आणखीही ब्लू व्हेल्स..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2017 01:00 AM2017-08-20T01:00:00+5:302017-08-20T01:00:00+5:30

आज चर्चा होते आहे ती केवळ ब्लू व्हेल गेमची आणि त्यानं निर्माण केलेल्या गांभीर्याची.

More Blue Whales .. | आणखीही ब्लू व्हेल्स..

आणखीही ब्लू व्हेल्स..

Next

- अॅड. प्रशांत माळी

आज चर्चा होते आहे ती केवळ ब्लू व्हेल गेमची आणि त्यानं निर्माण केलेल्या गांभीर्याची. मात्र हा केवळ एकच गेम नाही, ज्यानं तरुण पोरांची आयुष्यं बरबाद होताहेत. असे असंख्य गेम आहेत, जे तरुणांची आयुष्यं ओरबाडून घेताहेत. त्यांना देशोधडीला लावताहेत. त्यावर तातडीनं काही केलं नाही तर ‘आभासी’ वाटणारं हे भय असंच प्रत्यक्षात उतरत राहील..

नुकत्याच आलेल्या ब्लू व्हेल गेमनं जगभरात धुमाकूळ घातला. या गेमच्या मोहापायी अनेक तरुणांनी आत्महत्या केल्या, तर अनेकांना आपला जीव मुठीत धरून राहावं लागतंय. यातली आणखी भयानक गोष्ट म्हणजे आपण काय करतोय, आपण खेळत असलेल्या या गेमचे परिणाम किती गंभीर आणि भयंकर आहेत, याची जाणीवच या तरुणांना नाही, इतकं या गेमनं तरुणांना आपल्या कह्यात केलं आहे.
काहीतरी जगावेगळं आणि थरारक करण्याच्या नादात स्वत:चं अस्तित्व तर ते संपवत आहेतच; पण या गेमनं तरुण पोरांच्या आई-बापांनाही घोर लावला आहे. आपलं मूल तर या निळ्या देवमाशाच्या जाळ्यात अडकलं नाही ना, म्हणून त्यांच्याही मनात शंकेची पाल चुकचुकते आहे.

..पण आज चर्चा होते आहे ती केवळ ब्लू व्हेल गेमची. कारण त्याचं गांभीर्य झपाट्यानं पुढे येतंय. मात्र केवळ हाच एक गेम आहे का, ज्यानं तरुण पोरांची आयुष्यं बरबाद होताहेत? प्रमाण कमीअधिक असेल; पण असे असंख्य मोबाइल गेम आहेत, ज्यांनी तरुणांच्या मनावर गारुड केलंय आणि त्याचं आयुष्य ते ओरबाडून घेताहेत.

काय करता येईल यासाठी?
त्यासाठीचा नुसता कृतिआराखडा तयार करून उपयोगी नाही, त्याची अंमलबजावणीही झपाट्यानं झाली पाहिजे, तरच तरुणांच्या आयुष्याचा हा खेळ आपल्याला काही प्रमाणात थांबवता येईल. यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट केली पाहिजे ती म्हणजे भारतामध्ये मोबाइल गेमिंग संदर्भातील धोरण व नियामक कार्यकारिणीची स्थापना करणे. भारतात मोबाइल किंवा वेबसाइटद्वारे सध्या विविध आणि विचित्र गेम्स येऊ लागले आहेत. असे विचित्र गेम्स जेव्हा आपल्या पाल्यांकरवी खेळले जातात, तेव्हा त्यांच्या मनावर वाईट परिणाम होतो आणि आपल्या संस्कृतीतील जडण-घडण एक वेगळीच दिशा घेऊ शकते. आपल्या संस्कृतीचा एक विशिष्ट असा साचा आहे. त्या साच्यालाच आता धोका निर्माण झाला आहे. भारतात गेमिंगचा आशय किंवा त्यातील विषय नियमबद्ध करण्याच्या दृष्टीने एक रेग्युलेटर अर्थात, नियामक कार्यकारिणीची आवश्यकता आता अधोरेखित झाली आहे. या कार्यकारिणीचे स्वरूप असे असले पाहिजे की ज्यात सामाजिक बदल, संस्कृती आणि लहान मुलांची मानसिकता जाणणारे जाणकार सदस्य असतील. हे सर्व सदस्य प्रत्येक गेम भारतीय सायबर स्पेसमध्ये प्रसारित होण्याआधी पडताळून पाहतील. आता ही पडताळणी करणार कशी, तर त्या एका विशिष्ट गेमचा जगभरात इतिहास काय होता? त्याबद्दल लोकांच्या प्रतिक्रिया काय होत्या? त्या गेम्समुळे समाजावर काय परिणाम झाला? हा जो नवीन गेम देशात येऊ पाहात आहे त्यामुळे देशात समाजात काय परिणाम होऊ शकतो? आपल्या लहान मुलांवर काय परिणाम होऊ शकतो? यामुळे काही अनुचित गंभीर घटना घडू शकतात का?

