी अकल्पित घडलं आहे.’ भूकंपाचे धक्के चालू असतानाच मी कोयनानगरला फोन केला होता; गायकवाड आॅपरेटर ड्यूटीवर होता. तो म्हणाला की, ‘माझ्या इथे टेलिफोन एक्स्चेंजच्या भिंती चारी बाजूने कोसळायला लागल्या आहेत. फोन ठेवा, मी कीबोर्ड सोडून पळतोय. - आणि फोन डेड झाला.’

... ११ डिसेंबर १९६७ची ती पहाट. भूकंपाने सारा प्रलय घडवला. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ६.५ ते ७ इतकी होती; परंतु तेवढ्यानेही हाहाकार माजविला होता. अलोºयातले सर्व इंजिनिअर्स आणि कर्मचारी एव्हाना घराबाहेर पडून गटागटाने जमू लागले होते. कोयनेचे धरण शाबूत असेल ना, की फुटले असेल - असले अभद्र विचार सर्वांच्या मनात घोळत होते. कुजबुजीत भय होते. सर्वांच्या मनावर जीवघेण्या भीतीचे सावट पसरले होते. अलोरे आणि पोफळी येथील वरच्या हुद्याचे अधिकारी दिङ्मूढ झाले होते. डोंगराच्या पोटातील पोफळीचे पॉवर हाऊस बंद पडल्यामुळे तेथील सर्व इंजिनिअर्स अ‍ॅप्रोच टनेलमधून बाहेर पडले होते. वीज तर केव्हाच गडप झाली होती.

पहाटेचा अंधार अधिकच भीषण वाटत होता. काय करावे हे कोणालाच काही सुचत नव्हते. सुदैवाने अशा संकटसमयी माझे मन मुळीच विचलित व्हायचे नाही. मी आमच्या दळवी ड्रायव्हरला जीप घेऊन बोलावले. खटावकर व साळोखे या सहकारी इंजिनिअर मित्रांना सोबतीला घेऊन आम्ही कोयनानगरकडे सुटलो.

पोफळीचे सगळे गावकरीही रस्त्यावरच जमले होते. ‘कुंभार्ली घाटातून वर जाणं धोक्याचं आहे’ असे म्हणून घाटाच्या तोंडालाच आमची जीप गावकºयांनी अडवली. भूकंपाचे लहान-मोठे धक्के अजूनही बसतच होते. अडीच हजार फुटांच्या पंचधारा दरीच्या दोन्ही काठांचे डोंगरांचे सुळके धडाडा कोसळत होते. एखाद्या बॉम्बफेकीत धूर आणि धुळीचे लोट आकाशाकडे झेपावावेत तसा चित्रपट डोळ्यांसमोर दिसत होता. ‘कोयनानगरला जाणं फार महत्त्वाचं आहे, आम्ही पुरेपूर सावधगिरी घेऊन घाटातून जाऊ’, अशी गावक-यांची कशीबशी समजूत घालून आम्ही घाट चढायला सुरुवात केली. रस्त्याकडेला दरीच्या बाजूच्या भिंती (रिटेनिंग वॉल्स) ठिकठिकाणी कोसळल्या होत्या, तर डोंगरउताराकडची उलट बाजू ठिकठिकाणी ढासळून रस्त्यावर आली होती. लहानमोठे बोल्डर्स गडगडत येऊन रस्त्यात पडले होते.

हे सर्व पाहून आम्हाला हत्तीचे बळ आले. बोल्डर बाजूला ढकलत कशीबशी वाट काढून आमची जीप घाटमाथ्यावर पोहोचली. रस्त्याच्या जवळपास जंगलरानातील वस्त्या उद्ध्वस्त झाल्याचे वरून दिसू लागले होते. एव्हाना दिवस कासराभर वर आला होता. तो संध्याकाळला मावळल्यानंतर रात्रीच्या वेळी वाघरे आणि अस्वलांपासून माणसे आणि गायरांना संरक्षण मिळण्यासाठी बंदिस्त निवारा पुन्हा उभारणे सगळ्यात तातडीचे होते. म्हणून या वस्त्यांवरच्या माणसांनी मेढकी, वासे, चिवाट्या असला माल जंगलातून तोडून आणून घरागोठ्यांचे सांगाडे पुन्हा बांधायला सुरुवात केली होती. जंगलातून सरळसोट झाडांची कारवी कापून आणून त्या एकमेकाला खेटून उभ्या करत, घराच्या चारही भिंती बंदिस्त केल्या तर संध्याकाळपर्यंत तात्पुरत्या निवाºयाची तरी सोय होणार होती. हेळवाक दृष्टिपथात आले आणि एकदम लक्षात आले की धरण काही फुटलेले नाही.

सर्वांच्या तोंडातून एकदमच सुस्कारा बाहेर पडला. क-हाडहून हेळवाकमार्गे कोयनानगरकडे जाण्यासाठी कोयना नदीवर बांधलेला ब्रिटिशकालीन कमानीचा पूल कोसळला होता. कोयनानगरच्या नाक्यावर आम्ही आलो आणि समोरचे सारे दृश्य पाहून मात्र मन सैरभैर झाले. कोयनानगरची सगळी वसाहत उद्ध्वस्त झाली होती. कोयनेच्या अद्भुत प्रकल्पाची संकल्पना आणि सारे नियंत्रण जिथून होत असे ती सगळी कार्यालये, घरे आणि सारी मनुष्यवस्ती आता भग्न अवस्थेत विव्हळत समोर उभी होती. नाक्यावरती जखमींचा हलकल्लोळ उसळला होता. रात्रीच्या झोपत्या कपड्यांवरच लोक जमले होते. जे जखमी झाले होते, त्यांचे रक्त अंगावरच सुकले होते. सगळी वसाहत जमीनदोस्त झाली होती. समोरचे लोक सुचेल, वाटेल ते हताशपणी करीत होते. क-हाडहून येणारा रस्ता खचल्यामुळे त्या बाजूने काही मदत लवकर येण्याची आशा करण्यात अर्थ नव्हता. एवढ्यात आम्हाला कुणीतरी सांगितले, ‘या लोकांना घेऊन दवाखान्याकडं पळा.’

नाक्यावरच्या जखमींना दवाखान्याकडे नेऊन सोडण्यासाठी आम्ही जीप तिथेच सोडली आणि ढासळलेल्या ‘जी-वन्’ वसाहतीच्या मधल्या पाऊलवाटेने पळत आम्ही दवाखाना गाठला. दवाखान्यासमोर छोटे पटांगण होते. हमरस्त्यावरून तिथे जाण्यासाठी एक छोटा जोडरस्ता होता. त्याच्या दुतर्फा मृतदेह पसरले होते. कित्येक परिचित आणि त्यांची मुलेबाळे निश्चेष्ट पडली होती. मिळेल त्या कपड्यांनी कोणीतरी मृतदेह झाकले होते. त्यातही कोणाचे तरी हात, कोणाचे पाय उघडे पडले होते. त्यांची आप्तमंडळी शेजारी मूक उभी होती.
सगळ्यांच्या डोळ्यांतील अश्रू आटून गेले होते. कुठूनतरी मदत येईल याची वाट पाहत ते असहाय्य उभे होते. विषण्ण मनाने पुढे सरकत गेलो आणि पुढच्या पटांगणात... सार्वजनिक कार्यक्रमात हसतमुखाने आणि उत्साहाने भाग घेणारे, सर्वांना हवेहवेसे वाटणारे, लेखा शाखेमधील कुलकर्णी यांचे कुटुंब तिथे होते. मला पाहून उषावहिनींनी फोडलेला हंबरडा माझे काळीज चिरत गेला. आपल्या पतीचा मृतदेह मांडीवर घेऊन त्या बसल्या होत्या. सहानुभूती दर्शविण्याखेरीज आपण यावेळी वेगळे काहीच करू शकत नाही याची तीव्र कळ मनात उठली. कोणीतरी सांगितले की, सरनाईक दाम्पत्यच बळी गेले. धरणाकाठच्या पब्लिक स्कूलमध्ये नुकताच दाखल झालेला माझ्या आतेभावाचा मुलगा प्रसंगावधान राखून कॉटखाली गेला; परंतु घराची भिंत कॉटवरच कोसळली आणि त्याखाली दडपून तो कॉटखालीच गेला!