आतापर्यंत असे बघण्यात आले आहे की, स्त्रियांवर बलात्कार करण्यासाठी उद्युक्त करणारे गेम्स किंवा पॉकीमॉनसारखे गेम ज्यात खेळणारी व्यक्ती कुठल्यातरी गोष्टीच्या शोधात अविरत फिरत राहते आणि त्यामुळे अपघात होतात, कामात लक्ष लागत नाही. सध्या घडत असलेल्या मुलांच्या आत्महत्या ज्या ‘ब्लू व्हेल’ नावाच्या गेमने होत आहेत, तो मुलांना आत्महत्या करायला उद्युक्त करणारा, अत्यंत जीवघेणा असा गेम आहे. असे विविध गेम्स आपल्या पाल्यांपर्यंत नकळतपणे पोहचतात. आपल्या मुलांच्या शालेय व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये शेअर होतात. लहान मुले अभ्यासाच्या किंवा मित्र- मैत्रिणीच्या दबावामुळे त्यांच्यातील मानसिक आजार किंवा त्यांच्या घरामध्ये असलेली परिस्थिती, वैफल्यातून अशा गेम्सकडे वळतात. मुलं अशा गेम्सकडे वळण्याचे कारण म्हणजे त्यातून मिळणारा झटपट आनंद. ज्याला आपण इन्स्टंट ग्राटीफिकेशन असेदेखील म्हणतो. अशा मुलांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात कौतुकाचा लोभ असतो. आणि जर त्यांचे कौतुक केले गेले नाही तर त्यांच्या मनात द्वेषभावना निर्माण होते आणि ही मुले जीवघेण्या अशा गेम्समध्ये नकळत गुरफटली जातात.

काय करता येईल?
जे गेम्स भारतात प्रसारित करावयाचे आहेत, त्यासाठी एक नियामक कार्यकारिणी असावी. त्यांच्याकडून ना हरकत प्रमाणपत्र घेतल्यानंतरच गेमसाठी परवानगी दिली जावी. हे प्रमाणपत्र देताना नियामक कार्यकारणीने खालील काही गोष्टी लक्षात घेऊनच प्रमाणपत्र द्यायचे की नाही, ते ठरवावे..

१) प्रायव्हसीच्या दृष्टिकोनातून मोबाइलधारकाकडून किंवा संगणक-धारकाकडून मागितली जाणारी विविध प्रकारची परवानगी त्या संबंधित कायद्याला अनुरूप आहे का, ते पडताळून पाहणे.

२) गेम जर मायक्रोफोन किंवा कॅमेराची परवानगी मागत असेल तर त्या गेमचा मायक्रो फोन किंवा कॅमेरासोबत काही संबंध आहे का, ते पाहणे.

३) जर गेम मोबाइलधारकांच्या लोकेशनबद्दलची माहिती मागत असेल तर त्या गेमचा आणि लोकेशनचा काही संबंध आहे का, याचा विचार केला जाणे आवश्यक आहे आणि गेमला लोकेशनबद्दलची माहिती पुरविली गेली तर संभाव्य परिणामांचादेखील विचार केला गेला पाहिजे.

४) या गेम्समध्ये जो स्टोरी बोर्ड वापरला जातो त्याचे विशेष परीक्षण करावे. जेणेकरून त्याद्वारे कोणत्याही प्रकारची शत्रुता, जातीयवाद, विरोधाभास निर्माण होत नाहीत याची दक्षता घेतली जावी.

५) या गेमची हिंसक पातळी किती आहे, असल्यास ती कोणत्या वयोगटासाठी उपयुक्त आहे किंवा कोणता वयोगट हा गेम खेळू शकेल, गेममुळे खेळणाऱ्या मोठ्या व्यक्तीवर किंवा लहान मुलांवर मानसिक परिणाम तर होणार नाही ना, हेदेखील तपासणे गरजेचे ठरते.

६) कोणत्या प्रकारच्या गेममुळे लहान मुले त्याच्या आहारी जातील किंवा कोणत्या प्रकारच्या गेममुळे मुलांचे त्यांच्या शाळेच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष होईल? तसेच, कोणत्याही गेममुळे मुलांकडून कुठल्या कायद्याचा भंग तर होत नाही ना हेदेखील पाहिले गेले पाहिजे.

७) या गेमची किंमत किती आहे, गेममध्ये पुढच्या लेव्हलला गेले तर जास्त पैसे तर मागत नाही ना? पैशाच्या बाबतीत जबरदस्ती तर करत नाही ना? तसेच गेममध्ये भारतीय चलनात पैसे घेणे किंवा भारतामध्ये वैध नसलेले कुठले चलन वापरले जाणे, इत्यादी प्रकार तर घडत नाहीत ना? किंवा वस्तुविनिमय म्हणजेच कोणत्याही वस्तूंची देवाण-घेवाण होत नाही ना? कोणत्याही प्रकारचे आव्हान गेममध्ये दिले जात नाही ना? उदा. गेमची पुढची लेव्हल सुरू करण्यासाठी कुणाला तरी इजा करा आणि पुढच्या लेव्हलला जा असे तर त्यात नाही ना? या गोष्टींची योग्य ती पडताळणी करावी.

८) जो गेम आपल्याकडे आपल्या समाजात आपल्या मुलांसाठी वापरला जातो, त्यात एखादा मालवेअर तर वापरला जात नाही ना? कोणी त्या मोबाइलला हॅक करण्याची शक्यता तर नाही ना? मोबाइल जर हॅक झालाच तर त्याचा गैरवापर होण्यापासून बचाव करता येईल का? याचा विचार करणे आवश्यक आहे.

Web Title: More Blue Whales ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.