पुढे काय, असा फार मोठा प्रश्न होता. कुणीतरी ओळखीचे बरोबर घ्यावे म्हणून माझे मित्र पेटकर यांच्या घराकडे गेलो. सारे घर उद्ध्वस्त झाले होते. त्यांच्या अंथरूणावर भिंतीचे ढिगारे कोसळले होते. इतक्यात स्वत: पेटकरच कुठून तरी धावत आले, घरातले सगळे सुखरूप असल्याचे त्यांनी सांगितले. आणखी कोणाकोणाची आणि कुणाकडे चौकशी करणार? सगळेच हताश आणि सैरभैर झाले होते. चीफ इंजिनिअरांचे तांत्रिक स्वीय सहायक कुंदरगी हे सर्वांना प्रिय असलेले इंजिनिअर; ते अजातशत्रू आणि मार्गदर्शक होते. त्यांचा बंगला या वसाहतीमध्ये सर्वात उंचीवर होता. आपल्या एकुलत्या लाडक्या कन्येचा मृतदेह मांडीवर घेऊन अंगणातल्या औदुंबर वृक्षाभोवती बांधलेल्या कट्ट्यावर ते पती-पत्नी बसले होते. त्यांचे अश्रूही आटले होते. त्या घराच्या आउटहाऊसमोर एक वृद्धा कॉटवर बसली होती. तिच्याकडे अंगुलीनिर्देश करून, आधी तिला मदतीची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. ती वृद्धा तीन लहान मुलांचे मृतदेह घेऊन हताश बसली होती. तिची ही नातवंडे तर गेली होतीच; पण तिनेही, समोरच्या आउटहाऊसच्या व्हरांड्यात अडकलेल्या माणसांची सोडवणूक आधी करण्याची विनंती केली. आम्ही तिकडे पळत गेलो, तिथे दिसले की बरीच प्रौढ माणसे तिथे ओळीने झोपलेली होती. त्यांच्या डोके आणि पायाकडील दोन्ही भिंती कोसळून ही माणसे केव्हाच ठार झाली होती. आतापर्यंत तिथेच आम्ही ५५ मृतदेह मोजले होते. इथे थांबून आपण काहीच करू शकत नाही आणि इथे थांबण्यात अर्थही नाही असे जाणवल्यावर आम्ही पोफळी, अलोºयाहून काही मदत आणता येईल म्हणून तिकडे परतलो. या दोन्ही वसाहतींत कोपºया कोपºयावरती माणसे जमवून (कॉर्नर मिटिंग) त्यांच्याशी बोललो.


कोयनानगरची हालहवाल सांगितली. तिथे औषधपाणी, कपडे, खाद्यपदार्थ आणि मुलांसाठी दूध या सगळ्याची आवश्यकता आहे हे सर्वांना समजून चुकले. ‘इथून ४ वाजता ट्रक-डंपर्स कोयनानगरकडे सोडण्यात येतील त्यावेळी आपल्याकडून शक्य असेल ती मदत घेऊन यावी’, असा सर्वत्र पुकारा केला. पोफळीच्या दर्ग्यावरही भूकंपाने तीन व्यक्ती खलास केल्या होत्या. त्या बाजूला महाराष्ट्र शासनाचे मंत्री पी.के. सावंत हे गेले होते. आम्ही तिकडे जाऊन त्यांना भेटलो व कोयनानगरची परिस्थिती कथन केली. ते म्हणाले, ‘मी चिपळूणला होमगार्ड्सच्या मेळाव्यासाठी आलो होतो. तिथेच आता परत जाऊन कोयनानगरच्या मदतीसाठी होमगार्ड्सना पाठवितो. त्याचबरोबर मुंबईला सचिवालयाशी त्वरित संपर्क साधतो.’

पुढची मदत मिळविण्यासाठी आम्ही त्याच पावली पोफळीहून अलोºयाकडे परतलो. कोयनेतील भूकंपाच्या दुसºया दिवसांपासून भूकंपग्रस्तांचे पुनर्वसन करायला सुरुवात झाली. हे तर अभूतपूर्वच काम होते. हाकेच्या अंतरावर धरण भरलेले होते; पण इथे माणसांना प्यायला पाणी नव्हते. वीज नव्हती आणि रात्री झोपायला सुरक्षित निवाराही नव्हता. ड्रेनेजची व्यवस्था पूर्णत: कोलमडून गेली होती. खात्याच्या तिजोरीत पैसे होते; पण भूकंपात अडकलेल्या कर्मचाºयांना अ‍ॅडव्हान्स रूपाने पैसे कसे देता येतील, असा प्रश्न होता. आदल्या दुपारपासून कोयनानगरहून कºहाडकडे जाणारा रस्ता चालू झाला होता. कोयनानगरच्या वसाहतीतील अनेक मंडळी, उद्ध्वस्त झालेली आपली घरेदारे मागे सोडून, जखमींना किंवा आपल्या संबंधितांच्या मृतदेहांना सोबत घेऊन कºहाड-सांगली-सातारा-पुणे अगर आपापल्या गावी, मिळेत त्या वाहनांनी निघून गेली होती. एकाच दिवसात कोयनानगर म्हणजे उद्ध्वस्त झालेली युद्धभूमी वाटत होती.

यापुढचा एक महिनाभर आम्ही दररोज सकाळी, केवळ पुनर्वसनाच्या कामासाठी म्हणून कोयनानगरला येऊ आणि संध्याकाळच्या वेळी परत पोफळी, अलोºयास जात असू. राज्य परिवहन मंडळाने तत्परतेने पाठविलेल्या बसेसमधून इथल्या पीडितांना पास देऊन आपापल्या घरी पाठविण्यात येत होते. त्यांची प्रवास व्यवस्था करणे, पाणीपुरवठा व ड्रेनेज यंत्रणा पूर्ववत करणे, शासनाच्या आदेशानुसार कर्मचाºयांना अ‍ॅडव्हान्स रक्कम देण्यास मदत करणे, मदत म्हणून आलेल्या वस्तूंचे योग्य वाटप करणे अशी काही पुनर्वसनाची कामे होती. काही मृतदेहांवर तिथल्या जागेवरच अंत्यसंस्कार करावे लागले. ढासळून गेलेल्या घरांचे संरक्षण करण्यासाठी होमगाडर्सची नियुक्ती करण्यात आली होती. कर्मचा-यांना निवा-यासाठी छोट्या छोट्या राहुट्या पुरविण्यात आल्या होत्या.

आधी पाहिलेला मृतदेहांचा खच आणि या प्रकारची मदतीची कामे हे सगळे प्रत्यक्ष अनुभवल्यामुळे अन्नावरची आमची वासना पार उडून गेली होती. त्यातच बारीक पाऊस व कडाक्याची बोचरी थंडी यामुळे शरीरेही गारठली होती. आतापर्यंत इथल्या प्रकल्पावर जिवापाड राबून प्रेम करणारे मूर्ती, माने, देऊसकर आदी वरिष्ठ इंजिनिअर्स एव्हाना अन्यत्र बदलून गेले होते आणि ज्यांना या कामात काही राम वाटत नव्हता अशा इंजिनिअर्सची अलीकडे इथे नियुक्ती झालेली होती. कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांचे अश्रू पुसायला, त्यांना धीर द्यायला या ‘साहेब’ लोकांचा फारसा काही उपयोग नव्हता. इथे उरलेल्या माणसांचे मनोधैर्य पार खचून गेले होते. या सर्व जुन्या मंडळींच्या मनात एक गोष्ट मात्र अभिमानाने मिरवली जात होती, ती म्हणजे धरणासहित संपूर्ण प्रकल्प पूर्णत: शाबूत होता.

क-हाडहून निघाल्यानंतर कोयना नदीवरच्या ब्रिटिशकालीन पुलावरून हेळवाकमार्गे कोयनानगर वसाहतीकडे येता येत असे; परंतु हा पूल पडला होता. मात्र, कोयनानगरच्या वसाहतीजवळ कोयना नदीवर प्रकल्पांतर्गत एक पूल बांधला होता, त्यावरून थेट कºहाडला जाता येत असे. कोयनानगरला रसद पोचविण्यासाठी हा एक महत्त्वाचा पूल होता. अन्यथा कोल्हापूरहून खाली कोकणात उतरून रत्नागिरी-चिपळूणमार्गे किंवा महाबळेश्वरकडून खाली कोकणात उतरून पोलादपूर-चिपळूणमार्गे व पुनश्च कुंभार्लीचा घाट चढून कोयनानगरपर्यंत यावे लागले असते; त्यामुळे पुनर्वसनाच्या कामात मोठाच अडथळा निर्माण झाला असता. प्रकल्पांतर्गत बांधलेला हा पूल तरी भूकंपात सुरक्षित राहिला आहे किंवा नाही हे तपासणे आवश्यक होते. म्हणून दुसºया दिवशी मी कोयना नदीच्या पात्रात उतरून पुलाचे खांब, काँक्रीटचे बीम्स व स्लॅब आणि अबेटमेन्टस हे निरखून (व्हिज्युअल इन्स्पेक्शन) पाहत होतो. ते सुरक्षित असल्याचे माझ्या लक्षात आले. त्यानंतर पात्रातून वर चढून मी पुलाच्या मध्यावर आलो.

नेमक्या त्याच वेळी समोरून एक गाडी आली आणि त्यातून सर्वांचे आवडते, पितृतुल्य माजी मुख्य इंजिनिअर मूर्तीसाहेब व त्यांचे काही सहकारी खाली उतरले. भूकंपाची बातमी समजली तेव्हा ते दिल्लीत होते. तेथून विमानाने ते मुंबईला आले आणि मुंबई-पुण्याच्या आपल्या माजी सहकाºयांना बरोबर घेऊन त्यांनी कोयनानगरकडे धाव घेतली होती. माझ्याकडून सगळी परिस्थिती त्यांनी जाणून घेतली. सारी वसाहत जमीनदोस्त झाली असून, मी ५५ मृतदेह मोजल्याचे सांगितल्यावर ते अतिशय दु:खी झाले. परंतु संपूर्ण प्रकल्प पूर्णत: सुरक्षित असल्याचे सांगताच त्यांनी उद्गार काढले, ‘सो, माय चाइल्ड इज सेफ!’

 हे त्यांचे वाक्य आणि त्यामागील भावना, पुढे आयुष्यभर माझ्या हृदयात घर करून राहिल्या आहेत. आपल्या कामावर अपत्यवत् प्रेम करणारी अशी माणसे मला तिथे दिसली. केवळ पैसा आणि पैशाची ताकद यांच्यासाठी आपमतलबीपणा दाखविणारी बहुसंख्य माणसे आता सर्वत्र दिसतात. माणसाच्या भावना, बुद्धिमता आणि सृजनता यांच्या अफाट ऊर्जेला, आता केवळ पैशाची मस्ती आली असावी असा भास मला अलीकडे होतो.


शाश्वत ऊर्जेचा शोधयात्री!
प्रख्यात अभियंते वि.रा. (विठ्ठल राजाराम) जोगळेकर. कोयना धरणाच्या उभारणीपासून सलग तेरा वर्षे ते या प्रकल्पाशी संबंधित होते. त्यांनी अलीकडेच ‘शाश्वत ऊर्जेची शोधयात्रा’ हे आत्मकथन लिहिले आहे!
कोयना धरण उभारून सुमारे १०० टीएमसी पाणी अडविण्यात आले. कोयनेचे जे पाणी महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशाची भूमी भिजवत बंगालच्या उपसागराला रिक्त होते, ते पाणी अडवून पश्चिमेकडे वळवून केवळ पंचवीस किलोमीटर अंतरावर अरबी समुद्रात सोडून दिले. या प्रकाराने नदीचा ओघ उलट दिशेला वळविण्यात आपण केलेला पराक्रम योग्य की अयोग्य? या विचाराने जोगळेकर अस्वस्थ झाले. तेरा वर्षांच्या सेवेनंतर ऊर्जा ही गरज आहे; पण तिची निर्मिती निसर्गाचा समतोल बिघडून करता कामा नये, ऊर्जेची गरज भागविण्यासाठी असंख्य शाश्वत मार्ग निवडता येतील, त्याचा शोध घ्यायला हवा म्हणून त्यांनी शासकीय सेवेचा त्याग केला.
सांगलीला येऊन सहकारी तत्त्वावर शिवसदन संस्था स्थापन केली. बायोगॅस लावून प्रत्येकाच्या घरात ऊर्जानिर्मिती करता येणे शक्य आहे, याचे प्रयोग करीत निघाले. हजारो घरांत बायोगॅस बसविण्याची चळवळच त्यांनी हाती घेतली. स्वस्तातील घरबांधणीचे प्रयोग केले. आपल्या परिसरात मिळणा-या साधनांचा वापर करून स्वस्तातील घरे बांधण्याची ही संकल्पना राबविली. बायोगॅस आणि गोबरगॅस ही संकल्पना घराघरांत पोहोचविण्यासाठी जोगळेकरांनी अखंड धडपड केली आहे.

Web Title: ... my child is safe! Black dawn in the history of Koyane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.